उपवासकाळातील तिसरा सप्ताह
सोमवार दि.१३ मार्च २०२३
✝️
"मी तुम्हांला सत्य सांगतो की, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.
ख्रिस्ताचे सुवार्ता कार्य करणाऱ्या प्रत्येक माणसाला असा स्वकीयांकडून नाकारलेपणाचा अनुभव येतोय. मात्र अशा प्रसंगी सकारात्मक बनून ते आव्हान स्वीकारायला हवे.
आपल्या परिसरात सेवाकार्य करणाऱ्या प्रापंचिकांना आपण सहकार्य करावे, त्यांना प्रोत्साहित करावे आणि विशेषत: समाजाने त्यांना स्वीकारावे म्हणून आपण सर्वजण प्रयत्नशील बनायला हवे. खरा नेता आपल्या मध्येच असतो मात्र त्याची खरी ओळख होणे खूप महत्वाचे आहे.
पहिले वाचन २ राजे ५:१-१५
वाचक : राजाच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
अरामच्या राजाचा सेनापती नामान हा एक प्रतिष्ठित गृहस्थ असून आपल्या स्वामीजवळ त्याचे मोठे वजन असे. कारण त्याच्यामुळेच परमेश्वराने अराम्यांना युद्धात विजयी केले होते. तसाच तो मोठा पराक्रमी वीर होता. परंतु त्याला कोड निघाले होते. एकदा अरामी टोळ्यांनी इस्राएली प्रदेशात छापा घालून एक लहान मुलगी कैद करून आणली होती. ती नामानच्या बायकोची दासी झाली होती. ती आपल्या स्वामिनीला म्हणाली, "आमच्या स्वामींनी शोमरोनातल्या संदेष्ट्याची गाठ घेतली तर बरे होईल! तो यांचे कोड बरे करील.” तेव्हा नामानने राजाकडे जाऊन सांगितले की, "इस्राएली प्रदेशातील ती मुलगी असे म्हणत आहे." जा तर 33 मग, अरामचा राजा म्हणाला, "मी इस्राएलच्या राजाला खलिता देतो.” तेव्हा दहा किक्कार रौप्यमुद्रा, सहा हजार सुवर्णमुद्रा (मोहरा) व दहा पोषाख घेऊन नामान निघाला. त्याने इस्राएलच्या राजाला खलिता सादर केला. त्यात लिहिले होते, "या पत्रासोबत मी आपणाकडे आमचे मानकरी नामान यांना पाठवत आहे, त्याचे कोड आपण घालवावे." मग असे झाले की, पत्र वाचताच इस्राएलच्या राजाने त्रागाने आपली वस्त्रे फाडली. तो म्हणाला, "या कोड फुटलेल्या माणसाला बरे करण्याकरिता या गृहस्थाने माझ्याकडे पाठवले आहे; पण मी जीवन आणि मरण देणारा देव का आहे ? पहा ना, माझ्याशी भांडायला हा काही तरी निमित्त पहात आहे."
इस्राएलच्या राजाने आपली वस्त्रे फाडली, हे देवभक्त अलिशाने ऐकले तेव्हा त्यने राजाला निरोप पाठवला, "आपण कशाला आपली वस्त्रे फाडलीत? त्याला येऊ द्या ना माझ्याकडे म्हणजे इस्राएलात संदेष्टा आहे हे त्याला समजेल." तेव्हा नामान आपले घोडे व रथ घेऊन अलिशाच्या दारी येऊन उभा रहिला. मग अलिशाने एक जासूद पाठवून त्याला सांगितले, यार्देनवर जाऊन सात वेळा स्नान कर म्हणजे तुझे शरीर पूर्ववत होऊन तु शुद्ध होशील. पण नामान रागावून निघाला आणि म्हणाला, "मला वाटले होते, तो मला भेटायला बाहेर येईल. जवळ उभे राहून आपल्या परमेश्वराचा धावा करील. रोगट जागेवरून हात फिरवून माझे कोड घालवील. दिमिष्कातल्या अबाना आणि पडपर या नद्या इस्राएलातल्या साऱ्या जलाशयांपेक्षा सरस नाहीत का ? त्यात स्नान करुन मला शुद्ध नाही का होता येणार ?" मग तो मागे फिरला व रागाच्या भरात चालता झाला. तेव्हा त्याचे हुजरे जवळ येऊन म्हणाले, "पिताजी, या संदेष्ट्याने एखादा जालीम उपाय सुचवला असता तर आपण तो केला नसता काय? तर तो म्हणतो, स्नान करा आणि शुद्ध व्हा, त्यात काय आहे?" तेव्हा त्या देवभक्ताच्या सांगण्याप्रमाणे याद्देनवर जाऊन त्याने सात वेळा बुडी मारली; त्याबरोबर त्याची अंगकांती लहान मुलासारखी निर्मळ झाली.
नंतर नामान आपल्या सर्व लवाजम्यासह त्या देवभक्ताकडे जाण्यास मागे फिरला.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४२:२,३;४२:३,४
प्रतिसाद : मला देवाचे दर्शन कधी घडेल ?
१) हे देवा, पाण्याच्या प्रवाहासाठी एखादी हरिणी धापा टाकते
तसाच माझा जीव तुझ्यासाठी धापा टाकीत आहे.
२) माझा जीव देवाकरिता, जिवंत देवाकरिता तान्हेला झाला आहे;
मला देवाचे दर्शन कधी घडेल?
३) तुझे तेज, तुझे सत्य प्रकट कर;
ते मला मार्गदर्शन करोत.
तुझ्या पवित्र डोंगरावर तुझ्या निवासस्थानी घेऊन जावोत.
४) मग मी देवाच्या वेदीजवळ,
देव जो माझा परमानंद, त्याच्याजवळ जाईन.
हे देवा, माझ्या देवा, वीणेवर मी तुझे गुणगान गाईन.
जयघोष
प्रभू म्हणतो, "मीच जगाचा प्रकाश आहे.
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."
शुभवर्तमान लूक ४:२४-३०
वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू नाझरेथ गावी आला आणि सभास्थानातील लोकांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य सांगतो की, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही. आणखी मी तुम्हांला खरे ते सांगतो की, एलियाच्या काळी साडेतीन वर्षे आकाश बंद राहून सर्व देशात मोठा दुष्काळ पडला होता त्या काळी इस्राएलात पुष्कळ विधवा होत्या. तरी त्यातील एकीच्याकडेही एलियाला पाठवले नव्हते, तर सिदोन प्रदेशातील सारफथ येथील एका विधवेकडे मात्र त्याला पाठवले होते. तसेच अलिशा संदेष्ट्याच्या काळी इस्राएलात पुष्कळ कुष्ठरोगी होते; तरी त्याच्यातील कुणीही शुद्ध झाला नाही, तर सुरियाचा नामान मात्र शुद्ध झाला." हे ऐकत असताना सभास्थानातील सर्व लोक संतापले. त्यांनी उठून त्याला गावाबाहेर काढले आणि ज्या डोंगरावर त्याचे गाव वसले होते त्याच्या कड्यावरून त्याला लोटून देण्यास तेथवर नेले. पण तो त्यांच्यामधून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजचे पहिले वाचन, एका लहान मुलीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेविषयी बोलत आहे. “छोटी, इस्रायली, नोकरदार अशी ही मुलगी" “महान, अरामी सेनापती आणि स्वामी” ची विरोधाभासी प्रतिमा आहे. तथापि, नामानच्या बरे करण्याच्या कथेत जे अत्यंत कुशल, सामर्थ्यशाली आणि शक्तीशाली होते तेच, आजारी आणि लज्जास्पद आहे. दुसरीकडे, जे नम्र, तुटलेले आणि स्त्रीलिंग म्हणून ज्याचा उल्लेख केला आहे, ते सामर्थ्य, सद्भावना आणि उच्चारांनी परिपूर्ण आहे. लहान मुलीने तिच्या असहाय्य धन्याची काळजी घेतली. तिने त्याच्याविरुद्ध कुतूहल ठेवले नाही. प्रेषित अलीशा बरोबर काम करताना तिला त्याच्या दिव्य सामर्थ्याची आठवण झाली आणि तिने तिच्या मालकाला ही चांगली बातमी दिली. तिच्या साक्षीमुळे नामानला बरे होणे शक्य झाले. तिच्या साक्षीने, ह्या चिमुरडीने एक नवीन भविष्य उघडले, जे असहाय्य अधिकाऱ्याच्या व्याप्तीच्या पलीकडे होते. ती परिवर्तनाची उत्प्रेरक झाली. ह्या मुली कडून प्रेरणा घेऊन, निराश झालेल्या लोकांसाठी आपणही अशी विधायक भूमिका निभावू या !
प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या निवडलेल्या सेवकांचा योग्य तो सन्मान करण्यास व त्यांना स्वीकारण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या