Marathi Bible Reading | Thursday 9th March 2023 | 2ndt Week of Lent

उपवासकाळातील दुसरा सप्ताह 

गुरुवार  दि.९ मार्च २०२३

✝️ 
आब्राहाम म्हणाला, "मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर;



रोमची संत फ्रान्सेस

- विधवा (१३८४-१४४०)

फ्रान्सेस डी बस्सी ही मुलगी वयाच्या सहाव्या वर्षीच धार्मिकतेचा मूर्तिमंत आदर्श वाटावी इतकी श्रद्धाळू व भक्तिमान होती. लहानपणीच तिने धार्मिक कार्यासाठी व्रतस्थ जीवन जगण्याचे स्वप्न उराशी बाळगलेले होते. परंतु वयाच्या १२ व्या वर्षी तिच्या हेकेखोर वडिलांनी तिचे लग्न रोमच्या धार्मिक आणि सद्गुणी सरदार लोरेन्झो डी पोन्झीयानी ह्याच्याशी लावून टाकले. चाळीस वर्षे त्यांनी सुखाने संसार केला. त्यांना सहा मुले झाली.
वैवाहिक जीवन जगत असताना दोघे एकमेकांशी कधीही भांडली नाहीत. त्यांचे जीवन प्रार्थना आणि श्रद्धेच्या भक्कम खडकावर उभारलेले होते. फ्रान्सेस हिला प्रार्थनेमध्ये अवीट गोडी वाटत असे. ऐहिक सुखापासून ती स्वत:ला अलिप्त ठेवीत होती. श्रद्धा आणि वैराग्य अशी दुहेरी देणगी असतानाही फ्रान्सेस हिने आपल्या वैवाहिक जीवनाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. उलट वैवाहिक जीवन फुलविण्याची आणि शुद्धतेने व एकनिष्ठेने जगण्याची प्रेरणा तिला प्रार्थनेमधूनच मिळत असे.
फ्रान्सेस म्हणत असे, “विवाहित स्त्रीने, आपण प्रथम एक गृहिणी आहोत ह्याचे विस्मरण कधीही होऊ देऊ नये. आपल्या कौटुंबिक कर्तव्यात देवाचा शोध घेता यावा म्हणून प्रसंगी आपले प्रार्थनामय जीवन वेदीपाशीच ठेवून प्रथम आपल्या घरातील कर्तव्ये निष्ठेने पार पाडली पाहिजेत.”
पाश्चात्य ख्रिस्तसभेत फूट पडल्यानंतर रोमला अत्यंत दयनीय अवस्थेला सामोरे जावे लागले. त्यात दुष्काळाचीही भर पडलेली होती. १४०८ साली त्याची झळ फ्रान्सेस हिच्या कुटुंबालाही सोसावी लागली. लोरेन्झो डी पॉन्झीयानी हा रोममधील पोपमहाशयांच्या कुटुंबातील एक प्रमुख अग्रणी असल्यामुळे त्याला. नेपल्सच्या लाडिस्लास ह्याच्या सैन्याने धरून नेले व तुरूंगात टाकले. त्याची सुटका करण्यासाठी त्या सैनिकांनी फ्रान्सेस हिच्याकडे तिच्या आठ वर्षीय मुलाला खंडणी म्हणून पाठविण्याचा आदेश दिला. नंतर त्या दोघांना सोडण्यात आले.
परंतु इ. स. १४९० साली त्यांना रोममधून हद्दपार करण्यात आले, आणि रोममधील त्यांचा राजमहाल जाळून टाकण्यात आला. त्यांची संपत्ती मालमत्ता जप्त करण्यात आली. ह्या आपत्तीच्या काळात त्यांच्या दोन मुली देवाघरी गेल्या.

फ्रान्सेसच्या वैयक्तिक पावित्र्याचे तेज, तिची आत्मा जिंकण्याबाबतची कळकळ आणि गोरगरिबांविषयींची गरज पाहून अनेक घरंदाज रोमन स्त्रिया ऐषाराम झटकून जागरूक बनल्या. त्यांनी एकत्र येऊन १४३३ साली तोर डी स्पेन्वी येथील बेनेडिक्टाईन ऑब्लेट कांग्रेगेशन ही सेवाभावी संस्था उघडली. आजही ही संस्था रोममध्ये आणि इतरत्र कार्यरत आहे. ह्या संस्थेत कठोर व्रतवैकल्ये नव्हती. कडक आचारसंहिता नव्हती परंतु प्रार्थनेविषयी व गोरगरिबांच्या सेवेविषयी निश्चित भूमिका आणि नियम होते.
दुसऱ्यांच्या अंतर्यामातील विचार ओळखणे, सैतानाचे डावपेच समजून घेणे, साक्षात्कार, दृष्टांत, आरोग्यदान आणि संदेश देणे इ. दाने फ्रान्सेस हिला लाभलेली होती. तब्बल २३ वर्षे देवाने तिला आपल्या रक्षक दुताचा शारीरिक दृष्टांत दिला.
आपल्या पतीच्या दुःखद निधनानंतर ती आपल्या संस्थेत पूर्णपणे कार्यरत राहिली. चार वर्षानंतर ९ मार्च १४४० रोजी तिला देवाघरचे बोलावणे आले. इ. स. १६०८ साली तिला संतपदामध्ये समाविष्ट करण्यात आले.
✝️

पहिले वाचन  यिर्मया   १७:५ - १० 
वाचक :यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“जो मानवावर भिस्त ठेवतो तो शापित आहे. जो प्रभूवर विश्वास ठेवतो तो धन्य. 
परमेश्वर असे म्हणतो, “जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवतो, मानवाला आपला बाहू करतो व ज्याचे अंतःकरण परमेश्वरापासून फिरले आहे तो शापित आहे. तो वैराणातल्या झुडपासारखा होईल व जे कल्याण होईल ते तो पाहणार नाही. अरण्यातील रुक्ष स्थळे, क्षारभूमी व निर्जन प्रदेश यात तो वस्ती करील. जो पुरुष परमेश्वरावर भाव ठेवतो, ज्याचा भावविषय परमेश्वर आहे तो धन्य तो जलाशयाजवळ लावलेल्या वृक्षासारखा होईल. तो आपली मुळे नदीकिनारी पसरील. उन्हाची झळई येत असली तरी तिला तो भिणार नाही. त्याची पाने हिरवी राहतील. अवर्षणाच्या वर्षी त्याला चिंता पडणार नाही. तो फळे देण्याचे सोडणार नाही." हृदय सर्वात कपटी आहे. ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या करणीप्रमाणे प्रतिफळ देण्यास मी परमेश्वर हृदय चाळून पाहतो; अंतर्याम पारखतो.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १:१-४,६
प्रतिसाद : प्रभूवर भिस्त ठेवणारा मनुष्य धन्य. 

१) जो मनुष्य दुर्जनांच्या सल्ल्याप्रमाणे चालत नाही. 
पाप्यांच्या वाऱ्याला उभा राहत नाही 
किंवा देवनिंदकांच्या बैठकीत सामील होत नाही, 
तर उलट प्रभूच्या धर्मशास्त्रात रमतो 
त्याच्या धर्मशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.

२) वाहत्या पाण्याजवळ एखादे झाड लावलेले असते,
 यथाकाळी त्याला बहर येता,
 ज्याची पाने कोमेजत नाहीत, 
अशा झाडासारखा तो असतो. 
तो हाती घेतो ते सर्व सफल होते.

३) पण दुर्जनांचे तसे मुळीच नाही!
 वाऱ्याने उडून जाणाऱ्या भुशासारखे ते आहेत..
 सज्जनांच्या मार्गावर प्रभूचे लक्ष असते; 
परंतु दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.


जयघोष    
प्रभू म्हणाला, “मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील."


शुभवर्तमान लूक १६:१९-३१

वाचक : लूक  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तू सुख भरून पावलास आणि लाजर दुःख भरून पावला; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस."
येशू परुश्यांना म्हणाला, कोणीएक श्रीमंत मनुष्य होता. तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्यालीखुशाली करीत असे. त्याच्या दरवाजाजवळ फोडांनी भरलेला लाजर नावाचा एक दरिद्री माणूस पडलेला होता. त्या श्रीमंताच्या मेजावरून खाली पडेल त्यावर आपले पोट भरावे अशी त्याची इच्छा असे. शिवाय कुत्री येऊन त्याचे फोड चाटीत असत. पुढे दरिद्री माणूस मेला आणि देवदूतांनी त्याला आब्राहामच्या उराशी नेऊन ठेवले. श्रीमंतही मेला व त्याची उत्तरक्रिया करण्यात आली. तो अधोलोकात यातना भोगीत असताना त्याने आपली दृष्टी वर करून आब्राहाम व त्याच्या उराशी बसलेला लाजर ह्यांना दुरून पाहिले तेव्हा त्याने हाक मारून म्हटले, हे बापा आब्राहाम, माझ्यावर दया करुन लाजरला पाठव, त्याने आपल्या बोटाचे टोक पाण्यात बुडवून माझी जीभ थंड करावी; कारण ह्या जाळात मी क्लेश भोगीत आहे. आब्राहाम म्हणाला, "मुला, तू आपल्या आयुष्यात आपले सुख भरून पावलास, तसा लाजर आपले दुःख भरून पावला, ह्याची आठवण कर; आता ह्याला येथे समाधान मिळत आहे व तू क्लेश भोगीत आहेस. एवढेच नव्हे
तर जे इकडून तुम्हाकडे पार जाऊ पाहतात त्यांना जाता येऊ नये व तिकडून कोणी आम्हांकडे येऊ नये म्हणून आमच्या व तुमच्यामध्ये मोठी दरी स्थापलेली आहे." मग तो म्हणाला, “तर बापा, मी विनंती करतो, त्याला माझ्या बापाच्या घरी पाठव. कारण मला पाच भाऊ आहेत. त्यांनी तरी ह्या यातनेच्या स्थळी येऊ नये म्हणून त्याने त्यास इकडची साक्ष द्यावी." पण आब्राहामने त्याला म्हटले, “त्याच्याजवळ मोशे व संदेष्टे आहेत; त्याचे त्यांनी ऐकावे." तो म्हणाला, "हे बापा आब्राहाम, असे नाही; पण मेलेल्यांमधून कोणी त्याच्याकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील." तेव्हा त्याने त्याला म्हटले, ते मोशेचे व संदेष्ट्यांचे ऐकत नसतील तर मेलेल्यांमधूनही कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: जर वरील दोन वचने आपल्याला वाचून दाखवली गेली आणि आपल्याला एक साधा प्रश्न विचारला की, “या दोघांमध्ये धन्य कोण आहे ?", तर धनवान तो धन्य असे उत्तर देण्यास आपण क्षणभरही मागेपुढे पाहणार नाही. तो इतका श्रीमंत आहे की, त्याच्याकडे सर्वकाही आहे. दुसरीकडे, लाजरकडे संपत्ती आणि निवारा तर नाहीच शिवाय तो शारीरिक व्याधींनी देखील त्रस्त आहे. तथापि, जेव्हा , आपण श्रीमंत मनुष्य आणि लाजरची बोधकथा (लूक १६:१९-३१) शेवटपर्यंत वाचतो, तेव्हा आपल्या लक्षात येते की, लाजर आशीर्वादित आहे आणि श्रीमंत मनुष्य सदैव शापित आहे. या जीवनात लाजरला क्षणिक दुःख सहन करावे लागले, परंतु त्याला स्वर्गीय आनंद मिळाला; दुसरीकडे श्रीमंत माणसाने या जीवनात आनंद लुटला, परंतु नरकाच्या यातना भोगल्या. हा दाखला आपले डोळे उघडतो. सर्व ख्रिस्ती लोकांना येशू ख्रिस्ताप्रमाणे गरिबी आणि साधेपणाचे जीवन जगण्यास आव्हान आहे.

प्रार्थना :  हे परमेश्वरा, अंतःकरणापासून तुझी आज्ञा पाळण्यास व  सार्वकालिक जीवनाकडे वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या