Marathi Bible Reading | Monday 6th March 2023 | 2nd Week of Lent

उपवासकाळातील दुसरा सप्ताह 

सोमवार दि. ६ मार्च २०२३

✝️ 
 "कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”."


संत कॉलेट

(-   कुमारिका )
अनेक नवी कॉन्व्हेंट्स आणि मठ उदयास आले. फ्रान्सिस्कन जीवनपद्धतीलाही त्याची चांगली झळ पोहोचली. त्यामुळेच कॉलटेच्या नावावर १७ नवी कॉन्व्हेंटस आणि १४ नवे मठ उभारण्यात आल्याची नोंद झालेली आढळते.

संत कॉलेटने स्थापन केलेल्या धर्मभगिनी पूर्णपणे अलिप्त जीवन जगत असतात. उपवास, प्रार्थना, त्याग आणि गरिबीचे व्रत अशी त्यांच्या जीवनाची प्रमुख अंगे होत. आपल्या जीवन कारकिर्दीत संत कॉलेट हिने (संत) जोन ऑफ आर्क (सण २३ ऑक्टो.) आणि (संत) विन्सेंट फेरेर (सण ५ एप्रिल) अशा पवित्र स्त्री-पुरुषांचा सल्ला घेतला. (संत) विन्सेंट ह्यांनी तर तिच्या प्रतिष्ठेला शोभेल असा खास क्रूस तिला बहाल केलेला होता. मिरवणुकीच्या वेळी हा क्रूस सन्मानाने लोकांसमोर उभा केला जाई. हा क्रूस (संत) विन्सेंट फेरेर ह्यांनी आपल्या जाहीर कार्यक्रमात वापरलेला होता.

चिंतन : सार्वकालिक जीवनाकडे जाणारा मार्ग वेदना, दुःखसहन आणि सोशिकतेने स्वीकारलेल्या यातनामय क्रूसाला छेदून जातो. संत कॉलेट

✝️

देव  जसा दयाळू आणि क्षमाशील आहे तसेच आपण सर्वांनी असावे असे आवाहन  प्रभू येशू करीत आहे. देवाने आपल्याला अनेक दानांनी भरलेले आहे. ती सर्व  दाने देवाच्या गौरवासाठी आहेत म्हणून प्रभू येशू म्हणत आहे. 'द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल.' आपल्या आजूबाजूला असलेल्या गरजवंतांना आपण जर  सहकार्य केले व त्यांची गरज भागवली तर परमेश्वर आपल्याला अनेकपटीने  कृपादाने व आशिर्वाद देईल.
परमेश्वर जसा दयाळू, प्रेमळ व क्षमाशील असून उदार हस्ते देत  असतो त्याप्रमाणे आपल्याला बनता यावे व त्याच्या वचनाप्रमाणे जगता यावे  म्हणून प्रयत्नशील बनून प्रभूकडे प्रेरणा मागू या.
 
✝️

पहिले वाचन  दानिएल ९:४ - १० 
वाचक : दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन ९:४१ - १० 
“आम्ही पाप केले आणि कुटिलतेने वागलो. "

"हे प्रभो, हे थोर व भयावह देवा, जे तुझ्यावर प्रेम करतात व तुझ्या आज्ञा पाळतात त्यांच्याबरोबर तू आपला करार पाळून त्यांच्यावर दया करतोस. आम्ही पाप केले आणि कुटिलतेने वागलो. दुष्टतेचे वर्तन केले. फितूर झालो. तुझे विधी व तुझे निर्णय यापासून आम्ही परावृत्त झालो. तुझे सेवक जे संदेष्टे त्यांनी तुझ्या नामाने आमचे राजे, सरदार, वडील व देशाचे सर्व लोक यांना सांगितले तेसुद्धा आम्ही ऐकले नाही. हे प्रभो, न्यायत्व काय ते तुझ्याच ठायी आहे; परंतु आमच्या तोंडाला आजच्याप्रमाणे काळोखी लागली आहे. यहुदाचे लोक येरुशलेम निवासी लोक आणि जवळ व दूर राहणारे सर्व इस्राएल लोक, यांनी तुझ्याविरुद्ध पाप केल्यामुळे तू त्यांना निरनिराळ्या देशात हाकून लावले. त्या सगळ्यांच्या तोंडांना काळोखी लागली आहे. हे प्रभो, आमच्या तोंडास, आमचे राजे, आमचे सरदार, आमचे वडील यांच्या तोंडाला काळोखी लागली आहे. आम्ही तुझ्याविरुद्ध पाप केले आहे. आमचा देव प्रभू दयेचा व क्षमेचा सागर आहे. आम्ही त्याच्याबरोबर फितुरी केली आणि आमचा देव परमेश्वर याने आपले सेवक जे संदेष्टे यांच्याद्वारे आम्हांपुढे ठेवलेल्या त्याच्या धर्मशास्त्राप्रमाणे वागण्यासंबंधाने आम्ही त्याची वाणी ऐकली नाही."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ७९:८-९,११-१३
प्रतिसाद : प्रभो, आमच्या दुष्कृत्यांनुसार आमची परतफेड करू नकोस.

१) आमच्या वाडवडिलांचे अपराध आठवून
आम्हांला शासन करू नकोस. 
तुझ्या करुणेची सावली आमच्यावर लवकर पडू दे. 
कारण आमची अतिशय दैन्यावस्था झाली आहे.

२) आमच्या उद्धारक देवा, तुझ्या नामाचा महिमा 
व्हावा म्हणून आम्हांला मदत कर.
 हे आमच्या प्रभू परमेश्वरा, तुझे नाव राखले जावे 
म्हणून आमची सुटका कर आणि आमच्या पापांची क्षमा कर.

३)आम्हा बंदिजनांचे उसासे तुझ्या कानी पडून देत.
मरणाच्या दाढेत सापडलेल्यांची आपल्या
महासामध्यने सुटका कर. 
हे स्वामी, आमच्या शेजारच्या राष्ट्रांनी
 केलेल्या तुझ्या नालस्तीची भरपाई

४)सातपटीने त्यांच्या पदरी घाल. 
मग तुझ्या कुरणातला जणू कळप 
अशी आम्ही तुझी प्रजा,
 तुला सदैव धन्यवाद देऊ. 
तुझी कीर्ती पिढ्यान्पिढ्या वर्णीत राहू.


जयघोष                        लूक १५:१८

मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, "बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे."


शुभवर्तमान लूक ६:३६-३८

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. तुम्ही कोणाचे दोष काढू नका, म्हणजे तुमचे दोष कोणी काढणार नाही. कोणाला दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हांला कोणी दोषी ठरवणार नाही. क्षमा करा म्हणजे तुमची क्षमा होईल. द्या म्हणजे तुम्हांला दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील. कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हांला परत मापून देण्यात येईल.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: स्तोत्र ७८ हे यरूशलेमच्या लोकांचा विलाप व्यक्त करते. हे स्तोत्र त्यांच्यावर ओढवलेल्या राष्ट्रीय संकटाबद्दल म्हणजेच त्यांचा विनाश आणि मंदिराच्या अशुद्धतेबद्दल बोलते. स्तोत्रकार रक्ताच्या वाहणाऱ्या नद्या, पक्षी आणि प्राणी प्रेताचे मांस खात असल्याचे चित्र चित्रित करीत आहे. लोकांची यातना आणि लाज देखील स्पष्टपणे वर्णन केली आहे. या असह्य दुःखाने स्तोत्रकार प्रभुला विचारतो, “हे परमेश्वरा हे कोठवर चालणार?” जरी आपण वैयक्तिकरित्या युद्धाच्या भयंकर शोकांतिकेतून जात नसलो तरी हजारो लोक आहेत जे युद्धाचे क्रूर वास्तव अनुभवत आहेत, ज्यामुळे त्यांची सर्व स्वप्ने नष्ट होत आहेत. ते रडत शोक व्यक्त करत आहेत, ते स्वतःला कमनशीबी आणि आरोपी समजत आहेत. युद्ध आणि हिंसेचे भयंकर परिणाम अनुभवणाऱ्या सर्व लोकांसाठी तसेच युद्ध करणाऱ्या राष्ट्रांत शांतता आणि एकोपा निर्माण व्हावा म्हणून आज प्रार्थना करूया.

प्रार्थना : हे दयाळू परमेश्वरा, तुझ्या परिपूर्णतेत सहभागी होण्यास आम्ही पात्र  बनावेत म्हणून आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या