Marathi Bible Reading | 12th March 2023 |3rd Sunday of Lent

उपवासकाळातील तिसरा रविवार 

 दि.१२ मार्च २०२३

✝️ 
 
"जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल."


 ती स्त्री त्याला म्हणाली, "महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले.

✝️

पाणी हे जीवनासाठी आवश्यक असे दान देवाने आपल्याला दिलेले आहे. आपल्या सर्वांसाठी प्रभू येशू स्वतःच जीवनदायी कृपेचा अखंडितपणे वाहणारा झरा आहे. सार्वकालिक जीवन देणारा प्रभू येशू एकमेव प्रभू आहे. त्याच्या कृपेच्या झऱ्यातील पवित्र पाणी पिण्यासाठी आपण त्याच्या जवळ जाऊ या. आपली दुःखे, वेदना, संकटे, आजार व अडचणी घेऊन त्या कृपेच्या झऱ्याजवळ येऊन त्यातून अनंत जीवनाच्या पाण्याचे प्राशन करु या. .
✝️

पहिले वाचन निर्गम १७:३-७
वाचक :निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आम्हांला प्यायला पाणी द्या.' "
इस्राएल लोकांना पाण्याची तहान लागली तेव्हा ते कुरकुर करुन मोशेला म्हणाले, “आम्हांस, आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांस तहानेने मारून टाकण्यास तू आम्हांला इजिप्त देशातून बाहेर काढलेस काय ?" मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले. “ह्या लोकांकरिता मी काय करावे ? हे तर मला बहुतेक दगडमार करायला तयार झाले आहेत. ' 31 परमेश्वर मोशेला म्हणाला, "इस्राएलातील काही वडील माणसे बरोबर घेऊन व नाईल नदीवर आपली काठी हाती घेऊन लोकांच्यापुढे चाल. पाहा, होरेब पर्वतावरील एका खडकावर मी तुझ्यापुढे उभा राहीन. तू त्या खडकावर काठी आपट, त्यातून पाणी निघेल आणि ते हे लोक पितील " मोशेने इस्राएलच्या वडिलांदेखत तसे केले. मोशेने त्या ठिकाणाचे नाव मस्सा (परीक्षा) आणि मरिबा (कलह) असे ठेवले. कारण इस्राएल लोकांनी तेथे कलह केला आणि "परमेश्वर आम्हामध्ये आहे किंवा नाही ?" असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ९५:१-२, ६-७,८-९
प्रतिसाद : आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल !

१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करूया; 
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. 
उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ. 
स्तोत्रे गात त्याचा जयजयकार करू.

२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता
 त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची भक्ती करू, 
त्याच्यापुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे. 
आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, 
त्याच्या हातचा कळप आहोत.

३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल ते किती बरे होईल ! 
मरिबाप्रमाणे रानातील मस्साच्या दिवशी केल्याप्रमाणे 
तुम्ही आपले मन कठीण करू नका. 
तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली.
 मला पारखले, माझी कृती पाहिली.

दुसरे वाचन  रोमकरांस पत्र  ५:१- २,५-८
वाचक :  पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ५:१- २,५-८

"आपणाला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंतःकरणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे."

आपण विश्वासाने नीतिमान ठरवलेले आहोत म्हणून आपणाला आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण ज्या कृपेमध्ये आहो, त्यात आपला प्रवेशही त्याच्याद्वारे विश्वासाने झाला आहे आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो.
आशा लाजवीत नाही, कारण आपणांला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणांवरच्या स्वतः च्या प्रीतीचे प्रमाण देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला.
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष 
हे प्रभो, तू खरोखर जगाचा तारणारा आहेस; मला कधीही तहान लागू नये म्हणून जिवंत पाणी मला दे.

शुभवर्तमान योहान ४ : ५-४२
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 
 “सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा."
* (येशू शोमरोनमधून सुखार नावाच्या नगरात आला. ते याकोबने आपला मुलगा योसेफ ह्याला दिलेल्या शेताजवळ होते. तेथे याकोबचा झरा होता. चालून चालून दमलेला येशू तसाच त्या झऱ्यावर बसला. तेव्हा सुमारे सहावा तास होता. तेथे शोमरानची एक स्त्री पाणी काढायला आली. तिला येशू म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” कारण त्याचे शिष्य अन्न विकत घ्यावयास नगरात गेले होते. तेव्हा शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली, “आपण यहुदी असता माझ्यासारख्या शोमरोनी स्त्रीजवळ प्यावयाला पाणी मागता हे कसे ? कारण यहुदी शोमरोनी लोकांबरोबर संबंध ठेवत नसतात.' येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे, असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते, आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते." ती स्त्री त्याला म्हणाली, “महाराज, पाणी काढावयास आपल्याजवळ पोहरा नाही व विहीर तरे खोल आहे; मग ते जिवंत पाणी आपल्याजवळ कोठून ? आमचा पूर्वज याकोब ह्याने ही विहीर आम्हाला दिली. तो स्वतः, त्याचे मुलगे व त्याची गुरेढोरे हिचे पाणी पीत असत. त्याच्यापेक्षा आपण मोठे आहात काय ?” येशूने तिला उत्तर दिले, “जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी देईन ते पाणी कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही; जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उकळत्या पाण्याचा झरा असे होईल." ती स्त्री त्याला म्हणाली, "महाराज, मला तहान लागू नये व पाणी काढावयास मला येथवर येणे भाग पडू नये म्हणून ते पाणी मला द्या." )
(संक्षिप्त रूपासाठी (चरण ५-१५, १९-२६,३९-४२) कंसात दिलेले पाठ वापरता येतील. )
येशू तिला म्हणाला, "तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण." ती स्त्री म्हणाली, “मला नवरा नाही." येशूने तिला म्हटले, "मला नवरा नाही हे तू ठीक बोललीस: कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही; हे तू खरे सांगितलेस." ती स्त्री त्याला म्हणाली, "महाराज, आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता, जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान येरुशलेमेत आहे." येशू तिला म्हणाला, "बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व येरुशलेमातही करणार नाही अशी वेळ येत आहे, हे माझे खरे मान. तुम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करता; आम्हांला ठाऊक नाही अशाची उपासना आम्ही करतो; कारण यहुद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असे असावे अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे." ती स्त्री त्याला म्हणाली, “मसिहा, ज्याला ख्रिस्त म्हणतात तो येणार आहे हे मला ठाऊक आहे; तो आल्यावर आम्हांला सर्व गोष्टी सांगेल." येशू तिला म्हणाला, “जो तुझ्याबरोबर बोलत आहे तोच तो आहे.")

इतक्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीबरोबर बोलत आहे ह्याचे त्यांना आश्चर्य वाटले; तरी "आपण काय विचारता आहा ?” किंवा “आपण तिच्याबरोबर का बोलत आहा ?” असे कोणी म्हटले नाही. ती स्त्री तर आपली घागर तेथेच टाकून नगरात गेली व लोकांना म्हणाली, "चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले, त्या मनुष्याला पाहा. तोच ख्रिस्त असेल काय ?” तेव्हा ते नगरातून निघून त्याच्याकडे येऊ लागले.
दरम्यान शिष्य त्याला विनंती करू लागले की, “गुरुजी, जेवा.” परंतु तो त्यांना म्हणाला, तुम्हांला ठाऊक नाही असे अन्न माझ्याजवळ खावयाला आहे. यावरून शिष्य एकमेकांना म्हणू लागले, “याला कोणी खायला आणले असेल काय?” येशू त्यांना म्हणाला, “ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे. अजून चार महिन्यांचा अवकाश आहे, मग कापणी येईल असे तुम्ही म्हणता की नाही? पाहा, मी तुम्हांला म्हणतो, आपली नजर वर टाकून शेते पाहा; ती कापणीसाठी पिवळी होऊन चुकली आहेत. कापणारा मजुरी मिळवतो व सार्वकालिक जीवनासाठी पीक एकवट करतो; ह्यासाठी की, पेरणाऱ्याने व कापणाऱ्यानेही एकत्र आनंद करावा. एक पेरतो व एक कापतो, अशी जी म्हण आहे ती ह्या बाबतीत खरी आहे. ज्यासाठी तुम्ही श्रम केले नव्हते ते कापायला मी तुम्हांला पाठवले; दुसऱ्यांनी श्रम केले होते व तुम्ही त्याच्या श्रमाचे वाटेकरी झाला आहा."
("मी केले सर्वकाही त्याने मला सांगितले," अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातील पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आल्यावर त्यांनी त्याला आपल्या येथे राहण्याची विनंती केली; मग तो तेथे दोन दिवस राहिला. त्याच्या वचनावरून आणखी कितीतरी लोकांनी विश्वास धरला. ते त्या स्त्रीला म्हणाले, “आता तुझ्या बोलण्यावरूनच आम्ही विश्वास धरतो असे नाही, कारण आम्ही स्वतः ऐकले आहे व हा खचित जगाचा तारणारा आहे हे आम्हांला कळले आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: प्रायश्चित्तकाळाचा एक महत्वाचा हेतू म्हणजे आजच्या सर्व वाचनांमध्ये दर्शविल्याप्रमाणे (निर्गम १७:३-७; रोम ५:१-२; योहान ४:५-४२) परमेश्वराशी बिघडलेले नातेसंबंध पूर्ववत करणे. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू शोमरोनी स्त्रीला चार पातळीवर हे संबंध सुधारण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे: 
अ. परमेश्वराला पाहण्यासाठी आपण दृश्य स्वरूपापलीकडे जायला हवे : येशूने जेव्हा शोमरोनी स्त्रीकडे प्यायला पाणी मागितले तेव्हा तिला आश्चर्य वाटले. तो केवळ एक यहुदी पुरुष आहे असे तिला दिसले. त्यामुळे त्याच्याजवळ जीवनाचे पाणी असेल असे तिला वाटले नाही. 
ब. परमेश्वराशी नाते प्रस्थापित करण्यासाठी आपण आखीव रेखीव सीमारेषांपलीकडे जायला हवे: याकोब आपला पूर्वज आहे याविषयी शोमरोनी स्त्रीला खूप अभिमान वाटत होता. त्याच्यापेक्षा येशू श्रेष्ठ असू शकेल अशी तिची अपेक्षा नव्हती. येशू तिला याकोबच्या विहिरीतील पाण्याची मर्यादा दर्शवून ते पाणी माणसाची खरी तहान भागवू शकत नसल्याचे स्पष्ट करतो. 
क. परमेश्वराची उपासना करण्यासाठी आपण स्वतःच्या धार्मिक जीवनापलीकडे जायला हवे : गेरिझीम पर्वतावर जाऊन प्रार्थना केली की आपण परमेश्वराची उपासना केली असे शोमरोनी स्त्रीला वाटत होते. मात्र देव पित्याची उपासना विशिष्ट जागी न करता ती विशिष्ट प्रवृत्तीने म्हणजे आत्म्याने व खरेपणाने करायला हवी असे येशू तिला सुचवितो. 
ड. परमेश्वराला ओळखण्यासाठी मशिहाविषयी असलेली आपली संकल्पना व्यापक करायला हवी. शोमरोनी स्त्री मशिहाची वाट पाहात होती. तो येईल तेव्हा आपल्याला सर्वकाही शिकवील असे तिला वाटत होते. मात्र मसिहा साक्षात समोर उभा होता. दूरचे पाहताना ती जवळचे पाहायला विसरली होती. येशूच्या शब्दांनी वप्रेमळ सहवासाने तिची संकल्पना व्यापक बनली. घागर तिथेच ठेवून ती ग्रामस्थांना येशूच्या पायांपाशी घेऊन आली.

आत्मपरीक्षण ह्या प्रायश्चित्तकाळात परमेश्वराशी असलेले माझे नातेसंबंध सुधारण्यासाठी मी काय काय करीत आहे ?

प्रार्थना :   हे प्रभू येशू, जीवनाच्या अप्रतिम झऱ्या, आम्हाला तुझ्या तारणदायी पाण्याचे वरदान दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या