उपवासकाळातील तिसरा सप्ताह
शुक्रवार दि.१७ मार्च २०२३
✝️
जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही."
संत पॅट्रीक
- महागुरू (३८५-४६१)
संत पॅट्रीकचे उरस्त्राण ह्या नावाने प्रसिद्ध झालेल्या गीतातील शब्द पुढीलप्रमाणे :
देवाचा हात माझा संरक्षक
देवाचे वचन माझे मार्गदर्शक
देवाचे ज्ञान माझा आत्मविश्वास
देवाचे सैन्य माझा दूतावास.
प्रभू येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, बहिऱ्यांना कान व मुक्यांना वाचा दिली, आजारी व भूतग्रस्तांना मुक्ती दिली, मेलेल्यांना जिवंत केले, पापी व गरिब जनांना जवळ केले व त्यांना मायेचा ओलावा दिला. प्रभू येशूने अपराध्यांना क्षमा केली व अखिलमानवजातीच्या उद्धारासाठी क्रुसावर आपले, बलिदान दिले. परस्पर प्रीतिचे मूर्तिमंत उदाहरण स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे.आपण आज आपल्या परस्पर प्रेमावर चिंतन करू या. आपण स्वतः चे जीवन आनंदात जगत असतात इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी व त्यांचे जीवन फुलविण्यासाठी प्रयत्नशील बनू या. परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव घेऊन तो स्वतः आचरणात आणण्यासाठी प्रभूकडे प्रेरणा मागू या.
पहिले वाचन होशेय १४:१-९
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
परमेश्वर म्हणतो, "हे इस्त्राएल, परमेश्वर तुझा देव ह्याच्याकडे वळ. कारण तू आपल्या अधर्मामुळे ठोकर खाऊन पडला आहेस. तुम्ही शब्दानिशी परमेश्वराकडे वळा. त्याला म्हणा, आमचा सर्व अधर्म दूर कर, कृपेने आमचा स्वीकार कर; म्हणजे आम्ही आमच्या वाणीचे फळ अर्पू. असिरिया आमचा बचाव करणार नाही. आम्ही घोड्यावर स्वार होणार नाही. आमच्या हातच्या कृतीला, "आमच्या देवा," असे यापुढे आम्ही म्हणणार नाही. कारण तुझ्या जवळ पोरक्यांना दया मिळते.
मी त्यांना वाटेवर आणीन. त्यांच्याजवळ मोकळ्या मनाने प्रीती करीन. कारण त्यांच्यावरचा माझा राग गेला आहे. मी इस्राएलला दहिवरासारखा होईन. तो भूकमलाप्रमाणे फुलेल. लबानोनप्रमाणे मूळ धरील. त्याच्या फांद्या पसरतील. त्यांचे सौंदर्य जैतून वृक्षासारखे होईल. त्याला लबानोनसारखा वास सुटेल. ते परत येऊन त्याच्या छायेत राहतील. ते धान्यासारखे पुनर्जीवित होतील व द्राक्षीप्रमाणे फळ देतील. त्यांची कीर्ती लबानोनच्या द्राक्षरसासारखी होईल. एफ्राइमला यापुढे मूर्तीशी काय कर्तव्य आहे ? मी तर त्याचे ऐकून त्याच्यावर लक्ष ठेवीन, मी हिरव्यागार सरुसारखा आहे. माझ्या पासून तुला फळ मिळते.
जो कोणी शहाणा आहे, त्याला समजेल, जो कोणी समंजस आहे, त्याला हे कळेल. परमेश्वराचे मार्ग सरळ आहेत. त्या मार्गाने धार्मिक चालतात आणि पातकी त्यात अडखळून पडतात."
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८१:६-११,१४.१७
प्रतिसाद : मी प्रभू तुमचा देव आहे.
१) कुणा अपरिचिताचे बोलणे मला ऐकू येत आहे.
तुमच्या खांद्यावरले ओझे उतरणारा मीच.
हातामधल्या पाट्या काढून टाकणाराही मीच.
संकटात तुम्ही धावा केलात; मी तुम्हांला सोडवले.
२) वादळी मेघात मी दडलेला असताना
तुम्हांला उत्तर दिले.
मरिबा येथल्या झऱ्याजवळ मी तुमची कसोटी घेतली
इस्रायली जनहो, जरा माझे ऐकायचे होते!
३) तुम्ही अन्य देवतांच्या भजनी लागू नका.
परक्या देवतांच्या पाया पडू नका.
इजिप्त देशातून तुम्हांला बाहेर आणणारा,
मी प्रभूच तुमचा देव आहे.
४) माझ्या लोकांनी माझे ऐकले तर,
इस्राएल लोक माझ्या मार्गाने चालाले तर!
इस्राएलला मात्र मी उत्तमपैकी गहू खायला घालीन;
पहाडावरल्या मधाने तृप्त करीन.
जयघोष
हे देवा, माझ्या ठायी शुद्ध अंत:करण निर्माण कर. तू देत असलेल्या मुक्तीचा गोड अनुभव मला पुन्हा येऊ दे.
शुभवर्तमान मार्क १२:२८-३४
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
शास्त्र्यांपैकी एक जण त्यांचा वाद ऐकून आणि येशूने त्याला समर्पक उत्तर दिले हे पाहून पुढे आला आणि त्याने येशूला विचारले, "सर्वात पहिली आज्ञा कोणती?" येशूने उत्तर दिले, "पहिली ही की, हे इस्राएल, ऐक; आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे आणि तू आपला देव परेमश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने प्रीती कर. दुसरी ही की, जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती कर. ह्यापेक्षा मोठी अशी दुसरी कोणतीही आज्ञा नाही." तो शास्त्री त्याला म्हणाला, "गुरुजी, आपण ठीक व खरे बोललात की, तो एकच आहे आणि त्याच्याशिवाय दुसरा कोणी नाही; आणि संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने व संपूर्ण शक्तीने त्याच्यावर प्रीती करणे आणि जशी स्वत:वर तशी आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करणे, हे सर्व होमार्पणे व यज्ञ ह्यापेक्षा अधिक आहे." त्याचे हे सुज्ञपणाचे उत्तर ऐकून येशू त्याला म्हणाला, "तू देवाच्या राज्यापासून दूर नाहीस.” तेव्हापासून त्याला आणखी काही विचारण्याचे कोणालाही धैर्य झाले नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जुन्या करारातील संदेष्ट्यांचा संदेश एका इब्री शब्दामध्ये सारांशित केला जाऊ शकतो, तो म्हणजे “शुब” म्हणजे “ Return- परता”. प्रायश्चित्त काळाचा देखील मध्यवर्ती संदेश हाच आहे. परतणेचा अर्थ "घरी परतणे” देखील होतो. आपण परमेश्वरापासून दूर गेलो आहोत, अशावेळी संदेष्टा आपणांस जेथे प्रेमाचा ओलावा आहे व परमेश्वर जो प्रेमाचा उगम आहे त्याजकडे परतण्यास खुणावत आहे. आमचे शुभवर्तमान परमेश्वरावरील प्रेम व शेजाऱ्यांवरील प्रेम ह्या प्रेमाच्या दुहेरी आज्ञेबद्दल सांगते. जिथे ही प्रेमाची आज्ञा पाळली जाते तेच आमचे घर आहे. आपण परमेश्वरावर व इतरांवर प्रीती करणे सोडून दिले आहे आणि अशाप्रकारे आपण घरापासून दूरावलो आहोत. जेव्हा आपण प्रेम करणे थांबवतो तेव्हा आपण प्रेमापासून दुरावतो. संदेष्ट्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपण आपल्या प्रेमळ पित्याकडे परतू या.
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, तुजवर, स्वतःवर व तशीच आमच्या बंधु-भगिनींवर प्रीति करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या