Marathi Bible Reading | Wednesday 8th March 2023 | 2ndt Week of Lent

उपवासकाळातील दुसरा सप्ताह 

बुधवार  दि.८ मार्च २०२३

✝️ 
जो कोणी तुम्हांमध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. "



देवभक्त संत जॉन
वर्तनसाक्षी (१४९५-१५५०)
जॉनचा जन्म मध्य पोर्तुगालमध्ये इ. स. १४९५ साली झाला. मात्र त्याचे बालपण स्पेनमधील ओरोपेझा या ठिकाणी एका गुराख्याच्या घरी गेले. इथंच तो लहानाचा मोठा झाला आणि एक उत्तम मेंढपाळ म्हणून नावारुपाला आला. त्याच्या साधेपणाला विश्वासूपणा आणि पावित्र्य ह्यांची जोड होती.
पुढे तो सैनिक म्हणून फ्रान्स येथे गेला. व्हिएनाच्या वेढ्याच्या वेळी तो सेव्हईल येथे धनगर म्हणून काम पाहू लागला. मूर्स येथील गुलामांच्या सुटकेसाठी खंडणी म्हणून तो स्वत:च्या जीवाची किंमत मोजायला तयार होता.
काही काळ तो जिब्राल्टार येथे धार्मिक पुस्तके आणि चित्रे विकण्याचा धंदा करीत होता. वयाच्या ४५ व्या वर्षी एका दृष्टांतामध्ये बाळ येशू त्याच्या दृष्टीस पडला. त्याने त्यास म्हटले, 'हे देवभक्ता जॉन ग्रानाडा हा तुझा क्रूस होईल.'
ग्रानाडा ह्या शहरात जॉन जेव्हा गेला तेव्हा तेथे धन्यवादित जॉन अविलाकर' ह्यांच्या एका प्रवचनाचा त्याला स्पर्श झाला. त्या उपदेशाने तो खूप बेचैन झाला. त्याने आपली सर्व धनदौलत गोरगरिबांना वाटून टाकली. समाजातील दुःख निवारण्यासाठी तो विलक्षण धडपड करू लागला. त्याच्यातील तात्काळ परिवर्तनामुळे त्याचे डोके फिरले आहे, अशी लोकांची भावना झाली. त्यांनी त्याला वेड्यात काढले. नेमका ह्याचवेळी धन्यवादित जॉन अविलाकर ह्याने त्याच्याशी गप्पागोष्टी केल्या. त्याचे मन समजून घेतले. त्याच्या लहानसहान पापांची त्याला क्षमा केली. ह्या प्रसंगामुळे जॉनने आपले संपूर्ण जीवन गरीब आणि आजारी लोकांसाठी अर्पण करण्याचे ठरविले.
ग्रानाडा येथे त्याने छोटेसे घर भाड्याने घेतले. जे रोगी, आजारी त्याच्याकडे येत असत, त्यांना तो मोफत औषधोपचार करीत असे. जे रोगी स्वतः तिथे येऊ शकत नसत त्यांना तो आपल्या खांद्यावर प्रसंगी पाठीवर वाहून आणीत असे. रोगी आपल्या घरात आल्यानंतर तो त्यांचे पाय धुवून काढी. एक क्रूस त्यांच्यासमोर ठेवून रोगी त्या क्रुसाचे चुंबन घेत. त्यानंतर जॉन त्यांना अंथरूणावर झोपवी. त्यांचे पापनिवेदन ऐकण्यासाठी एखाद्या धर्मगुरूंना बोलावणे पाठवी. त्याच्या ह्या छोट्या घराचा संपूर्ण कारभार तो एकटाच सांभाळीत असे. घराची स्वच्छता, स्वत:चा स्वयंपाक, कपडे धुणे, औषधांची व रुग्णांची देखभाल, त्यांचा दैनंदिन आहार इ. गोष्टींवर तो जातीने लक्ष देत असे. उरलेला वेळ रात्री जागरण करून प्रार्थना, मनन-चिंतन यामध्ये तो घालवित असे. कधी कधी त्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी पैसे आणि अन्न मागत दारोदार फिरावे लागे. देवाने आपल्यावर इतके प्रेम केलेले आहे. मग आपण देवावरील प्रेमाखातर थोडा तरी त्याग करायला नको का? असे तो सर्वांना सांगत सुटे.
रात्री आसरा शोधत असलेल्यांना तो आपल्या घरात ठेवून घेई, अनाथ, विधवा, गरीब विद्यार्थी, वाकडे पाऊल पडलेल्या वा उपेक्षित, स्त्रिया ह्यांना तो अतिशय प्रेमाने वागवी. बेकारांना तो नोकरी शोधून देई. दु:खितांचे अश्रू पुसत व आनंदोत्सव करणाऱ्यांना उत्तेजन देत तो इकडेतिकडे भटकत राही. आर्चबिशपांनी त्याच्या ह्या कार्याला पूर्ण पाठिंबा दिलेला होता. त्याच्या पावित्र्यपूर्ण जीवनाला चमत्काराचे भरपूर पीक आलेले होते.
मार्च १५५० रोजी वेदीसमोर गुडघे टेकून प्रार्थना करीत असताना त्याला अचानक मृत्यू आला इ. स. १६९० साली त्याला संतपद देण्यात आले. संत जॉन इस्पितळे, आजारी, पारिचारिका, छापखाने आणि पुस्तक विक्रेते ह्याचा तो आश्रयदाता संत आहे.
त्याने स्थापन केलेल्या हॉस्पीटलर्स ब्रदर्सना इटालीत बरीच लोकप्रियता मिळाली. आज जगातील विविध भागांमध्ये १०० हून अधिक इस्पितळे हे ब्रदर्स चालवित असतात.
चिंतन : हे प्रभो, तुझे काटे माझी गुलाबे आहेत आणि तुझे दुःखसहन माझा गौरव आहे म्हणूनच वेळ असेपर्यंत मी सर्व प्रकारची चांगली कामे अखंडितपणे करीत राहीन. मला तुझी शक्ती दे. - देवभक्त संत जॉन

खरा मोठेपणा मान-सन्मान, श्रीमंती, वैभव यामध्ये नसून सेवा व परोपकार ह्यामध्ये आहे, हे प्रभू येशूने स्पष्ट केले आहे. आज आपण आपल्या ख्रिस्ती जीवनाचा आढावा घेत असताना ऐहिक वैभवापेक्षा आपल्या जीवनात आध्यात्मिकतेची उंची कशी वाढविता येईल ह्यावर चिंतन करु या. नम्रता, सेवा व ख्रिस्ती मुल्ये आचरणात आणण्यासाठी प्रभूकडे प्रार्थना करु या. 
✝️

पहिले वाचन  यिर्मया  १८:१८-२०
वाचक : यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
        
    लोक म्हणाले, “ह्या यिर्मयाचा काटा आता काढलाच पाहिजे. आपल्याकडे धर्मशास्त्राचे ज्ञान देण्यासाठी पुरोहित आहेत, सल्लामसलत देण्यासाठी विद्वान आहेत आणि देवाचा संदेश सांगण्यासाठी प्रवक्तेही आहेत. तर मग त्याच्यावर आपण आरोप ठेवूया. त्याच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची आपल्याला मुळीच गरज नाही. " हे प्रभू माझ्याकडे तू लक्ष दे . माझे विरोधक काय म्हणताहेत ते ऐक. बऱ्याची फेड वाइटाने व्हावी काय? त्यांनी माझा जीव घेण्यासाठी कसा खड्डा तयार केला आहे. त्यांच्यावरील तुझ्या कोपाचे निवारण व्हावे म्हणून मीच त्यांच्यासाठी तुझ्याजवळ मध्यस्थी केली होती ह्याची आठवण कर.

हा प्रभूचा शब्द आहे 

सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ३१:५-६,१४-१७

प्रतिसाद  प्रभो, आपल्या वात्सल्यामुळे माझा बचाव कर.

१) माझ्यासाठी त्यांनी गुपचूप पसरलेल्या 

जाळ्यातून मला सोडव. 

कारण तूच मला आसरा देणारा दुर्ग आहेस. 

मी आपला आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. 

हे प्रभू, सत्यस्वरूप देवा, तूच माझा उद्धार करणार आहेस.


२) अनेकांची कुजबुज माझ्या कानावर येत आहे 

भोवती भीतीचे वातावरण आहे. 

ते माझ्याविरुद्ध खलबत करत आहेत. 

माझा जीव घ्यायचा त्यांनी बेत केला आहे. 


३)  प्रभो, मी तर तुझ्यावर भरवसा ठेवून आहे. 

मी म्हणतो, "तूच माझा देव, 

माझे बरेवाईट तुझ्याच हातात आहे. 

माझा पिच्छा पुरविणारे व माझे शत्रू, 

ह्याच्या हातून मला सोडव."


जयघोष 

 हे प्रभो, तुझे शब्द, आत्मा आणि जीवन आहेत.

 तुझे शब्द सार्वकालिक जीवन देणारे आहेत.


शुभवर्तमान मत्तय : २०:१७-२८

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशू वर येरुशलेमास जाण्याच्या बेतात असता त्याने बारा शिष्यांना वाटेत एकीकडे नेऊन म्हटले, “पाहा, आपण वर येरुशलेमास जात आहो आणि मनुष्याच्या पुत्राला मुख्य याजकांच्या व शास्त्रांच्या हाती धरून देण्यात येईल. ते त्याला मरणदंड ठरवतील आणि थट्टा करायला, फटके मारायला व क्रूसवर खिळायला त्याला परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा उठवला जाईल."
तेव्हा जब्दीच्या मुलांच्या आईने आपल्या मुलांसह त्याच्याकडे येऊन त्याच्या पाया पडून त्याच्याजवळ काही मागणी केली. त्याने तिला विचारले "तुला काय पाहिजे ?" ती त्याला म्हणाली, "तुमच्या राज्यात ह्या माझ्या दोघा मुलांतील एकाने तुमच्या उजवीकडे व एकाने डावीकडे बसावे अशी आज्ञा करा." येशू म्हणाला, "तुम्ही काय मागता हे तुम्हास समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुम्हाला पिता येईल काय?" ते त्याला म्हणाले, "पिता येईल." त्याने त्यांना म्हटले, "माझा प्याला तुम्ही प्याल खरा, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्याच्यासाठी तो आहे." ही गोष्ट ऐकून दहा शिष्यांना त्या दोघा भावांचा राग आला.
पण येशूने त्यांना बोलावून म्हटले, “परराष्ट्रीयांवर त्यांचे अधिपती प्रभुत्व चालवतात व मोठे लोकही अधिकार करतात, हे तुम्हांला ठाऊक आहे. तसे तुम्हांमध्ये नाही; तर जो कोणी तुम्हांमध्ये श्रेष्ठ होऊ पाहतो तो तुमचा सेवक होईल आणि जो कोणी तुम्हांमध्ये पहिला होऊ पाहतो तो तुमचा दास होईल. ह्याप्रमाणे मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायला नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करायला आला आहे."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आजच्या शुभवर्तमानातील, "तेव्हा" हा शब्द, येशूची आपल्या मृत्यूबद्दल तिसरी आणि अंतिम भविष्यवाणी व याकोब आणि योहानाच्या आईची विनंती, ह्या दोन महत्त्वाच्या घटनांना जोडतो. जेव्हा येशू त्याच्या स्वतःचा मृत्यू, थट्टा मस्करी आणि अपमानाविषयी बोलत होता तेव्हा त्याचे सर्वात जवळचे शिष्य सत्ता आणि शक्तीचा विचार करीत होते. आजही ख्रिस्ती भाविक, येशूचे शिष्य, ऐहिक सत्ता आणि प्रतिष्ठा यात अडकून आहेत आणि त्यांना येशूच्या मूल्यांचा विसर पडत आहे ही मोठी शोकांतिका आहे. पवित्र आत्म्याचा वर्षाव झाल्यानंतर येशूची मूलभूत मूल्ये याकोब आणि योहान समजतात. आपण येशूची मूल्ये कधी समजून घेणार आहोत आणि या मूल्यांनुसार आपले जीवन कधी जगणार आहोत ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, नम्रता, सहनशीलता, दया, परोपकार व सेवाभाव आमच्यामध्ये वाढीस लावा, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या