उपवासकाळातील चौथा सप्ताह
सोमवार दि. २० मार्च २०२३
✝️
योसेफाने मरियेचा पत्नी म्हणून स्वीकार केला. "
✝️
ख्रिस्तसभा आज संत जोसेफ, धन्य कुमारी मरियेचा पती हा सण साजरा करीत आहे. दावीदाच्या कुळातील जोसेफ ह्याचे मरियेशी नाते जुळले होते. मरिया पवित्र आत्म्याठायी गर्भवती असल्याचे देवदूताने स्पष्ट केले व देवाची योजना जोसेफला कळली. नीतिमान व भक्तीमान असणाऱ्या जोसेफने दैवी योजना जाणली व मरियेचा पत्नी म्हणून स्वीकार केला.
प्रभू येशू ख्रिस्ताचा या पृथ्वीतलावरील सांभाळकर्ता पिता व पवित्र मरियेचा पती संत योसेफ ह्यांच्या विषयी ख्रिस्ती परंपरेच्या इतिहासात फारच त्रोटक माहिती उपलब्ध आहे. शुभवर्तमानकार मत्तयच्या व लूक यांच्या पहिल्या आणि दुसन्या अध्यायांतील माहितीनुसार तो एक सज्जन, नीतिमान पुरूष होता. इतकीच विश्वसनीय गोष्ट आपल्याला सांगण्यात येते.
काही दंतकथांमध्ये योसेफाविषयीची माहिती देण्यात आलेली आहे. मात्र ही माहिती कोणत्या पुराव्यावर आधारित आहे त्याचे नामोनिशाण अपर ग्रंथांमध्ये कुठेही आढळत नाही. परंतु ती प्रभूच्या एकंदर जीवनाशी खूपशी साधर्म्य सांगणार आहे.
पवित्र मरियेशी संत योसेफ ह्यांचा विवाह झाला. तेव्हा तो खूप वृद्ध असल्याचे आणि पवित्र मरिया कोवळ्या वयातील असल्याचे ह्या दंतकथा सांगतात. त्यात पवित्र मरियेचे वर्ष केवळ १४ वर्षे असल्याचे म्हटले आहे. संत थॉमस अक्वायनस हे विचारवंत आणि ईशज्ञानी म्हणतात, "देवदूताने दिलेल्या निरोपाच्या वेळी मरिया आणि योसेफ केवळ परस्परांशी वाग्दत्त होते."
प्रभू येशू ख्रिस्त येरुशलेम मंदिरात सापडला त्यावेळेपर्यंत योसेफविषयी
आपण शुभवर्तमानात वाचतो. परंतु त्यानंतर मात्र योसेफचा कुठेही उल्लेख नाही. ह्यावरून ख्रिस्ती परंपरा असे अनुमान काढते की प्रभू येशूच्या सार्वजनिक प्रेषितकार्याला प्रारंभ होण्यापूर्वीच योसेफचा मृत्यू झाला असावा.
संत योसेफच्या मृत्यूची तारीख आणि त्याचे दफन केल्याची जागा ह्याविषयी कुठलाही तपशील उपलब्ध नाही, परंतु प्रारंभापासूनच त्याच्याविषयीची भक्ती जनमाणसांत प्रचलित होती. पौर्वात्य ख्रिस्तसभेत त्याच्या सन्मानार्थ पहिल्या शतकापासून एक सण साजरा केला जाई आणि ही भक्ती उत्तरोत्तर वाढत गेल्याचे दिसून येते.
स्पेनमधील अविलाच्या संत तेरेजा ह्यांनी आपल्या कार्मेलाईट संस्थेच्या पुनउभारणीच्या वेळी संत योसेफ ह्याला आपला आश्रयदाता संत मानले होते. १६८३ साली तिच्या धर्मभगिनींना आपल्या ह्या आश्रयदात्या संताचा सण साजरा करण्यास परवानगी देण्यात आली होती.
पहिल्या व्हॅटिकन विश्वपरिषदेच्या काळात (इ.स. १८६९-७०) ३०० हून अधिक बिशपांनी संत योसेफ ह्याला विश्वव्यापिच्या ख्रिस्तसभेचा आश्रयदाता संत म्हणून घोषित करण्याची जोरदार शिफारस केली. त्यानुसार ८ डिसेंबर १८७० साली पोप पायस नववे ह्यांनी संत योसेफ ह्याला अखिल जगभरच्या ख्रिस्तसभेचा आश्रयदाता संत म्हणून सन्मानीत केले. पोप महाशयांनी त्यावेळी केलेल्या भाषणात म्हटले होते की, खुद्द परमेश्वराने संत योसेफ ह्याच्यावर आपल्या निर्मितीचे आणि त्याच्या घराण्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सोपविली होती. पुढे १९५५ साली पोप पायस बारावे ह्यांनी संत योसेफ ह्याला सर्व "कामगारांचा आश्रयदाता" हे नवीन पद बहाल केले. त्याचा हा सण १ मे रोजी सर्वत्र साजरा केला जातो.
आपल्या सर्व अडीअडचणीत आपण संत योसेफकडे धावून जायला हवे असे खिस्तसभा आपल्या लेकरांस सुचविते. सुखाचे मरण लाभावे म्हणूही संत योसेफ ह्याचा धावा केला जातो.
चिंतन : देवाने काही संतांना काही विशिष्ट गरजांसाठी आपल्या भक्तांना आश्रय देण्याचे भाग्य दिलेले आहे. परंतु संत योसेफ ह्याला सर्व गोष्टींकरिता, सर्व गरजांकरिता आणि प्रत्येक बाबींसाठी मध्यस्थी करता येण्याजोगे भाग्य देवाने प्रदान केलेले आहे. - संत थॉमस अक्वायनस
सर्व पतींनी संत जोसेफाचे सद्गुण आत्मसात करून आदर्श पती बनण्यासाठी मध्यस्थी प्रार्थना करु या.
पहिले वाचन २ शमुवेल ७: ४ -५,१२-१४. ६
वाचक :शमुवेलच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभू, परमेश्वर, त्याला त्याचा पिता दावीद ह्याचे राजासन देईल."
परमेश्वराचे वचन नाथानला प्राप्त झाले ते असे : "जा, माझा सेवक दावीद ह्यास सांग 'परमेश्वर म्हणतो तुझे दिवस पुरे झाले आणि तू जाऊन आपल्या पूर्वजांबरोबर निजलास म्हणजे तुझ्या पोटच्या पुत्राला तुझ्यामागून मी राजासनावर बसवीन आणि त्याचे राज्य बळकट करीन. तो माझ्या नावाप्रित्यर्थ मंदिर बांधील, मी त्याचे राजासन कायमचे स्थापीन. मी त्याचा पिता होईन आणि तो माझा पुत्र होईल. तुझे घराणे आणि तुझे राज्य माझ्यापुढे अढळ राहील, तुझी गादी कायमची स्थापित होईल.”
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ८९:२-५,२७,२९
प्रतिसाद : त्याचे राजघराणे सर्वकाळ राहील.
१. प्रभूच्या अढळ प्रेमाचे मी सतत गुणगान गाईन.
मी माझ्या तोंडाने साऱ्या पिढ्यांना
तुझ्या विश्वसनीयतेविषयी सांगेन.
तुझी विश्वसनीयता स्वर्गात स्थापलेली आहे.
तुझे प्रेम अनंतकाळ टिकेल.
२. “मी स्वतः निवडलेल्या व्यक्तीशी करार केला आहे.
तुझे सिंहासन पिढ्यान्पिढ्या राखीन.
माझा दास दावीद याला अभिवचन दिले आहे,
तुझा वंश मी अबाधित ठेवीन.
३. तो मला म्हणेल, “तूच माझा पिता, माझा देव,
माझा रक्षणकर्ता दुर्ग, मुक्तिदाता आहेस.”
त्याच्यावरील माझे प्रेम अढळ राहील.
त्याच्याबरोबरचा माझा करार सदैव अबाधित राहील.
दुसरे वाचन पौलचे रोमकरांस पत्र ४ : १३. १६-१८.२२
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“आब्राहामने श्रध्दा ठेवली, आशेचा किरणही नसताना आशा बाळगली."
आब्राहामाचे आचरण धर्मशास्त्रानुसार होते म्हणून नव्हे, पण त्याच्या श्रध्देमुळे तो नीतिमान ठरला म्हणून, सारे जग त्याचेच होईल असे अभिवचन त्याला व त्याच्या वंशजांना देण्यात आले होते.
तेव्हा आब्राहामाच्या साऱ्या वंशजांना म्हणजे केवळ धर्मशास्त्राप्रमाणे वागवणाऱ्यांनाच नव्हे पण आब्राहामाप्रमाणे ज्यांची श्रध्दा आहे, त्यांनाही - हे वचन मेहेरबानीदाखल खात्रीने मिळावे म्हणून ते श्रध्देवर आधारलेले आहे, कारण आब्राहाम आपणा सर्वांचा पिता आहे. धर्मशास्त्रात लिहिले आहे, “मी तुला अनेक राष्ट्रांचा पिता त्याच्याविषयी केले आहे." जो मृतांना जिवंत करतो व अस्तित्वात नसेल ते आपल्या आज्ञेसरशी अस्तित्वात आणतो, अशा देवावर त्याची श्रध्दा होती. आब्राहामाने श्रध्दा ठेवली, आशेचा किरण नसताना आशा बाळगली, म्हणूनच तो अनेक राष्ट्रांचा पिता झाला ! त्याच्याविषयी सांगण्यात आले होते, “इतके तुझे वंशज होतील !” म्हणून ते “त्याला नीतिमत्व असे गणण्यात आहे."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे प्रभो, तुझ्या मंदिरात राहणारे किती धन्य आहेत !
ते निरंतर तुझी स्तुती गातात.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १:१६,१८-२१,२४
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"प्रभूच्या दूताच्या आदेशाप्रमाणे त्याने मरियेशी लग्न केले."
याकोबला योसेफ झाला. हा योसेफ मरियेचा पती असून तिच्याच पोटी ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा जन्म झाला.
येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या प्रकारे झाला त्याची आई मरिया हिचा योसेफाशी वाड्. निश्चय झालेला होता. पण त्याचे लग्न होण्यापूर्वीच पवित्र आत्म्याच्या योगे ती गर्भवती असल्याचे दिसून आले. तिचा भावी पती योसेफ सज्जन होता. मरियेची अब्रू चव्हाट्यावर मांडायची त्याची इच्छा नव्हती. म्हणून त्याने आपला वाड्. निश्चय गुपचूप मोडून टाकण्याचा बेत केला. हा बेत त्याच्या मनात घोळत असतानाच प्रभूच्या एका दूताने त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि तो म्हणाला, “दावीदच्या पुत्रा, योसेफ, आपली पत्नी म्हणून मरियेचा स्वीकार करायला भिऊ नकोस, कारण तिच्या पोटी पवित्र आत्म्याच्या योगानेच गर्भ राहिला आहे. तिला मुलगा होईल. तू त्याचे नाव येशू असे ठेव, कारण तोच आपल्या लोकांना पापांपासून मुक्त करणार आहे.” मग योसेफ जागा झाला. प्रभूच्या दूताच्या आज्ञेप्रमाणे त्याने मरियेचा स्वीकार केला
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आपण येशूचे पालक संत योसेफ ह्याचा सोहळा साजरा करत आहोत. जुन्या करारातील योसेफ आणि संत योसेफामध्ये अनेक समानता आहेत. ह्या दोघांनाही स्वप्नात देवाचा साक्षात्कार झाला. दोघेही सत्पुरूष होते. दोन्ही पवित्रता आणि शुद्धतेचे आदर्श आहेत. संत योसेफ हा दाविदाच्या राजघराण्यातील अत्यंत नम्र आणि सौम्य व्यक्ती होता. त्याने तारणाच्या इतिहासात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. ८ डिसेंबर २०२० ते ८ डिसेंबर २०२१ पर्यंत आपण कॅथलिक चर्चचे संरक्षक संत योसेफ यांचे वर्ष साजरे केले. आपण या महान संताच्या शांत, परंतु अनुकरणीय आणि नीतिमान जीवनावर चिंतन केले ज्याने आपला तारणहार येशू ख्रिस्त आणि आपल्या धन्य आईचे संरक्षण केले आणि त्यांची काळजी घेतली. आज आपण संत योसेफाच्या मध्यस्थीद्वारे प्रार्थना करू या की, आपण सर्व वाईट आणि पापी जीवनापासून सुरक्षित राहू. जगात शांतता नांदावी यासाठी आपण विशेष प्रकारे प्रार्थना करूया.
प्रार्थना: हे प्रभू परमेश्वरा, संत जोसेफचा आदर्श जीवनात उतरविण्यास व त्याच्यासारखे भक्तीमान व नीतिमान बनण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या