उपवासकाळातील दुसरा सप्ताह
शुक्रवार दि.१० मार्च २०२३
✝️
“जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;"
✝️
तुर्कस्थानमधील आर्मेनिया ह्या ठिकाणच्या सेबेस्टे येथील चाळीस सैनिक ३२० साली रक्तसाक्षी बनले. कप्पाडोसियाचा राज्यपाल आग्री कोलॉस ह्याने सेबेस्टे येथील लोकांना मूर्तीला नैवेद्य दाखविण्याचा आदेश दिला. त्यावेळी ह्या ४० सैनिकांनी इतरांपासून अलिप्त राहून आपली ख्रिस्ती श्रद्धा अबाधित ठेवण्याच्या हेतूने एकजुटीने राहण्याचे ठरविले. ते वेगवेगळ्या देशांतून आलेले होते. त्यांनी मूर्तीपूजेला नकार दिला. यावरून ते ख्रिस्ती आहेत असा निष्कर्ष काढून त्यांना सेबेस्टे येथल्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले परंतु कुठल्याही शिक्षेच्या भीतीपोटी ते आपली श्रद्धा सोडून देण्यास तयार नव्हते.
प्रारंभी राज्यपालाने त्यांचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर त्यांचा अमानुष छळ करण्याचा व तुरूंगात टाकण्याचा आदेश देण्यात आला. तुरूंगात असताना त्यांना प्रभू येशूचे दर्शन झाले. त्याने त्यांना जिद्द व चिकाटीने पुढे जाण्यास धीर दिला.
त्यावर्षी कडाक्याची थंडी पडलेली होती. एका उघड्या तलावात बर्फाच्छादित भूभागावर त्यांना उघडे नागडे झोपविण्याचा व मृत्यूपर्यंत त्या थंडीत कुडकुडत राहण्याचा हुकूम सोडण्यात आला. त्या जीवघेण्या थंडीत त्यांना क्षणभर मोहात पाडण्यासाठी तलावा शेजारी एक भला मोठा विस्तव पेटविण्यात आला होता. ह्या शिक्षेचे त्या चाळीस सैनिकांकडून आनंदाने स्वागत झाले. कोणी शिपाई येऊन आपले कपडे उतरविल ह्याची त्यांनी वाट पाहिली नाही. ते स्वत:हून उघड्या नागड्या अवस्थेत व बर्फाच्छादित तलावात गेले व पाण्यावर तरंगू लागले. "एका छळवादी रात्रीच्या गर्भात सार्वकालिक सुखाचा उष:काल दडलेला आहे” असे म्हणत त्यांनी एकमेकांचे सांत्वन केले. त्यांनी एकत्रितपणे देवाची स्तुती आराधना केली आणि अशी प्रार्थना केली: “हे परमेश्वरा आम्ही चाळीसजण एकत्रितपणे या संघर्षात उतरलेलो आहोत. आम्हा चाळीसही जणांना तुझ्या वेदनेचा मुकूट बहाल कर. ह्या पवित्र आकड्याचा अवमान होईल व ही संख्या कमी होईल असे आमच्या हातून काही घडू देऊ नकोस."
ज्या सैनिकांनी या चाळीस सैनिकांवर पहारा ठेवला होता त्यांनी स्वर्गातून ३९ देवदूत येताना व आपणा सोबत गौरवशाली मुकूट आणताना पाहिले. दरम्यानच्या काळात एकजण सरपटत विस्तवाच्या अग्नीजवळ आलेला होता. त्याला थोडावेळ ऊब मिळाली. परंतु लवकरच त्याला अपराधीपणाची भावना टोचू लागली व त्यातच त्याचा मृत्यू झाला. परंतु हे पाहून शेजारी उभ्या असलेल्या सैनिकांपैकी एकाने ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेतली आणि त्या मृत सैनिकाच्या जागेवर त्याने शिक्षा भोगायला सुरूवात केली. पुन्हा एकदा रक्तसाक्ष्यांची संख्या ४० पर्यंत गेली. सर्वजण एकनिष्ठेने अखेरचा श्वास घेत होते.या चाळीस सैनिकांमध्ये एक सैनिक बराच वेळ जिवंत होता. जेव्हा अधिकारी आला तेव्हा त्याला हा सैनिक जिवंत असलेला आढळला. त्याने आपला विश्वास सोडून दिल्यास त्याला वाचविण्यात येईल असे आमिष त्याला दाखविण्यात आले. परंतु त्यावेळी त्याची आई त्याच्या शेजारी उभी राहिली. त्यामुळे त्या सैनिकांमध्ये नवीन बळ संचारले. त्याने पुन्हा एकदा ख्रिस्ती धर्माचा जयजयकार केला. त्यामुळे त्याला इतर ३९ जणांसह चित्तेमध्ये टाकण्यात आले.
तारणाच्या इतिहासात देवाने अनेकांच्याद्वारे आपली योजना घोषित केली. मात्र अनेकदा निवडलेल्या लोकांनी सुद्धा देवाविरुद्ध बंड केले. ते बहकले आणि त्यांनी अनेक संदेष्ट्यांना जिवे मारले. प्रभू येशू ख्रिस्त देवपुत्र होता त्यालासुद्धा जिवे मारले. मात्र पुनरुत्थित होऊन त्याने देवाचे गौरव प्रकट केले. आपण आपले जीवन फलदायी बनवून ख्रिस्ताच्या राज्याचे सहभागीदार बनण्यास प्रेरणा व बळ मागू या.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती ३७: ३ -४,१३,१७-२८
वाचक :उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे; तर आता चला, आपण त्याला ठार करू."
इस्राएल आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफवर अधिक प्रीती करीत असे. कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने त्याच्यासाठी पायघोळ झगा केला होता. आपला बाप आपल्या इतर सर्व भावांपेक्षा त्याच्यावर अधिक प्रीती करतो हे पाहून ते त्याचा द्वेष करू लागले व त्याच्याशी सलोख्याने भाषण करिनासे झाले.यानंतर त्याचे भाऊ आपल्या बापाचे कळप चारायला शखेम येथे गेले. तेव्हा इस्राएल योसेफाला म्हणाला, "तुझे भाऊ शखेम येथे कळप चारीत आहेत. तर चल, मी तुला त्याच्याकडे पाठवतो."
योसेफ आपल्या भावाच्या मागे गेला व ते त्यांना दोथानात सापडले. त्यांनी त्याला दुरून पाहिले, तेव्हा तो त्यांच्याजवळ येऊन पोहचण्यापूर्वी, त्याला मारून टाकण्याचा त्यांनी कट केला. ते एकमेकांना म्हणाले, “पाहा, तो स्वप्नदर्शी येत आहे, तर आता चला, आपण त्याला ठार करून एका खड्डयात टाकून देऊ आणि मग सांगू कोणा हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले, मग पाहू त्याच्या स्वप्नाचे काय होत ते. " हे रऊबेनच्या कानी आले, तेव्हा त्याने त्यांच्या हातातून त्याला सोडवले; तो त्यांना म्हणला, "आपण त्याला जिवे मारू नये. रक्तपात करू नका; या रानातल्या खड्ड्यात त्याला टाका, पण त्याच्यावर हात टाकू नका." त्याच्या हातातून सोडवून त्याला त्याच्या बापाकडे परत पाठवून द्यावे म्हणून तो असे म्हणाला, योसेफ आपल्या भावापाशी पोहोचला, तेव्हा त्याच्या अंगात पायघोळ झगा होता तो त्यांनी काढून घेतला आणि त्याला धरून खड्ड्यात टाकून दिले. तो खड्डा कोरडा होता. त्यात पाणी नव्हते.
मग ते शिदोरी खायला बसले असता, त्यांनी वर नजर करून पाहिले तो इश्माएली लोकांचा एक काफिला उंटावर मसाला, ऊद व गंधरस लादून गिलादहून इजिप्तकडे जात आहे असे त्यांना दिसले. तेव्हा यहुदा आपल्या भावांना म्हणाला, आपण आपल्या भावाला ठार मारून त्याचा खून लपविला तर काय लाभ ? चला, आपण त्यांना या इश्माएली लोकांना विकून टाकू; आपण त्याच्यावर हात टाकू नये; कारण तो आपला भाऊ आहे. आपल्या हाडामांसाचा आहे हे त्याच्या भावांना पसंत पडले. ते मिद्यानी व्यापारी जवळून चालले तेव्हा त्यांनी योसेफला त्या खड्ड्यातून ओढून बाहेर काढले आणि त्या इश्माएली लोकांस वीस रुपयांला विकून टाकले. ते योसेफला इजिप्त देशात घेऊन गेले.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १०५:१६-२१
प्रतिसाद : प्रभूची अद्भुत कृत्ये आठवा.
१) इजिप्त देशावर प्रभूने दुष्काळ आणला.
त्यांच्या अन्नधान्याचा पुरवठा पार तोडून टाकला.
त्याच्या अगोदर त्याने एक मनुष्य पुढे पाठवला.
तो म्हणजे गुलाम म्हणून विकण्यात आलेला योसेफ !
२) त्यांनी त्याचे पाय साखळ्यांनी जखडले,
गळ्याभोवती लोखंडी कडे अडकवले,
पुढे योसेफने वर्तवलेले भविष्य खरे ठरले.
प्रभूच्या वचनानुसार त्याचे म्हणणे बरोबर ठरले.
३) इजिप्तच्या राजाने माणसे पाठवून
त्याला मुक्त केले. राष्ट्राच्या अधिपतीने
त्याची सुटका केली.. त्याने त्याला आपल्या
राज्याचा सत्ताधीश आणि
आपल्या सर्वस्वावर अधिकारी नेमले.
जयघोष
प्रभू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही.
शुभवर्तमान मत्तय २१:३३-४३,४५-४६
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा वारस आहे. चला, आपण ह्याला ठार मारू."
येशूने मुख्य याजक आणि लोकांच्या वडीलजनांना म्हटले, "आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी एक गृहस्थ होता. त्याने द्राक्षमळा लावला. त्याभोवती कुंपण घातले. त्यामध्ये द्राक्षरसासाठी कुंड खणले व माळा बांधला आणि तो माळ्यांना लावून देऊन आपण परदेशी गेला. नंतर फळांचा हंगाम आल्यावर त्याने आपले फळ घेण्याकरिता आपल्या दासांना माळ्यांकडे पाठवले. तेव्हा माळ्यांनी त्याच्या दासांना धरून कोणाला ठोक दिला, कोणाला जिवे मारले व कोणाला धोंडमार केला. त्याने फिरून पहिल्यापेक्षा अधिक असे दुसरे दास पाठवले. त्यांच्याशीही ते तसेच वागले. शेवटी माझ्या मुलाचा ते मान राखतील, असे म्हणून, त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. परंतु माळी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा वारस आहे; चला, आपण ह्याला ठार मारू व ह्याचे वतन घेऊ. तेव्हा त्यांनी त्याला धरून द्राक्षमळ्याबाहेर काढून ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा धनी येईल तेव्हा तो त्या माळ्यांचे काय करील?" ते त्याला म्हणाला, "तो त्या दुष्टांचे हालहाल करून त्यांचा नाश करील आणि जे माळी हंगामी त्याला फळ देतील अशा दुसऱ्यांकडे तो द्राक्षमळा लावून देईल." येशू त्यांस म्हणाला, “जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला;" हे परमेश्वराकडून झाले आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे, असे शास्त्रात तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय? म्हणून मी तुम्हांला सांगतो, “देवाचे राज्य तुम्हांपासून काढून घेतले जाईल व जी प्रजा त्याचे फळ देईल तिला ते दिले जाईल."
मुख्य याजक व परुशी त्याचे दाखले ऐकून, हा आम्हांविषयी बोलत आहे असे समजले. ते त्याला धरायला पाहात होते, परंतु त्यांना लोकसमुदायाची भीती वाटली; कारण ते त्याला संदेष्टा मानत होते..
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: येशू त्यांना म्हणाला, “जो दगड बांधणाऱ्यांनी नापसंत केला, तोच कोनशिला झाला, हे परमेश्वराकडून झाले, आणि ते आमच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे.” (मत्तय २१:४२) येशूचे हे शब्द ‘स्तोत्र ११८: २२-२३ मधील असून ते जीवनात कसेआश्चर्यकारक परिवर्तन घडते, जीवन कसे बदलू शकते हे दर्शविते. जे निरुपयोगी मानले गेले जातात आणि बाहेर फेकले गेले जातात त्यांना सर्वात महत्त्वाचे स्थान दिले गेले आहे. हे आश्चर्यकारक आहे, जवळजवळ अविश्वसनीय ! ही झाली परमेश्वराची कार्यपद्धती. बायबल अशा गोष्टींनी व कथांनी भरलेले आहे, जिथे दुर्बळ व गरीबांना बलवान व सामर्थ्यशाली लोकांपेक्षा जास्त पसंती दिली जाते. परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे सार हेच आहे. मानवी शक्ती निरुपयोगी आहे. खरी शक्ती परमेश्वरातच आहे. परमेश्वरावर विश्वास ठेवून आपल्याला जीवनात आशावादी दृष्टीकोन आणण्याची गरज आहे. एक आशावादी आस्तिक प्रत्येक गोष्टीत चांगले पाहतो, कारण त्याचा / तिचा असा विश्वास असतो की, परमेश्वर प्रत्येक गोष्टीत आपले भले पाहतो. संत इग्नेशिअसची " consciousness examen” ची प्रार्थना म्हणजे जीवनात आशावादी होण्याचे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवण्याचे आपणासाठी एक निश्चित साधन आहे! तर मग निराशा सोडून परमेश्वरावरील विश्वासात आशावादी बनू या.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या योजनेला योग्य तो प्रतिसाद देण्यास व परिवर्तनशील जीवन जगण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या