उपवासकाळातील तिसरा सप्ताह
शनिवार दि.१८ मार्च २०२३
✝️
जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
जेरूसलेमचे संत सिरील
महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (३१३-३८०)
ख्रिस्ताच्या क्रुसाची आपल्याला शरम वाटता कामा नये, तर आपण विरोधकांच्या जुलमी कारवायांना न भिता क्रुसाचे चिन्ह मानाने हातात, कपाळावर व हृदयावर मिरवावे. सैतान हे चिन्ह पाहून पळून जाईल. त्यामुळेच ही क्रुसाची खूण उठता बसता, खाता पिता, फिरता, झोपता, बोलता चालता, शब्दाने आणि कृतीने आपल्या जीवनात काढीत राहा. संत सिरील
प्रभू येशू स्वतः नम्र बनला व आपल्या सर्वांसाठी त्याने दुःखसहन व मरण स्वीकीरले. प्रभू येशू स्वतः म्हणत आहे, 'मी नम्र व लीन हृदयाचा आहे. ' आपण आपल्यातील अहंकार, स्वार्थ आणि मीपणा दूर सारुन प्रभू येशूला शरण जाऊ या. पश्चात्तापी अंत:करणाने प्रभूकडे दयेची व क्षमेची याचना करु या.
पहिले वाचन होशेय ६:१-६
वाचक : होशेय या पुस्तकातून घेतलेले वाचन
"मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे."
प्रभू असे म्हणतो, "ते आपल्या संकटसमयी माझा धावा कळकळीने करून म्हणतील, चला, आपण परमेश्वराकडे परत जाऊ. कारण त्याने आम्हांला झोडले आहे व तोच आम्हांला बरे करील. त्याने आम्हांला जखम केली आहे व तोच पट्टी बांधील. तो दोन दिवसात आमचे पुनरुज्जीवन करील; तिसऱ्या दिवशी तो आम्हांला उठवून उभे करील आणि त्याच्यासमोर आम्ही जिवंत राहू. चला, आपण परमेश्वराला ओळखू. परमेश्वराचे ज्ञान मिळवण्यासाठी झटू. त्याचा उदय अरुणोदयाप्रमाणे निश्चित आहे. तो पर्जन्याप्रमाणे भूमी शिंपणाच्या वळवाच्या पर्जन्याप्रमाणे आम्हाकडे येईल."
हे एफ्राइम, मी तुझ्यासाठी काय करू ! हे यहुदा, मी तुला काय देऊ? तुमचे चांगुलपण सकाळच्या अभ्राप्रमाणे, लवकर उठून जाणाऱ्या दंहिवराप्रमाणे आहे. म्हणून मी त्याच्यावर संदेष्ट्यांच्या हातून कुऱ्ह्याड चालवली आहे. माझ्या तोंडच्या शब्दांनी त्यांना ठार केले आहे. माझा न्याय प्रकाशाप्रमाणे व्यक्त झाला आहे. मी यज्ञाचा नाही तर दयेचा भुकेला आहे. होमार्पणांपेक्षा देवाचे ज्ञान मला आवडते.
प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५१:३-४,१८-२१
प्रतिसाद : मला यज्ञ नको तर प्रेम हवे.
१) देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर
तुझ्या महान दयेस अनुसरून
माझ्या अपराधांचे कलंक पुसून टाक.
मला धुऊन माझा दोष पूर्णपणे दूर कर.
माझ्या पापापासून मला शुद्ध कर.
२) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस,
नाही तर तो मी केला असता.
होमार्पणांची देखील तुला आवड नाही.
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा हाच माझा यज्ञ.
भग्न व पश्चात्तापी अंत:करण तू झिडकारणार नाहीस.
३) तू प्रसन्न होऊन सियोन नगरावर कृपादृष्टी कर.
येरुशलेमची तटबंदी उभार.
मग यथायोग्य यज्ञ व विविध होमार्पणे यांनी तू प्रसन्न होशील.
तुझ्या वेदीवर गोहे बळी दिले जातील.
जयघोष
आज तुम्ही आपली मने कठीण करू नका. तर प्रभूचे म्हणणे ऐका!
शुभवर्तमान लूक १८:९-१४
वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
आपण धार्मिक आहो असे जे कित्येक स्वत:विषयी भरवंसा धरून इतर सर्वांना तुच्छ मानीत होते त्यांनाही येशूने एक दाखला सांगितला: "एक परुशी व एक जकातदार असे दोघेजण प्रार्थना करण्यास वर मांदिरात गेले. परुश्याने उभे राहून स्वत:शी अशी प्रार्थना केली, हे देवा, इतर माणसे लुबाडणारी, अधर्मी, व्यभिचारी आहेत, त्यांच्यासारखा किंवा ह्या जकातदारासारखाही मी नाही, म्हणून मी तुझे आभार मानतो. मी आठवड्यातून दोनदा उपास करतो; जे मला मिळते त्या सर्वांचा दशांश देतो. जकातदार तर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यासदेखील न धजता आपला ऊर बडवीत म्हणाला, हे देवा, मज पाप्यावर दया कर ! मी तुम्हांला सांगतो दुसऱ्यापेक्षा हा नीतिमान ठरून खाली आपल्या घरी गेला; कारण जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल आणि जो कोणी आपणाला नमवतो तो उंच केला जाईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजचे पहिले वाचन आणि शुभवर्तमान ख्रिस्ती धर्मातील काही मूलभूत शिकवण देतात. पहिले वाचन दयेवर आणि शुभवर्तमान नम्रतेवर आपले लक्ष केंद्रित करते. दया व नम्रता हे पैलू आजच्या वाचनांमध्ये सुंदरपणे स्पष्ट केले आहेत. उपवास, प्रार्थना आणि दानधर्म करणे या सारख्या “धार्मिक कर्तव्यांचे " पालन करून कोणीही स्वतःला खूप धार्मिक समजू शकतो. आजच्या शुभवर्तमानामधील परुशी हा अशा धार्मिकतेचा एक प्रकार आहे. त्याच्या धार्मिकतेने त्याला अभिमानाने फुगवले होते, इतके की तो इतर कमी भाग्यवान लोकांकडे तिरस्काराने पाहू लागला जसे की करवसुली करणाऱ्यांकडे तो तिरस्काराने पाहू लागतोजो त्याचे “धार्मिक कर्तव्य” पूर्ण करण्यात अपयशी ठरला. देव नम्र जकातदारावर कृपादृष्टीने पाहतो, परंतु गर्विष्ठ आणि निर्दयी परुश्यावर तो नाराज आहे. आजच्या वाचनातून आपण कोणता धडा शिकतो ?
प्रार्थना: हे प्रभू येशू, मज पाप्यावर दया कर, मला तुझ्या सत्पथाने चालण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या