सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
शनिवार १ ऑक्टोबर २०२२
खरे मोठेपण मोठमोठ्या गोष्टी करण्यात नसून छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या मनाने करण्यात आहे हे तिने आपल्या जीवनाद्वारे दाखवून दिले व साध्याभोळ्या लोकांसमोर एक आगळावेगळा आदर्श उभा केला. "एका आत्म्याची कहाणी" या आत्मचरित्रात्मक लिखाणात तिने ही सत्ये नमूद केलेली आहेत. कोणत्याही गोष्टीविषयी चिंता करू नये, कुरकूर करू नये, आपण सहन करीत असलेले दुःख मुकाट्याने सोसावे, जे आपल्याशी तुसडेपणाने वागतात त्यांना विशेष प्रेम दाखवावे, हसत खेळत सर्वांशी मिळून मिसळून वागावे हे तिच्या जीवनातील काही महत्त्वाचे मूलमंत्र होते.
ख्रिस्तसभा आज विनम्र, बालसदृश्य मनोवृत्ती व प्रीतिने ओतप्रोतभरलेली बाळ येशूची संत तेरेजा हिचा सन्मान करीत आहे. देवावरील निखळ प्रेम व बाळ येशूविषयी महान भक्ती ह्यामुळे संत तेरेजाचे जीवन प्रार्थनामय बनले. मिशन विभागात कार्यकरणाऱ्या सर्व धर्मगुरुंना आणि मिशनऱ्यांना त्यांचे सेवाकार्य करण्यास प्रेरणा व बळ मिळावे म्हणून संत तेरेजाने आपले संपूर्ण जीवन प्रार्थना व त्याग करण्यात घालविले. संत तेरेजाचा आदर्श समोर ठेवून, नम्र, प्रेमळ आणि प्रार्थनामय जीवन जगण्यासाठी आपण मध्यस्थी करु या.
✝️
पहिले वाचन :यशया ६६:१०-१४
वाचन :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जशी एखाद्याची आई त्याचें सांत्वन करितें तसें मी तुमचें सांत्वन करीन; "
यरुशलेमेबरोबर आनंद करा, तिजवर प्रेम करणारे तुम्ही सर्व तिजमुळें उल्लासा; तिजसाठी शोक करणारे तुम्ही सर्व तिजबरोबर अत्यंत हर्षित व्हा; म्हणजे तुम्ही तिचे स्तन चोखून तृप्त व्हाल, सांत्वन पावाल व तिचें विपुल वैभव भोगून संतुष्ट व्हाल. कारण परमेश्वर म्हणतो, पाहा, नदीप्रमाणें शांति व पाण्याच्या पुराप्रमाणें राष्ट्रांचे वैभव मी तिजकडे वाहवितों; तुम्ही स्तनपान कराल, तुम्हांस कडेवर वागवितील, मांडीवर खेळवितील. जशी एखाद्याची आई त्याचें सांत्वन करितें तसें मी तुमचें सांत्वन करीन; यरुशलेमेंत तुमचे सांत्वन करीन. तें पाहून तुमचें हृदय आनं दित होईल, कोवळ्या हिरवळीप्रमाणे तुमची हाडें तरतरीत होतील; परमेश्वराचा हात त्याच्या सेवकांच्या ठायीं प्रगट होईल आणि त्याचा क्रोध शत्रूंवर होईल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र :१३१:१-३
प्रतिसाद : हे इस्राएला, आतांपासून सर्वकाळ तूं परमेश्वराची आशा धर.
१) हे परमेश्वरा, माझे मन गर्विष्ठ नाही,
माझी दृष्टि उन्मत्त नाहीं आणि
मोठमोठ्या व मला असाध्य अशा गोष्टींत मी पडत नाहीं.
२) खरोखरच मी आपला जीव स्वस्थ व शांत ठेविला आहे;
दूध तुटलेले बाळक आपल्या आईबरोबर असतें
तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बाळका सारखा माझ्या ठायीं आहे.
३) हे इस्राएला, आतांपासून सर्वकाळ तूं परमेश्वराची आशा धर.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जो कोणी माझ्या नांवाने अशा एखाद्या
बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १८ : १-५
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश कदापि होणार नाही. "
शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “स्वर्गराज्यात सर्वात मोठा कोण ?” तेव्हा त्याने एका बाळकाला बोलावून त्याला त्यांच्यामध्ये उभे केले आणि म्हटले, “मी तुम्हाला खचित सांगतो, तुमचा पालट होऊन तुम्ही बाळकांसारखे झाल्याशिवाय स्वर्गराज्यात तुमचा प्रवेश कदापि होणार नाही. म्हणून जो कोणी स्वतःला ह्या बाळकासारखे नम्र करतो तो स्वर्गराज्यात सर्वात मोठा होय.”आणि जो कोणी माझ्या नांवाने अशा एखाद्या बाळकाला जवळ करतो तो मला जवळ करतो.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजचे शुभवर्तमान नम्रतेविषयी आपणांस सांगत आहे. बालकाप्रमाणे निरागस जीवन जगण्यासाठी परमेश्वर आपल्याला आवाहन करीत आहे. आज आपण बाळ येशूची संत तेरेजा, चिमुकले फुल, जी मिशनऱ्यांची आश्रयदाती व धर्मपंडिता म्हणून गणली जाते तिचा सण साजरा करीत आहोत. तिच्या आयुष्यातील सर्व अडचणी, अपमान, दुःख व गरजा याद्वारे ती नम्रता शिकली. इतके की सर्वकाही परमेश्वराची एक देणगी आहे. असे ती मानत असे आणि त्यामुळेच अगदी तरुण वयात परमेश्वराने तिला ज्ञानाने भरले. बालक अगदी निरागस असते. ते कोणाला हानी पोहचवत नाही. ख्रिस्त म्हणतो की, जेव्हा आपण पापाशी जुळवून घेत नाही तेव्हा आपण मुलासारखे बनतो. निष्पाप पणाचे पुण्य प्राप्त करणे म्हणजे आपल्या मनात निर्माण होणाऱ्या पापाबद्दलच्या विकसित भावनाचा त्याग करूनमुलांसारखे राहणे. नम्रता आपल्याला स्वच्छ दृष्टी देते, तर निरागसपणा आपल्याला स्पष्ट दृष्टीकोण देतो. ज्याद्वारे आपण परमेश्वराला अपेक्षित जीवन जगू शकू. बालकाप्रमाणे नम्र व निरागस होऊन परमेश्वराचे राज्य मिळविण्याचा प्रयत्न करू या.
प्रार्थना : प्रभू येशू, आमच्याठायी नम्र हृदय निर्माण कर. नि:स्वार्थीपणे तुझी सेवा करण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या