उपवासकाळातील तिसरा सप्ताह
मंगळवार दि.१४ मार्च २०२३
✝️
"मी तुम्हांला सत्य सांगतो की, कोणताही संदेष्टा स्वदेशात मान्य होत नाही.
संत मॅटिल्डा
राणी (८९५-९६८)
मॅटिल्डाचे वडील तिच्या बालवयातच मरण पावले आणि तिच्या आईने कॉन्व्हेंटचा रस्ता धरला. त्यामुळे मॅटिल्डाचे बालपण व प्राथमिक शिक्षण मध्य जर्मनीतील एरफर्ट येथल्या एका कॉन्व्हेंटमध्ये झाले. अल्पावधीतच तिने आपले सद्गुण आणि कलाकौशल्ये दाखविण्यास सुरूवात केली. वयाच्या १४ व्या वर्षी सॅक्सनीचा हेन्री ह्या राजपुत्राबरोबर तिचे लग्न झाले.
पुढे हा हेन्री जर्मनीचा राजा कॉरेंड ह्याचा उत्तराधिकारी बनला. राणी या नात्याने मॅटिल्डा हिने आपले निष्कलंक जीवन व विवेकी राज्यकारभार ह्याचे दर्शन सर्वांना घडविले. गरीब आणि अडल्या-नडल्यांना तिने मोलाचा आधार दिला. परंतु इ. स. ९३६ साली राजा हेन्री मरण पावला आणि मॅटिल्डा राणीच्या डोक्यावर वैधव्याची कुऱ्हाड कोसळली.
अशा बिकट परिस्थितीत मात्र ती बिलकूल डगमगली नाही. तिने आपली प्रार्थना, उपवास, प्रायश्चित्त, दानधर्म यामध्ये वाढ केली. असंख्य इस्पितळे, मठ आणि ख्रिस्तमंदिरे उभारण्यासाठी सढळ हस्ते मदत केली. परंतु तिच्या ह्या दानधर्माला आणि उदारवृत्तीला तिच्या मुलांनी उधळपट्टी म्हणून हिणविले आणि त्यांनी तिला राजमहालाबाहेर हाकलून दिले.
मॅटिल्डा राजवाड्याबाहेर पडली आणि साम्राज्याची चक्रे उलट दिशेने फिरू लागली. सगळीकडे राजपुत्र हेन्री व ओट्टो ह्यांना दुर्दैवाचे परिणाम दिसू लागले. भरभराटीचा काळ संपुष्टात आला. अधोगतीने संपूर्ण राज्यात आपले पसरायला सुरवात केली. सेवक-सेनापती, नोकरचाकर, कामधंदे सोडून गेले. सर्वत्र उदासीनता आणि हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. आपल्या आईच्या रुगने परमेश्वरालाच आपण घराबाहेर हाकलून दिल्याचे त्या राजपुत्रांना टोचू लागले. त्यांनी लागलीच आपल्या आईला परत माघारी बोलाविले. तिच्या आगमनाबरोबर राज्यात पुन्हा एकदा नवचैतन्य पसरले. गेलेली सर्व सुबत्ता आणि समृद्धी परत आली. तिचा मोठा मुलगा ओट्टो हा जर्मनीचा सम्राट बनला, दुसरा मुलगा कोलोन शहराचा आर्चबिशप (संत ब्रुनो) बनला. तिची मुलगी गर्बेरा फ्रान्सचा
राजा लुईस चौथा याच्याशी विवाहबद्ध झाली आणि शेवटची मुलगी हेडविंग कॅपेरीयन साम्राज्याचा जनक यू कॅपेर ह्याची माता होय.
संत मॅटिल्डा १४ मार्च ९६८ रोजी मरण पावली.
✝️
पहिले वाचन दानिएल ३:२५,३४-४३
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
“आमचे पश्चात्तापी हृदय आणि विनम्र मन स्वीकार."
अजऱ्या आगीच्या मध्यभागी उभा राहून उंच स्वरात प्रार्थना करू लागला : तू आपल्या नावाला स्मरून आमचा सदासर्वदा त्याग करू नकोस; आम्हांसाठी आपले वचन रद्द करू नकोस; आपला मित्र आब्राहाम, आपला सेवक इसहाक तसेच आपले भक्तगण इस्रायलचे यांचे स्मरण कर व आपली कृपादृष्टी आमच्यापासून फिरवू नकोस; तूच असे वचन दिले होतेस की, आकाशातल्या ताऱ्यांप्रमाणे व समुद्र किनाऱ्यावरील वाळूप्रमाणे तुमचे वंशज संख्येने वाढतील. हे प्रभो, संख्येच्या दृष्टीने आम्ही सर्व राष्ट्रात लहान झाले आहोत आणि आमच्या पापांमुळे सर्व पृथ्वीवर आमचा अपमान होत आहे. आता तर राजा नाही, संदेष्टा नाही, नेता नाही अर्पण नाही, यज्ञ नाही, बळी नाही आणि धूपदानपण नाही; अशी एकही जागा नाही की, जेथे तुझी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी तुला अर्पण करता येईल. आमचे पश्चात्तापी हृदय आणि विनम्र मन मेंढ्या आणि बैल तसेच हजारो पुष्ट बकऱ्या ह्यांच्या बलीप्रमाणे तुला मान्य होवो; आज तुझ्यासाठी हेच आमचे बलिदान असो, आम्हांला पूर्णपणे तुझ्या मार्गावर चालव, कारण तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची कधीच निराशा होत नाही. आता आम्ही असा दृढ निश्चय करतो की, आम्ही तुझ्या मार्गाने चालू, तुझ्यावर श्रद्धा ठेवू आणि तुझ्या दर्शनासाठी आतुरलेले असू. आमची निराशा करू नकोस, तर आमच्याबद्दल आमची सहनशीलता तशीच महान दया प्रदर्शित कर. हे प्रभो आपल्या अपूर्व कार्याद्वारे आमचे रक्षण कर आणि आपले नाव सन्मानित कर!
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २४: ४-९
प्रतिसाद : प्रभो, तुझ्या वात्सल्याचे स्मरण कर.
१) प्रभो, तुझे मार्ग मला दाखव.
तुझ्या वाटा मला प्रकट कर.
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
मला वळण लाव.
कारण तूच तर माझा मुक्तिदाता देव आहेस.
२) प्रभो, तुझे वात्सल्य आणि तुझे अढळ प्रेम
यांचे स्मरण कर. ते पूर्वापार चालत आले आहे.
माझ्या तारुण्यातील पापांची व अपराधांची
आठवण करू नकोस. प्रभो, तुझे अढळ प्रेम
आणि तुझे चांगुलपण लक्षात घेऊन माझी आठवण ठेव.
३) प्रभू किती चांगला आणि सरळ आहे.
तो पाप्यांना सन्मार्गाने जायला शिकवतो.
नम्रजनांना न्यायपरायणता दाखवतो.
आपला मार्ग गरिबांना प्रकट करतो.
जयघोष योहान ११:२५
प्रभू म्हणतो, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येक जण, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."
शुभवर्तमान मत्तय १८:२१-३५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही."
पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, “प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? सात वेळा काय ?" येशू त्याला म्हणाला, सात वेळा असे मी तुला म्हणत नाही तर सातांच्या सत्तर वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कोणाएका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासापासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला तेव्हा लक्षावधी शेकेलच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करायला काही नसल्यामुळे धन्याने हुकूम केला की, तो त्याची बायको व मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धन्याला दया येऊन त्याने त्याला मोकळे केले व त्याचे कर्ज सोडले. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे शंभर शेकेल येणे होते. तेव्हा तो त्याला पकडून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पाया पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याचे न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुंरुगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याच्या सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्वकाही आपल्या धन्याला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धन्याने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी ते सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करावयाची नव्हती काय? मग त्याच्या धन्याने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हालहाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही तर माझा स्वर्गातील पिताही त्याप्रमाणेच तुमचे करील.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आपल्याकडे जे काही आहे ते आपल्याला परमेश्वराने दिलेली देणगी आहे. त्याबद्दल आपण त्याचे अत्यंत ऋणी आहोत. आजच्या शुभवर्तमानात दासाप्रमाणे आपणावर परमेश्वराचे प्रचंड ऋण आहेत. हे ऋण फेडण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी आयुष्यभर आपण हे ऋण फेडू शकणार नाही. ते आपल्या क्षमतेच्या बाहेर आहे. त्याचे ऋण आपण कधीही फेडू शकणार नाही हे जाणून कृपापूर्ण परमेश्वराने आपले संपूर्ण पाप रूपीकर्ज वरदान रुपी कृपेने माफ केले. तथापि, परमेश्वराची माफ करण्याची ही दयाळू वृती आपल्याला त्याचे अनुकरण करण्यास आव्हान करते. जेव्हा परमेश्वर आपले अफाट कर्ज माफ करतो, तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या लोकांची कर्जे माफ करावी अशी तो अपेक्षा करतो. प्रचंड कर्ज माफ केल्यानंतर, आजच्या शुभवर्तमानातील अक्षम्य दास त्याच्या सहकारी दासाचे एक लहानसे क्षुल्लक कर्ज माफ करण्यास अयशस्वी ठरला. आपण त्या दासासारखे संकुचित वृत्तीचे आहोत की, परमेश्वर आपल्याशी दयाळूपणे वागतो त्याप्रमाणे आपण सर्वांना क्षमा करण्याइतक मोठ्या मनाचे आहोत ?
प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझ्या निवडलेल्या सेवकांचा योग्य तो सन्मान करण्यास व त्यांना स्वीकारण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या