उपवासकाळातील पहिला सप्ताह
शनिवार दि.४ मार्च २०२३
✝️
" जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."
✝️
ऑस्ट्रेलियाच्या सद्गुणी एलिझाबेथ आणि पोलंडचा कर्तव्यतत्पर राजा कासिमीर चौथा ह्यांच्या पोटी कासिमीर हा दुसरा मुलगा जन्माला आला. पोलंडचा सुप्रसिद्ध इतिहासकार जॉन डग्लस ह्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचे प्रारंभीचे शिक्षण झाले. त्यांच्याकडून त्यावेळी त्याला धार्मिक जीवनाचे बाळकडू मिळाले. पुढे हे इतिहासकार लेम्बर्ग धर्मप्रांताचे आर्चबिशप झाले.
वयाच्या ९ व्या वर्षातच कासिमीर ह्याने आपल्या तीक्ष्ण बुद्धीमतेची आणि पवित्र जीवनाची चमक दखविली होती. तो तासन् तास व बंद असलेल्या देवळासमोर गुडघे टेकून प्रार्थना करण्यात मग्न असे. कधी कधी संपूर्ण रात्रभर तो त्या अवस्थेत प्रार्थनेमध्ये गुंग होऊन जाई. पोलंडचे हवामान त्याच्या ह्या आध्यात्मिकतेला अजिबात अनुकूल नव्हते. तशात तो वरचेवर उपवास करायचा. जमिनीवर झोपायचा आणि केवळ एकच केसाळ शर्ट वापरायचा. गरिबांविषयी त्याच्या मनात अपार करूणा भरून राहिलेली होती. त्यामुळे लवकरच त्याला “गरीब व दीनदुबळे ह्यांचा संरक्षक व कैवारी" असा किताब मिळाला.
परमेश्वराठायी भोदभाव नसून तो सर्वांवर सारखाच प्रेम करीत असतो, म्हणूनच प्रभू म्हणत आहे, 'जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा.' प्रभूमध्ये पूर्णत्व प्राप्त करण्यासाठी प्रभूची प्रीतिची आज्ञा पाळावीच लागेल.
वैऱ्यांवर प्रीति करण्यासाठी मन खूप मोठ असाव लागते. त्याचप्रमाणे जे आपला छळ करतात व आपल्यावर अन्याय करतात त्यांच्यासाठी प्रार्थना हाच एकमेव चांगला मार्ग आहे. प्रभूने दिलेली ही शिकवण आपल्याला परिपूर्णतेकडे नेणारी आहे. देवाची लायक मुले बनण्यास व त्याच्या प्रीतिचे
साक्षीदार बनण्यास आपण प्रेरणादायी जीवन जगू या..
✝️
पहिले वाचन अनुवाद २६:१६-१९
वाचक : अनुवाद या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील."
मोशेने लोकांना म्हटले, “हे विधी व नियम तू पाळावे अशी आज्ञा आज तुझा देव परमेश्वर तुला करीत आहे म्हणून ते तू जिवेभावे व काळजीपूर्वक पाळ. परमेश्वर हा आपला देव आहे असे मान्य करून तू आज वचन दिले आहे की, मी तुझ्या मार्गानी चालेन. तुझे विधी, आज्ञा व नियम पाळीन आणि तुझा शब्द मानीन आणि परमेश्वरानेही आज मान्य केले आहे. तुला संगितल्याप्रमाणे तू माझी खास प्रजा झाली आहेस. तू माझ्या सर्व आज्ञा पाळ, म्हणजे मी निर्माण केलेल्या सर्व राष्ट्रांपेक्षा प्रशंसा, नावलौकिक आणि सन्मान ह्या बाबतीत तुला श्रेष्ठ करीन आणि माझ्या म्हणण्याप्रमाणे तू परमेश्वर आपला देव ह्याची पवित्र प्रजा होशील.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११९:१-२,४-५, ७-८
प्रतिसाद : जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!
१) ज्याचे आचरण शुद्ध आहे,
जे प्रभूच्या धर्मशास्त्रानुसार वागतात, ते धन्य!
जे त्याची शिकवण आचरतात,
अगदी मनापासून त्याचा शोध करतात, ते धन्य होत.
२) प्रभू तुझे आदेश आम्ही निष्ठापूर्वक पाळावेत.
म्हणून तू ते आम्हांला देऊन ठेवले आहेत.
तुझ्या नियमांप्रमाणे आचरण राखण्याकडे
माझी प्रवृत्ती असली तर बरे.
३) तुझे न्याय्य संकेत मला समजू लागतील.
तसा मी सरळ मनाने तुला धन्यवाद देईन.
मी तुझे नियम पाळीन, मला कधीच अंतर देऊ नकोस.
जयघोष
जे वचन ऐकून सालस व चांगल्या अंतःकरणात
धरून ठेवतात आणि धीराने फळ दे जातात, ते धन्य होत.
शुभवर्तमान मत्तय ५:४३-४८
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा"
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “आपल्या शेजाऱ्यांवर प्रीती करा व आपल्या वैऱ्यांचा द्वेष करा, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय ? जकातदारही तसेच करतात ना? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता? परराष्ट्रीयही तसे करतात ना? ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: बायबलमधील स्तोत्र ११९ हे सर्वात मोठे स्तोत्र आहे, ज्यामध्ये १७६ वचने आहेत. हे एक अक्रोस्टिक (परिवर्णी काव्य) प्रकारचे स्तोत्र आहे, ज्यामध्ये वचने हिब्रू अक्षरांनी सुरू होतात (२२ हिब्रू अक्षरे X ८ वचने = १७६ वचने). आजचे प्रतिसाद स्तोत्र पहिले हिब्रू अक्षर आलेफपासून सुरू होणाऱ्या पहिल्या आठ वचनांशी संबंधित आहे. पहिल्या स्तोत्राची (स्तोत्र क्र. १) सुरूवात आशीर्वादाने होते. पहिल्या स्तोत्रातील पहिले वचन त्या व्यक्तीला धन्य म्हणते जी दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही. स्तोत्र ११९ मधील पहिले वचन त्या लोकांना धन्य मानते जे परमेश्वराच्या नियम शास्त्राप्रमाणे चालतात. आजच्या शुभवर्तमानात येशू नियम शास्त्राचा खरा अर्थ स्पष्ट करतो, जो शत्रूंवर प्रेम आहे. आज आपण आपल्या शत्रूंवर प्रेम करण्याच्या शिकवणीचे पालन करून आशीर्वाद प्राप्त करू या.
प्रार्थना : हे प्रेमळ बाप्पा, तुझ्या पूर्णतेत आम्ही एकमय व्हावे व तुझी निवडलेली लाडकी प्रजा बनावेत म्हणून आम्हाला तुझ्या कृपेने भर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या