Marathi Bible Reading |Monday3rd October 2022 | 27th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २ वा सप्ताह  

सोमवार ३ ऑक्टोबर २०२२


“पण माझा शेजारी कोण ?

 येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”

खरा ख्रिस्ती माणूस चांगल्या शोमरोन्याचा आदर्श आपल्या जीवनात आचरणात आणित असतो. आजच्या दाखल्यामधील लेवी आणि याजक ह्यांना नियमशास्त्र आणि देवाच्या आज्ञांचे ज्ञान होते मात्र ते प्रत्यक्ष कृतित आणण्यास असमर्थ ठरले. आपल्याला सुध्दा देवप्रीति आणि परस्परप्रीतिचे ज्ञान आहे मात्र प्रत्यक्ष जीवनात त्याचे अनुकरण करणे कठीण जाते. सार्वकालिक जीवन मिळविण्यासाठी आपण कृतीशील बनले पाहिजे. शोमरोनी माणसाने संकटात सापडलेल्या त्या जखमी माणसाची गरज ओळखली आणि वेळीच त्याला साहाय्य करुन त्याची गरज भागविली. खरा ख्रिस्ती माणूस गरजवंतांची गरज ओळखतो आणि त्यांच्या सहाय्याला धावून जात असतो. म्हणूनच जो |अडचणीत व संकटात सापडलेला आहे त्याची गरज ओळखतो तो चांगला  शोमरोनी बनतो. देवप्रीतिची आज्ञा परस्परप्रीतिच्या आज्ञेत पूर्णत्वास येते. म्हणूनच आपण आपले वैयक्तिक जीवन जगत असताना कितीही धार्मिक व भक्तीमान असलो तरी त्या धार्मिकतेला व भक्तीला शेजारप्रीतिच्या कृतीची जोड असायला हवी.

✝️   

पहिले वाचन : गलतीकरांस पत्र  १:६-१२

वाचन :पौलचे गलतीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"मी सांगितलेली सुवार्ता मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नव्हे तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली. "

मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हांला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून तुम्ही इतके लवकर अन्य सुवार्तेकडे वळत आहा, ती दुसरी नाही, पण तुम्हांला घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताच्या सुवार्तेचा विपर्यास करू पाहणारे असे कित्येक आहेत. जी सुवार्ता आम्ही तुम्हांला सांगितली तिच्याहून निराळी सुवार्ता आम्ही सांगितली, किंवा स्वर्गातून आलेल्या देवदूताने सांगितली, तरी तो शापभ्रष्ट असो. आम्ही अगोदर सांगितले तसे मी आताही पुन्हा सांगतो की, जी तुम्ही स्वीकारली तिच्याहून निराळी सुवार्ता कोणी तुम्हांला सांगितल्यास तो शापभ्रष्ट असो. मी आता मनुष्यांची मनधरणी करायला पाहत आहे की देवाची मी मनुष्यांना संतुष्ट करायला पाहत आहे का ? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतुष्ट करत राहिलो असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
बंधूनो, मी तुम्हांला हे कळवतो की, मी सांगितलेली सुवार्ता मनुष्यापासून प्राप्त झाली नाही आणि ती मला कोणी शिकवलीही नाही, तर येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १११:१-२, ७- १०क
प्रतिसाद    परमेश्वर आपल्या कराराची सदैव आठवण ठेवतो.

१ )परमेश्वराचे स्तवन करा, 
सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत 
मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन. 
परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, 
ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.

२)त्याच्या हातची कृत्ये साक्षात सत्य आणि न्याय्य आहेत 
त्याचे सर्व आदेश विश्वसनीय आहेत, 
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
ते सत्याने आणि सरळपणाने नेमलेले आहेत. 

३ )त्याने आपल्या लोकांना उद्धारदान पाठवून दिले आहे, 
त्याने आपला करार सर्वकाळासाठी नेमला आहे. 
त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे,
 त्याचे स्तवन सर्वकाळ चालते.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, 
म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १०:२५-३७
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"माझा शेजारी कोण ?"

कोणीएक शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला, “गुरुजी, काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल ? त्याने त्याला म्हटले, नियमशास्त्रात काय लिहिले आहे ? तुझ्या वाचनात काय आले आहे ?" त्याने उत्तर दिले, “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर." त्याने त्याला म्हटले, "ठीक उत्तर दिलेस, हे कर म्हणजे जगशील.”

परंतु स्वतःला नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला, “पण माझा शेजारी कोण ?" येशूने उत्तर दिले, “एक मनुष्य येरुशलेमहून खाली यरीहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला, त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. थोड्या वेळाने एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता, तो त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला. मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता, पडलेला माणूस होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला, त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांना तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून
उतारशाळेत आणले आणि त्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हांला देईन. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघांपैकी तुझ्या मते कोण झाला ?” तो म्हणाला, "त्याच्यावर दया करणारा तो.” येशूने त्याला म्हटले, “जा आणि तूही तसेच कर.”

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  देवप्रीती व शेजारप्रीती एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, हे येशू आज चांगल्या शोमरोन्याच्या दाखल्यातून आपणास सांगत आहे. शेजार प्रीती व खरा शेजारी ही संकल्पना येशू आज अगदी सोप्या  भाषेत स्पष्ट करीत आहे. गरजेत असलेली प्रत्येक व्यक्ती ही आपला खरी शेजारी असते व तिला केलेली प्रत्येक प्रामाणिक मदत म्हणजे शेजार प्रीती होय. देव प्रीतीचा उभा खांब व शेजार प्रीतीचा आडवा खांब यावर आपले तारण अवलंबून आहे. देव प्रीती व शेजार प्रीती एकमेकांस पूरक आहेत. आपल्या कृती आपल्या शब्दाहून जास्त बोलतात. प्रार्थनेसाठी जोडलेले हात जितके महत्वाचे आहेत. तितकेच महत्त्व सेवेसाठी पुढे आलेल्या हातांनाआहे. प्रार्थनेद्वारे देवप्रीती तर सेवेतून शेजार प्रीती साधता येते. शेजार प्रीती शिवाय देव प्रीती शक्य नाही. अगदी तसेच देव प्रीती शिवाय ही शेजार प्रीती म्हणजे केवळ स्वार्थी कृती होईल. देव प्रीतीची व शेजार प्रीतीची योग्य सांगड घालून परमेश्वराचे प्रेम सर्वत्र पसरवू या.
प्रार्थना :   हे प्रभू परमेश्वरा, तुला ओळखण्यास व शेजाऱ्यावर प्रीति करण्यास मला प्रेरणा व बळ दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या