Marathi Bible Reading | Thursday 16th March 2023 | 3rd Week of Lent

उपवासकाळातील तिसरा सप्ताह 

गुरुवार  दि.१६ मार्च २०२३

✝️ 
जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो."




संत हेरीबर्ट
कोलोनचे महागुरू (९७०-१०२१)


एकदा देशभर मोठा दुष्काळ पडला होता. आर्चबिशपांनी स्वतःच्या नेतृत्वाखाली एक प्रायश्चित्तविधी आयोजित केला. मिरवणूक संत सेव्हरेनिअस चर्चमध्ये शिरली. तिथे आर्चबिशपांनी गुडघे टेकून बराच वेळ प्रार्थना केली. गुडघे टेकलेल्या अवस्थेत पवित्र साक्रामेंतातील येशूकडे त्यांनी पावसासाठी कळकळीने विनवणी केली आणि त्यांची प्रार्थना संपताच मुसळधार पाऊस सुरू झाला. त्या वर्षी भरघोस पीक आले. आजही पावसासाठी संत हेरीबर्ट ह्यांचा धावा केला जातो. 
नेऊस येथील दौरा आटोपून परतत असताना त्यांना भयंकर सडकून ताप भरला व त्यात त्यांचा अंत झाला. त्यांचा पार्थिव देह डेऊत्स येथे पुरण्यात आला. त्यांच्या मृत्यूनंतर बरीच वर्षे असंख्य चमत्कार घडत राहिले.

ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजेच विश्वासाने त्याची  वचने आत्मसात करणे. ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजेच त्याची देवप्रीतिची  व परस्परप्रीतिची आज्ञा पाळणे. ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजे श्रद्धेने व  अंतःकरणापासून त्याला आपला प्रभू व स्वामी स्वीकारणे. ख्रिस्ताला अनुकूल असणे म्हणजे त्याच्या शब्दाप्रमाणे आचरण करणे आणि आत्मत्याग करुन  परस्पर सेवेचा महामंत्र जीवनात अंगिकारणे होय..

✝️

पहिले वाचन  यिर्मया   ७:२३-२८
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही ते हेच राष्ट्र आहे. "

परमेश्वर म्हणतो, "मी त्यांना फक्त एवढेच सांगितले होते की तुम्ही माझ्या आज्ञा पाळा, म्हणजे मी तुमचा देव व तुम्ही माझे लोक व्हाल. मी दाखवलेल्या सन्मार्गाने तुम्ही चाला म्हणजे तुमचे कल्याण होईल. पण त्यांनी माझे ऐकले नाही. माझ्या आज्ञांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. त्यांचे हट्टी व दुष्ट मन सांगेल त्याप्रमाणे ते स्वैराचार करू लागले. चांगले होण्यापेक्षा ते अधिकच वाईट बनले. इजिप्तमधून तुमचे पूर्वज निघालेल्या दिवसापासून तो आजवर मी त्यांच्याकडे माझ्या सेवकांना व प्रवक्त्यांना पाठवत गेलो. पण कोणीही त्यांचे ऐकले नाही किंवा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही. उलट तुमच्या वाडवडिलांपेक्षाही अधिकच हेकेखोर व बंडखार असे तुम्ही बनत गेला. तेव्हा तू हा संदेश माझ्या लोकांना सांग, पण ते तुझे ऐकणार नाहीत. तू त्यांना हाक मार, पण ते तुला ओ देणार नाहीत. त्यांना तू सांग की, आपला देव परमेश्वर याचा शब्द ऐकत नाही आणि शिक्षा भोगूनही सुधारत नाहीत ते हेच राष्ट्र आहे. निष्ठा लोप पावली आहे; आता तिचा उल्लेखदेखील कोणी करत नाही."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ९५: १-२,६-९
प्रतिसाद :  आज तुम्ही प्रभूची वाणी ऐकाल तर किती बरे होईल.

१) याहो या, आपण परमेश्वराचा जयजयकार करूया; 
आपल्या तारणदुर्गाचा जयजयकार करू. 
उपकारस्मरण करीत आपण त्याच्यापुढे जाऊ. 
स्तोत्रे गात त्याचा जयजयकार कर.

२) याहो या, परमेश्वर जो आपला उत्पन्नकर्ता 
त्याच्यापुढे आपण गुडघे टेकू; त्याची भक्ती करू,
 त्याच्यापुढे नमन करू. कारण तो आपला देव आहे..
 आणि आपण त्याच्या कुरणातील प्रजा, 
त्याच्या हातचा कळप आहोत.

३) आज तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल! "
कलहाप्रमाणे, रानातील परीक्षेच्या दिवशी केल्याप्रमाणे
 तुम्ही आपले मन कठीण करू नका.
 तेव्हा तुमच्या वडिलांनी माझी परीक्षा पाहिली; 
मला पारखले, माझी कृती पाहिली.

जयघोष   
बी हा देवाचा शब्द आहे. पेरणारा येशू ख्रिस्त आहे.
 ज्याला ते सापडेल त्याला सार्वकालिक जीवन लाभेल.



शुभवर्तमान लूक ११:१४-२३

वाचक :  लूक  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे."

येशू एकदा एक भूत काढीत होता, ते मुके होते. तेव्हा भूत निघाल्यावर मुका बोलू लागला. यावरून लोकसमुदायाला आश्चर्य वाटले. पण त्यातील कित्येक म्हणाले, “भुताचा अधिपती जो बालजबूल त्याच्या साहाय्याने हा भुते काढतो" आणि दुसरे कित्येक त्याची परीक्षा पाहण्याकरिता त्याच्याजवळ स्वर्गीय चिन्ह मागू लागले. परंतु त्याने त्यांच्या मनातील कल्पना ओळखून त्यांना म्हटले, "आपसांत फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि घरावर घर पडते, सैतानातही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल ? कारण मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, असे तुम्ही म्हणता; पण मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढीत असेन तर तुमचे लोक कोणाच्या साहाय्याने काढतात? ह्यामुळे तेच तुमचा न्याय करतील. परंतु मी जर देवाच्या सामर्थ्याने भूत काढीत आहे, तर देवाचे राज्य तुम्हांवर आले आहे. सशस्त्र व बलवान मनुष्य आपल्या वाड्याचे रक्षण करीत असता त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. परंतु त्याच्यापेक्षा अधिक बलवान मनुष्य त्याच्यावर येऊन त्याला जिंकतो. तेव्हा ज्या  शस्त्रसामुग्रीवर त्याने भिस्त ठेवली होती ती तो घेऊन जातो व त्याची लूट वाटून टाकतो. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: गेली दोन वर्षे संपूर्ण कॅथोलिक चर्च, सामान्य लोक आणि व्रतस्थ एकत्रितपणे सिनड ह्या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा आणि विचारविनिमय करत आहेत. सिनडचा अर्थ एकत्र चालणे किंवा सहप्रवास करणे असा आहे. आपल्याला देवासोबत एकत्रितपणे चालण्यासाठी आमंत्रित केले आहे. आजचे पहिले वाचन सरळ चालण्याबद्दल बोलते. प्रेषित यिर्मयाद्वारे, देव इस्राएल लोकांना आणि आपल्या सर्वांना त्याच्या मार्गावर चालण्याचे आमंत्रण देतो, जो प्रेम, शांती, न्याय, क्षमा इत्यादींचा मार्ग आहे. तथापि, ज्याप्रमाणे इस्राएल लोकांनी देवाचा आवाज ऐकला नाही आणि त्यांच्या हट्टीपणाने स्वतःच्या स्वार्थी मार्गाने चालत राहिले, त्याप्रमाणे आपण देवाच्या वाणीकडे दुर्लक्ष करून स्वतःच्या मार्गाने चालतो. आपल्या स्वार्थी मार्गावर चालताना आपण पुढे न जाता मागे जातो हे आपल्या लक्षात येत नाही. ह्या प्रवासात आपण प्रगती करावी अशी देवाची इच्छा आहे. आपण देवासोबत त्याच्या लोकांना साथ देत पुढे जाऊ या.

प्रार्थना:  हे प्रभू येशू, आम्ही सन्मार्गावर चालावे व शुद्धतेचे जीवन जगून तुझी सुवार्ता इतरापर्यंत पोहोचविण्यास आम्हाला सामर्थ्य दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या