ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ
शनिवार ३१ डिसेंबर २०२२
✝️
"त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.”
संत सिल्व्हेस्टर पहिले
परमगुरू, वर्तनसाक्षी ( ३३५
संत पीटरचे वारीस म्हणून पोप सिल्व्हेस्टर ह्यांची निवड झाली. ख्रिस्तसभेतील ते ३३ वे पोप होत. त्यांच्या २१ वर्षीय कारकीर्दीमध्ये त्यांनी रोमन कॅथलिक ख्रिस्तसभेमध्ये आणलेली शिस्त उल्लेखनीय आहे.
त्यांच्याच काळात रक्तसाक्षी संतांची मालिका पहिल्यांदाच संकलित आणि संग्रहित करण्यात आली. रोमन कॅथलिक उपासना गीतामध्ये एकवाक्यता यावी म्हणून त्यांनी संगीत शाळा स्थापन केली. ह्याच काळात “प्रभू दयाळा दया करा" दयायाचना ही समाविष्ट करण्यात आली. (“किरिए एलेइझॉन" हे लॅटीन गीत) ह्याच पोपमहाशयांच्या काळात सम्राट कॉन्स्टन्टाईन ह्याने व्हॅटिकनमधील महामंदिरे, लॅटरन, संत लॉरेन्सचे आणि पवित्र क्रुसाचे महामंदिर इ. वास्तुशिल्पांची उभारणी केली.
परंतु पोप सिल्व्हेस्टर पहिले ह्यांच्या काळातील सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे तुर्कस्थान येथील नायसिया ह्या ठिकाणी इ. स. ३२५ साली भरलेली पहिली सर्वपंथीय विश्वपरिषद होय. ३२० महागुरू (त्यापैकी बहुतेक पौर्वात्य ख्रिस्तसभेतील होते) कोर्डोबाच्या महागुरूंच्या अध्यक्षतेखाली आणि पोपमहाशयांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत एकत्र जमले. त्यांनी एरियस ह्या पाखंडवाद्यांचे मत खोडून काढले. एरियस ह्या धर्मगुरूला धर्मबहिष्कृत केले आणि नायसियाचा सुप्रसिद्ध विश्वासांगिकार शब्दबद्ध केला.
पोप सिल्व्हेस्टर पहिले हे ३१ डिसेंबर ३३५ साली मरण पावले आणि नवख्रिस्ती यांना धर्मशिक्षण देण्यासाठी बांधण्यात आलेल्या कॅटाकोम्ब नामक गुहेमध्ये पुरण्यात आलेले ते पहिले पोप ठरले.
'शब्द' म्हणजे देवाचे प्रकट रूप आणि देवाचे परिपूर्ण अस्तित्व. 'शब्द देही झाला' मानवाला प्रकट स्वरुपात अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी देव स्वत: देहधारी मनुष्य झाला. प्रभू येशू ख्रिस्त हाच देवाचा शब्द असून परमेश्वराचे ते परिपूर्ण आणि अंतिम प्रकटीकरण होय.
'ख्रिस्त जगाचा प्रकाश', विश्वासणाऱ्या प्रत्येकाला ख्रिस्त त्याच्या प्रकाशाने प्रकाशित करतो. जीवनात असलेला आज्ञान, दु:खे, संकटे, आजार, अपयश, निराशा अशा सर्व प्रकारच्या अंधकाराला दूर करुन ज्ञान, आनंद, आरोग्य, शांती व सुखाचा प्रकाश देणारा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांबरोबर वस्ती करण्यास आला आहे. ख्रिस्ताची शिकवण, त्याची वचने व आज्ञा आचरणात आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तिला प्रभूच्या कृपेचा अनुभव येत असतो.
शब्द रुपाने व भाकरीच्या रुपाने परिपूर्ण करण्यासाठी येणाऱ्या प्रभूला आपण अंत:करणात स्वीकारु या. कृपेने भरलेले जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या. अस्तास जात असलेल्या २०२२ ह्या वर्षाबद्दल देवाचे आभार मानू या आणि नवीन वर्षाचे स्वागत करु या.
✝️
पहिले वाचन १योहान २:१८-२१
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जो पवित्र त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे."
मुलांनो, ही शेवटची घटका आहे आणि ख्रिस्तविरोधक येणार असे तुम्ही ऐकले त्याप्रमाणे आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत. ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. आपल्यावाचून ते निघाले तरी ते आपले नव्हेत. ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते. त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले. जो पवित्र त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला आहे आणि हे तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तुम्हांला सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हांला लिहिले आहे असे नाही. तुम्हांला ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही म्हणून लिहिले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ९६:१-२,११-१३
प्रतिसाद : आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.
१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा.
पृथ्वीवर समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा.
प्रभूचे गुणगान करा. त्याच्या नामाला धन्यवाद द्या.
त्याने केलेल्या उध्दाराची दिवसेंदिवस घोषणा करा.
२) आकाश हर्ष करो. पृथ्वी आनंदित होवो.
समुद्र व त्यातले प्राणी गर्जना करोत.
मळे व त्यातले सगळे काही खूष होवोत.
मग वनातले सारे वृक्ष प्रभूसमोर आनंदाने गाऊ लागतील.
कारण तो येणार आहे, पृथ्वीचा न्याय करायला तो येणार आहे.
३) सात्त्विकतेने जगाचा न्याय करील
व मानव जातीचा यथार्थ न्याय करील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देव प्राचीन काळी अंशाअंशांनी प्रकाराप्रकारांनी संदेष्ट्यांच्याद्वारे आपल्या पूर्वाजांशी बोलला, तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलता आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान योहान १:१-१८
वाचक : योहानलिखित शुभवर्तमानाचा प्रारंभ योहान १:१-१८
"शब्द मनुष्य झाला."
प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्यावाचून झाले असे काहीच नाही. जे झाले ते त्याच्याठायी जीवन होते व ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही.
देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षीकरिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की, त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. तो प्रकाश नव्हता, तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता.
जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे होते त्याकडे तो आला तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला, त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा, अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीररीत्या म्हणतो : जो माझ्यामागून येतो तो माझ्यापुढे झाला आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता, असे ज्याच्याविषयी मी सांगितले, तो हाच आहे. कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते. कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली, देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देवपित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजचे शुभवर्तमान आपल्याला शुभवर्तमानकार संत योहानाच्या शुभवर्तमानाच्या प्रस्तावनेचा परिचय करून देत आहे. त्याच्या प्रस्तावनेत योहान आवर्जून सांगतो की, “शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. " या शब्दांनी योहान आपल्याला जाणीव करून देतो की, येशूचा जन्म ही एक काल्पनिक गोष्ट नसून ऐतिहासिक सत्य आहे. ख्रिस्ताने इतिहासाच्या विशिष्ट काळात आणि ठिकाणी जन्म घेतला. त्याच्या देहधारणेमुळे अवघी सृष्टी पवित्र झाली. निर्गम या ग्रंथात नमूद केले आहे की, कराराचा कोश हा यहुदी जनतेसाठी परमेश्वराच्या सामर्थ्यशील उपस्थितीचे प्रतिक होते. हा कराराचा कोश मंडपात वस्ती करत असे. त्या अनुषंगाने योहान आपल्याला प्रचीती करून देत आहे की, येशू ख्रिस्ताच्या माध्यमाने आणि देहधारणेमुळे परमेश्वर कायमचा आपल्यामध्ये वस्ती करत आहे. परमेश्वराच्या सामर्थ्यशील उपस्थितीचा आपल्याला दैनंदिन जीवनात अनुभव आला आहे काय ?
प्रार्थना :- :हे प्रभू येशू, आमच्या जीवनाच्या प्रकाशा, नवजीवनाच्या प्रकाशात नव वर्ष साजरे करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन,
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या