सामान्यकाळातील २५ वा सप्ताह
शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२
त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.”
पीएटरेलचीनचे संत फादर पीओ
आपण मानवी बुद्धीने देवाला ओळखण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्या पंचेद्रियांच्या अनुभवाने त्याला जाणण्याचा प्रयत्न करतो. मात्र देवाचे रहस्य मानवी कल्पना, बुद्धीचातुर्य व शहापणाच्या पलिकडचे आहे.
आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त, शिष्यांना प्रश्न विचारतो. 'तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?' प्रभू येशूच्या सर्व शिष्यांपैकी केवळ पेत्राने उत्तर दिले, 'देवाचा ख्रिस्त.' प्रभू येशू | देवाचा पुत्र व तारणारा आहे ह्याची जाणीव असताना सुद्धा पेत्राने येशूला तीन वेळा नाकारले होते. आज तोच प्रश्न प्रभू येशू आपल्या प्रत्येकाला विचारीत आहे. 'तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?' आपण प्रभू येशूच्या ह्या वचनावर चिंतन करु या.
✝️
पहिले वाचन : उपदेशक ३:१-११
वाचन :उपदेशक या पुस्तकातून घेतलेले वाचन
“भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो."
सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो, भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो.
जन्मसमय आणि मृत्यूसमय, पेरणीचा समय आणि कापणीचा समय असतो. वधण्याचा समय आणि बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय आणि बांधून काढण्याचा समय असतो. रडण्याचा समय आणि हसण्याचा समय. शोक करण्याचा समय आणि नृत्य करण्याचा समय असतो. धोंडे फेकून देण्याचा समय आणि धोंडे गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय आणि आलिंगन देण्याचे आवरून धरण्याचा समय असतो. शोधण्याचा समय आणि गमावण्याचा समय, साठवण्याचा समय आणि फेकून देण्याचा समय असतो. फाडून टाकण्याचा समय आणि शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय आणि बोलण्याचा समय असतो. प्रेम करण्याचा समय आणि द्वेष करण्याचा समय असतो. मनुष्य ज्यासाठी कष्ट करतो त्यात त्याला काय लाभ ?
मानवजातीला जे कष्ट देव भोगायला लावत असतो ते मी पाहिले आहेत. आपआपल्या समयी होणारी हरएक वस्तू त्याने सुंदर बनवली आहे. त्याने मनुष्याच्या मनात अनंतकालाविषयीची कल्पना उत्पन्न केली आहे, तरी देवाचा आदिपासून अंतापर्यंतचा कार्यक्रम मनुष्याला आकलन होत नाही.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४४:१-४
प्रतिसाद : परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो.
१) परमेश्वर जो माझा दुर्ग त्याला धन्यवाद असो,
तो माझा दयानिधी, माझा दुर्ग माझा गड,
माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे,
मी त्याचा आश्रय घेतो.
२) हे परमेश्वरा, मानव तो काय की तू त्याची ओळख ठेवावी ?
मर्त्य मनुष्य तो काय की तू त्याच्याकडे लक्ष पुरवावे ?
मनुष्य श्वासावर आहे, त्याचे आयुष्य नश्वर छायेसारखे आहे.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे,
कारण जे काही मी आपल्या पित्यापासून
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हांला कळवले आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक ९:१८-२२
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तू देवाचा ख्रिस्त आहे. मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी ह्याचे अगत्य आहे.'
येशू एकांती प्रार्थना करत असता शिष्य त्याच्याबरोबर होते. तेव्हा त्याने त्यांना विचारले, “लोक मला कोण म्हणून म्हणतात ?" त्यांनी उत्तर दिले, बाप्तिस्मा करणारा योहान, पण कित्येक म्हणतात एलिया आणि कित्येक म्हणतात की, प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे. त्याने त्यांना म्हटले, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” पेत्राने उत्तर दिले, “देवाचा ख्रिस्त.” मग हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि म्हटले, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी, वडील मंडळी, मुख्य याजक आणि शास्त्री ह्यांच्याकडून नाकारले जावे, जिवे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, ह्याचे अगत्य आहे.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना प्रश्न विचारतो, "तुम्ही मला कोण म्हणून म्हणता ?” ह्या प्रश्नाचे उत्तर पेत्राने अगदी तंतोतंत दिले. पेत्र म्हणाला 'देवाचा ख्रिस्त'. पेत्राला हे कसे शक्य झाले ? कारण पेत्राने येशूचा जवळून अनुभव घेतला होता. जेव्हा येशूचे रूपांतर झाले तेव्हा पेत्र त्याठिकाणी होता, त्यामुळे पेत्राला येशूची जवळून ओळख होती. आपल्याला येशूची खरी ओळख आहे का ? जर येशूने आपल्याला प्रश्न केला की, “मी तुमच्यासाठी कोण आहे?” या प्रश्नाला आपले उत्तर काय असेल ? आपल्याला येशूची जवळून ओळख कशी होऊ शकते ? जेव्हा आपण प्रार्थनामय जीवन जगतो, पवित्र साक्रामेंताची आराधना करतो आणि देवाचे वचन ऐकतो, तेव्हा आपणांस येशूची खरी ओळख होत असते. चला तर मग, येशूच्या वचनाप्रमाणे वागून येशूची खरी ओळख करून घेऊया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी खरी ओळख होण्यास व तुझ्या कृपेचा अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या