Marathi Bible Reading | Friday 23rd December 2022 | 4th Week of Advent |

                     आगमनकाळातील ४चौथा  सप्ताह 

शुक्रवार  २३ डिसेंबर २०२

 “प्रभू त्याच्या बरोबर होता.

कॅन्टीचे संत जॉन 
वर्तनसाक्षी (१३९०-१४७३)

सत्याच्या विरूद्ध असलेल्या सर्व मतांशी लढा द्या परंतु ह्या लढाईत सहनशीलता, कनवाळूपणा आणि परोपकार प्रेम ही शस्त्रे हाती बाळगा. कारण हिंसा ही दुधारी तरवारीप्रमाणे तुमच्या आत्म्याला इजा करते, आणि तुमचा शुद्ध हेतू देखील पायदळी तुडविते. - कॅन्टीचे संत जॉन

✝️

 
  योहान बाप्तिस्ताचा जन्म याजक जखऱ्या आणि त्याची पत्नी अलीशिबा ही दोघेही धर्मशील आणि नीतिमान अशा याजक घराण्यात झाला. परमेश्वराने त्याची निवड तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग तयार करणारा म्हणून केली होती. योग्य वेळी योहान अरण्यात जाऊन राहिला आणि परमेश्वराच्या आत्म्याने परिपूर्ण झाला. यार्देन नदीच्या पलिकडे त्याने आपल्या सेवाकार्याचा प्रारंभ केला. जगात सर्वाच्या उद्धारासाठी जन्माला येणाऱ्या तारणाऱ्यासाठी, (मशिहा) तयारी म्हणून पश्चातापाचा बाप्तिस्मा घेण्यासाठी लोकांच्या झुंडी त्याच्याजवळ येऊन बाप्तिस्मा घेत असतांनाच स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा योहानाकडून बाप्तिस्मा स्विकारला.
प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा आणि मशिहा आहे अशी साक्ष योहानाने दिली. प्रभू येशू ख्रिस्ताचे आगमन व त्याचे स्वागत हेच त्याच्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट होते. धैर्यवान आणि सत्यवादी असलेल्या योहानाचा अन्यायी हेरोदाने शीर धडावेगळे करुन त्याचा वध केला. परंतु स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने योहानाची प्रशंसा केली आहे. 'स्त्रियांपासून जन्मलेल्यांत बाप्तिस्मा करणारा योहान ह्याच्यापेक्षा मोठा कोणी निघाला नाही' (मत्तय ११:११). त्याच्या मृत्यूनंतरही त्याचे शिष्य त्याच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहिले आणि म्हणूनच नंतर ते ख्रिस्ताचे अनुयायी बनले. योहान बाप्तिस्ताचा जन्म केवळ ख्रिस्त जन्मासाठी होता आणि म्हणूनच 'प्रभू त्याच्या बरोबर होता."
आपणा प्रत्येकाला ख्रिस्ताचा मार्ग तयार करण्याची संधी देवाने दिलेली आहे त्या संधीचा योग्य तो फायदा घेऊ या.


पहिले वाचन मलाखी  ३:१-४, ४:५-६
वाचक : मलाखी या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “पाहा परमेश्वराचा दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुम्हांकडे पाठवीन."

प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “पाहा, माझ्यापुढे मार्ग तयार करण्यासाठी मी आपला संदेष्टा पाठवतो, ज्या प्रभूला तुम्ही शोधता तो एकाएकी आपल्या मंदिरात येईल. पाहा, करार घेऊन येणाऱ्या संदेष्ट्याची तुम्ही अपेक्षा करीत आहा तो येत आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याच्या आगमनाच्या दिवशी कोण निभावेल ? तो प्रगट होईल तेव्हा कोण टिकेल ?"

"कारण तो धातू गाळणाऱ्याच्या अग्नीसारखा, परिटाच्या खारासारखा आहे. रूपे गाळून शुद्ध करणाऱ्यासारखा तो बसेल आणि लेवीच्या वंशजाला शुद्ध करील, त्याला सोन्यारुप्याप्रमाणे शुद्ध करील. मग ते धर्माने परमेश्वराला बली अर्पण करतील. पूर्वीच्या दिवसांप्रमाणे, प्राचीन वर्षाप्रमाणे यहुदा आणि येरुशलेम यांचे यज्ञार्पण परमेश्वराला आवडेल.”
पाहा, परमेश्वराचा मोठा व भयंकर दिवस येण्यापूर्वी मी एलिया संदेष्ट्याला तुम्हांकडे पाठवीन. तो वडिलांचे हृदय त्याच्या वडिलांकडे वळवील. मी येऊन भूमीला शापाने ताडन करावे असे न होवो.”
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २५:४-५,८-१०,१४
प्रतिसाद :   तुमचा मुक्तिसमय जवळ आला आहे.

१) हे प्रभो, तुझे मार्ग मला दाखव, 
तुझ्या वाटा मला प्रकट कर. 
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव, 
मला वळण लाव, कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.

२) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे! 
तो पापीजनांना सन्मार्गाने चालायला शिकवतो. 
नम्र लोकांना न्यायपरायणता दाखवतो. 
गरिबांना आपला मार्ग प्रकट करतो.

३) परमेश्वराच्या कराराचे आणि त्याच्या
 आज्ञांचे पालन करणाऱ्यांना प्रभूचे सर्व
 मार्ग प्रेमपूर्ण आणि विश्वसनीय आहेत. 
त्याचे भय धरणाऱ्यांशी प्रभूचे सख्य असते. 
तो आपला करार त्यांना प्रकट करतो.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
हे इम्मानुएल, आमच्या राजा आणि न्यायाधीशा, हे प्रभो परमेश्वरा, ये आणि आमचे तारण कर.
 आलेलुया!

शुभवर्तमान लूक १:५७-६६

वाचक :  लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "बाप्तिस्मा करणाऱ्या योहानचा जन्म."

अलिशिबेचे दिवस पूर्ण भरल्यावर तिला मुलगा झाला. प्रभूने तिच्यावर मोठी दया केली हे ऐकून तिचे शेजारी आणि नातलग हे तिच्याबरोबर आनंद करू लागले. मग आठव्या दिवशी ते बाळकाची सुंता करायला आले. त्याच्या बापाच्या नावावरून ते त्याचे नाव जखऱ्या ठेवणार होते. परंतु त्याच्या आईने म्हटले, “ते नको; ह्याचे नाव योहान ठेवावयाचे आहे.' ते तिला म्हणाले, “ह्या नावाचा तुझ्या नातलगात कोणी नाही." मग ह्याचे काय नाव ठेवायचे आहे असे त्यांनी त्याच्या बापाला खुणावून विचारले. त्याने पाटी मागवून, “ह्याचे नाव योहान आहे” असे लिहिले. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. मग लगेच त्याचे तोंड उघडले, त्याची जीभ मोकळी झाली आणि तो देवाला धन्यवाद देत बोलू लागला. ह्यावरुन त्यांच्याभोवती राहणाऱ्या सर्वांना भय वाटले आणि यहुदियाच्या सगळ्या डोंगराळ प्रदेशात ह्या सर्व गोष्टींविषयी लोक बोलू लागले. ऐकणाऱ्या सर्वांनी ह्या गोष्टी आपल्या अंतःकरणात ठेवून म्हटले, “हा बाळक होणार तरी कोण ?" कारण प्रभू त्याच्याबरोबर होता.

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतनआजच्या पहिल्या वाचनात संदेष्टा मलाखी निरोप्याचा उल्लेख करतो. हा निरोप्या योहान बाप्तिस्तासुद्धा याजकाच्या कुळातला आहे. अर्थात तो याजक आहे. तो यरुशलेमच्या मंदिराच्या आवारात आणि वातावरणात वाढलेला होता. त्याचबरोबर मंदिराच्या विधीशी तो परिचित होता. तर मग तो वाळवंटात का आहे ? मंदिरात का नाही ? जेरूसलेम मंदिराचे नूतनीकरण हेरोद राजाने स्वतःच्या गौरवासाठी केले होते. परंतु तो एक दुष्ट राजा होता. याची प्रचीती आपल्याला नव्या करारामध्ये होते. हेरोद राजा स्वतःला इस्रायलचा मसिहा म्हणून संबोधायचा. योहान बाप्तिस्ताने हा भ्रष्टाचार पाहिला होता. त्याला अंर्तज्ञानाने जाणीव होती की, खराखुरा मसिहा लवकरच उदयास येणार आहे. म्हणून तो येरूशलेमच्या जुन्या मंदिरापासून लांब जातो आणि नवीन मंदिराचा (येशूख्रिस्त नवीन परमपवित्र स्थानाचा) याजक होतो. नवीन मंदिर असलेल्या येशू ख्रिस्ताप्रमाणे आपण स्वतः पवित्र आत्म्याचे मंदिर आहोत याचे भान आपल्याला आहे काय ? (१ करिंथ ६:१९)

प्रार्थना :- हे प्रभू येशू ख्रिस्ता, आमच्या जीवनातील ध्येय परिपूर्णतेस नेण्यासाठी आम्हाला सहाय्य कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या