Marathi Bible Reading | Wednesday 15th March 2023 | 3rd Week of Lent

उपवासकाळातील तिसरा सप्ताह 

बुधवार  दि.१५ मार्च २०२३

✝️ 
"आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.


संत लुईजा डी मारिलेक  
- विधवा (१५९१-१६६०)

चिंतन : “मन लावून गरिबांची सेवाचाकरी करा, जसे तुम्ही ख्रिस्ताला वागविले असते तसे त्यांना प्रेमाने व आदराने वागवा.” - संत लुईजा



शुभवर्तमान आणि नवाकरार खऱ्या अर्थाने जुन्या कराराची परिपूर्तता आहे. प्रभू येशूने सर्व नियम व आज्ञा देवप्रीति व परस्पर प्रीतित समाविष्ठ केल्या आणि जगात प्रेमाचे व शांतीचे राज्य आणले. प्रभूचा शब्द त्याची शिकवणूक आणि देवाच्या आज्ञांचे पालन करुन खरे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी प्रभूकडे कृपा  मागू या. देव शब्दावर मनन-चिंतन करुन तो आचरणात आणण्यासाठी झटू या.


✝️

पहिले वाचन  अनुवाद  ४:१,५-९
वाचक :अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन 
" जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवत आहे ते तुम्ही पाळावेत.”

मोशे लोकांना म्हणाला, “आता, अहो इस्राएल लोकहो, जे विधी व नियम मी तुम्हांला शिकवीत आहे ते पाळावे म्हणून तुम्ही ते ऐकून घ्या म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर तुम्हांला जो देश देत आहे, त्यात प्रवेश करून तो वतन करून घ्याल.
पाहा, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही जात आहा, त्यात पाळण्यासाठी आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेप्रमाणे मी तुम्हांला विधी व नियम शिकवले आहेत. त्याप्रमाणे तुम्ही चालावे तुम्ही ते काळजीपूर्वक पाळावेत. कारण त्यामुळे देशोदेशी लोकांच्या दृष्टीला तुम्ही सुज्ञ व समंजस असे दिसाल. त्या सर्व विधीसंबंधी ऐकून ते म्हणतील की, हे महान राष्ट्र खरोखर बुद्धिमान व समंजस लोकाचे आहे. कारण आमचा देव परमेश्वर ह्याचा आम्ही धावा करतो, तेव्हा तो आमच्याजवळ असतो. ह्याच्यासारखे देव जवळ असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? हे सारे नियमशास्त्र मी आज तुम्हांला देत आहे. त्यातल्यासारखे यथार्थ विधी व नियम असणारे महान राष्ट्र दुसरे कोणते आहे? मात्र स्वतःविषयी सावधगिरी बाळग आणि स्वतःला फार जप. नाहीतर तू ज्या गोष्टी डोळ्यांनी पाहिल्या आहेत त्या विसरून जाशील आणि जन्मभर त्या तुझ्या मनातून जातील. तू आपल्या पुत्रपौत्रांना त्याची माहिती द्यावी. "
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १४८: १२-१३,१५-१६,१९-२०
प्रतिसाद :  येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर !

१) येरुशलेम, प्रभूचे गुणगान कर ! 
सियोन, तुझ्या देवाचे स्तवन कर !
तुझ्या वेशींचे अडसर त्याने मजबूत राखले आहेत. 
तुझ्यामधील नागरिकांना आशीर्वाद दिला आहे.

२.) तो पृथ्वीवर हुकूम सोडतो. 
त्याचा शब्द वेगाने धावत येतो. 
तो लोकरीसारखी दाट हिमवृष्टी करतो, 
राखेसारखे दव पसरतो.

३) आपला संदेश त्याने याकोबला आणि 
आपले नियम व संकेत इस्राएलला जाहीर केले.
 कुठल्याही राष्ट्रासाठी त्याने असे केले नाही.
 त्याचे संकेत त्यांना माहीत नाहीत.


जयघोष      २ करिंथ ६:२
पहा, आताच समय अनुकूल आहे. 
आजच तारणाचा दिवस आहे.



शुभवर्तमान मत्तय  ५:१७-१९

वाचक :  मत्तय  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“जो कोणी ह्या आज्ञा पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील. "

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला नव्हे तर पूर्ण करायला आलो आहे. कारण मी तुम्हांला खचित सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होईपर्यंत सर्व काही पूर्ण झाल्याशिवाय नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. ह्यास्तव जो कोणी ह्या लहान आज्ञातील एखादी रद्द करील व त्याप्रमाणे लोकांना शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्याला स्वर्गाच्या राज्यात मोठा म्हणतील."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: एखादी गोष्ट शिकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे शिकवणे. जेव्हा आपण इतरांना काही शिकवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला तो विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो. इतरांना समजून घेण्याचा आणि त्यांच्या शंका आणि प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो, त्यामुळे आपल्याला स्वतःला अधिक स्पष्टता आणि समज मिळते. म्हणूनच प्रत्येक चांगल्या शिक्षकाने हुशार विद्यार्थ्यांना कमकुवत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे. या प्रक्रियेचा फायदा दोन्ही पक्षांना होतो. मोशे परमेश्वराने निवडलेला संदेष्टा आणि शिक्षक असल्याने आजच्या पहिल्या वाचनात तोच सिद्धांत वापरतो. येथे आई-वडील आणि आजी-आजोबांना आपल्या मुलांना आणि नातवंडांना शिकवण्याची भूमिका घेण्यास सांगितले जाते. जीवनानुभव आणि ईश्वरानुभवांची ही शिकवण जगनिर्मितीच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाची आहे. आजच्या धावपळीच्या जगात, पालकांना वेळ नसल्यामुळे आणि आजी-आजोबा बहुतेक नातवंडांसोबत राहत नसल्यामुळे विश्वनिर्मितीची ही प्रक्रिया खंडित होत आहे. या बायबलच्या आज्ञेमागील शहाणपण आपण जाणणार आहोत का ?

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुला अपेक्षित नियम व आज्ञा पाळून तुझ्या राज्याचे वारसदार बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या