सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
मंगळवार २७ सप्टेंबर २०२२
बंधुप्रेमातून उगम पावणाऱ्या परोपकाराला अडथळा ठरणाऱ्या मत्सरीवृत्ती पासून सावध रहा.-संत विन्सेंट डी पॉल
पॅरीसमधील सेंट लाझारे हे 'प्रिस्ट्स ऑफ द मिशन्स'चे मुख्य केंद्र होते. तेथे फा. विन्सेंट ह्यांनी धर्मगुरू आणि प्रापंचिक ह्यांच्यासाठी तपसाधना वा रिट्रीट्स आयोजित करण्यास सुरुवात केली व त्याद्वारे जनमानसात आध्यात्मिकतेचे बीज पेरले. ही आध्यात्मिकतेची चळवळ सुरू असताना त्यांनी पॅरीस येथे गोरगरिबांची सेवाचाकरी करणे चालूच ठेवले.
सरदार घराण्यातील स्त्रियांमध्ये त्यांनी परोपकार बुद्धी जागृत केली. त्यांतून 'लेडीज ऑफ चॅरिटी' ही संस्था उदयास आली. या संस्थेने शहरातील असंख्य इस्पितळांचे नूतनीकरण केले. ह्या इस्पितळांव्यतिरिक्त फा. विन्सेंट ह्यांनी उपेक्षितांसाठी आश्रम, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, मतिमंदांची शाळा आणि कुष्टधामे ह्यांची स्थापना केली. ह्या सर्व सेवाभावी संस्थामध्ये 'डॉटर्स ऑफ चॅरिटी' ह्या व्रतस्थांच्या भगिनी सेवाकार्य करीत..
वरील सर्व कार्य करण्यासाठी फा. विन्सेंट डी पॉल ह्यांना संत लुईजा डी मारिलेक ह्यांचा खूप आधार लाभला. तरुण उपेक्षित स्त्रियांना पॅरीसमधील कॉन्व्हेंटमध्ये आसरा देण्यात आला. फा. विन्सेंट म्हणत, 'जे गोरगरिबांवर प्रेम करतात ते मरणाला सामोरे जाताना कधीच भयभीत होत नाहीत.'
ट्यूनिस, अल्जिर्स आणि बिझेर्टा येथल्या ३०,००० ख्रिस्ती गुलामांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्यासाठी फा. विन्सेंट ह्यांनी आपले धर्मगुरू व धर्मबंधू पाठवून दिले. त्यांनी आपल्या धार्मिक कर्तव्यांव्यतिरिक्त गुलामांचा त्यांच्या कुटुंबाशी संपर्क ठेवण्यासाठी 'निरोप्या' म्हणून कार्य केले. फा. विन्सेंट डी पॉल ह्यांनी आपल्या आयुष्यभरात सहा दशलक्ष डॉलर्स इतकी देणगी जमा केली होती. ती त्यांनी १,२०० गुलामांना मुक्त करण्यासाठी खंडणीदाखल दिली.
प्रार्थना, चिंतन आणि विरक्तवृत्तीची साधना हे फा. विन्सेंट डी पॉल ह्यांच्या अथक परिश्रमामागचे प्रेरणास्थान होते. स्वत:पेक्षा अधिक प्रमाणात त्यांचा देवावर आणि देवाच्या दानशूरतेवर भरवसा होता. त्यांच्या नम्रतेमुळेच देवाने त्यांना खऱ्या अर्थाने उंचावलेले होते.फा. विन्सेंट डी पॉल २७ सप्टेंबर १६६० रोजी मरण पावले आणि १७३७ साली पोप क्लेमेंट बारावे ह्यांनी त्यांना संतपद देऊन सन्मानित केले. त्यांच्या नावाने गोरगरिबांच्या कल्याणासाठी 'संत विन्सेंट डी पॉल सोसायटी' ही सेवाभावी संस्था जगभर १४३ हून अधिक देशांमध्ये कार्य करीत आहे.
ख्रिस्तसभा आज गरिबांचा आश्रयदाता संत विन्सेंट दि पॉलचा सन्मान करीत आहे. ह्या संताचा आदर्श समोर ठेवून गरीब व गरजवंतांस सहाय्य करण्यासाठी पुढाकार घेऊ या.
✝️
पहिले वाचन : इयोब ३:१-३,११-१७,२०-२३
वाचन :इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन
"दुःखितांना प्रकाश का मिळतो ?"
इयोबने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला. इयोब म्हणाला,
"मी जन्मलो तो दिवस जळो! 'पुत्रगर्भ राहिला' असे जी रात्र म्हणाली ती जळो !”
मी गर्भाशयातच का नाही मेलो ? गर्भाशयातून निघताच माझा प्राण का नाही गेला ? मातेच्या मांड्यांनी माझा स्वीकार का केला? मी चोखावी म्हणून स्तनांनी माझा स्वीकार का केला ? केला नसता तर मी आज पडून स्वस्थ राहिलो असतो, मी निजलो असतो, मी विसावा पावलो असतो. आपणासाठी शून्य मंदिरे बांधणारे भूपती आणि मंत्री यांच्याबरोबर, सोन्याचा संचय करणारे, आपली घरे चांदीने भरून ठेवणारे सरदार यांच्या बरोबर मी विसावा पावलो असतो. अकाली पतन पावलेल्या गुप्त गर्भासारखा प्रकाश कधी न पाहिलेल्या अर्भकांसारखा मी असतो. तेथे दुर्जन त्रासदेण्याचे थांबवतात, श्रांत विश्रांती पावतात.
“दुःखितांना प्रकाश का मिळतो ? जे मनाचे दुःखी त्यांना जीवन का प्राप्त होते ? ते मृत्यूची उत्कट अपेक्षा करतात, पण तो येत नाही. गुप्त निधीसाठी खणणाऱ्यांपेक्षा ते मृत्यूच्या प्राप्तीसाठी अधिक खटाटोप करतात. त्यांना शवगती प्राप्त झाली म्हणजे ते हर्ष करतात, त्यांना अत्यानंद होतो. ज्या माणसाचा मार्ग गुप्त आहे, ज्याला देवाने कुंपण करून कोंडले आहे, अशाला प्रकाश का प्राप्त होतो ?”
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ८७:२-३,४-५, ६, ७-८
प्रतिसाद : प्रभो, माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो.
१) हे परमेश्वरा, माझ्या उद्धारक देवा,
मी रात्रंदिवस तुझ्यापुढे आरोळी करतो.
माझी प्रार्थना तुझ्यापुढे सादर होवो.
माझ्या विनवणीकडे तुझा कान असू दे.
२) कारण माझा जीव क्लेशांनी व्यापला आहे,
माझा प्राण अधोलोकांजवळ जाऊन पोहोचला आहे.
गर्तेत पडणाऱ्यात माझी गणना झाली आहे,
मी निराधार वीरासारखा झालो आहे.
३) मला प्रेतांमध्ये टाकले आहेस,
वध होऊन जे कबरेत पडले आहेत,
ज्यांची आठवण तू कधी करत नाहीस,
ज्यांचा तुझ्या हाताचा आधार तुटला आहे,
त्यांच्यासारखा मी झालो.
४) गर्तेत अगदी तळाशी, अंधकारमय स्थळी,
खोल डोहात तू मला टाकले आहेस.
तुझ्या संतापाचा भार माझ्यावर पडला आहे,
तू आपल्या सर्व लाटांनी मला पीडले आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात,
ती नेत्रांना प्रकाश देतात.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:५१-५६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता.'
येशूला वर घेतले जाण्याचा समय जवळ आला तेव्हा त्याने येरुशलेमला जाण्याच्या दृढनिश्चयाने तिकडे आपले तोंड वळवले. त्याने आपल्यापुढे निरोप्ये पाठवले, तेव्हा ते निघून त्याच्यासाठी तयारी करण्यासाठी शोमरोन्यांच्या एका गावात गेले, पण त्यांनी स्वीकार केला नाही, कारण त्याचा रोख येरुशलेमकडे जाण्याचा होता. हे पाहून त्याचे शिष्य याकोब आणि योहान म्हणाले, “प्रभो, आकाशातून अग्नी पडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी, अशी आपली इच्छा आहे काय ?" त्याने वळून त्यांना धमकावले. मग ते दुसऱ्या गावात गेले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : महात्मा गांधी म्हणतात, 'डोळ्याबद्दल डोळा' या भावनाने आपण जगलो तर जग आंधळे होईल. सूडभावना नेहमी नाशकारक असते. ती व्यक्तीला नाशाकडे नेत असते आणि त्यात असलेली सूडभावना दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा नष्ट करत असते. आपण अनेक वेळेला ऐकले आहे की, “मी त्याला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.” आजच्या शुभवर्तमानात देखील असेच घडले. शिष्यांना शोमरोन्यांचा राग आला, त्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी ते येशूला विनंती करत होते. परंतु येशू त्यांना शांतीचा व क्षमेचा महामंत्र शिकवत होता व तोच महामंत्र गिरविण्यासाठी शिष्यांना प्रोत्साहित करत होता. सूड घेतल्याने वैर वाढते, तर क्षमा केल्याने शत्रुत्व संपते. आपल्या जीवनात क्षमेचे महत्व काय आहे. हे समजण्यासाठी परमेश्वराकडे याचना करूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमच्या जीवनाचा प्रवास कितीही खडतर असला तरी ख्रिस्ती मुल्ये जोपासण्यास व तुझे खरे अनुयायी बनण्यास आम्हाला प्रेरणा व
शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या