सामान्यकाळातील २६ वा सप्ताह
सोमवार २६ सप्टेंबर २०२२
"माती पूर्ववत मातीला मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ!
कॉस्मस आणि डेमियन हे दोघे जुळे भाऊ होते. ते अरेबियातील अत्यंत भक्तिमान असे ख्रिस्ती श्रद्धावंत होते. तुर्कस्थानातील किलिकिया प्रांतात ते वैद्यकशास्त्राचा अभ्यास करून जनतेची सेवा करीत होते. आग्रेस ह्या बंदरावर लोकांवर औषधोपचार करीत असताना ते कुठलीही फी घेण्यास तयार नसत.
दोघांना देवाने आरोग्य दानाची देणगी दिलेली होती. आपल्या कौशल्याने ते केवळ शारीरिक आरोग्यच नव्हे तर आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगून आध्यात्मिक नवजीवन देत. त्यांच्या पवित्र जीवनाकडे पाहणारे आणि त्यांच्याकडे असलेले 'हिलिंग'चे दान प्रत्यक्ष अनुभवणारे असे अनेक लोक ख्रिस्ताकडे वळले.
डायक्लोशियन छळवादाला सुरुवात झाली तेव्हा प्रमुख ख्रिस्ती श्रद्धावंत म्हणून त्यांना प्रथम तुरुंगात टाकण्यात आले. त्यांचे हालहाल करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा एकत्र शिरच्छेद करण्यात आला. त्यांच्या कर्तृत्वाची कीर्ती संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेत पसरली आणि पौर्वात्य व पाश्चिमात्य ख्रिस्तसभेत त्यांच्या नावाने अनेक चर्चेस बांधण्यात आली.
संत कॉस्मस आणि डेमियन हे न्हावी, डॉक्टर्स, शस्त्रक्रिया करणारे सर्जन्स, दंतवैद्य आणि मेडिकल स्टोअर्स चालविणारे ह्यांचे आश्रयदाते संत आहेत. हर्निया व मरी ह्या रोगांवर आराम पडावा म्हणून त्यांचा धावा केला जातो. प्रभू येशूने आपल्या शिष्यांचे पाय धुतले व नम्रतेचा आणि सेवेचा महान मंत्र सर्वांना दिला आहे (योहान १३:१-२०). जुन्या करारात म्हटले आहे, “देवाची कृपा संपादन करायची असेल तर स्वतःला नम्र केले पाहिजे" ( २ इतिहास ६ : १४).
प्रभू येशूची नम्रतेची शिकवण आचरणात आणताना संत पेत्र बोध करतो की, "बंधुजनांशी नम्रतेने वागावे व देवापुढे नम्र असावे” (१ पेत्र ५:५- ६). संत पौलने तर स्वतःला सर्वात कनिष्ठ समजून मंडळींना नम्रतेचा बोध केला (फिलिपै २:१-११, १ करिंथ ६ : ९ ). नम्रता ह्या गुणांवर चिंतन करीत असताना आपण आपल्यातील अहंकार, मीपणा, मोठेपणा व जे जे आपल्याला देवापासून दूर घेऊन जाऊ शकते त्याचा त्याग करू या.
✝️
पहिले वाचन : इयोब १:६-२२
वाचन :इयोब या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले, परमेश्वराचे नाम धन्य असो. "
एक दिवस असा आला की, त्या दिवशी देवपुत्र परमेश्वरापुढे येऊन उभे राहिले आणि त्यांच्यामध्ये सैतानही आला. परमेश्वर सैतानाला म्हणाला, “तू आता कोठून आलास ?” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले, “मी पृथ्वीवर इकडेतिकडे हिंडून फिरून आलो आहे.” परमेश्वराने सैतानाला विचारले, माझा सेवक इयोब याच्याकडे तुझे लक्ष गेले होते काय ? भूतलावर त्याच्या तोडीचा सात्त्विक, सरळ, देवाला भिऊन वागणारा आणि पापापासून दूर राहणारा असा दुसरा कोणी नाही.” सैतानाने परमेश्वराला उत्तर दिले की, "इयोब देवाचे भय काय फुकट बाळगतो? तो, त्याचे घर आणि त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहे ना ? तू त्याच्या हातात यश दिले आहे ना ? आणि देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे ना ? तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वाला लावून तर पाहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अव्हेर करील. " परमेश्वर सैतानाला म्हणाला, “पाहा, त्याचे सर्वस्व तुझ्या हाती देतो, त्याला मात्र हात लावू नकोस.” मग सैतान परमेश्वरासमोरून निघून गेला. एके दिवशी असे झाले की, इयोबचे पुत्र आणि कन्या आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत आणि द्राक्षरस पीत असता एका जासुदाने इयोबकडे येऊन सांगितले, "बैल नांगरीत होते आणि त्यांच्याजवळ गाढवी चरत होत्या. तेव्हा शबाई लोक हल्ला करून त्यांस घेऊन गेले, त्यांनी तलवारीच्या धारेने चाकरांची कत्तल केली, हे तुला सांगायला मीच एकटा निभावून आलो आहे.” तो हे सांगत आहे इतक्यात दुसऱ्या जासुदाने येऊन सांगितले, “दैवी अग्नीचा आकाशातून वर्षाव झाला, त्याने मेंढरे आणि चाकर जळून भस्म केले, हे तुला सांगावयास मीच एकटा निभावून आलो आहे.” तो हे सांगत आहे इतक्यात आणखी एका जासूदाने येऊन सांगितले, “तुझे पुत्र आणि कन्याही आपल्या ज्येष्ठ बंधूच्या घरी भोजन करत आणि द्राक्षरस पीत होती इतक्यात वाळवंटाकडून आलेल्या प्रचंड वाऱ्याच्या सोसाट्याने त्या घराचे चारही कोपरे हादरले, त्यामुळे ते घर त्या तरूण मंडळीवर कोसळले आणि ती सगळी मरून गेली, हे तुला सांगायला मीच एकटा निभावून आलो आहे .
तेव्हा इयोबने उठून आपला झगा फाडला, आपल्या डोक्याचे मुंडण केले आणि जमिनीवर पालथे पडून देवाला दंडवत घातले. तो म्हणाला, मी मातेच्या उदरातून नग्न आलो आहे, तेथे परत जाणार आहे. परमेश्वराने दिले आणि परमेश्वराने नेले. धन्य परमेश्वराचे नाव !
ह्या सर्व प्रसंगात इयोबच्या हातून पाप झाले नाही आणि अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १७:१, २-३, ६-७
प्रतिसाद : हे देवा, माझ्याकडे कान दे, माझे म्हणणे ऐक.
१ ) हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक,
माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.
२) माझा निवाडा तुझ्यापुढे होवो.
तुझे डोळे समदृष्टीने पाहोत.
तू माझे हृदय पारखले आहेस,
रात्री तू माझी झडती घेतली आहेस.
तू मला तावूनसुलाखून पाहिले आहेस,
तरी तुला काही आढळले नाही.
३) मी तुझा धावा करतो, कारण हे देवा,
तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे,
माझे म्हणणे ऐक. तुझा आश्रय घेणाऱ्यांना
त्यांच्या विरोधकांपासून तू आपल्या उजव्या
हाताने वाचवतोस,तर तू आता विशेष वात्सल्य दाखव.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, बोल तुझा दास ऐकत आहे,
सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:४६-५०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हा सर्वामध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे."
आपणामध्ये मोठा कोण ह्याविषयी शिष्यांमध्ये आपसांत वाद सुरू झाला. येशूने त्यांच्या अंतःकरणातील विचार ओळखून एका बाळकाला घेतले आणि त्याला आपणाजवळ उभे केले, मग त्याने त्यांना म्हटले, जो कोणी ह्या बाळकाचा माझ्या नावाने स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो तो ज्याने मला पाठवले त्याचा स्वीकार करतो, कारण तुम्हा सर्वांमध्ये जो कनिष्ठ आहे तोच श्रेष्ठ आहे.” योहानने म्हटले, "गुरुजी, आम्ही एका माणसाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले, तेव्हा आम्ही त्याला मनाई केली, कारण तो आमच्याबरोबर तुम्हांला अनुसरत नाही." येशूने त्याला म्हटले, “त्याला मनाई करू नका, कारण जो तुम्हांला प्रतिकूल नाही तो तुम्हांला अनुकूल आहे.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : 'सत्तेचे व्यसन' सर्वात हानीकारक आहे. Power is most harmful addiction than any other substance. सत्तेची खुर्ची कोणालाच सोडाविशी वाटत नाही. दुसऱ्यांवर हक्क गाजविण्यासाठी व हुकूम चालविण्यास मनुष्य सदोदित तयार असतो. याउलट दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यास माणूस नाखूश असतो. अशा या कलयुगात जगत असताना येशू मात्र कनिष्ठ व्यक्तीला श्रेष्ठत्वाचा दर्जा देतो. आज प्रभू आपल्याला लहान बालकाचे उदाहरण देत आहे. बालके ही निरागस, निष्पाप असतात. ते वडिलधाऱ्यांच्या आज्ञेप्रमाणे वागतात, कारण त्यांच्याठायी नम्रता असते, ते दुसऱ्यांच्या विचारांचा मोकळेपणाने स्वीकार करतात. आज प्रभू आपणांस हेच सांगत आहे की, आपण बालकाप्रमाणे नम्र व मोकळ्या मनाचे असले पाहिजे. अहंकार, गर्विष्ठपणामुळे आपली प्रगती खुंटते. तर नम्रतेमुळे प्रगती उंचावते.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आम्हामध्ये नम्रता वाढीस लागो, सर्वांबरोबर सहिष्णुतेने व नम्रतेने वागण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या