उपवासकाळातील दुसरा रविवार
दि.५ मार्च २०२३
✝️
मेघातून वाणी झाली, "हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका."
✝️
येशूमध्ये परमेश्वर पित्याचे स्वरुप असून त्याच्या सहवासात देवाच्या सहवासाचा अनुभव येत असतो. आपल्या सर्वांना प्रभू येशूच्या रुपांतरात सहभागी होण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. धैर्याने, श्रद्धेने आणि देवाची इच्छा प्रामाण मानून आपण प्रभू येशूच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करु या.
देवाच्या सहवासाचा अनुभव घेऊन तो कृतीत उतरविण्यास आणि देवाची सुवार्ता पसरविण्यास आपण कृतीशील जीवन जगण्यासाठी कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती १२:१-४
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परमेश्वराच्या लोकांचा पिता आब्राहाम याचे पाचारण."
परमेश्वराने आब्रामाला सांगितले, “तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. मी तुझ्यापासून मोठे राष्ट्रे निर्माण करीन. मी तुला आशीर्वाद देईन. तुझे नाव मोठे करीन. तू आशीर्वादित होशील. तुझे अभीष्ट चिंतितील त्यांचे मी अभीष्ट करीन. तुझे जे अनिष्ट चिंतितील त्यांचे मी अनिष्ट करीन. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होतील." परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे अब्राम निघून गेला.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३३:४-५,१८-१९,२०-२२
प्रतिसाद : हे परमेश्वरा, आम्ही तुझी आशा धरली आहे.
१) परमेश्वराचे वचन सरळ आहे.
त्याची सर्व कृती सत्याची आहे.
त्याला नीती व न्याय ही प्रिय आहेत.
परमेश्वराच्या वात्सल्याने पृथ्वी भरली आहे.
२) पाहा, जे परमेश्वराचे भय धरतात व
त्याच्या प्रेमाची अपेक्षा करतात
त्यांचा जीव मृत्यूपासून सोडवावा व
दुष्काळात त्यांचा प्राण वाचवा,
म्हणून त्यांच्यावर त्याची नजर असते.
३) आमचा आत्मा परमेश्वराची प्रतीक्षा करीत आहे.
आमचे साह्य व ढाल तोच आहे. हे परमेश्वरा,
आम्ही तुझी आशा धरली आहे..
म्हणून आम्हांवर तुझी प्रीती असू दे..
दुसरे वाचन २ तिमथी १:८-१०
वाचक : पौलचे तिमथीला दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"देव आम्हांला बोलवतो आणि आमचे मन प्रकाशित करतो."
आपल्या प्रभूविषयीच्या साक्षीची आणि मी जो त्याचा बंदिवान त्या माझी तू लाज धरू नये, तर देवाच्या सामर्थ्याच्या परिणामाने शुभवर्तमानासाठी माझ्याबरोबर दुःख सोसावे. त्याने आमच्या कृत्यांनुसार नव्हे तर स्वतः च्या संकल्पानुसार व कृपेनुसार आम्हांला तारले व पवित्र पाचारणाने बोलावले आहे. ही कृपा युगाच्या काळापूर्वी ख्रिस्त येशूच्या ठायी आम्हांवर करण्यात आली होती. ती आता आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याच्या प्रकट होण्याने दृश्यमान झाली आहे. त्याने मरण नाहीसे केले आणि शुभवर्तमानाद्वारे जीवन व अविनाशिताही प्रकाशित केली आहेत.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
तेजस्वी मेघातून पित्याची वाणी ऐकू आली, "हा माझा प्रिय पुत्र आहे. ह्याचे तुम्ही ऐका."
शुभवर्तमान मत्तय १७:१-९
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले. "
सहा दिवसांनंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोगरावर एकान्ती नेले. तेव्हा त्याचे रूप त्यांच्यादेखत पालटले; त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली. तेव्हा पाहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करीत असेलेले त्याच्या दृष्टीस पडले. मग पेत्र येशूला म्हणाला, "प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे तीन मंडप उभारतो. आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक." तो बोलत आहे तो, पाहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून वाणी झाली, "हा माझा पुत्र, मला परमप्रिय आहे. ह्याविषयी मी संतुष्ट आहे. ह्याचे तुम्ही ऐका." हे ऐकून शिष्य जमिनीवर पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, "उठा, भिऊ नका." तेव्हा त्यांनी दृष्टी वर करुन पाहिले तो येशूशिवाय कोणी त्यांना दिसला नाही. नंतर ते डोंगरावरून खाली येताना येशूने त्यांना आज्ञा केली की, “मनुष्याचा पुत्र मेलेल्यातून उठवला जाईपर्यंत हा साक्षात्कार कोणालाही सांगू नका."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: प्रायश्चित्तकाळात मानवाने आपल्या स्वार्थी सुरक्षा कवचातून बाहेर पडावे आणि स्वर्गराज्यातील शांती आणि कृपा ह्यांचा आस्वाद घ्यावा यासाठी भाविकांना आवाहन करण्यात येते. आजच्या वाचनातून विविधप्रकारे हा प्रवास वर्णन करण्यात आलेला आहे.
अ. वचनदत्त भूमी कनानमध्ये प्रवेश करण्यासाठी हारानरूपी मायभूमी सोडावी लागतेः पहिल्या वाचनात (उत्पत्ती १२:१-४) परमेश्वराने आब्राहामला केलेल्या पाचारणाविषयी आपण ऐकतो. आपली मायभूमी सोडून देवाने देऊ केलेली वतनभूमी आब्राहाम नम्रपणे, आज्ञाधारकपणे व त्यागी वृत्तीने स्वीकारतो. मात्र ह्या प्रवासात कधी कधी "आत्म्याची काळी रात्र" आणि "वैराण वाळवंट” अनुभवावे लागते.
ब. देवाच्या योजना स्वीकारण्यासाठी स्वतःच्या योजनांचा त्याग करावा लागतो: आजच्या दुसऱ्या वाचनात (रतीमथ्य १:८-१०) संत पॉल आपल्यासमोर ईश्वराची योजना उलगडून दाखवतो. अशी योजना नक्कीच मानवाच्या छोट्या छोट्या संकल्पापेक्षा निराळी असते. आपल्या योजना किती छोट्या किंवा मोठ्या असतात ते महत्त्वाचे नसून त्या देवाच्या योजनेशी सुसंगत आहेत की नाहीत ते महत्त्वाचे असते.
क. आध्यात्मिक जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी भौतिक जीवनाची आसक्ती सोडावी लागते : प्रभू येशू ख्रिस्त लोकांच्या जीवनाशी समरस झालेला होता. परंतु देवपित्यावरून त्याची दृष्टी जराही ढळली नाही. आजच्या शुभवर्तमानात (मत्तय १७:१- ९) येशूच्या रूपांतराचा प्रसंग वर्णन करण्यात आलेला आहे. हा आध्यात्मिक अनुभव घेण्यासाठी येशू आपल्या तीन प्रेषितांना एकान्ती एका उंच डोंगरावर घेऊन जातो.
प्रायश्चित्तकाळात ख्रिस्तसभा आपल्याला आध्यात्मिक जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी भौतिक जीवनाची आसक्ती सोडण्याचे आवाहन करते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वाणी ऐकल्यास न तुझ्या शब्दाप्रमाणे जीवन जगण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या