Marathi Bible Reading | Thursday 29th December 2022 | Christmas Week

                     ख्रिस्त जन्मोत्सव - नाताळ

नाताळ सप्ताहातील

गुरुवार २९ डिसेंबर २०२२

  ✝️ 

"माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.'



संत थॉमस बेकेट, 
रक्तसाक्षी

✝️   
 शिमोन हा भक्तीमान व नीतिमान माणूस इस्त्राएलाच्या सांत्वनदात्या परमेश्वराची वाट पाहत असतो. येशू बाळाला पाहताच शिमोन आनंदाने देवाला धन्यवाद देत म्हणतो, 'हे प्रभू, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे.' पवित्र जीवन जगणारा, नीतिने आचरण करणारा आणि निष्ठेने ! तारणाऱ्याची वाट पाहणाऱ्या शिमोनाला प्रभू येशूचे दर्शन घडले आणि तो धन्य झाला.  मोठ्या आनंदाने शिमोनाने प्रभू येशू ख्रिस्त तारणारा असल्याची साक्ष  येरुशलेमच्या मंदिरात दिली.

ख्रिस्तसभा आज रक्तसाक्षी संत थॉमस बेकेट ह्यांचा सन्मान करीत आहे. इंग्लडचा राजा हेन्री दुसरा ह्यांच्या दरबारातील महत्वाची व्यक्ती थॉमस बेकेट ह्यांना कैंटरबरीचे आर्चबिशप म्हणून राजाने नेमणूक केली होती. मात्र ख्रिस्तसभेच्या हिताच्या योजनांच्या विरोधात राजा असल्यामुळे थॉमस बेकेट ह्यांनी राजाला विरोध केला. ख्रिस्ती मुल्ये आणि ख्रिस्ताची शिकवण सत्याने देणाऱ्या थॉमस बेकेट ह्यांचा राजा हेन्री दुसरा ह्यांनी मृत्यु घडवून आणला. येशूच्या  नावासाठी आणि ख्रिस्तसभेच्या कार्यासाठी संत थॉमस बेकेट ह्यांनी आपला प्राण अर्पण केला. ज्यांनी ख्रिस्ताचा प्रकाश अनुभवला आहे ते आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष जगाला देत असतात. ख्रिस्ताच्या प्रकाशात आपण आपले जीवन उज्ज्वल बनवू या.

“येशूच्या नावासाठी आणि ख्रिस्तसभेच्या कोणत्याही कामासाठी मी मरायला तयार आहे." -संत थॉमस बेकेट



पहिले वाचन १योहान २:३-११
वाचक :योहानचे पहिले पत्र यातून घेतलेले वाचन

"जो आपल्या बंधूवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो."
आपण त्याच्या आज्ञा पाळल्या तर त्यावरून आपणांस कळून येते की, आपण त्याला ओळखतो. मी त्याला ओळखतो असे म्हणून त्याच्या आज्ञा जो पाळीत नाही तो लबाड आहे. त्याच्या ठायी सत्य नाही. जो कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्णत्व पावली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्या ठायी आहे आपण त्याच्याठायी होत. मी त्याच्याठायी राहतो, असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वत: ही चालले पाहिजे.
प्रियजनहो, मी तुम्हांसाठी नवी आज्ञा लिहीत नाही, परंतु जी आज्ञा तुम्हांला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच जुनी आज्ञा लिहितो. जे वचन तुम्ही ऐकले ते, ती जुनी आज्ञा होय. तरी पण एक प्रकारे मी तुम्हांसाठी नवी आज्ञा लिहितो. ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्या ठायी अडथळा नसतो. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो, तो कोठे चालला आहे हे त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ९६:१-३,५-६
प्रतिसाद :आकाश हर्ष करो. पृथ्वी उल्हासो.

१) एखादे नवीन गीत गाऊन प्रभूचे गुणगान करा. 
पृथ्वीवर समस्त जनहो, प्रभूचे गुणगान करा.
 प्रभूचे गुणगान करा.
त्याच्या नामाला धन्यवाद द्या.

२) त्याने केलेल्या उध्दाराची दिवसेंदिवस घोषणा करा. 
देशोदेशी त्याचा महिमा प्रकट करा. 
साऱ्या मानवजातीला त्याची अलौकिक कृत्ये जाहीर करा.

३)प्रभूने तर नभोमंडल निर्माण केले, 
शाही वैभवाने व तेजाने ते, मंडित आहे. 
त्याच्या गाभाऱ्यात सामर्थ्य आणि सौंदर्य वसते.


जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
शब्द देह झाला आणि त्याने आम्हांमध्ये वस्ती केली, 
परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला
त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास 
ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक :२२-३५

वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“परराष्ट्रीयांच्या प्रबोधनासाठी प्रकाश."

मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर योसेफ व मरिया हे येशूबाळाला वर येरुशलेम येथे घेऊन आले. त्याचे प्रभूला समर्पण करावे, म्हणजे 'प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा' असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे आणि प्रभूच्या नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे होल्यांचा जोडा किंवा पारव्याची दोन पिल्ले ह्यांचा यज्ञ करावा म्हणून ते घेऊन आले.

तेव्हा पाहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य येरुशलेममध्ये होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्राएलच्या सांत्वनाची वाट पाहात होता व त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्याअगोदर तुला मरण येणार नाही असे पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले, तेव्हा त्याने त्याला आपल्या हातात घेऊन देवाला धन्यवाद देत म्हटले :

“हे प्रभो, आता तू आपल्या वचनाप्रमाणे आपल्या दासाला शांतीने जाऊ देत आहेस, कारण माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिले आहे. ते तू सर्व राष्ट्रांसमक्ष सिद्ध केले आहे.. ते परराष्ट्रीयांना प्रकटीकरण होण्यासाठी उजेड व तुझ्या इस्राएल लोकांचे वैभव असे आहे. "

त्याच्याविषयी जे हे सांगण्यात आले त्यावरून त्याचा बाप व त्याची आई ह्यास आश्चर्य वाटले. शिमोनने त्याला आशीर्वाद दिला व त्याची आई मरिया हिला म्हटले,“पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन: उठणे होण्यासाठी ह्याला नेमले आहे, ह्यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे. आणखी तुझ्या स्वतःच्याही हृदयातून तरवार भोसकून जाईल."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआजचे शुभवर्तमान मंदिरात येशूचे समर्पण ही घटना कथन करते. नियमशास्त्रानुसार प्रत्येक प्रथम जन्मलेल्या मुलाला परमेश्वराला समर्पित करणे बंधनकारक होते (निर्गम १३:२). या कायद्याची पूर्तता करण्यासाठी मरिया आणि योसेफाने येशूला येरूशलेम मंदिरात समर्पित केले. त्याच क्षणी त्यांची भेट शिमोन नावाच्या मनुष्याशी झाली. तो नीतिमान मनुष्य होता तो मशिहाची आतुरतेने वाट पाहत होता. पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केले होते की, ख्रिस्ताला पाहिल्यावाचून तो मरणार नाही. येशूला कवेत घेताबरोबर शिमोन स्तोत्रात त्याचा आनंद उल्हास व्यक्त करून परमेश्वराला धन्यवाद देतो. त्याच्या स्तोत्रात जे हिब्रु लोक मसिहाच्या आगमनाची आणि देवराज्याच्या स्थापनेची वाट पाहत होते अशा गरजवंताच्या आशेचा समावेश दडलेला आहे. त्याचबरोबर शिमोनाने येशू आणि मरियेच्या जीवनात दुःखाचे प्रसंग येतील याचे भाकीत वर्तविले. आपल्यात शिमोनसारखी ख्रिस्तासाठी उत्सुकता आहे काय ? शिमोनप्रमाणे ख्रिस्ताला आपण उराशी बाळगतो का ?

प्रार्थना :- हे प्रभू येशू, आमच्या जीवनातील सर्व प्रकारचा अंधार दूर कर. तुझ्या  प्रकाशाचे साक्षीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या