Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Monday 16th January 2023| 2nd Week in Ordinary Time


 सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

 सोमवार   दि.१६ जानेवारी  २०२३

वहाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय?


✝️


सेंट जोसेफ वाझ
(वर्तनसाक्षी)(१६५१-१७११)

आशिया खंडामधून जेवढे महान मिशनरी तयार झाले त्याच्यात धन्यवादित जोसेफ वाझ ह्यांचा फार वरचा क्रमांक लागेल. इ. स. १६५१ साली गोव्यातील बेनोली येथे त्यांचा जन्म झाला. १६७६ साली वयाच्या अवघ्या २५ व्या वर्षी त्यांना धगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. १७११ साली श्रीलंकेतील कॅन्टी शहरात त्यांना मृत्यू आला.

आपल्या आयुष्याची ३६ मौल्यवान वर्षे धर्मगुरू म्हणून त्यांनी गोवा, कॅनरा आणि श्रीलंका ह्या ठिकाणी ईश्वरी सेवेत व्यतीत केली. समर्पित वृत्तीचा मिशनरी आणि कुशल प्रशासक म्हणून ते नावारुपाला आले. कॅनरा येथील ख्रिस्तसभेमध्ये प्रशासनावरून पाद्रो आदो-प्रोपोगांडा असा वाद निर्माण झाला. तेव्हा फा. जोसेफ ह्यांनी मोलाची कामगिरी बजावली आणि तो वाद मिटविला.

भारतीय मिशनऱ्यांमध्ये ऐक्य आणि त्यांच्या कार्यात एकवाक्यता असावी म्हणून त्यांनी जुन्या गोव्यामध्ये मिलाग्रीस क्रुसाच्या नावाने एक प्रशिक्षण केंद्र उभारले. श्रीलंकेतील आपले मिशनकार्य सदैव चालूच रहावे याकरिता त्यांनी ह्या केंद्रात अनेक मिशनरी घडविले. हे मिशनरी श्रीलंकेव्यतिरिक्त इतर अनेक भागात सुवार्ता प्रसार करीत असत. मात्र श्रीलंकेतील श्रद्धेची ज्योत नेहमी प्रज्वलित ठेवण्यासाठी ते आपल्या परिश्रमाचे तेल त्यात नेहमी ओतून ठेवीत.

जोसेफ वाझ ह्यांचे पवित्र जीवन, अथक परिश्रम, समर्पित आणि उत्साही वृत्ती, आशावादी दृष्टीकोन, धैर्य इ. सद्गुणांमुळे श्रीलंकेतील ख्रिस्तसभेत एक आगळेवेगळे चैतन्य संचारले.

फा. वाझ ह्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीने गोव्याच्या आपल्या मातृभूमीत ब्रद्धेचे बीज पेरताना संस्कृतीला अजिबात धक्का लागणार नाही ह्याची काळजी घेतली. त्याकाळी अस्तित्वात असलेली पोर्तुगीजांची राजवट आणि त्यांच्यातर्फे आलेले पाश्चात्य ख्रिस्ती धर्माचे संस्कार ह्यांचा फारसा प्रभाव गोव्यातील नवख्रिस्तीयांवर पडू शकला नाही. कारण फा. वाझ ह्यांची कार्यप्रणाली चाणाक्ष आणि तितकीच कणखर होती.

'यथा राजा तथा प्रजा' या उक्तीनुसार “ज्यांचे राज्य त्यांचा धर्म” लोकांनी पाळावा ही त्याकाळी एक प्रथाच बनून गेलेली होती. परंतु फा. जोसेफ वाझ आणि त्यांचे सहकारी धर्मगुरू ह्यांनी ही प्रथा खंबीरपणे मोडीत काढली आणि आपल्या स्थानिक संस्कृतीशी व मातीशी इमान राखणारा ख्रिस्ती धर्म त्यांच्याच मातृभाषेत लोकांना शिकविण्यास सुरुवात केली. हे करीत असताना त्यांनी वसाहतवाद्याशी कुठलेही संबंध ठेवण्यास नकार दिला. त्यामुळे गोव्यातील ख्रिस्ती धर्मतत्वे अबाधित राखण्यात त्यांना यश आले.

इ. स. १७११ साली मृत्यू पावलेल्या फा. जोसेफ वाझ ह्यांना पोप जॉन पॉल दुसरे ह्यांनी २१ जाने. १९९५ रोजी धन्यवादित म्हणून आल्ताराचा बहुमान दिला.१४ जानेवारी २०१५ रोजी पोप फ्रान्सिस यांनी त्यांना संत पॅड घोषित केले 

पहिले वाचन इब्री  ५:१-१०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

 प्रत्येक प्रमुख याजक मनुष्यातून घेतलेला असून देवाविषयक गोष्टींबाबत मनुष्यांकरिता नेमलेला असतो; त्याने दाने आणि पापांबद्दल यज्ञ ही दोन्ही अर्पावी. अज्ञानी आणि बहकणारे ह्यांच्याबरोबर तो सौम्यतेने वागू शकतो, कारण तोही स्वतः दुर्बलता वेष्टिलेला आहे आणि ह्या दुर्बलतेमुळे त्याने जसे लोकांसाठी तसे स्वत:साठीही पापांबद्दल अर्पण केले पाहिजे. हा मान कोणी आपण होऊन घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. त्याचप्रमाणे ख्रिस्तानेही प्रमुख याजक होण्यासाठी आपणा स्वत:ला गौरविले नाही, तर ज्याने त्याला म्हटले. "तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे," त्याने त्याला गौरविले. त्याप्रमाणेच दुसऱ्या ठिकाणीही तो म्हणतो,

"मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."

आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देहावस्थेच्या दिवसांत, मोठा आक्रोश करीत आणि अश्रू गाळीत प्रार्थना आणि विनवणी केली आणि ती त्याच्या सद्भक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले त्याद्वारे तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगीच्या तारणाचा कर्ता झाला आणि त्याला मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे प्रमुख याजक असे देवाकडून संबोधण्यात आले.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४

प्रतिसाद :  मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.

१ माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो: "तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस."

२ परमेश्वर तुझा राजदंड सियोनेतून पुढे नेईल; तो म्हणतो, आपल्या शत्रूंवर प्रभूत्व कर.

३ तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले तुझे तरूण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.

४ परमेश्वराने शपथ वाहिली आहे आणि तो ती बदलणार नाही. "मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस."


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

तू आपला मुखप्रकाश आपल्या दासावर पाड आणि तुझे नियम मला शिकव.

आलेलूया !

शुभवर्तमान मार्क २: १८-२२

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

      एके दिवशी योहानचे शिष्य आणि परुशी उपास करीत होते, तेव्हा लोक येऊन येशूला म्हणाले, “योहानचे शिष्य आणि परुश्यांचे शिष्य उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाहीत, ह्यांचे कारण काय ?" येशू त्यांना म्हणाला, “वहाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत उपास करणे त्यांना शक्य आहे काय? त्यांच्याबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांना उपास करणे शक्य नाही. तरी असे दिवस येतील की, त्यांच्यापासून वर काढून घेतला जाईल, तेव्हा त्या दिवसांत ते उपास करतील. कोणी कोऱ्या कपडाचे ठिगळ जुन्या वस्त्राला लावत नाही, लावले तर धड करण्याकरिता लावलेले ठिगळ त्याला म्हणजे जुन्याला फाडते आणि छिद्र मोठे होते. कोणी नवा द्राक्षारस जुन्या बुधल्यात घालत नाही; घातला तर नव्या द्राक्षारसाने बुधले फुटतात, द्राक्षारस सांडतो आणि बुधलेही निकामी होतात; म्हणून नवा द्राक्षारस नव्याच बुधल्यात घालतात."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  एकमेव याजक प्रभू यशू ह्याचा, उगम मालकिसदेक ह्या याजकापर्यंत जातो, हे दर्शविले आहे. परंपरावादी, परुश्यांना प्रभू येशू नव्या द्राक्षरसाचे महत्त्व शुभवर्तमानात पटवून देत आह.  परुश्यांनी प्रभू येशूला उपवासाचा प्रश्न विचारला असताना, प्रभू येसू त्यांना नवा  द्राक्षरस व नवा बुधला ह्याचे उदाहरण देऊन पटवून देतो की परमेश्वठायी विश्वास ठेवणाऱ्यांनाच जीवनाचे दाव समजत असते.
 आपल्या देहाप्रमाणेच आपल्याला अंतर्यामी देवाचा ध्यास लागला म्हणजे उपवास फलद्रूप झाला असे  म्हणायला हरकत नाही. परंतु  देवाचा ध्यास लागण्यासाठी त्याच्या आंतरिक  सहवासाची गरज आहे. येशूचे शिष्य त्याच्या सहवासात असल्यामुळे त्यांना  शारीरिक उपवासाची गरज भासली नाही.

आपल्याला जर प्रभू येशूच्या सहवासात यायचे असेल तर आपल्या  वाईट सवयी, दुष्ट प्रवृत्ती, स्वार्थीपणा आणि जे जे प्रभू येशूपासून आपल्याला दूर | ठेवते अशा सर्वांचा त्याग किंवा उपवास करु या.


प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या सहवासाचा अनुभव घेण्यासाठी मला त्याग व तुझ्याशी एकनिष्ठ राहण्यास कृपा दे, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️