Marathi Bible Reading | Saturday 11th March 2023 | 2nd Week of Lent

उपवासकाळातील दुसरा सप्ताह 

शनिवार  दि.११ मार्च २०२३

✝️ 
हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे."




संत युलोजिअसचा सण - रक्तसाक्षी

जे श्रद्धेमध्ये शेवटपर्यंत टिकून राहतात त्यांना सार्वकालिक जीवनाचा मुकूट दिला जातो. ह्या मुकूटाचे महात्म्य जर समजून घेतले तर या जगातील कोणत्याही ऐहिक सुखाला आपण बळी पडणार नाही." -कॉर्डोबाचे संत युलोजिअस

✝️

परमेश्वर दयाळू, प्रेमळ व क्षमा करण्यात आनंद मानीत असतो. आपण आपल्या पापी जीवनावर चिंतन करीत असताना देवाच्या प्रेमळ स्वभावावर चिंतन करु या. आपण जीवनात देवापासून दूर गेलो तरी देव आपली परत येण्याची वाट पाहत असतो. विशेषतः जीवनात बहकलेले व निराश झालेल्या तरुणांना हा दाखला खूप प्रेरणादायी आहे. देवाच्या आपल्यावरील प्रीतित कधीच खंड पडत नाही. आपण पश्चात्तापी अंत:करणाने प्रभूला शरण जाऊ या.
✝️

पहिले वाचन  मीखा  ७:१४-१५,१८-२० 
वाचक : मीखा या पुस्तकातून घेतलेले वाचन 

हे देवा, तू आकडी घेऊन आपल्या लोकांना चार, तुझ्या वतनातील मेंढरे कार्मेलच्या झाडीत एकांती राहतात त्यांना चार; प्राचीन काळच्या दिवसांप्रमाणे बाशानात व गिलादात त्यांना चरू दे. तू इजिप्त देशातून बाहेर निघालास त्या दिवसांप्रमाणे त्याला मी अद्भुत कृत्ये दाखवीन.
तुझ्यासमान देव कोण आहे? तू अधर्माची क्षमा करतो, आपल्या वतनाच्या अवशेषांचे अपराध मागे टाकतोस; तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. तो वळून पुनः आम्हांवर दया करील. तो आमचे अपराध पायांखाली तुडवील. तू त्याची सर्व पापे समुद्राच्या डोहात टाकशील. प्राचीन काळापासून तू आमच्या वडिलांना शपथपूर्वक सांगितल्याप्रमाणे याकोबबरोबर सत्यतेने व आब्राहामबरोबर वात्सल्याने वागशील.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०३:१-४,९-१२

प्रतिसाद   परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे.

१) हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर; 

हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. 

हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर,

 त्याचे सर्व उपकार विसरु नको.


२) तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो, 

तो तुझे सर्व रोग बरे करतो, 

तो तुझा जीव विनाशगर्तेतून उद्धरतो, 

तो तुला दया व करुणा ह्यांचा मुकूट घालतो.


३) तो सर्वदाच दोष देत राहाणार नाही; 

तो आपला क्रोध सर्वकाळ राहू देणार नाही. 

आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही, 

त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हांला प्रतिफळ दिले नाही.


४) कारण जसे पृथ्वीच्यावर आकाश उंच आहे 

तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे.

 पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे,

 तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर नेले आहेत.


जयघोष 

आताच समय अनुकूल आहे आजच तारणाचा दिवस आहे.


शुभवर्तमान लूक  १५:१-३,११-३२

वाचक : लूक  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

सर्व जकातदार व पापी येशूचे ऐकायला त्याच्याजवळ येत होते, तेव्हा परुशी व शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले की, "हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो." मग त्याने त्यांना एक दाखला सांगितला :
कोणाएका मनुष्याला दोन मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. मग फार दिवस झाले नाहीत तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशी निघून गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून टाकली. त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन त्याला चिकटून राहिला. त्याने त्याला आपल्या शेतात डुकरे चारायला लावले. तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पोट भरावे अशी त्याला फार इच्छा होई. त्याला कोणी काही देत नसे. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या किती तरी मोलकऱ्यांना भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर येथे भुकेने मरतो आहे. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही. आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा." मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही." पण बापाने आपल्या दासांना सांगितले, "लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला. ह्याच्या हातात अंगठी व पायात जोडा घाला आणि पुष्ट वासरू आणून कापा; आपण खाऊ आणि आनंदोत्सव करू कारण हा माझा मुलगा मेला होता, तो पुन्हा जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे." मग ते आनंदोत्सव करू लागले.

त्याचा वडील मुलगा शेतात होता; तो घराजवळ आला तेव्हा त्याने गायनवादन व नृत्य ह्यांचा आवाज ऐकला. तेव्हा त्याने एका चाकराला बोलावून विचारले, हे काय चालले आहे? त्याने त्याला सांगितले, तुमचा भाऊ आला आहे आणि तो तुमच्या वडिलांना सुखरूप परत मिळाला म्हणून त्यांनी पुष्ट वासरू कापले आहे.
तेव्हा तो रागावला व आत जाईना; म्हणून त्याचा बाप बाहेर आला व त्याची समजूत घालू लागला. परंतु त्याने बापाला उत्तर दिले. पाहा, मी इतकी वर्षे तुमची सेवाचाकरी करीत आहे आणि तुमची एकही आज्ञा मी कधीच मोडली नाही; तरी मला आपल्या मित्राबरोबर आनंदोत्सव करण्यासाठी तुम्ही कधी करडूही दिले नाही. पण ज्याने तुमची संपत्ती कसबिणींबरोबर खाऊन टाकली तो हा तुमचा मुलगा आला आणि तुम्ही त्याच्यासाठी पुष्ट वासरू कापले ! त्याने त्याला म्हटले, "बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आणि आनंद करणे योग्य आहे; कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झाला आहे; हरवला होता, तो सापडला आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: या जगात असे बरेच लोक आहेत जे सूड उगवण्यात आनंद व समाधान मानतात. "जशास तसे" हे जगाचे स्वीकृत तत्त्व आहे. बऱ्याचदा आम्ही म्हणतो : हे योग्यच आहे. कधी ना कधी त्याला आपल्या वाईट कृत्याची किंमत मोजावी लागेलच. परंतु परमेश्वराचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे. त्याला शिक्षा करण्यात आनंद होत नाही. दुर्दैवाने आपल्यापैकी बरेचजण शिक्षा करणारा कठोर न्यायाधीश किंवा कठोर पोलीस अशी परमेश्वराची प्रतिमा साकारतो. उधळ्या पुत्राच्या दाखल्याद्वारे येशू आपला हा गैरसमज दूर करत आहे. तो बदलण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण हा प्रसिद्ध दाखला हजारो वेळा ऐकला आहे तरीसुद्धा आपल्याला अद्याप ही परमेश्वराचे अथांग प्रेम आणि दया पूर्णपणे समजलेली नाही. आज आपण परमेश्वराबद्दलची आपली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करू या आणि दयेचा अथांग सागर असलेल्या परमेश्वराची, दयाळू पित्याची प्रतिमा अनुभवण्याचा प्रयत्न करू या. 

प्रार्थना:हे प्रभू परमेश्वरा, पश्चातापी अंत:करणाने चांगले कुमासर  करण्यास व परिवर्तीत जीवन जगण्यास मला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या