सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
शुक्रवार ३० सप्टेंबर २०२२
-वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३४१-४२०)
ख्रिस्तसभा आज ख्रिस्तसभेतील महान धर्मपंडित संत जेरोम ह्यांचा सन्मान करीत आहे. संपूर्ण बायबलचे भाषांतर करून त्यावर स्पष्टीकरणात्मक भाष्य करणारे संत जेरोम म्हणतात, “पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान म्हणजे ख्रिस्ताविषयी अज्ञान होय."
सोफ्रोनियस युजेबियस हैरोनिमस असे लांबलचक नाव असलेला जेरोम दल्मातिया (युगोस्लाव्हिया) प्रांतात जन्माला आला. त्याने रोम शहरात अभ्यास केल्यानंतर वृत्तीने ज्ञानपिपासू असलेला हा अभ्यासू बुद्धीमान माणूस ज्ञानाच्या शोधार्थ बरीच वर्षे दूरदूरचा प्रवास करीत राहिला.
पहिल्या प्रथम तो ईशज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी ट्रेव्हेस येथे गेला. त्या ठिकाणी इजिप्तच्या वाळवंटात संत अथनेशियस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ३० वर्षापूर्वी मठवासियांसाठी एक ख्रिस्ती प्रशिक्षण केंद्र उघडण्यात आले होते. त्याचे रूपांतर ख्रिस्ती संन्यासाश्रमात करण्यात आले होते. तेथून तो अंत्युखिया येथे गेला. तेथे त्याने ग्रीक आणि पवित्र शास्त्र ह्यांचा अभ्यास केला. मात्र तिथे राहून आपण ख्रिस्ती धर्माऐवजी परधर्माच्या विचारसरणीत हळूहळू वाहून जाण्याचा धोका त्याला जाणवल्यामुळे तो तेथून एक दाट जंगलात निघून गेला. तेथे ५ वर्षे त्याने विरक्तवृत्तीची साधना केली आणि दरम्यान हिब्रू भाषा आत्मसात केली.
इ. स. ३८० साली वयाच्या ३९ व्या वर्षी त्याला धर्मगुरुपदाची दीक्षा देण्यात आली. गुरुदीक्षेनंतरचे एक वर्ष त्यांनी कॉन्स्टॅन्टिनोपल येथे राहून संत ग्रेगरी नाझियान्झेन ह्यांची शिकवण समजून घेतली. त्यानंतर ते रोम येथे गेले.
पोप महाशयांनी त्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता पाहून त्यांना ५ वर्षांसाठी आपले सेक्रेटरी म्हणून नेमले. तेथे असताना त्यांना वायबलच्या आवृत्तीमध्ये सुधारणा सुचविल्या. एक ग्रंथालय उघडले. साध्वी स्त्रियांना पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त केले.
बायबल अभ्यासासाठी एक मठ व एक शाळा ह्यांचे प्रशासन सांभाळीत असतानाच फा. जेरोम ह्यांनी आपले बायबल भाषांतराचे कार्य जोरात सुरू ठेवले. जुन्या व नव्या करारातील बरीचशी पुस्तके हिब्रू व अरेमाईक भाषांतून त्यांनी लॅटीन भाषेत भाषांतरित केली.
फा. जेरोम ह्यांची अभ्यासूवृत्ती, विविध भाषांवरील प्रभुत्व बायबलचे ज्ञान आणि चिकाटी ह्यामुळे तब्बल १८ वर्षांनी इ.स. ४०४ साली हे बायबल भाषांतराचे कार्य त्यांनी तडीस नेले. त्या आवृत्तीला 'व्हल्गेट' (म्हणजे दैनंदिन वापरासाठी बायबलची आवृत्ती) असे नाव देण्यात आले. पुढे ११०० वर्षांनी ट्रेंट इथे भरलेल्या विश्वपरिषदेमध्ये 'जेरोमकृत भाषांतरीत बायबल हे ख्रिस्तसभेचे अधिकृत भाषांतर आहे' अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव करण्यात आला.
नितांत श्रद्धा आणि तीक्ष्ण बुद्धिमत्ता ह्यांचा सुंदर मिलाफ त्यांच्याठायी
घडून आलेला होता. मोठ्या खंबीरपणे बायबलवर सडेतोडपणे बोलणारे संत
जेरोम रात्रीच्या रात्री प्रार्थनेमध्ये एकांतवासात घालवीत. पुष्कळ उपासतापास करीत.
शेवटपर्यंत त्यांनी आपल्या शरीराला अनंत आत्मक्लेश दिले.३० सप्टेंबर ४२० रोजी आपल्या परिश्रमाचे प्रतिफळ मिळविण्यासाठी स्वर्गीय निजधामी गेलेला हा महापुरुष ग्रंथपालांचा आश्रयदाता संत मानला जातो.
त्यांच्या मते 'पवित्र शास्त्र वाचल्यानंतर आपल्याला प्रार्थना कराविशी वाटली पाहिजे आणि प्रार्थना करीत असताना पवित्र शास्त्रातील वचनांचा आधार आपल्याला घ्यावासा वाटला पाहिजे.' 'पवित्र शास्त्राविषयीचे अज्ञान हे ख्रिस्ताविषयीचे अज्ञान होय. '
चिंतन : सतत काहीतरी करीत रहा, मग परमेश्वर येवो वा सैतान येवो, तुमचे हात पुष्कळशा चांगल्या गोष्टींनी भरलेले आहेत असे त्याला दिसले पाहिजे.-
संत जेरोम
✝️
पहिले वाचन : इयोब ३८:१.१२-२१,४०:३-५
वाचन :इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन
तू कधी प्रातः समयाचे नियमन केले आहेस का किंवा समुद्राच्या झऱ्यापर्यंत तुझा कधी शिरकाव झाला आहे का ?
परमेश्वराने वावटळीतून इयोबला उत्तर दिले. तो म्हणाला, "तू जन्मात कधी प्रातः समयाचे नियमन केले आहेस का ? प्रभातीला आपले स्थान दाखवून दिले आहेस का ? यासाठी की त्याने पृथ्वीच्या दिगंतास धरून तीवरील दुष्टांना झटकून टाकावे. तेव्हा मुद्रेच्या ठशाने जसा मातीला आकार येतो, तसा प्रभातीने पृथ्वीचा आकार व्यक्त होतो, सर्व वस्तू जशा काय त्याच्या पेहरावाप्रमाणे ठळक दिसतात. दुष्टांना त्यांचा प्रकाश नाहीसा होतो, त्यांचा उगारलेला हात मोडतो."
समुद्राच्या झऱ्यापर्यंत तुझा कधी शिरकाव झाला आहे का? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहेस का ? मृत्यूची द्वारे तुला दृष्टीगोचर झाली आहेत का ? तू अधोलोकांची द्वारे पाहिली आहेत का? पृथ्वीच्या विस्ताराचे तुझे आकलन झाले आहे का ? तुला हे सर्व ठाऊक असेल तर सांग.
"प्रकाशाच्या निवासाकडे नेणारी वाट कोणती ? अंधाराचे स्थान कोठे आहे ? त्याला त्याच्या प्रदेशाच्या सीमेपर्यंत नेऊन तुला पोचविता येईल का ? त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस का? हे सर्व तुला ठाऊक असलेच, कारण त्यावेळी तू जन्मला असावास, तू बहुत दिवसांचा म्हणावयाचा.'
मग इयोबने परमेश्वराला उत्तर दिले, “पाहा, मी तर पामर आहे, मी तुला काय उत्तर देऊ? मी आपला हात आपल्या तोंडावर ठेवतो. एकदा मी बोललो खरा, पण आता मी तुला काही प्रत्युत्तर देणार नाही. मी दोनदाही बोललो, पण आता पुन्हा बोलणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४०:१-३,७-१०,१३-१४अब
प्रतिसाद : हे परमेश्वरा, शाश्वत जीवनाने मला चालव.
१ )हे परमेश्वरा, तू मला पारखले आहेस,
तू मला ओळखतोस, माझे बसणे
आणि माझे उठणे तू जाणतोस,
तू दुरून माझे मनोगत समजतोस.
तू माझे चालणे आणि माझे निजणे
बारकाईने पाहतोस, माझ्या एकंदर
वर्तनक्रमाची माहिती तुला आहे.
२) मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ ?
मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ ?
मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस,
अधोलोकी मी आपले अंथरूण केले,
तरी पाहा, तेथे तू आहेस.
३) मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या
अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो,
तरी तेथेही तुझा हात मला चालवील,
तुझा उजवा हात मला धरून ठेवील.
४) तूच माझे अंतर्याम निर्माण केलेस,
तूच माझ्या आईच्या उदरी माझी घडण केलीस.
विलक्षण आणि अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे,
म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका,
तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १०:१३-१६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
जो येशूचा अव्हेर करतो तो ज्याने त्याला पाठवले त्याचा अव्हेर करतो.
येशू म्हणाला, हे खोराजिना, तुझी केवढी दुर्दशा होणार! हे बेथसैदा, तुझी केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्हांमध्ये जी पराक्रमाची कृत्ये घडली ती सोर आणि सिदोन ह्यात घडली असती तर त्यांनी मागेच गोणपाट आणि राख अंगावर घेऊन बसून पश्चात्ताप केला असता. ह्यामुळे न्यायाच्या वेळी तुमच्यापेक्षा सोर आणि सिदोन ह्यांना सोपे जाईल. हे कफर्णहूम, तू आकाशापर्यंत उच्चपदाला पोहोचशील काय ? तू अधोलोकापर्यंत उतरशील.
नंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो, जो तुमचा अव्हेर करतो तो माझा अव्हेर करतो आणि जो माझा अव्हेर करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा अव्हेर करतो.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : जेव्हा एखाद्या व्यक्तीठायी कृतघ्नतेची भावना असते, तेव्हा त्या व्यक्तीचा नाश होत असतो. आज प्रभू येशू ख्रिस्त बेथसैदा व खोराजीन शहराकडे पाहून म्हणत आहे की, “तुमच्या कृतघ्नपणामुळे तुमचा नाश होणार. कारण परमेश्वराने तुमच्या ठायी महानकृत्ये केली परंतु तुम्ही त्यांचे ऋणी राहिले नाहीत व देवावर विश्वास ठेवून, पश्चात्तापही केला नाही, त्यामुळे तुमचा नाश होणार." आपल्या जीवनातही परमेश्वराने अनेक महान कृत्ये केली आहेत. पण आपण देवाचे आभार मानतो का? त्या महत्कृत्यांकडे बघून आपल्या हृदयात पश्चात्तापाची भावना उगवते का ? जर उगवत असेल तर आपले कल्याण होईल. जर उगवत नसेल तर आपण दुर्दशेच्या वाटेवर • मार्गक्रमण करणार याची नोंद घ्यावी.
प्रार्थना : हे प्रभू येशू, पश्चातापी अंत:करणाने तुजजवळ येण्यास व तारणारा म्हणून स्वीकारण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या