सामान्यकाळातील २६ वा रविवार
२५ सप्टेंबर २०२२
तो गरीब माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले.
श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजार ह्यांचा दृष्टांत देऊन, प्रभू येशूने समाजातील दोन प्रकारच्या माणसांची दृष्ये आपल्या समोर ठेवलेली आहेत. त्याचबरोबर ह्या जगातील सुख आणि स्वर्गीय सुख ह्याची कल्पना आपल्यासमोर मांडली आहे. अनेक माणसे जागतिक सुख उपभोगण्यात आयुष्याचा बराच वेळ घालवितात. जगातील सर्व प्रकारच्या सुखसोयी मिळवणे, अलिशान घरे, चैनबाजी आणि कमावलेले धन व संपत्तीचा उपभोग घेणे वाईट नाही, परंतु आपल्याला लाभलेली संपत्ती आणि प्राप्त झालेले जीवन हे सर्व त्या विधात्याची कृपा आहे. त्यांचा योग्य तो वापर करणेची जबाबदारी प्रत्येकाची आहे. विलासी जीवन आणि विषयसुख हे जीवनाची सार्थकता नाही तर ज्या परमेश्वराने हे सर्व दिले आहे त्याला धन्यवाद देणे आणि जसे आपण स्वतः जगतो तसे इतरांनाही जगण्यास सहाय्य करणे गरजेचे आहे.
✝️
पहिले वाचन : आमोस ६:१,४-७
वाचक : आमोस या पुस्तकातून घेतलेले वाचन "जे अस्ताव्यस्त पडतात आणि ओरडतात त्यांना बंदिवासात टाकण्यात येईल."
सर्वसमर्थ परमेश्वर म्हणतो, सियोनेत सुखवस्तू असणारे आणि शोमरोनच्या पर्वतावर निश्चिंत असणारे यांना धिक्कार असो !
“तुम्ही हस्तिदंती पलंगावर निजता आणि मंचकावर ताणून पडता, कळपातली कोकरे आणि गोठ्यातली वासरे खाता. तुम्ही वीणेच्या सुरावर काही तरी गात असता, दावीदप्रमाणे अनेक तंतुवाद्ये बनवता. तुम्ही घागरींच्या घागरी द्राक्षरस पिता, उत्तम तेलांनी आपणांला माखता, योसेफवरील आपत्तीबद्दल तुम्ही खेद करत नाही. ह्यास्तव ते आता बंदिवानांच्या अग्रभागी चालून बंदिवासात जातील, ख्यालीखुशाली करणाऱ्यांचा गोंगाट नाहीसा होईल."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४६ : ६,-१०
प्रतिसाद : हे माझ्या मना, परमेश्वराचे स्तवन कर.
१) परमेश्वर सदा आपले सत्यवचन पाळतो,
तो छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो.
तो भुकेल्यांना अन्न देतो,
परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.
२) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो,
वाकलेल्यांना उभे करतो.
परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो,
उपऱ्यांचे रक्षण करतो.
३) तो अनाथ आणि विधवा यांची दाद घेतो,
परंतु दुर्जनांचा मार्ग फिसकटून टाकतो.
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो,
हे सियोन, तुझा पिढ्यान्पिढ्या राज्य करतो.
दुसरे वाचन १ तिमथी ६:११-१६
वाचक: पौलचे तिमथीला पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू हीआज्ञा निष्कलंक राख. '
हे देवभक्ता, तू ह्यांपासून पळ आणि नीतिमत्त्व, सुभक्ती, विश्वास, प्रीती, धीर आणि सौम्यता ह्यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला पक्के धर. त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस. सर्व प्राणीमात्राला जीवन देणारा जो देव तुला निक्षून सांगतो, आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत तू ही आज्ञा निष्कलंक आणि निर्दोष राख. जो धन्य आणि एकच अधिपती, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो, ज्याला कोणा माणसाने पाहिले नाही आणि कोणी पाहू शकत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाळी दाखवील. त्याला सन्मान आणि पराक्रम युगानुयुगे आहे. आमेन.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे,
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १६:१९-३१
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुला तुझ्या आयुष्यात सुख मिळाले आणि लाजरसला दुःख मिळाले, आता ह्याला येथे समाधान मिळत आहे आणि तू क्लेश भोगत आहेस."
येशूने परुश्यांना म्हटले, कोणीएक श्रीमंत मनुष्य होता तो जांभळी आणि तलम वस्त्रे वापरीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाज्याजवळ फोडांनी भरलेला लाजरस नावाचा एक गरीब माणूस ठेवण्यात आला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटत 'असत. पुढे असे झाले की, तो गरीब माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला आणि त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगत असताना त्याने आपली दृष्टी वर करून आब्राहाम आणि त्याच्या उराशी बसलेला लाजरस ह्यांना दुरून पाहिले. तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, "बापा आब्राहाम, माझ्यावर दया करून लाजरसला पाठव, त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी, कारण ह्या जाळात मी क्लेश भोगत आहे. आब्राहाम म्हणाला, “मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजरस आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर. आता ह्याला येथे समाधान मिळत आहे आणि तू क्लेश भोगत आहेस, एवढेच नव्हे तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये आणि तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या आणि तुमच्यामध्ये मोठी दरी निर्मिली आहे." मग तो म्हणाला, “तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव, कारण मला पाच भाऊ आहेत, त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यांना इकडची साक्ष द्यावी." पण आब्राहामने त्याला म्हटले, "त्यांच्याजवळ मोशे आणि संदेष्टे आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे." तो म्हणाला, “हे बापा आब्राहम, असे नाही, पण मेलेल्यांमधून कोणी त्यांच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील.” तेव्हा त्याने त्याला म्हटले, "ते मोशेचे आणि संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही."
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : 'धनाचा लोभ हे सर्व विकारांचे मूळ आहे' असे संत पॉलने तीमथ्याला शिकविले. आजची शास्त्रवाचने धनाचा लोभ आणि त्याचे दुष्परिणाम या विषयावर तीन टप्यात आपल्याला मार्गदर्शन करतात.
अ. धनाचा लोभ कालांतराने आपल्यामध्ये बेफिकीरपणा उत्पन्न करतोः आजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा इस्राएली लोकांना त्यांच्या बेफिकिरपणाबद्दल खडसावतो. कोवळ्या वासरांचे मांस, यथेच्छ मद्यपान, मंचकावर लवंडून ऐषाराम करणे असे करतानाच गोरगरिबांकडे त्यांनी केलेले दुर्लक्ष यांमुळे ते हद्दपारीत जातील.
ब. धनाचा लोभ आध्यात्मिकतेला कलंक लावतो: आजच्या दुसऱ्या वाचनात आमोस धनाच्या लोभामुळे मनुष्याची आध्यात्मिकता कशी भ्रष्ट होते ते वर्णन करून झाल्यानंतर त्यापासून पळ काढण्यास आणि आध्यात्मिक गोष्टींच्या मागे लागण्यास संत पॉल तीमथ्याला प्रवृत्त करतो.
क. धनाचा लोभ माणसाची संवेदनशीलता बोथट करतो: आजच्या शुभवर्तमानात श्रीमंत मनुष्य आणि लाजरस ह्यांची परस्परविरोधी जीवनशैली वर्णन करण्यात आलेली आहे. मरणानंतर दोघांच्या जीवनशैलीत उलथापालथ होते. खरे पाहता श्रीमंत माणसाची संवेदनशीलता बोथट झाल्यामुळे त्याला लाजरसच्या गरजा समजू शकल्या नाहीत. लाजरसने मात्र आपले दुःख मुकाट्याने सहन केले. संपूर्ण दाखल्यात लाजरस बोलत नाही परंतु श्रीमंत मनुष्य नरकयातना भोगताना आक्रोश करतो. त्याला लाजरसचे नाव ठाऊक आहे, म्हणजे त्याच्या गरजाही ठाऊक आहेत. मात्र धनलोभामुळे त्याची संवेदना बोथट झाली होती.
आत्मपरीक्षणः धनलोभाचे कोणते दुष्परिणाम मी माझ्या जीवनात अनुभवत आहे ?
प्रार्थना : प्रभू परमेश्वरा, विश्वासाने तुझ्या स्वर्गीय राज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या