वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.'
शिष्य भाकरी घ्यावयास विसरले होते आणि मचव्यात त्यांच्याजवळ एकच भाकरी होती. मग येशूने त्यांना निक्षून सांगितले, “सांभाळा, परुश्यांचे खमीर आणि हेरोदचे खमीर ह्यांविषयी जपून राहा.” तेव्हा "आपल्याजवळ भाकरी नाहीत" अशी ते आपसांत चर्चा करू लागले. हे जाणून येशू त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ भाकरी नाहीत ह्याविषयी चर्चा का करता ? तुम्ही अजून ध्यानात आणत नाही आणि समजतही नाही काय ? तुमचे अंत:करण कठीण झाले आहे काय ? डोळे असून तुम्हाला दिसत नाही काय ? कान असून तुम्हाला ऐकू येत नाही काय ? तुम्हाला आठवत नाही काय ? मी पाच हजार लोकांना पाच भाकरी मोडून वाटून दिल्या तेव्हा तुम्ही उरलेल्या तुकड्यांच्या किती टोपल्या भरून घेतल्या ?" ते त्याला म्हणाले, “बारा.” “तसेच चार हजारांसाठी सात भाकरी मोडल्या तेव्हा तुम्ही किती पाट्या तुकडे भरून घेतले?” ते म्हणाले, “सात.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, "अजून तुम्हाला समजत नाही काय ?"
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: डोळे असूनही आंधळ्यासारखे वागणारे व कान असूनही ऐकू न येणारे येशूची शिष्य मंडळी येशूच्या शब्दांचे फटकारे खातात. शिष्य तर येशूच्या अगदी जवळ होते. आपण तर येशूपासून खूप लांब गेलो आहोत. आपली काय अवस्था होईल ? आजच्या पवित्र वाचनात आपण याच गोष्टीवर प्रकाश टाकणार आहोत. आजच्या पवित्र वाचनात येशू आपल्या शिष्यांना फटकारतो. तुमची अंतःकरणे आंधळी आहेत. तुम्हाला डोळे असूनही दिसत नाही व कान असूनही ऐकू येत नाही. शिष्य हे येशूच्या अवतीभवती असूनही येशूने केलेला चमत्कार ओळखण्यात कमी पडले. येशूने पाच भाकऱ्या व दोन मासे यांमधून पाच हजार लोकांना भोजन दिले. येशूचा शब्द ऐकायला आलेले लोक पोटभर जेवून काही भाकऱ्या व मासे उरले. परंतु येशूचा चमत्कार समजण्यात त्याचे शिष्य कमी पडले. देवाने मानवावर इतके प्रेम केले की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. त्या पुत्राने मानवाच्या पापाच्या भरपाईसाठी वधस्तंभावरचे मरण स्वीकारले व मानवावरचे प्रेम सिद्ध केले. आपल्या दैनंदिन जीवनात आपण परमेश्वराचे चमत्कार पाहण्यात धन्यता मानतो. परंतु देव आपल्याबरोबर कसा असतो हे पाहण्यात, ओळखण्यात आपण कमी पडतो. परमेश्वरी कार्यासाठी आपण सदैव तत्पर व तयार असले पाहिजे. आयुष्यातील प्रत्येक क्षणात, प्रत्येक श्वासात देव आपल्याबरोबर असतो. जेव्हा जेव्हा आपण अडचणीत असतो आपण प्रार्थना करतो तेव्हा देव आपल्यासाठी धावून येत असतो परंतु हे सर्व पाहण्यासाठी आपले अंतःकरण, हृदय, डोळे व कान सदैव उघडे असले पाहिजेत
प्रार्थना : हे प्रभू येशू, सर्व अनिष्टांपासून आमचे रक्षण कर व तुझ्या वचनानुसार जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !