Marathi Bible Reading | Thursday 22nd September 2022 | 25th Week in Ordinary Time

सामान्यकाळातील २५ वा सप्ताह  

गुरुवार २२  सप्टेंबर २०२२

"मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?"

संत थॉमस विलानोव्हा

महागुरू, वर्तनसाक्षी (१४८८ - १५५५)

 व्हिलानोवाच्या विशप थॉमस ह्यांना देवाने चमत्कारांची, आरोग्य दानाची आणि पाषाणहृदयी लोकांचे परिवर्तन करण्याची अनन्यसाधारण शक्ती दिलेली  होती. त्यांनी 'साक्षात्कार-ईशज्ञान'(Mystical Theology) या विषयी लिहिलेल्या पुस्तकाच्या २० आवृत्त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
आर्चबिशप थॉमस १५५५ साली स्वर्गवासी झाले. त्यांना पोप आलेक्झांडर सातवे ह्यांनी १ नोव्हेंबर १६५८ रोजी संतमालिकेत समाविष्ट केले.
चिंतन : जीवन जगण्याची कला हे जगातील सर्वश्रेष्ठ शास्त्र आहे. जर तुम्हाला ही कला अवगत झाली तर तुम्ही जगातील सर्वात ज्ञानी व्यक्ती म्हणून प्रसिद्धी पावाल.- संत थॉमस विलानोव्हा

आजच्या स्तोत्रात देवाची अक्षयता व मानवाची क्षणभंगुरता ह्याचे वर्णन करीत असतानाच सुंदर प्रार्थनेचे वर्णन करण्यात आले आहे. विश्व निर्मात्या देवाचे कार्य अनादिकालापासून सूरू आहे. देव त्याच्या महानतेचे | | आणि सामर्थ्याचे दर्शन विश्वातील व मानवाच्या जीवनातील सर्व घडामोडींद्वारे  घडवत असतो. म्हणूनच त्या सर्वसमर्थ परमेश्वराला आपण शरण गेले पाहिजे. तरच देवाच्या महान अस्तित्वाची जाणीव आपल्याला होत राहील. 
✝️   

पहिले वाचन : उपदेशक  १:२-११
वाचन :उपदेशक या पुस्तकातून घेतलेले वाचन
"भूतलावर नवे म्हणून काहीच नाही."

व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो, व्यर्थ हो व्यर्थ! सर्व काही व्यर्थ. या भूतलावर मनुष्य जे सर्व परिश्रम करतो त्यात त्याला काय लाभ? एक पिढी जाते आणि दुसरी येते, पृथ्वीच काय ती सदा कायम राहते. सूर्य उदय पावून अस्ताला जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो. वायू दक्षिण दिशेकडे वाहतो आणि उलटून उत्तर दिशेकडे वाहतो, तो एकसारखा घुमत जाऊन पुन्हा पुन्हा आपली फेरी करतो. सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही, ज्या स्थळी त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुन्हा पुन्हा वाहत राहतात. सर्व काही कष्टमय आहे, कोणालाही त्याचे वर्णन करता येत नाही, ते पाहून डोळ्यांची तृप्ती होत नाही, ऐकून कानांचे समाधान होत नाही. एकदा होऊन गेले तेच होणार, करण्यात आले तेच करण्यात येणार, भूतलावर नवे म्हणून काहीच नाही. “हे पाहा, काही नवीन आहे,” असे एखाद्या गोष्टीविषयी कोणी म्हटल्यास ती आपल्यापूर्वी कित्येक शतके आधी होऊन गेलेली असते. पूर्वीच्या किंवा आधीच्या गोष्टीचे स्मरण राहिले नाही, पुढे जे होईल त्यांचेही स्मरण त्याच्या पुढल्या पिढीला राहणार नाही.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र : ९०:३-६, १२-१४.१७
प्रतिसाद : प्रभो, तू पिढ्यानपिढ्या आम्हांला निवासस्थान आहेस.

१) तू मनुष्याला पुन्हा मातीला मिळवतोस 
आणि म्हणतोस, “अहो, मानवांनो, परत जा.
" कारण तुझ्या दृष्टीने सहस्त्र वर्षे 
कालच्या गेलेल्या दिवसासारखी, 
रात्रीच्या प्रहरासारखी आहेत.

२) तू पुराप्रमाणे मानवांना घेऊन जातोस, 
तू निद्रेप्रमाणे क्षणिक आहेत, 
सकाळी उगवणाऱ्या गवताप्रमाणे ते आहेत. 
सकाळी ते तरारून वाढते, 
संध्याकाळी ते कापल्यावर वाळून जाते.

३) आमचे आयुष्य मोजके दिवस आहे हे 
आम्हांला शिकव म्हणजे आम्ही सुज्ञ होऊ.
 हे परमेश्वरा, परत फिर, किती वेळ लावशील ?
 तू आपल्या सेवकांवर करुणा कर.

४) तू आपल्या दयेने आम्हांला प्रभातीच तृप्त कर, 
म्हणजे आम्ही हर्षभरित होऊन 
आमचे सर्व दिवस आनंदात घालवू, 
परमेश्वर जो आमचा देव त्याचा कृपाप्रसाद 
आमच्यावर होवो, आमच्या हातचे काम सिद्धीस ने.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील, 
माझा पिता त्याच्यावर प्रीती करील 
आणि आम्ही त्याच्याकडे येऊ.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक ९:७-९
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 
"मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण ?"

घडत असलेल्या सर्व गोष्टीविषयी मांडलिक हेरोदने ऐकले आणि तो मोठ्या घोटाळ्यात पडला, कारण योहान मेलेल्यातून उठला आहे असे कित्येक म्हणत होते, कित्येक एलिया प्रकट झाला आहे असे म्हणत होते आणि कित्येक प्राचीन संदेष्ट्यांपैकी कोणीतरी पुन्हा उठला आहे असे म्हणत होते. पण हेरोद म्हणाला, "मी योहानचा शिरच्छेद केला, तर मग ज्याच्याविषयी मी अशा गोष्टी ऐकतो आहे, तो कोण?" म्हणून त्याला पाहण्याची तो संधी पाहत होता.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन :  एखादी व्यक्ती पापमय जीवन जगत असेल, तर ते पाप सावलीसारखे त्याचा पाठलाग करते. अगदी असेच घडले मांडलिक हेरोदाच्या बाबतीत ! हेरोदाने संत योहानाचा शिरच्छेद केला होता व हे महाभयंकर पाप त्याचा पाठलाग सोडत नव्हते, त्याचे अंतर्मन त्याला टोचत होते व त्यामुळे येशूला पाहण्याची संधी तो शोधत होता. त्याला बघायचे होते की, ज्याला मी मारले तो हाच आहे की दुसरा कुणी? त्याला फक्त त्याची शंका दूर करायची होती. पश्चातापाचा जराही लवलेश त्याच्याठायी नव्हता. याउलट जकातदार जक्कयला येशूला पाहायचे होते ते पश्चात्ताप करून नवीन जीवन जगण्यासाठी! आपण कोणत्या कारणासाठी येशूला पाहण्यासाठी तळमळत आहोत ? मांडलिक हेरोदाप्रमाणे की जकातदार जक्कय प्रमाणे! ह्या प्रश्नाचे उत्तर आपण सर्वांनी शोधून काढायचे आहे

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, जीवनात सतत जागृत राहून सकारात्मकतेने तुझा  शोध घेण्यास व अर्थपूर्ण जीवन जगण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या