सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
बुधवार २८ सप्टेंबर २०२२
संत वेन्सेस्लॉस
• राजा, रक्तसाक्षी (९०७-९२९)
बोहेमिया (झेकोस्लाव्हाकिया) येथे लुडमिला नावाची एक साध्वी स्त्री राहात होती. तिच्यामध्ये अतिपवित्र साक्रामेंताविषयी नितांत आदर व भक्तिभाव होता. तिने आपला नातू वेन्सेस्लॉस ह्या राजपुत्रामध्ये खऱ्या ख्रिस्ती धर्माविषयी आवड व तळमळ उत्पन्न केली. परंतु त्याचे ख्रिस्ती वडील मरण पावल्यानंतर त्याच्या आईने पुन्हा एकदा मूर्तिपूजेला प्रोत्साहन द्यावयास सुरुवात केली. तिने प्रथम जर्मन मिशनऱ्यांना आपल्या राज्याबाहेर हाकलून दिले. तरुण राजपुत्र वेन्सेस्लॉस ह्याच्या हातून राजसत्ता हिसकावून घेतली आणि लुडमिला हिचा गळा दाबून खून केला.
अशा क्रूर स्त्रीच्या राज्यकारभाराला लोकांकडून कडवा विरोध झाला. त्यांनी राजपुत्र वेन्सेस्लॉस ह्याला पाठिंबा देऊन त्याच्या आईच्या हातून राजसत्ता हस्तगत केली. राज्यपदावर येताच राजा वेन्सेस्लॉस ह्यांनी जर्मन धर्मगुरूंना पुन्हा आपल्या राज्यात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी बोलाविले. त्यांना भरपूर प्रोत्साहन दिले व बोहेमियाचा धार्मिक, नैतिक आणि सांस्कृतिक दर्जा उंचावला. त्याला हृदयाची कोमलता, धैर्य व उत्साह ह्यांची अनमोल अशी देणगी देवाकडून मिळालेली होती.
सम्राट ओटो पहिला ह्यांच्याकडून त्याला 'बोहेमियाचा राजा' हे पद मिळाले होते. परंतु बऱ्याचशा सरदारांनी त्याच्या राजकीय धोरणांना विरोध केला व त्याचा फायदा त्याच्या आईने उठविला. तिने वेन्सेस्लॉसला सिंहासनावरून बाजूला सारून त्याच्या जागी आपला दुसरा मुलगा बोलेस्लाव ह्याला बसविले.
दररोज अतिपवित्र साक्रामेंतासमोर गुडघे टेकून प्रार्थना करणे ही वेन्सेस्लॉस ह्याची सवय सर्वांना परिचित होती. एकदा तो असाच आल्तबुझलाव चर्चमधून प्रार्थना करून बाहेर पडत असताना त्याच्या भावाने त्याला चर्चच्या उंबरठ्यावरच ठार मारले.
संत वेन्सेस्लॉस हा बोहेमियाचा आश्रयदाता संत मानला जातो.
परमेश्वराच्या कसोटीस पूर्णपणे उतरलेले पवित्र शास्त्रतील एक महान व्यक्तिमत्व म्हणजे इयोब. देवावरील पूर्ण श्रद्धा, भक्ती आणि निष्ठा ह्यांचा सुंदर संगम इयोबच्या जीवनात पाहावयास मिळतो. देवाच्या आज्ञा पाळून त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणाऱ्या इयोबला सुद्धा कसोटीस उतरताना तावून सलाखून निघावे लागले. देवाने त्याचे सर्वस्व उध्वस्त केले तरी सुद्धा तो पूर्णतया देवाला शरण गेला.
आपले शिष्य होऊ पाहणाऱ्यांची प्रभू येशू कसोटी घेत आहे. प्रभू येशू शिष्यांना तीन मुद्दे स्पष्ट करीत आहे.
१. म्हणजेच राहण्याचे निश्चित ठिकाण नाही तर विश्वचि माझे घर समजायचे. २. तू जाऊन देव राज्याची घोषणा कर, ” याचाच अर्थ नाते संबंध " सर्वकाळ टिकणारे नाहीत तर देवराज्य सर्वकाळासाठी आहे.
शेवटी ३. शिष्य बनल्यावर एकमात्र लक्ष्य म्हणजेच देवराज्याची सुवार्ता घोषविणे होय. तेथे जीवनातील इतर गोष्टींबरोबर तडजोड नाही. येशूवर पूर्णपणे विसंबून राहून स्वतःला झोकून द्यायचे.
✝️
पहिले वाचन : इयोब ९:१-१२,१४-१६
वाचन :इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल ?”
इयोब आपल्या मित्रांना म्हणाला, खरोखर हे असेच आहे. हे मला ठाऊक आहे. पण मानव देवापुढे कसा नीतिमान ठरेल? मानव देवाशी वाद करू लागला तर हजार गोष्टीतल्या एकीचेही उत्तर त्याला देता येणार नाही. देव मनाने सुज्ञ आणि सामर्थ्याने प्रबल आहे, त्याच्याशी विरोध करून कोण टिकला आहे? तो पर्वतांना नकळत अचानक हटवतो, तो आपल्या क्रोधाने त्यांना उलथून टाकतो. तो पृथ्वीला कापून तिला स्थानभ्रष्ट करतो, तिचे आधारस्तंभ थरारतात. त्याची आज्ञा झाली असता सूर्य उगवत नाही, तो ताऱ्यांना मोहोरबंद करतो. तोच आकाशमंडळ विस्तारतो, तो समुद्राच्या पर्वतमय लहरीवरून चालतो. त्यानेच सप्तऋषी, मृगशीर्ष, कृत्तिका आणि दक्षिणेकडील नक्षत्रमंडळे उत्पन्न केली. तो अतर्क्स, अगणित अद्भुत कृत्ये करतो. पाहा, तो माझ्याजवळून जातो तरी मला दिसत नाही, तो निघून जातो तरी माझ्या दृष्टीस पडत नाही. पाहा, तो हिसकावून घेऊ लागला तर त्याचा हात कोण धरील? तू हे काय करतोस, असे त्याला कोण म्हणणार ?
“तर मी त्याला उत्तर दयावे आणि शब्दांची योग्य निवड करून त्याच्याशी वाद करावा, असा मी कोण आहे ? मी निर्दोष असलो तरी त्याला मी उत्तर देणार नाही. त्या माझ्या प्रतिवाद्यांची मी विनवणी करतो. मी धावा केला असता तर त्याने उत्तर दिले असते, तरी त्याने माझे ऐकलेच अशी माझी खात्री झाली असती.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ८८: १० -१५
प्रतिसाद : प्रभो, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो.
१ )हे परमेश्वरा, मी दररोज तुझा धावा करतो,
तुझ्यापुढे मी आपले हात पसरतो.
मृतांकरिता तू अद्भुत कृत्ये करशील का ?
प्रेते उठून तुझी स्तुती करतील का ?
२) तुझ्या कृपेचे वर्णन शवगर्तेत होईल का ?
विनाशस्थानी तुझ्या सत्यतेचे वर्णन होईल का ?
अंधारात तुझी अद्भुत कृत्ये प्रकट होतील का ?
विस्मरणलोकी तुझे नीतिमत्त्व प्रकट होईल का ?
३) मी तर, हे परमेश्वरा, तुझा धावा करतो,
प्रात:काळी माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होते.
हे परमेश्वरा, तू माझ्या जिवाचा त्याग का करतोस?
तू आपले मुख माझ्यापासून का लपवतोस ?
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
माझ्या देवा, तुझ्या वाटा मला प्रकट कर,
तू आपल्या सत्पथाने मला चालव.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:५७-६२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"प्रभो, आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन."
येशू आणि त्याचे शिष्यं वाटेने चालत असता कोणाएकाने त्याला म्हटले, "आपण जेथे कोठे जाल तेथे मी आपल्या मागे येईन.” येशू त्याला म्हणाला, “कोल्ह्यांना बिळे आणि आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला ठिकाण नाही.” त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये." परंतु तो म्हणाला, "प्रभो, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ दया.” तो त्याला म्हणाला, “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांना पुरू दे, तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” मग आणखी एकाने म्हटले, "प्रभो, मी आपल्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरच्या माणसांचा निरोप घेऊ दया.” येशूने त्याला म्हटले, "जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :
'निवड' हा शब्द अनेक वेळा आपण ऐकला आहे व आपल्या दैनंदिन जीवनात आपण त्याचा वापरही केला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक गोष्टींची निवड करतो. पण आपण निवड करताना केवळ आपल्या फायद्याची करतो. नुकसान देणारी निवड आपण कधीच करत नाही. आज प्रभू येशू दोन व्यक्तींना आपले शिष्य होण्यास पाचारण करतो. परंतु त्या दोन व्यक्ती येशू व आपले कुटुंब या दोन गोष्टीत कुटुंबाची निवड करतात. प्रभू येशू त्यांना म्हणतो की, “जी व्यक्ती येशूचा शिष्य होऊ पाहते, तिने प्रथम येशूची निवड करावी व त्या निवडीत शिष्यांनी स्वहिताचा विचार न करता जगाला व शेजाऱ्यांना कसा फायदा होईल ह्याकडे लक्ष दिले पाहिजे.” प्रभूचा अनुयायी स्वार्थी होऊ शकत नाही तर तो निःस्वार्थी असणे गरजेचे आहे. आपल्या जीवनात आपण योग्य ती निवड करण्यासाठी प्रभूकडे याचना करूया.
प्रार्थना : प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून तुझी सुवार्ता घोषविण्यास मला ।
बळ दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या