सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
गुरुवार २९ सप्टेंबर २०२२
संत मायकल, राफायल आणि गाब्रिएल
ख्रिस्तसभा आज संत मायकल, संत गब्रिएल व संत राफायल ह्या महान देवदूतांचा सण साजरा करीत आहे. आपल्या जीवनात देवदूतांना अतिमहत्त्वाचे स्थान आहे.
संत मायकल
महादूत
ख्रिस्तसभा आज महादूत संत मायकल ह्याचा सण साजरा करीत आहे. देवदूतांनी जेव्हा सैतानाला स्वर्गातून हाकून दिले तेव्हा मायकल या महादूताने सैतानावर मिळविलेल्या विजयाबद्दल मायकल ह्याला 'तू देवासमान आहेस' असे म्हटल्याचे मानले जाते. मायकल या शब्दाचा अर्थच मुळी 'देवासारखा' असा आहे.
पवित्र शास्त्रामध्ये देवाने निवडलेली प्रजा जेव्हा पर्शियाच्या तावडीतून मुक्त झाली तेव्हा मायकल हा महादूत त्यांचा सांत्वनकर्ता व मार्गदर्शक होता. मक्काबींच्या विजयाची आशा त्याने जनमानसात पेरलेली होती.
प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत ख्रिस्ती लोक आजाऱ्यांना संत मायकलच्या आश्रयाखाली ठेवीत. कलस्सै येथील त्याच्या नावाने वाहणाऱ्या औषधमुक्त झऱ्यात स्नान केल्याने आजारी बरे होतात आणि पवित्र त्रैक्याच्या स्तुतीनंतर ह्या महादूताजवळ विनंती केली तर तो आपल्याला आजारांच्या तावडीतून मुक्त करतो अशी त्यांची श्रद्धा होती.
संत मायकल हा पोपमहाशयांचा रक्षकदूत आणि साक्रामेंताच्या पेटिकेचा संरक्षणकर्ता संत आहे.
संत राफायल
राफायल या हिब्रू नावाचा अर्थ 'देवाने बरे केले आहे' असा होय. पवित्र शास्त्रातील तोबीतच्या पुस्तकात स्वत: राफाएल दूताने साक्ष दिल्याप्रमाणे देवासमोर उभे राहणाऱ्या सात दिव्यदूतांपैकी तो एक आहे. जुन्या करारात तोबीत नावाच्या माणसाचे आंधळेपण त्याने कसे बरे केले आणि मिडिया देशात जाणाऱ्या त्याच्या मुलाला राफाएल दूताने कसे मार्गदर्शन केले त्याचे वर्णन आलेले आहे. त्यामुळे संत राफाएल हा प्रवाश्यांचा, तरुणांचा आणि निष्पाप बालकांचा आश्रयदाता संत मानला जातो.
पौर्वात्य ख्रिस्तसभेत गेली १००० वर्षे संत राफाएलची भक्ती विकसित झालेली आहे. जगभरच्या ख्रिस्तसभेच्या सणदर्शिकेमध्ये राफाएलचे नाव १९२२ साली जोडण्यात आले.
संत गॅब्रिएल
'गॅब्रिएल' ह्या हिब्रू नावाचा अर्थ 'देवाचे सामर्थ्य' असा होय. बायबलमध्ये आणि ख्रिस्ती उपासनेमध्ये वर्णन करण्यात आलेल्या तीन देवदूतांपैकी हा एक महादूत होय. तो देवाच्या राजासनासमोर उभा राहणाऱ्या सात देवदूतांपैकी एक होय. पृथ्वीतलावर शुभवार्ता किंवा सांत्वनपर असा देवाचा संदेश घेऊन जाणारा तो देवाचा 'निरोप्या' मानला जातो.
दानिएलच्या पुस्तकातील आठव्या अध्यायात एडका व बकरा ह्यांचा दृष्टांत देण्यात आलेला आहे. त्याचे स्पष्टीकरण गॅब्रिएल महादूत देताना दिसतो (दानिएल ८:१६. . .) त्याने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार पुढे आलेक्झांडर द ग्रेट ह्या महान सम्राटाच्या हस्ते पर्शियाचे राज्य धुळीला मिळाले. त्यानंतरच्या अध्यायातच गॅब्रिएल दूताने दानिएलला, प्रभू येशूच्या आगमनाची पूर्वकल्पना दिल्याचे वाचावयास मिळते (दानिएल ९:२५).
नव्या करारामध्ये संत योहान बाप्तिस्ताच्या जन्माचे भाकित करण्यासाठी महादूत गॅब्रिएल जखऱ्या ह्याला मंदिरात दर्शन देतो (अधिक माहिती २४ जून संत योहान बाप्तिस्तचा सण). परंतु ह्या सर्वांचा कळस म्हणजे गॅब्रिएल देवदूताने पवित्र मरियेला दिलेला संदेश होय! (सण २५ मार्च)..
यहुदी परंपरेनुसार सदोम नगराचा न्याय करण्यासाठी देवाने गॅब्रिएल देवदूताला पाठविले होते (उत्पत्ती १८ व १९). पुढे निवडलेल्या प्रजेच्या कपाळावर पावित्र्याची खूण करण्यासाठीदेखील हाच देवदूत आलेला होता.
ख्रिस्ती परंपरेनुसार बेथलेहेम येथील गुरांच्या गोठ्यात ख्रिस्त जन्मल्यानंतर मेंढपाळांना ती शुभवार्ता सांगण्यास गॅब्रिएल दूताला पाठविण्यात आलेले होते. योसेफला तीन वेळा स्वप्नात सूचना देण्यासाठी देवाने ह्याच महादूताला पाठविले होते. शिवाय जेथशेमनी बागेत रक्ताचा घाम गाळणाऱ्या ख्रिस्ताला 'शक्ती' देणारा देवदूत तो गॅब्रिएल हाच होय.
देवाच्या सहवासात त्याचे गुणगान गाणाऱ्या देवदूतांचा सन्मान करीत असतांना आपण आपल्या सर्वांच्या संरक्षणासाठी त्यांच्याद्वारे प्रार्थना करू या.
✝️
पहिले वाचन : दानीएल ७ : ९-१०. १३-१४
वाचन :दानीएलच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. "
मी पाहत असता आसने मांडण्यात आली आणि एक पुराणपुरुष आसनारुढ झाला. त्याचा पेहेराव बर्फासारखा पांढरा होता. त्याच्या डोक्याचे केस स्वच्छ लोकरीसारखे होते. त्याचे आसन प्रत्यक्ष अग्निज्वालामय होते आणि त्या आसनाची चक्रे धगधगीत अग्निरूप होती. त्याच्यासमोरून अग्निप्रवास वाहत होता. हजारो देवदूत त्याची सेवा करत होते. लाखो लोक त्याच्यासमोर उभे होते. न्यायसभा भरली, पुस्तके उघडली गेली. मी रात्रीच्या दृष्टांतात पाहिले इतक्यात पाहा, आकाशातील मेघांवर आरूढ होऊन, मानवपुत्रासारखा कोणी आला, तो त्या पुराणपुरुषाकडे आला आणि त्याला त्यांनी त्याच्याजवळ नेले. सर्व लोक, सर्व राष्ट्र आणि सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव आणि राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय आणि अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
पर्यायी पहिले वाचन
वाचन: प्रकटीकरण ह्या पुस्तकातून घेतलेले १२ : ७-१२
"मायकल आणि त्याचे दूत अजगराबरोबर लढले."
स्वर्गात युध्द सुरू झाले, मायकल आणि त्याचे दूत अजगराबरोबर युध्द करण्यास निघाले आणि त्यांच्याबरोबर अजगर आणि त्याचे दूत लढले, तरी त्याचे काही चालले नाही आणि स्वर्गात त्याचे ठिकाणही उरले नाही. मग तो मोठा अजगर खाली टाकण्यात आला म्हणजे सर्व जगाला ठकवणारा, जो दियाबल आणि सैतान म्हटलेला आहे तो जुनाट साप खाली पृथ्वीवर टाकण्यात आला आणि त्याबरोबर त्याच्या दूतांना टाकण्यात आले. तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली, ती म्हणाली : “आता आमच्या देवाने सिध्द केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रकट झाली आहेत. कारण आमच्या बंधूंना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्याच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे. त्याला त्यांनी कोकराच्या रक्तामुळे आणि आपल्या साक्षीच्या वचनामुळे जिंकले आणि त्यांच्यावर मरण्याची पाळी आली तरी त्यांनी आपल्या जिवावर प्रीती केली नाही. म्हणून सर्वांनो आणि त्यात राहणाऱ्यांनो, उल्हास करा."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १३८ : १-५
प्रतिसाद : प्रभो, देवदूतांसमक्ष मी तुझी स्तोत्रे गाईन
१)प्रभो, मी अगदी मनापासून तु
झे उपकारस्मरण करीन,
देवदूतांसमक्ष तुझी स्तोत्रे गाईन.
तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन.
२)तुझ्या दयेमुळे आणि तुझ्या सत्यामुळे मी
तुझ्या नामाचे उपकारस्मरण करीन.
कारण तू आपल्या संपूर्ण नामापेक्षा
आपल्या वचनाची थोरवी वाढवली आहेस.
मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला,
तू मला हिम्मत दिलीस तेव्हा मला सामर्थ्य प्राप्त झाले.
३) हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राजे तुझे
उपकारस्मरण करतील,
कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत.
ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील :
"परमेश्वराचा महिमा किती थोर आहे !"
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूची इच्छा पूर्ण करणाऱ्या त्याच्या
सर्व सेवक-सैन्यांनो, प्रभूला धन्यवाद द्या.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १:४७ -५१
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"देवदूतांना चढताना आणि मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. "
नथनेलला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे, ह्याच्याठायी कपट नाही !” नथनेल त्याला म्हणाला, “आपणाला माझी ओळख कोठली ?" येशूने त्याला उत्तर दिले, “फिलीपने तुला बोलावण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास, तेव्हाच मी तुला पाहिले." नथनेल त्याला म्हणाला, “गुरुजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलचे राजे आहा.” येशू त्याला म्हणाला, "मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू श्रध्दा ठेवतोस काय ह्याच्यापेक्षा मोठया गोष्टी पाहशील." आणखी तो त्याला म्हणाला, “मी तुम्हांला खचित खचित सांगतो, आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : 'कपट' हा शब्द नकारात्मक आहे. ज्या व्यक्तीमध्ये कपट असते त्याचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे असतात. कपटी माणसांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही. आज प्रभू येशू म्हणत आहे की, “नथनेलमध्ये कपट नाही तर प्रामाणिक व सरळ स्वभावाचा व्यक्ती आहे.” जे त्याच्या मनात होते ते त्याने फिलीपला बोलून दाखवले. की नाझरेथमधून काय चांगले येणार आहे. त्यामुळे येशू म्हणाला, “त्याच्याठायी कपट नाही, तर तो सरळ व प्रामाणिक आहे." आज नथनेलप्रमाणे प्रामाणिक व सरळ स्वभाव अंगीकरण्यासाठी देऊळमाता आपणांस आमंत्रण देत आहे. प्रामाणिक व सरळ जीवन जगण्यासाठी आपण संत मायकल, गॅब्रिएल व राफाएल या महादूतांकडे याचना करूया.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सहवासाचा अनुभव आम्हाला यावा आणि तुझे गुणगान गाण्यास प्रेरणा मिळावी म्हणून कृपा दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या