सामान्यकाळातील २७ वा सप्ताह  

मंगळवार ४ ऑक्टोबर २०२२

“मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे.”



असिसीचे संत फ्रान्सिस

• वर्तनसाक्षी (११८२-१२२६)


 ख्रिस्तसभा आज आसिसीचे संत फ्रान्सिस ह्यांचा सण साजरा करीत आहे.  ख्रिस्तात एकरुप होणारा आणि गरिबांपर्यंत सेवाकार्य करून देवाची सुवार्ता  पसरविणारा संत फ्रान्सिस प्रभू येशूचा खरा अनुयायी व शांतीचा दूत मानला जातो. एका श्रीमंत व्यापाऱ्याच्या कुटुंबात जन्मलेल्या फ्रान्सिसला वयाच्या २७ व्या वर्षी  देवाचे पाचारण झाले. आपल्या वाट्याला आलेली सर्व संपत्ती त्याने विकून टाकली व गरिबांना साहाय्य केले. येशूच्या प्रीतिने झपाटलेल्या फ्रान्सिसने तळागाळातील सामान्य जनांपर्यंत येशूची सुवार्ता घोषविली. अत्यंत साधे, नम्रतेचे व पावित्र्याचे  जीवन जगून संत फ्रान्सिसने धर्मबंधुंच्या सहाय्याने असंख्य लोकांना ख्रिस्तकडे  आणले. 

फ्रान्सिसने स्थापन केलेल्या संस्थेचा प्रचार इतका झपाट्याने झाला की १२१९ साली असिसी येथे भरलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला ५,००० अनुयायी (Friars) एकत्र आले होते. त्यांच्या प्रवचनांचा लोकांवर खूप प्रभाव होताना दिसत होता. स्थानिक भाषा, दररोजच्या जीवनातील उदाहरणे, प्रेमाने ओतप्रोत भरलेली रसाळ व नैतिक जीवनावरील प्रवचने अनेकांना आकर्षून घेऊ लागली.
सदा प्रसन्न परंतु तितकाच नम्र असलेल्या संत फ्रान्सिसने आपल्या प्रेषितीय
प्रवासात इटली, दक्षिण फ्रान्स आणि स्पेन येथे बरेच वाद मिटविले. त्याच्या प्रेमळ स्वभावामुळे असंख्य पापी लोक देवाकडे आले. सोबत सर्वसमावेशक सहानुभूती तर होतीच. ज्यांना धर्मगुरू न होता देवाचं कार्य करायचं होतं त्यांच्यासाठी फ्रान्सिसने १२२१ साली 'तृतीय श्रेणी' ची स्थापना केली. ह्या श्रेणीतील सभासद निरासक्त, वचनबद्ध आणि राजकारणापासून अलिप्त राहात असत.

फ्रान्सिसचे पावित्र्य तर आता इतके पराकोटीला पोहोचलेले होते की इ.
स. १२२६ साली त्याच्या शरीरावर येशूचे पाच पवित्र घाय (जखमा) दिसू लागले. त्यावेळी त्याचे वय अवघे ४४ वर्षे होते. शेवटी ४ ऑक्टो. १२२६ साली फ्रान्सिस मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन वर्षांत त्याला संतपद देण्यात आले.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय संत म्हणून त्याची ख्याती आहे.संत फ्रान्सिस असिसीकर ह्यांचे निसर्गावर नितांत प्रेम होते. त्यांचे सूर्यस्तोत्र खूप प्रसिद्ध आहे. इ.स. १२१२ साली त्यांनी येशू जन्माची महती वर्णन करणारा गाईचा गोठा तयार केला. त्यामध्ये सर्व जिवंत पात्रे त्याने सादर केली. तेव्हापासून गाईचे गोठे नाताळला तयार करण्यात येतात. 'हे प्रभो, मला तुझ्या शांतीचा दूत बनव' ही त्यांची प्रार्थना जगप्रसिद्ध आहे.

Lord, make me a channel of thy peace,
that where there is hatred, I may bring love;
that where there is wrong,
 I may bring the spirit of forgiveness;
that where there is discord, I may bring harmony;
that where there is error, I may bring truth;
that where there is doubt, I may bring faith;
that where there is despair, I may bring hope;
that where there are shadows, I may bring light;
that where there is sadness, I may bring joy.
Lord, grant that I may seek rather to 
comfort than to be comforted;
to understand, than to be understood;
to love, than to be loved.
For it is by self-forgetting that one finds.
It is by forgiving that one is forgiven.
It is by dying that one awakens to Eternal Life.

 

चिंतन : दारिद्र्य हा स्वर्गाकडे जाणारा मार्ग आहे आणि परिपूर्णतेचे मूळ आहे. - संत फ्रान्सिस असिसीकर

संत फ्रान्सिस असिसीचा आदर्श समोर ठेवून आपण सर्वतोपरि तन, मन, धना निशी देवाची सुवार्ता पसरविण्यास प्रेरणा मिळावी म्हणून प्रार्थना करू या.


✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  १:१३-२४

वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी म्हणून देवाने आपल्या पुत्राला माझ्याठायी प्रकट केले. "

यहुदी धर्मातल्या माझ्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी तुम्ही ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा पराकाष्ठेचा छळ करत असे आणि तिचा नाश करत असे आणि माझ्या पूर्वजांच्या संप्रदायाविषयी मी विशेष आवेशी असल्यामुळे माझ्यालोकांतल्या माझ्या वयाच्या पुष्कळ जणांपेक्षा यहुदी धर्मात मी पुढे गेलो होतो. तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले आणि आपल्या कृपेने बोलावले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रकट करणे बरे वाटले. आणि मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा केली. तेव्हा मानवांची मसलत न घेता आणि माझ्यापूर्वी झालेल्या प्रेषितांकडे येरुशलेमला वर न जाता मी सरळ अरबस्तानात निघून गेलो आणि तेथून दिमिष्क येथे पुन्हा परत आलो. मग तीन वर्षानंतर मी केफाला भेटायला येरुशलेमला वर गेलो आणि त्याच्याजवळ पंधरा दिवस राहिलो. परंतु प्रेषितांतील दुसरा कोणी माझ्या दृष्टीस पडला नाही, मात्र प्रभूचा बंधू याकोब माझ्या दृष्टीस पडला. तर पाहा, तुम्हांला मी जे लिहीत आहे ते असत्य लिहीत नाही, हे मी देवासमक्ष सांगतो. मग सुरिया आणि किलिकिया ह्या प्रांतात मी आलो, तेव्हा ख्रिस्तामध्ये असणाऱ्या यहुदियातील मंडळ्यांना माझी तोंडओळख नव्हती, त्यांच्या ऐकण्यात ऐवढेच येत असे की, “पूर्वी आपला छळ करणारा जो ज्या विश्वासाचा मागे नाश करत असे,” त्याचीच तो आता घोषणा करत आहे. तेव्हा ते माझ्यामुळे देवाचा गौरव करत असत.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४०:१-३, १३-१५
प्रतिसाद    हे देवा, मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालव.

१) हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस, 
तू मला ओळखतोस,
माझे बसणे आणि माझे उठणे तू जाणतोस,
तू दुरून माझे मनोगत समजतोस 
तू माझे चालणे आणि माझे निजणे बारकाईने पाहतोस,
 माझ्या एकंदर वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.

२) तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस, 
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस, 
भयप्रद आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे, 
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.

३) तुझी कृत्ये अद्भुत आहेत हे माझा जीव पूर्णपणे
 जाणून आहे, मी गुप्त स्थळी निर्माण होत असता 
आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे 
माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तुझे नियम मला समजावून दे, 
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १०:३८-४२
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"मार्थाने येशूचे आपल्या घरी स्वागत केले, मरियेने  चांगला वाटा निवडून घेतला आहे."

येशू एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणांजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थाला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन त्यांना म्हणाली, "प्रभो, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे, ह्याची आपल्याला पर्वा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा." प्रभूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी आणि दगदग करतेस, परंतु थोड्याच गोष्टींचे, किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  मार्था व मरिया यांच्या घरी आज येशू आला. परमेश्वराने आपल्या घरी येणे हे परम भाग्य आहे. मार्था संसाराच्या चिंता व काळजी यात इतकी गढून गेली होती की, प्रत्यक्ष परमेश्वरतिच्याकडे आला तरी ती मात्र कामात व्यस्त राहिली. मरिया मात्र त्याच्या पायाशी बसून राहिली आणि त्यामुळेच येशूचा म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराचा सहवास तिला लाभला. मार्थाला परमेश्वराजवळ असूनही त्याच्या सहवासात राहता आले नाही. परमेश्वर आपल्या चांगल्या कृत्याची नक्कीच दखल घेतो, परंतु त्याहूनही जास्त तो त्याच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तींची दखल घेतो. परमेश्वराच्या सहवासात मिळणारा आनंद या जगातील कोणत्याही गोष्टीतून मिळत नाही. आज आपण असिसीचा संत फ्रान्सिस यांचा सण साजरा करीत आहोत. ते म्हणतात. “या जीवनात काळजी आणि चिंतेमुळे सैतान मनुष्याचे। अंतःकरण कंटाळवाण्याचा प्रयत्न करतो आणि तेथे स्वतःसाठी निवासस्थान बनवतो.” मात्र परमेश्वराच्या सहवासात आपल्याला पवित्र जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. तीच प्रेरणा आपल्याला सेवेकडे नेते म्हणूनच त्याच्या सहवासात काही काळ राहून त्याची कृपा मिळविण्याचा आपण प्रयत्न करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझी सुवार्ता  पसरविण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️