Marathi Bible Reading | Tuesday 20th September 2022 | 25th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २५ वा सप्ताह  

मंगळवार २०  सप्टेंबर २०२२

“हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.” 



संत अँण्ड्रयू कीम, पॉल काँग आणि सहकारी  
कोरीयाचे रक्तसाक्षी (१८३९, १८४६, १८६२, १८६७) 

इ. स. १८८६ साली कोरियामध्ये धर्मप्रसार बंदी उठविण्यात आली आणि ख्रिस्ती धर्माचा अधिकृतरित्या प्रसार होण्यास सुरुवात झाली. परंतु तोपर्यंतच्या १०० वर्षात (१७८४-१८८६) १०,००० लोकांना रक्तसाक्षित्वाचे मरण आले. त्यात अकरा धर्मगुरू, ९२ प्रापंचिक, पंधरा कुमारिका किंवा व्रतस्थ भगिनी आणि अवघ्या १३ वर्षीय पीटर-यू- ताय चोल नावाचे बालक ह्यांचा समावेश होता.
अॅण्ड्रयू कीम हे पहिले कोरियन धर्मगुरू होते. त्यांनी ख्रिस्तावरील प्रेमापोटीआणि लोकांच्या श्रद्धाबांधणीसाठी कोरियामध्ये सुवार्ता प्रसार कार्यास प्रारंभ केला. परंतु दुर्दैवाने त्यांच्या गुरुदीक्षेच्या दिवशी त्यांच्या हाताला लावण्यात आलेले पवित्र तेल ओले असतानाच एक वर्ष व एक महिन्यानेच त्यांना रक्तसाक्षित्वाचा मुकूट घालण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे २६ वर्षांचे होते.
पॉल कॉंग ह्यांनी कोरियामध्ये सुवार्ता प्रसारानिमित्ते प्रवेश करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी पेकिंग शहराला खूप भेटी दिल्या. इ. स. १८०१ च्या छळवादानंतर कोरियामध्ये ख्रिस्ती लोकांचे नेतृत्व करणारे धर्मगुरूच नव्हते. शेवटी पॉल काँगच्या प्रयत्नांना यश आले आणि कोरियामध्ये एक महागुरू व काही धर्मगुरू ह्यांना सुवार्ता प्रसार करण्याची संधी मिळाली.
आज कोरियामध्ये जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्या श्रद्धेचा पाया ॲण्ड्रयू कीम, पॉल कॉंग आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी घातला. त्यामुळे १४ मे १९८४ साली पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी त्यांना संतपद बहाल केले.


✝️   

पहिले वाचन : नीतिसूत्रे २१:१-६,१०-१३
वाचन :नीतिसूत्रे या पुस्तकातून घेतलेले वाचन
 
"विविध नीतिसूत्रे."
राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो ते वळवतो.
मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंत:करणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे.
धर्माने आणि न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे.
चढेल दृष्टी आणि गर्विष्ठ अंतःकरण, तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूपे होत.
उद्योगी माणसाचे विचार समृद्धी करणारे असतात, जो कोणी उतावीळ करतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो.
असत्य जिव्हेने मिळविलेले धन इकडेतिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे, मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावतात.
दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यांवर तो कृपादृष्टी करीत नाही.
निंदकाला शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो,
सुज्ञाला शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञानी बनतो. न्यायी परमेश्वर दुर्जनांच्या घराकडे लक्ष देतो. तो दुर्जनांना विपत्तीत पाडतो
गरिबांची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालतो, तोही आरोळी करीत पण कोणी ऐकणारा नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११८:१.२७,३०.३४,३५.४४
प्रतिसाद : प्रभो, तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव.

१ )ज्यांचे आचरण शुद्ध आहे, 
जे परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात, ते धन्य! 
तुझ्या आदेशाप्रमाणे कसे वागावे ते मला समजावून दे, 
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.

२) मी सत्याचा मार्ग निवडला आहे, 
मी तुझे निर्णय आपल्यासमोर ठेवले आहेत. 
तुझे नियमशास्त्र आचरण्यास 
आणि ते मनापासून पाळण्यास मला शिकव.

३) तू आपल्या आज्ञांच्या मार्गावर मला चालव, 
कारण त्यातच मला आनंद आहे. 
मी तुझे नियमशास्त्र सदासर्वकाळ पाळत राहीन.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात. 
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. 
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ८:१९-२१
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
"हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत."
येशूची आई आणि भाऊ त्याच्याकडे आले, परंतु गर्दीमुळे त्यांना त्याच्याजवळ येता येईना. तेव्हा त्याला सांगण्यात आले की, तुझी आई आणि तुझे भाऊ तुला भेटण्याच्या इच्छेने बाहेर उभे आहेत. त्याने त्यांस उत्तर दिले, “हे जे देवाचे वचन ऐकणारे आणि पाळणारे तेच माझी आई आणि माझे भाऊ आहेत.”

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  आजच्या शुभवर्तमानातून येशूने आपल्या आईचा अपमान केला, हे विधान आपले विभक्त झालेले ख्रिस्ती बांधव पसरविताना दिसतात. परंतु खरोखर येशूने आपल्या आईचा अपमान केला का ? नाही! येशूने आपल्या आईची स्तुती केली व लोकांना तिचा आदर्श गिरवण्यास सांगितले. पवित्र मरिया ही निसर्ग नियमाप्रमाणे येशूची आई झाली नाही तर तिने परमेश्वराचे वचन ऐकले व त्यामुळे ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती राहिली. त्यामुळे देवाची आई होण्याचे भाग्य तिला प्राप्त झाले. संत पौल म्हणतो, 'येशूच्या रक्तामुळे व त्याच्या बलिदानामुळे आपण परमेश्वराला आपला बाप या नावाने हाक मारू शकतो. ' हे नाते जर टिकवायचे असेल तर पवित्र मरियेप्रमाणे देवाचे वचन ऐकावे लागेल व ते आपल्या जीवनात पाळावे लागेल. नामधारी ख्रिस्ती असण्यापेक्षा कृत्त्यांनी ख्रिस्ती असणे खूप गरजेचे आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी दिव्य आणि अमर वचने आत्मसात करण्यास व त्याप्रमाणे आचरण करण्यास आम्हाला प्रेरणा व धैर्य लाभो, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या