Marathi Bible Reading | Monday 19th September 2022 | 25th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २४ वा सप्ताह  

सोमवार  १९ सप्टेंबर २०२२

 प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. 





संत जानेवारीअस 
महागुरू, रक्तसाक्षी (--- ३०५ )

संत जानेवारीअस ह्यांच्याविषयी इतिहासामध्ये अत्यंत थोडीशी माहिती उपलब्ध आहे. उत्तर इटलीतील बेनेवेंटुम शहराचे ते बिशप होते. डायक्लेशिअन सम्राटाच्या कारकीर्दीत त्यांना छळ सहन करावा लागला आणि अनेक उपधर्मगुरूंसह त्यांना मरणाच्या दाढेत ढकलण्यात आले.
'नेपल्सच्या कॅथिड्रलमध्ये मिराकोलो डी सान जेनारो' या नावाने त्यांचे अवशेष प्रसिद्ध आहेत. एका चांदीच्या व काचेच्या पेटिकेमध्ये या पवित्र बिशपांचे अवशेष ठेवण्यात आलेले आहेत. त्यात असलेले विशपांचे रक्त एरवी घट्ट व काळ्या रंगाचे दिसते परंतु वर्षातील तीन विविध प्रसंगी ते पातळ होताना व त्याचा रंग जांभळट- लालभडक होताना आढळतो. त्या रक्ताची घनता व पातळीदेखील वाढते. त्यावर बुडबुडे येऊ लागतात.

या चमत्काराची बरीच चिकित्सा करण्यात आलेली आहे. वातावरण, हवामान किंवा लोकांची गर्दी ह्यांचा परिणाम त्या रक्तावर कधीच होताना आढळत नाही. मोठमोठ्या वैज्ञानिकांना हे एक फार मोठे गूढ वाटत आलेले आहे. जवळ जवळ १०० वर्षे या रक्तावर संशोधन करण्यात आले तरी १३८९ पासून आतापर्यंत चमत्काराच्या नियमितपणात खंड पडलेला नाही. १३८९ पासूनची सर्व संशोधनपर माहिती तिथे जपून ठेवण्यात आलेली आहे.

संत जानेवारी अस हा नेपल्सचा आश्रयदाता संत आहे आणि वेसुवियस या पर्वताजवळ जेव्हा ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा सर्व लोक या संताचा धावा करतात व सर्व काही स्थिरस्थावर होते.

गरजवंताला आपल्या ऐपतीनुसार सहाय्य करावे आणि शेजाऱ्यांबरोबर सलोख्याने राहावे अशा प्रकारचा बोध आजच्या पहिल्या वाचनात करण्यात आला आहे. शुभवर्तमानात प्रभू येशू त्याच संदर्भाने  दिव्यावरून धडा देत आहे, आपण त्यावर चिंतन करू या.


✝️   

पहिले वाचन : नीतिसूत्रे ३:२७-३४
वाचन :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
कुटील माणसाचा परमेश्वराला वीट आहे.

माझ्या मुला, एखाद्याचे बरे करणे उचित असून ते करण्याचे तुझ्या अंगी सामर्थ्य असल्यास ते करण्यास माघार घेऊ नकोस.
एखादी वस्तू तुझ्याजवळ असता आपल्या शेजाऱ्याला असे सांगू नकोस की, तू जा आणि उद्या परत ये, म्हणजे ती मी तुला देईन. तुझा शेजारी तुझ्याजवळ निर्भय राहतो असे पाहून त्याचे वाईट योजू नकोस. एखाद्या मनुष्याने तुझे वाईट केले नसता त्याच्याशी उगीच भांडण करू नकोस.
जुलूम करणाऱ्याचा हेवा करू नकोस आणि त्याच्या कोणत्याही मार्गाने जाऊ नकोस. कारण परमेश्वराला कुटील माणसाचा वीट आहे, पण सरळांबरोबर त्याचे सख्य आहे. परमेश्वराचा शाप दुर्जनांच्या घरावर असतो, पण सज्जनांच्या वस्तीला तो आशीर्वाद देतो. उपहास करणाऱ्यांचा तो अवश्य उपहास करतो, पण दीनजनांवर तो अनुग्रह करतो
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १५:१- ५
प्रतिसाद : हे परमेश्वरा, जो नीतीने वागतो तो तुझ्या 
पवित्र पर्वतावर वस्ती करील.

१) हे परमेश्वर, तुझ्या पवित्र पर्वतावर कोण
 वस्ती करील ? जो सात्त्विकतेने चालतो 
आणिनीतीने वागतो तो, 
जो मनापासून सत्य बोलतो तो, 
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो.

२ )तो आपल्या बंधूंचे वाईट करत नाही, 
तो आपल्या शेजाऱ्यांची निंदा करत नाही, 
तो अधर्माला तुच्छ लेखतो, 
तो परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो.

३) तो आपण वाहिलेल्या शपथेने स्वत:चे 
अहित झाले तरी ती मोडत नाही, 
आपला पैसा व्याजी लावत नाही, 
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता 
लाच घेत नाही, जो असा वागतो तो
 कधी ढळणार नाही.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे, 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ८:१६-१८
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून दिवा दिवठणीवर ठेवतात. "

येशू लोकसमुदायाला म्हणाला, कोणी दिवा लावून तो भांड्याखाली झाकून ठेवत नाही किंवा पलंगाखाली ठेवत नाही, तर आत येणाऱ्यांना उजेड दिसावा म्हणून तो दिवठणीवर ठेवतो. प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही आणि कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा, ज्याच्याजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे म्हणून त्याला वाटते तेदेखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  आज प्रभू येशू दिव्याची उपमा देताना आपणांस दिसत आहे. दिवा हा स्वार्थासाठी कधीही जळत नाही. तर तो स्वतः जळून इतरांना प्रकाश देत असतो. तेही त्याच्यातील तेल संपेपर्यंत ! जेव्हा सगळीकडे अंधार पसरलेला असतो, तेव्हा लहान दिव्याचेही महत्त्व जाणवते. संत मदर तेरेजा ह्या त्या लहान दिव्याप्रमाणे आहेत. अनाथ, अपंग, गरीब लोकांच्या जीवनात प्रकाशाचे तेज पसरविण्याचे कार्य त्यांनी केले. कोलकत्ता येथे सुरू केलेले त्यांचे कार्य आता जगभर विस्तारले आहे. आजच्या शुभवर्तमानात प्रभू आपणांस हेच सांगत आहे की, आपण सदाचारी आयुष्य जगले पाहिजे. आपली स्तुती झाली नाही, तरी हरकत नाही पण आपण आपले सत्याचे, न्यायाचे व नीतीमत्त्वाचे जीवन जगत राहिले पाहिजे. तसेच दिवा बनून दुसऱ्याच्या जीवनातील अंधःकार नष्ट करण्यासाठी आपण याचना करू या.

प्रार्थना : हे प्रभू येशू, उदार अंतःकरणाने आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करून तुझी व गरजवंतांची सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या