उपवासकाळातील चौथा रविवार
दि.१९ मार्च २०२३
✝️
“ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्माला आला.
तो म्हणाला, “प्रभुजी, मी विश्वास ठेवतो” आणि त्याने त्याला नमन केले.
✝️
जन्मांध माणसाला प्रभू येशू दृष्टी दान देऊन देवाचे गौरवमय वैभव प्रकट करतो. शिष्यांसमोर घडलेला हा चमत्कार येशूच्या प्रकटीकरणाचा अविष्कार होतो. दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाचा विश्वास बळकट झाला. ह्यावेळी प्रभू येशूने स्पष्टपणे सांगितले की, 'मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे, ह्यासाठी की ज्यांना |दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांना दिसू नये.' परुश्यांना दिसत असताना सुद्धा ते आंधळे झाले होते.
विश्वासाने प्रभूच्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस अंधारात राहणार नाही तर त्याला जीवनाचा प्रकाश लाभेल. ज्याप्रमाणे अंधाच्या जीवनात प्रकाश आला आणि त्याचे संपूर्ण जीवन परिवर्तन झाले त्याच प्रमाणे आपण सर्वांनी विश्वासाने प्रभू येशूला आपला मशीहा, | तारणारा म्हणून स्वीकारावे म्हणून अंतर्मुख बनून त्याच्या सर्वस्वी शरण जाऊ या.'
✝️
पहिले वाचन १शमुवेल १६:१.६ - ७.१०-१३
वाचक :शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“इस्राएलचा राजा म्हणून दावीदचा अभिषेक होतो. "
परमेश्वराने शमुवेलला म्हटले, “शिंगात तेल भरून चल. मी तुला इशाय बेथलहेमकर याच्याकडे पाठवतो; कारण मी त्याच्या एका पुत्राला माझ्याकरिता राजा निवडले आहे.'
ते आले तेव्हा त्याने अलियाबला न्याहाळून पाहून म्हटले, “परमेश्वरासमोर आलेला हाच परमेश्वराचा अभिषिक्त होय." पण परमेश्वराने शमुवेलला म्हटले, "तू त्याच्या स्वरूपावर अथवा त्याच्या शरीराच्या उंचीकडे पाहू नकोस, कारण मी त्याला नापसंत केले आहे. परमेश्वराचे मानवासारखे पाहणे नसते. मानव बाह्य स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृदय' पाहतो." याप्रकारे इशायने आपले सात पुत्र शमुवेलपुढे सादर केले. शमुवेलने इशायला म्हटले, “यातला कोणीही परमेश्वराने पसंत केला नाही.” शमुवेलने इशायला विचारले, “तुझे सर्व पुत्र हजर आहेत काय ?" तो म्हणाला, “एक सर्वात धाकटा राहिला आहे. तो मेंढरे राखत आहे." तेव्हा शमुवेल इशायला म्हणाला, “त्याला बोलावून आण. तो येईपर्यंत आम्ही भोजनाला बसणार नाही." त्यांने त्याला बोलावणे पाठवून आणले. त्याचा वर्ण तांबूस, डोळे सुंदर व स्वरूप मनोहर होते. तेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले, “ऊठ, त्याला अभिषेक कर; हाच तो आहे.” मग शमुवेलने तेलाचे शिंग हाती घेऊन त्याच्या भावांसमोर त्यांला अभिषेक केला आणि त्या दिवसापासून पुढे परमेश्वराचा आत्मा दावीदच्या ठायी जोराने संचारू लागला.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २३:१-- ६
प्रतिसाद : परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
१ परमेश्वर माझा मेंढपाळ आहे.
मला काही उणे पडणार नाही.
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो.
तो मला शांत पाण्याजवळ नेतो.
तो माझा जीव ताजातवाना करतो.
२ तो आपल्या नावास्तव मला
नीतिमार्गांनी चालवतो.
मृत्युच्छायेच्या दरीतूनही मी जात असलो
तरी मी अरिष्टाला भिणार नाही,
कारण तो माझ्याबरोबर आहे.
त्याची आकडी व त्याची काठी मला धीर देतात.
३. तो माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढे ताट वाढतो.
तो माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतो.
माझे पात्र काठोकाठ भरले आहे.
४ खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
मला कल्याण व दया ही लाभेल.
परमेश्वराच्या घरात मी चिरकाल राहीन.
दुसरे वाचन इफिस ५:८-१०
वाचक : पौलचे इफिसकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ५:८-१०
"मेलेल्यातून ऊठ, म्हणजे ख्रिस्ताचा प्रकाश तुझ्यावर पडेल."
बंधूजनहो, पूर्वी तुम्ही अंधकार असे होता पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहा, प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला, कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतिमत्त्व व सत्यता ह्यात दिसून येते. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊ नका, तर उलट त्याचा निषेध करा. कारण त्या लोकांच्या हातून जी कर्मे गुप्तपणे होतात त्यांचा उच्चार करणेदेखील लज्जास्पद आहे. सर्व निषेधलेल्या गोष्टी उजेडाकडून उघड होतात. कारण जे काही उघड होते ते प्रकाश आहे. म्हणून असे म्हटले आहे.
"हे निद्रिस्ता, जागा हो व मेलेल्यातून ऊठ, म्हणजे ख्रिस्त तुझ्यावर प्रकाश पाडील,
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
प्रभू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील
शुभवर्तमान योहान ९ : १-४१
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"त्याने डोळे धुतले आणि त्यास दृष्टी मिळाली. "
(येशू तिकडून जात असता एक जन्मांध माणूस त्याच्या दृष्टीस पडला.) तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले,
गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा आंधळा जन्माला आला ? ह्याच्या की ह्याच्या आईबापांच्या ?" येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा ह्याच्या आईबापांनी पाप केले असे नाही, तर ह्याच्या ठायी देवाची कार्ये प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्माला आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” असे बोलून येशू भूमीवर थुंकला. थुकीने त्याने चिखल केला. तो चिखल त्याच्या डोळ्यांना लावला आणि त्याला म्हटले, "जा, शिलोह (म्हणजे पाठवलेला) नावाच्या तळ्यात धू." मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. ह्यावरून शेजारीपाजारी व ज्यांनी त्याला पूर्वी भिक्षा मागताना पाहिले होते ते म्हणाले, “भीक मागत बसणारा तो हाच नाही काय ?" कित्येक म्हणाले, "तोच हा," दुसरे म्हणाले, “नाही, हा त्याच्यासारखा आहे," तो म्हणाला, “मी तोच आहे." ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुझे डोळे कसे उघडले ?” त्याने उत्तर दिले, “येशू नावाच्या मनुष्याने चिखल करुन माझ्या डोळ्यांना लावला आणि मला सांगितले, शिलोहवर जाऊन धू; मी जाऊन धुतले आणि मला दृष्टी आली.” तेव्हा त्यांनी त्याला म्हटले, “तो कोठे आहे ?" तो म्हणाला, “मला ठाऊक नाही."(मग जो पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी परुश्यांकडे नेले. ज्या दिवशी येशूने चिखल करून त्याचे डोळे उघडले तो दिवस शब्बाथ होता. ह्यास्तव परुश्यांनीही त्याला पुन्हा विचारले, "तुला दृष्टी कशी आली ?" तो त्यांना म्हणाला, “त्याने माझ्या डोळ्यांना चिखल लावला, तो मी धुऊन टाकल्यावर मला दिसू लागले.” ह्यावरून परुश्यांतील कित्येक म्हणाले, “हा मनुष्य देवाकडचा नाही. कारण तो शब्बाथ पाळीत नाही." दुसरे म्हणाले, “पापी मनुष्य अशी चिन्हे कशी करू शकतो ?” आणि त्यांच्यामध्ये फूट पडली. म्हणून पुन्हा ते त्या आंधळ्याला म्हणाले, “त्याने तुझे डोळे उघडले तर त्याच्याविषयी तू काय तू म्हणतोस ?” त्याने म्हटले, "तो संदेष्टा आहे.")
यहुद्यांनी त्या दृष्टी प्राप्त झालेल्या माणसाच्या आईवडिलांना बोलावून विचारपूस करीपर्यंत, तो पूर्वी आंधळा होता व आता डोळस आहे, हे खरे मानले नाही. त्यांनी त्यांना विचारले, “तुमचा जो मुलगा आंधळा जन्मला असे म्हणता तो हाच काय ? तर आता त्याला दृष्टी कशी लाभली ?" त्याच्या आईवडिलांनी उत्तर दिले, “हा आमचा मुलगा आहे व तो आंधळा जन्मला हे आम्हांला ठाऊक आहे. तरी आता त्याला दृष्टी कशी मिळाली हे आम्हांला ठाऊक नाही किंवा त्याचे डोळे कोणी उघडले हेही आम्हांला ठाऊक नाही. त्याला विचारा, तो वयात आलेला आहे. तो स्वतःविषयी सांगेल.” त्याच्या आईवडिलांना यहुद्यांचे भय होते म्हणून ते तसे म्हणाले कारण हा ख्रिस्त आहे असे कोणी पत्करल्यास त्याला सभाबहिष्कृत करावे असे यहुद्यांचे अगोदरच एकमत झाले होते. यामुळे त्याच्या आईवडिलांनी म्हटले, “तो वयात आलेला आहे, त्याला विचारा."
मग जो मनुष्य पूर्वी आंधळा होता त्याला त्यांनी दुसऱ्यांदा बोलावून म्हटले, “देवाचा गौरव कर, तो मनुष्य पापी आहे हे आम्हांला ठाऊक आहे." यावरुन त्याने उत्तर दिले, “तो पापी आहे किंवा नाही हे मला ठाऊक नाही. मात्र मला एक गोष्ट ठाऊक आहे की, मी पूर्वी आंधळा होतो व आता मला दिसते." यावर त्यांनी त्याला म्हटले, “त्याने काय केले ? त्याने तुझे डोळे कसे उघडले ?” त्याने त्यांना उत्तर दिले "आताच मी तुम्हांस सांगितले ते तुम्ही ऐकले नाही ? पुन्हा ऐकायची इच्छा का करता? तुम्हीही त्याचे शिष्य होऊ इच्छिता काय ?” तेव्हा त्यांनी त्याची हेटाळणी करून म्हटले, “तू त्याचा शिष्य आहेस, आम्ही मोशेचे शिष्य आहो. देव मोशेबरोबर बोलला आहे हे आम्हांला ठाऊक आहे. हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक नाही." त्या माणसाने त्यांना उत्तर दिले, "हेच तर मोठे आश्चर्य आहे की, तो कोठला आहे हे तुम्हांला ठाऊक नाही; पण त्याने तर माझे डोळे उघडले! आम्हांला ठाऊक आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही; तर जो कोणी देवाचा भक्त असून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचे तो ऐकतो. जन्मांधाचे डोळे कोणी उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी ऐकण्यात आले नव्हते. हा देवाकडचाम्हटले, "तू सर्वस्वी पापात जन्मलास आणि आम्हांला धडे शिकवतोस काय ?” मग त्यांनी त्याला बाहेर घालवले.
त्यांनी त्याला बाहेर घालवले हे येशूने ऐकले आणि त्याला भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय ?" त्याने उत्तर दिले, “महाराज, मी त्याच्यावर विश्वास ठेवावा असा तो कोण आहे ?" येशूने त्याला म्हटले, “तू त्याला पाहिले आहे व तुझ्याबरोबर आता बोलत आहे तोच तो आहे.” तो म्हणाला, “प्रभुजी, मी विश्वास ठेवतो” आणि त्याने त्याला नमन केले.) तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी ह्या जगात आलो आहे. ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.” परुश्यातील जे त्याच्याजवळ होते त्यांनी हे ऐकून त्याला म्हटले, “आम्हीही आंधळे आहो काय ?” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हांला पाप नसते; परंतु आम्हांला दिसते असे तुम्ही आता म्हणता, म्हणून तुमचे पाप तसेच राहते
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या उपासनेतील वाचने आपल्याला अंधारातून प्रकाशात येण्याचे आमंत्रण देत आहेत. आजच्या पहिल्या वाचनात (१ शमुवेल १६:१, ६-७, १०-१३अ) इस्राएलचा पहिला राजा शौल परमेश्वराच्या प्रकाशातून दूर गेल्यामुळे दुष्टतेच्या अंधारात निघून जातो. त्याच्या जागी अभिषिक्त होणारा दावीद परमेश्वराच्या प्रकाशाचे द्योतक बनतो. दुसऱ्या वाचनात (इफिस ५: ८-१४) संत पॉल इफिसकरांना पापाच्या अंधारातून ख्रिस्ताच्या प्रकाशात चालण्यासाठी आवाहन करतो. जन्मांधाला डोळे देणे (योहान ९:१-४१) ह्या प्रसंगातून संत योहान शुभवर्तमानकार आपल्यासमोर प्रकाशाची तीन माध्यमे सादर करतो.
अ. प्रभुशब्दाचा प्रकाश : येशूने आंधळ्याला शिलोह नावाच्या तळ्यावर जाऊन आपले डोळे धुवायला सांगितले. तो जरी आंधळा असला तरी आपल्या कानांनी त्याने येशूचा शब्द ऐकला. त्याच्यासाठी प्रभूचा शब्द त्याच्या मार्गावरील प्रकाश आणि त्याच्या पावलांकरिता दिवा बनला. आपण जरी प्रभूच्या आज्ञांच्या अज्ञानरूपी अंधारात जन्मलेले असलो तरी प्रभूशब्दाच्या प्रकाशात चालून तारणप्राप्ती करून घेऊ शकतो.
ब. ईश्वर अनुभवाचा प्रकाशः आंधळा डोळस झाल्यानंतर त्याला असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागते. शेजाऱ्यांनी प्रश्न विचारून त्याला भंडावून सोडले, आईवडीलांनी यहुद्यांच्या भीतीमुळे त्याला एकटे सोडून दिले. यहुदी अधिकाऱ्यांनी त्याला सभास्थानातून बाहेर घालवून दिले. अशा ह्या प्रतिकूल परिस्थितीत तो जन्मांध आपल्या जीवनाची साक्ष देतच राहिला. कारण त्याने ईश्वरी स्पर्शाचा वैयक्तिक अनुभव घेतलेला होता.
क. श्रद्धेचा प्रकाश : हे सर्व होईपर्यंत येशू नक्की कोण आहे ते त्याला ठाऊक नव्हते. पुढे येशू त्याला भेटल्यावर आपणच तो "मनुष्याचा पुत्र ” आहोत असे आत्मप्रकटीकरण त्याला करतो, आता त्याला केवळ भौतिक प्रकाश नव्हे तर आध्यात्मिक प्रकाश लाभतो. तो नमन करून येशूला "प्रभूजी” म्हणून स्वीकारतो. मात्र बुद्धीच्या प्रकाशात वावरणाऱ्या यहुदी अधिकाऱ्यांच्या वाटेला अश्रद्धेच्या अंधारात ठेचाळत राहण्याचे दुर्भाग्य येते.
आत्मपरीक्षण : जीवनातील कोणकोणत्या प्रकारच्या अंधारावर मी मात करायला हवी असे मला वाटते ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, श्रद्धेच्या प्रकाशात तुझे वैभवी प्रकटीकरण अनुभवण्यास आणि तुझी कृपा व प्रेम अनुभवण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या