ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ
पवित्र कुटुंबाचा सण
शुक्रवार ३० डिसेंबर २०२२
✝️
“मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे."
पवित्र कुटुंबाचा सण
बेनसीराची बोधवचने ह्या पहिल्या वाचनात मुलांची आई बापासंबंधाची कर्तव्ये सांगण्यात आली आहेत. विशेषत: आई-बापास सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांच्या वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ करावा आणि आई बापा मुळेच आपले जीवन अस्तित्व आहे ह्याची मुलांनी जाण ठेवावी..
आजच्या शुभवर्तमानात संत योसेफाला देवाचा दूत बालक येशू व आई मरिया ह्यांना घेऊन मिसर देशात जाण्यासाठी आज्ञा करतो. संकट समयी देवाने त्यांचे रक्षण केले व त्यांना नासरेथात परत आणले. त्या कठीण प्रसंगी योसेफाने मरियेची व बाळाची विशेष काळजी घेतली.
ख्रिस्तसभा आज बाळ येशू, मरिया व योसेफ ह्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. आजच्या तिनही वाचनांच्या संबंधाने आपण आपल्या कौटुंबिक जीवनावर चिंतन करु या.
संत योसेफ, पवित्र मरिया व बाळ येशू ह्या कुटुंबाचा आदर्श आपल्यासमोर आहे. आपण खरे ख्रिस्ती कुटुंब बनावे म्हणून प्रेरणा घेऊ या.
✝️
पहिले वाचन बेन सिरा ३ : २-६,१२-१४
वाचक :बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
“जो परमेश्वराला भितो तो आईबापाला मान देतो."
प्रभूने बापाला मुलापेक्षा अधिक सन्मान दिला आहे आणि त्याने मुलाबरोबर आईच्या अधिकाराला महत्त्व दिले आहे. जो आपल्या बापाला मान देतो, तो आपल्या पापांची भरपाई करतो आणि जो आपल्या आईचा सन्मान करतो त्याची तुलना धनदौलत जमवणाऱ्याबरोबर करता येते. जो बापाला मान देतो, त्याला त्याची मुले आनंदित करतील आणि जेव्हा तो प्रार्थना करील तेव्हा ती ऐकली जाईल. बापाला मान देणाऱ्याचे आयुष्य दीर्घ होते. जो आईचे समाधान करतो तो परमेश्वराची आज्ञा पाळतो. हे मुला, तुझ्या बापाला त्याच्या म्हातारपणी आधार दे आणि तो जिवंत असेपर्यंत त्याला दुःख देऊ नकोस, त्याची समज कमी झाली तरी त्याला दया दाखव. तुझ्या सामर्थ्यात त्याचा तिरस्कार करू नकोस. बापाला दाखविलेली दया फुकट जाणार नाही. तर तुझ्या पापांच्या भरपाईसाठी तिचा उपयोग होईल.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १२८:१-५
प्रतिसाद :परमेश्वराचे भय धरून चालतो तो धन्य.
१ )धन्य तो पुरुष, जो परमेश्वराचे भय धरतो,
जो त्याच्याच मार्गानी चालतो.
तू आपल्या श्रमाचे फळ खाशील.
तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
२ )तुझ्या घरात तुझी स्त्री जणू काय द्राक्षीच्या
सफळ वेलीसारखी होईल.
तुझी मुले तुझ्या मेजाभोवती
जैतुनाच्या रोपासारखी होतील.
३) पाहा, परमेश्वराचे भय धरणारा पुरुष
याप्रमाणे आशीर्वाद पावेल.
परमेश्वर सियोनतून तुला आशीर्वाद देवो.
आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस
येरुशलेमचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.
दुसरे वाचन
पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ३ : १२-२२
"प्रभूठायी कौटुंबिक जीवन. "
तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा. प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती ह्या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. परस्परांना सर्व ज्ञानाने शिकवण द्या व बोध करा. आपल्या अंत:करणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा आणि बोलणे किंवा करणे जे काही कराल ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा, त्याच्याद्वारे देव जो पिता त्याची उपकारस्तुती करा.
स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये उचित आहे त्याप्रमाणे तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा.
पतींनो, तुम्ही आपापल्या पत्नीवर प्रीती करा व तिच्याशी निष्ठुरतेने वागू नका.
मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आईबापांची आज्ञा पाळा. हे प्रभूला संतोषकारक आहे. बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका. आणाल तर ती खित्र होतील.
हा प्रभूचा शब्द आहे
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
ख्रिस्ताची शांती तुमच्या हृदयात राज्य करो.
ख्रिस्ताच्या संदेशाला तुम्हांमध्ये स्थान मिळो.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय २:१३ - १५,१९-२३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"इजिप्तमध्ये पवित्र कुटुंब. "
मागी लोक गेल्यावर, पाहा, प्रभूचा दूत योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन इजिप्त देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा, कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे." मग तो उठला आणि बाळक व त्याची आई ह्यांना घेऊन रातोरात इजिप्त देशात निघून गेला आणि हेरोदच्या मरणापर्यंत तेथे राहिला. “मी आपल्या पुत्राला इजिप्त देशातून बोलावले आहे." हे जे प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. पुढे हेरोद मरण पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत इजिप्त देशात योसेफला स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलच्या देशास जा, कारण जे मुलाचा जीव घ्यायला पाहात होते ते मरून गेले आहेत.” तेव्हा तो उठला आणि बाळाला व त्याच्या आईला घेऊन इस्राएलच्या देशात आला. परंतु अर्खेलाव हा आपला बाप हेरोद याच्या जागी यहुदियात राज्य करीत आहे असे ऐकून तो तेथे जायला घाबरला आणि स्वप्नात सूचना झाल्यामुळे तो गालिली प्रांतात गेला व नाझरेथ नावाच्या गावी जाऊन राहिला. अशासाठी की, “त्याला नाझरेथकर म्हणतील” हे जे संदेष्ट्यांच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आज देऊळमाता नाझरेथच्या पवित्र कुटुंबाचा सण साजरा करीत आहे. आजच्या शुभवर्तमानात योसेफ आणि मरियेचे मिसर देशात पलायनाचा वृत्तांत कथन केला आहे. त्यामागचा प्रमुख उद्देश म्हणजे बाळ येशूची सुरक्षा. पवित्र कुटुंबाप्रमाणे प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाचा उद्देश असला पाहिजे. तो उद्देश पोप संत जॉन पॉल दुसरे ह्यांनी स्पष्ट केला आहे. ते म्हणतात की, प्रत्येक ख्रिस्ती कुटुंब एक लहान देऊळ आहे, त्यात परमेश्वराची आराधना होते आणि परमेश्वराची आज्ञा प्रमाण मानली जाते. ज्या कुटुंबात याची अंमलबजावणी होते, ते कुटुंब सुखी आणि समाधानी असून योग्य दिशेने वाटचाल करते. अशा आदर्श कुटुंबाचे सविस्तर वर्णन आजच्या पहिल्या वाचनात केले आहे. त्यात मुलं त्याचा आईवडिलांचा आदर आणि सन्मान करून परमेश्वराच्या विपुल कृपेचा उपभोग घेतात. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात परमेश्वराच्या आज्ञेला प्रथम स्थान देण्यासाठी आणि त्याचबरोबर श्रद्धेत वृद्धींगत होण्यासाठी विशेष प्रार्थना करू या.
प्रार्थना :- : हे प्रभू येशू, तू आमच्या कुटुंबाचा आश्रयदाता राजा आहेस. आमच्या कुटुंबात प्रेम, सौख्य व शांती अनुभवण्यास आम्हाला तुझ्या कृपेने भर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या