Marathi Bible Reading | Tuesday 7th March 2023 | 2ndt Week of Lent

उपवासकाळातील दुसरा सप्ताह 

मंगळवार दि.७ मार्च २०२३

✝️ 
 "जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.”."



संत परपेच्युआ व फेलसीटी 
रक्तसाक्षी (२०३)
श्रद्धेमध्ये बळकट रहा. एकमेकांवर प्रेम करा. आमच्या छळामुळे तुम्ही भिऊन जाऊ नका. आमचे दुःखसहन तुम्हाला अडखळणाऱ्याचा धोंडा बनू नये.- संत पर्पेतुआ
✝️

ख्रिस्तासारखे आपण जोपर्यंत नम्र बनून कृतीशील जीवन जगत नाही तोपर्यंत ख्रिस्ताचे खरे अनुयायी होऊ शकत नाही. आपल्यातील अहंकार व स्वार्थ  बाजूला सारुन आपण नम्रतेने खरे ख्रिस्ती जीवन जगता यावे म्हणून प्रभूकडे। विशेष कृपा मागू या.
✝️

पहिले वाचन  यशया  १:१०,१६ - २० 
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन 
 “चांगले करायला शिका. नीतीच्या मागे लागा."

सदोमच्या अधिपतींनो, परमेश्वराची वचने ऐका, गमोराच्या लोकांनो, आमच्या देवाच्या धर्मशास्त्राकडे कान द्या! आपणास धुवा, स्वच्छ करा. माझ्या डोळ्यांपुढून आपल्या कर्माचे दुष्टपण दूर करा. दुष्टपणा करण्याचे सोडून द्या. चांगले करायला शिका. नीतीच्या मागे लागा, जुलम्याला ताळ्यावर आणा. अनाथांचा न्याय करा, विधवेचा कैवार घ्या.
परमेश्वर म्हणतो, “चला, या, आपण बुद्धिवाद करू. तुमची पापे लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी शुभ्र होतील. ती किरमिजासारखी तांबडी असली तरी लोकरीसारखी बनतील. तुम्ही माझे ऐकावयाला तयार व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. तुम्ही बंड कराल तर तरवार तुम्हांला खाऊन टाकील, कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ५०:८-९,१६-१७,२१-२३
प्रतिसाद : सरळमार्गी मनुष्याला मी देवाच्या मुक्तीचे दर्शन घडवीन.

१) तुझ्या यज्ञाबद्दल मी तुला दोष देत नाही
 तुझी होमार्पणे सतत माझ्यासमोर असतात. 
तुझ्या घरचा गोन्हा किंवा तुझ्या कळपातले
 बकरे घ्यायची मला गरज नाही.

२) माझ्या आज्ञा जाहीर करून तुला काय करायचे आहे ? 
तुझ्या तोंडी माझा करार कशाला ? 
तुला तर शिस्तीचा तिटकारा आहे.
 मी बोलतो तेव्हा तू तोंड फिरवतोस.

३) या गोष्टी तू केल्यास तरीदेखील मी गप्प बसू काय ?
 तुला वाटते मी तुझ्यासारखाच आहे. 
आभारप्रदर्शनरूपी यज्ञ करणारा माझे गौरव करता. 
सरळमार्गी मनुष्याला मी देवाच्या मुक्तीचे दर्शन घडवीन.


जयघोष               
देवाने जगावर एवढी प्रीती केली की, 
त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला; 
•अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो
 त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.

शुभवर्तमान मत्तय २३:१-१२

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशू लोकसमुदायांस व आपल्या शिष्यांस म्हणाला, “शास्त्री व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जे काही तुम्हांस सांगतील ते सर्व आचरीत व पाळीत जा. परंतु त्यांच्या कृतीप्रमाणे करू नका, कारण ते उपदेश करतात पण तसे आचरण करत नाहीत. जड अशी ओझी बांधून ते लोकांच्या खांद्यांवर देतात, परंतु ती काढण्यास ते स्वतः बोटही लावावयाचे नाहीत. आपली सर्व कामे लोकांनी पाहावी म्हणून ते ती करतात. ते आपली मंत्रपत्रे रुंद व आपले गोंडे मोठे करतात. जेवणावळीतील श्रेष्ठ स्थाने, सभास्थानांतील श्रेष्ठ आसने, बाजारात नमस्कार घेणे व लोकांकडून गुरुजी म्हणवून घेणे त्यांस आवडते. तुम्ही तरी आपणास गुरुजी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा गुरू एक आहे व तुम्ही सर्व भाऊभा आहात. पृथ्वीवरील कोणाला आपला पिता म्हणू नका, कारण तुमचा पिता एक आहे. तो स्वर्गीय आहे. तसेच आपणास स्वामी म्हणवून घेऊ नका, कारण तुमचा स्वामी एक आहे. तो ख्रिस्त होय. पण तुमच्यामध्ये जो मोठा असेल त्याने तुमचा सेवक व्हावे. जो कोणी स्वतःला उंच करील तो नमविला जाईल आणि जो कोणी स्वतःला नमवील तो उंच केला जाईल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: मत्तयच्या शुभवर्तमानाच्या २३व्या अध्यायात येशूने त्याच्या काळातील धर्मगुरू, शास्त्री व परुशी यांच्यावर कठोर टीका केली आहे. शास्त्री व परुशी हे विद्वान आणि प्रापंचिक नेते होते; ते याजक नव्हते. त्यांचा आदर केला जात असे आणि त्यांचे आज्ञापालन केले जात असे. कारण त्यांना धर्मग्रंथाचे ज्ञान होते आणि ते धार्मिक नियमांचे कठोरपणे पालन करत होते. जेव्हा आपण आजचे शुभवर्तमान वाचतो (मत्तय २३:१-१२), तेव्हा येशू त्याच्या काळातील धर्मगुरू, शास्त्री व परुश्यांसाठी जे शब्द वापरतो ते वर्णन आपल्या सर्वांसाठी लागू होते. आपल्यापैकी काही जणांना समाजात सन्मानाची, प्रतिष्ठेची, आदराची वागणूक मिळाली तर फार बरे वाटते. किंबहुना आपण या सर्वांची इच्छा बाळगतो. येशूची शिकवण आपल्या सर्वांसाठी, याजकांसाठी आणि सामान्य प्रापंचिकांसाठी उपयुक्त आहे. तो प्रत्येकाला आणि विशेषतः नेतृत्वाच्या पदावर असलेल्यांना नम्र होण्यासाठी आणि मनापासून सेवा करण्यास सांगतो. आपण येशूच्या ह्या महत्वाच्या शिकवणीचे पालन करण्यास तयार आहोत का ?

प्रार्थना :  हे प्रभू येशू, नम्र अंत:करणाने समर्पित जीवनाद्वारे तुझी सेवा करण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या