सामान्यकाळातील २७ वा रविवार
२ऑक्टोबर २०२२
तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असे तर,.......
हबक्कूक संदेष्ट्याने देवाला विनवणी केली. देवाने हबक्कूला संदेश देऊन म्हटले ‘धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल'. अधर्मी जनांचा नाश होईल कारण त्यांच्या ठायी विश्वास नसतो. आज आपण आपल्या विश्वासासंबंधाने चिंतन करु या.
अनेकदा जीनवात निराशा येते. प्रार्थना, भक्ती, उपवास आणि दानधर्म करुन सुद्धा प्रार्थना निरुत्तर बनते. आपण देवाविषयी कूरकूर करु लागतो. अशा विचारांमुळे आपला देवावरील विश्वास कमी होऊ लागतो. मन अस्वस्थता, अस्थिरता, आजार व संकटे ह्यांनी ग्रासून जाते.
प्रभू येशू आजप्रेषितांना म्हणत आहे, 'तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर, ह्या तुतीला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.' आपण अनेक वेळा विश्वासात कमी पडतो म्हणूनच प्रेषितांप्रमाणे विनवणी करू या. 'प्रभूजी आमचा विश्वास वाढवा'. विश्वास म्हणजे, शरणागती व आत्मसमर्पण.
आजच्या दुसऱ्या वाचनात संत पौल म्हणतो, 'देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. ' आपण निराश न होता आपली धार्मिकता, नीतिमत्ता व आचरण तपासून पहावे आणि विश्वासाने जीवन जगावे म्हणून अंतर्मूख बनून प्रार्थना करू या.
✝️
पहिले वाचन : हबक्कूक १:२-३; २:२-४
वाचक : हबक्कूक या पुस्तकातून घेतलेले वाचन
“धार्मिक मनुष्य आपल्या विश्वासाने वाचेल.”
“हे परमेश्वरा, मी किती वेळ धावा करू? तू ऐकत नाहीस. जुलूम झाला असे मी तुला ओरडून सांगतो तरी तू सुटका करत नाहीस. मला अधर्म का पाहावयास लावतोस ? विपत्ती मला का दाखवतोस ? लुटालूट आणि जुलूम माझ्यासमोर आहेत. कलह चालला आहे, वाद उपस्थित झाला आहे.'
मग परमेश्वराने मला उत्तर दिले की, हा दृष्टान्त लिहून काढ, पाट्यांवर ठळक लिही, म्हणजे कोणीही तो वाचून धावत सुटावे. कारण हा दृष्टान्त नेमलेल्या समयासाठी आहे आणि तो शेवटाला जाण्यास स्वतःचे नेट करत आहे. तो फसवणार नाही. त्याला विलंब लागला तरी त्याची वाट पाहा, तो येईलच, त्याला विलंब लागावयाचा नाही, पाहा, तो गर्वाने फुगला आहे, त्याचा आत्मा त्याच्या ठायी सरळ नाही, धार्मिक तर आपल्या विश्वासाने वाचेल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९५:१-२, ६-९
प्रतिसाद : आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल!
१ )याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करू
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू.
उपकारस्मरण करत आपण त्याच्यापुढे जाऊ,
स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.
२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता
त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू कारण
तो आपला देव आहे आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा,
त्याच्या हातचा कळप आहोत.
३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल !
“मरिबा येथल्याप्रमाणे, रानात मस्सा येथील
प्रकरणाच्या दिवशी केल्याप्रमाणे
तुम्ही आपली मने कठोर करू नका.
तेव्हा तुमच्या वडिलांनी जरी माझी
कृती पाहिली होती तरी त्यांनी माझी परीक्षा केली
आणि मला पारखले.”
दुसरे वाचन २ तिमथी १:६-८,१३-१४
वाचक: पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास तू लाज धरू नये."
मी तुला आठवण देतो की, देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे.
म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यास आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. ज्या सुवचनांचा नमुना तू माझ्यापासून ऐकून घेतला तो, ख्रिस्त येशूच्या ठायी असलेला तुझा विश्वास आणि प्रीती ह्यांमध्ये दृढपणे राख, आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगे ती चांगली ठेव सांभाळ.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझे वचन हे सत्य आहे,
तू आम्हांला सत्यात समर्पित कर.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १७:५-१०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जर तुम्हांमध्ये विश्वास असेल. "
प्रेषित प्रभूला म्हणाले, आमचा विश्वास वाढवा. प्रभू म्हणाला, तुम्हांमध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असे तर, ह्या तुतीच्या झाडाला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.
तुम्हांपैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल, आताच येऊन जेवायला बैस ? उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही का ? सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो का? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर आम्ही निरुपयोगी नोकर आहो, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : श्रद्धा म्हणजे केवळ भक्ती नाही आणि केवळ ईशज्ञानदेखील नाही. श्रद्धा म्हणजे बांधिलकी. आजची वाचने ह्या बांधिलकीविषयी तीन चिंतने सादर करतात :
अ. खरी श्रद्धा ही दुःख आणि मोह ह्यांच्या भट्टीतून तावून सुलाखून निघत असते : आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा परमेश्वराला प्रश्न विचारीत असलेला आढळतो. खरे पाहता,हबक्कूकचे पुस्तक संदेष्ट्याचे दोन प्रश्न आणि परमेश्वराचे उत्तर ह्यांचे मिळून बनलेले आहे. ते दोन प्रश्न म्हणजे, नीतिमानांच्या वाट्याला दुःख का यावे ? हे दुःख दुर्जनांच्या हातून का यावे ? पुस्तकाच्या शेवटी याचे उत्तर मिळते : नीतिमानांची श्रद्धा बळकट करण्यासाठी.
ब. बऱ्या वाईट परिस्थितीत श्रद्धेला चिकटून राहणे मानवाच्या हिताचे असते : संत पॉल आजच्या दुसऱ्या वाचनात तीमथ्याला आपल्या श्रद्धेत टिकून राहण्याचे आवाहन करतो. तीमथ्याला संत पॉलकडून मिळालेला विश्वास तीमथ्याची आजी लोईस आणि त्याची आई युनिस ह्यांनी टिकवून ठेवलेला होता.
क. श्रद्धेची बांधिलकी पाळण्यासाठी दासाचे नम्रस्वरूप धारण करावे लागते : आजच्या शुभवर्तमानात अस्सल श्रद्धेचे सामर्थ्य वर्णन केल्यानंतर प्रभू येशू दासाचा दाखला देतो. तुतीच्या झाडाचे मूळ जमिनीत खोलवर गेलेले असते. ते उपटणे कठीण असते. श्रद्धावंताला कठीण गोष्टी सुलभ वाटत असतात. शिष्यांनी प्रभूला 'विश्वास वाढविण्या'ची विनंती केली होती. येशूने त्याऐवजी विश्वासाचा दर्जा सुधारण्यासाठी दासाचे नम्रस्वरूप धारण करण्याची शिकवण दिली. खरा श्रद्धावंत आपल्या कार्याचे श्रेय कधीही स्वतःकडे घेत नाही. तो 'निरूपयोगी दास' म्हणून काम करीत राहतो.
आत्मपरीक्षण : दुःखामध्ये मी श्रद्धेशी असलेली बांधिलकी कशाप्रकारे व्यक्त करतो ? श्रद्धा टिकविण्यासाठी दासाचे नम्रस्वरूप मी कशारीतीने धारण करू शकतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमची श्रद्धा दृढ कर. विश्वासाने आम्ही जीवन जगावे, म्हणून आम्हाला प्रेरणा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या