सामान्यकाळातील २५ वा सप्ताह
शनिवार २४ सप्टेंबर २०२२
"माती पूर्ववत मातीला मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ!
संत पीटर नोलास्को, पेन्याफोर्टचे संत रेमंड आणि ॲरागॉनचा राजा जेम्स ह्यांनी इ.स. १२३३ साली बार्सेलोना (स्पेन) येथे स्थापन केलेल्या 'दयामाता संघा'ने सारासेनच्या गुलामगिरीतून ख्रिस्ती गुलामांना मुक्त करण्याचे प्रेषितकार्य सुरू केले. त्यासाठी लागेल ती खंडणी या संस्थेतील धर्मगुरू व धर्मबंधू स्वकष्टाने मिळवून देत असत. त्यांनी पवित्र मरियेच्या सन्मानार्थ हा सण साजरा करण्यास सुरुवात केली.
हळूहळू फ्रान्स आणि स्पेन देशांनी हा सण साजरा करण्यास प्रारंभ केला व शेवटी पोप इनोसंट तेरावे ह्यांनी १६९६ साली संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेने सदर सण साजरा करावा अशी अधिकृत घोषणा केली.
वसईतील मर्सेस या ठिकाणी मर्सेस माऊली (दयामाता) चे चर्च आहे व सप्टेंबर महिन्याच्या शेवटी दयामातेचा सण तिथे साजरा केला जातो.
इंग्लडच्या परिवर्तनासाठी आणि चुकीच्या धार्मिक शिकवणुकीपासून भाविकांचे संरक्षण व्हावे म्हणून दयामातेचा धावा केला जातो. सैतानाच्या विषारी तावडीतून पाप्यांची सुटका व्हावी, शुद्धीस्थानातील आत्म्यांचे तारण व्हावे म्हणून देखील पवित्र मरियेकडे मध्यस्थीची याचना केली जाते.
✝️
पहिले वाचन : उपदेशक ११:९-१२:८
वाचन :उपदेशक या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला आठव, कारण पाहा, माती पूर्ववत मातीला मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल."
हे तरुणा, आपल्या तारुण्यात आनंद कर, तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला उल्हास देवो, तू मनाला वाटेल त्या मार्गाने आणि नजरेला येईल तसा चाल, पण ह्या सर्वाबद्दल देव तुला जाब विचारील हे तुझ्या लक्षात असू दे. म्हणून आपल्या मनातील नैराश्य दूर कर आणि आपला देह उपद्रवापासून राख, कारण कुमारावस्था आणि जवानी ही व्यर्थ आहेत.
आपल्या तारुण्याच्या दिवसांत आपल्या निर्माणकर्त्याला आठव. पाहा, अनिष्ट दिवस येत आहेत आणि अशी वर्षे जवळ येत आहेत की, त्यात मला काही सुख नाही असे तू म्हणशील. त्या समयी सूर्य, प्रकाश, चंद्र आणि तारे अंधुक होतील आणि पावसानंतर अभ्रे पुन्हा येतील. त्याकाळी घराचे रखवालदार कापतील, बळकट पुरुष वाकतील, दळणाऱ्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहाणाऱ्या अंध होतील. जात्याचा आवाज मंद झाला म्हणजे बाहेरील दारे मिटतील, पक्ष्यांच्या शब्दाने देखील त्याच्या निद्रेचा भंग होईल, सर्व गायनस्वर मंदावतील. ते चढावाला भीतील, रस्ता धोक्यांनी भरला आहे असे त्यांना वाटेल, बदाम फुलेल, टोळसुद्धा जड असा वाटेल, वासना निमेल कारण मनुष्य आपल्या अनंतकालिक निजधामाला चालला आहे आणि ऊर बडवून रडणारे गल्ल्यागल्ल्यांतून फिरतील. मग चांदीचा दोर तुटेल, सोन्याचा कटोरा फुटेल, झऱ्याजवळ घडा फुटेल, आडावरचा रहाट मोडेल. तेव्हा माती पूर्ववत मातीला मिळेल आणि देवाने दिलेला आत्मा त्याच्याकडे परत जाईल. व्यर्थ हो व्यर्थ! उपदेशक म्हणतो, सर्व काही व्यर्थ!
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९०:३-६,१२-१४,१७
प्रतिसाद : प्रभो, तू पिढ्यान्पिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.
१) तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस,
आणि म्हणतोस, अहो मानवांनो, परत जा.
कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे कालच्या
गेलेल्या दिवसासारखी, रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.
२) तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस,
तू निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत,
सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत.
सकाळी ते तरारून वाढते,
संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.
३) आमचे आयुष्य मोजके दिवस आहे
हे आम्हाला शिकव म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ.
हे परमेश्वरा, परत फीर, किती वेळ लावशील ?
तू आपल्या सेवकांवर करुणा कर.
४) तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर,
म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन
आमचे सर्व दिवस आनंदात घालवू,
परमेश्वर जो आमचा देव त्याचा प्रसाद आमच्यावर होवो,
आमच्या हातचे काम सिद्धीस ने.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे प्रभो, तुझे वचन हेच सत्य आहे,
तू आम्हांला सत्यात समर्पित कर
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:४३ब-४५
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे, या गोष्टींविषयी त्याला विचारायला ते भीत होते. "
येशूने केलेल्या सर्व कृत्यांवरून सर्व लोक आश्चर्य करत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला, तुम्ही ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा, कारण मनुष्याच्या पुत्राला लोकांच्या हाती धरून देण्यात येणार आहे. ही गोष्ट त्यांना समजली नाही. ती त्यांना समजू नये म्हणून त्यांच्यापासून ती गुप्त ठेवण्यात आली होती आणि ह्या गोष्टींविषयी त्याला विचारायला ते भीत होते.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतो, "तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” ह्या प्रश्नाचे उत्तर पेत्राने अगदी तंतोतंत दिले. पेत्र म्हणाला 'देवाचा ख्रिस्त'. पेत्राला हे कसे शक्य झाले ? कारण पेत्राने येशूचा जवळून अनुभव घेतला होता. जेव्हा येशूचे रूपांतर झाले तेव्हा पेत्र त्याठिकाणी होता, त्यामुळे पेत्राला येशूची जवळून ओळख होती. आपल्याला येशूची खरी ओळख आहे का ? जर येशूने आपल्याला प्रश्न केला की, “मी तुमच्यासाठी कोण आहे?” या प्रश्नाला आपले उत्तर काय असेल ? आपल्याला येशूची जवळून ओळख कशी होऊ शकते ? जेव्हा आपण प्रार्थनामय जीवन जगतो, पवित्र साक्रामेंताची आराधना करतो आणि देवाचे वचन ऐकतो, तेव्हा आपणांस येशूची खरी ओळख होत असते. चला तर मग, येशूच्या वचनाप्रमाणे वागून येशूची खरी ओळख करून घेऊया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी खरी ओळख होण्यास व तुझ्या कृपेचा अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या