Marathi Bible Reading | Friday 3rd March 2023 | 1st Week of Lent

उपवासकाळातील पहिला सप्ताह 

शुक्रवार दि.३ मार्च   २०२३

✝️ 
 मी तुला सत्य सांगतो. दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही."




संत कैथरीन 
✝️
देवासमोर समर्पण करताना आपले समर्पण निर्दोष असावे ह्यासाठी  परस्परांतील वैमनस्यांमध्ये समेट करणे गरजेचे आहे. शांतीने व सलोख्याने परस्परात क्षमा करणे महत्त्वाचे आहे. आपल्या अंत:करणातील कटुतेची भावना काढून टाकून सर्वांबरोबर प्रेमाने, सौख्याने, शांतीने व समेटाने जीवन जगण्यासाठी आपण निर्णय व निधार करु या. 
✝️

पहिले वाचन यहेज्केल १८:२१-२८
वाचक : यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने आपले मार्ग सोडून देऊन जगावे याने मला संतोष होतो."

प्रभू परमेश्वर म्हणतो, तथापि दुष्टाने आपण केलेल्या सर्व पापांपासून परावृत्त होऊन माझे सर्व नियम पाळले आणि तो नीतीने व धर्माने वागला तर तो खात्रीने वाचेल, मरावयाचा नाही. त्याने केलेले कोणतेही अपराध त्याच्या हिशोबी धरले जाणार नाहीत, त्याने केलेल्या धार्मिकतेमुळे तो वाचेल. प्रभू परमेश्वर म्हणतो, दुष्टाच्या मरणाने मला संतोष होतो काय? त्याने • आपले मार्ग सोडून देऊन जगावे याने मला संतोष होतो ना? तरी पण धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करू लागला, व अधार्मिकाच्या सर्व अमंगळ आचाराप्रमाणे वागू लागला तर तो वाचावा काय? त्याने केलेली सर्व धार्मिकता जमेस धरण्यात येणार नाही. त्याने केलेला भ्रष्टाचार व त्याने केलेले पाप यामुळे तो मरेल. तरी तुम्ही म्हणता, प्रभूचा मार्ग न्याय्य नाही. हे इस्राएल घराण्या, ऐक, माझा मार्ग न्याय्य नाही काय? तुमचेच मार्ग न्याय्य नाहीत, असे नव्हे काय? कोणी धार्मिक आपली धार्मिकता सोडून दुष्कर्म करतो व त्यामुळे मरतो तर तो आपण केलेल्या दुष्कर्मानेच मरतो, दुर्जन आपण केलेल्या दुष्टपणापासून परावृत्त होऊन नीतीने व धार्मिकतेने वागेल तर तो आपला जीव वाचवील. तो आपण केलेली सर्व पापे लक्षात आणून वळेल तर तो खात्रीने वाचेल. मरावयाचा नाही
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १३०:१-८
प्रतिसाद :हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, 
तर तुझ्यापुढे कोण टिकाव धरील ?

१) हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे. 
हे प्रभू, माझी वाणी ऐक. 
माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.

२) हे परमेश्वरा, तू अधर्म लक्षात आणशील, 
तर तुझ्यापुढे कोण टिकाव धरील ?
 तरी पण लोकांनी तुझे भय धरावे 
म्हणून तुझ्याठायी क्षमा आहे.

३) मी परमेश्वराची अपेक्षा करतो,
 माझा जीव अपेक्षा करतो आणि 
मी त्याच्या वचनाची आशा धरतो. 
पहाटेची वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा 
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.

४ )हे इस्राएल, परमेश्वराची आशा धर. 
कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे. 
त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे. 
तो इस्राएलला त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.

जयघोष 
प्रभू म्हणतो, पश्चात्ताप करा, 
कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे


शुभवर्तमान मत्तय ५:२०-२६

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "मी तुम्हांला सांगतो, शास्त्री व परुशी ह्यांच्यापेक्षा तुमचे नीतिमत्व अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.
खून करू नको. जो कोणी खून करील तो न्यायसभेच्या दंडास पात्र होईल, असे प्राचीन लोकांना सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा!' असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल आणि जो कोणी त्याला
‘अरे मूर्खा!' असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. ह्यास्तव तू आपले दान अर्पिण्यास वेदीजवळ आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तेथे तुला स्मरण झाले, तर तेथेच वेदीपुढे आपले दान तसेच ठेव आणि निघून जा; प्रथम आपल्या भावाबरोबर समेट कर, मग येऊन आपले दान अर्पण कर. वाटेवर तुझा वादी तुझ्याबरोबर आहे तोच त्याच्याशी सलोखा कर, नाहीतर वादी तुला न्यायधीशाच्या हाती देईल. न्यायाधीश तुला शिपायांच्या हाती देईल आणि तू तुरुंगात पडशील. मी तुला सत्य सांगतो. दमडीन् दमडी फेडीपर्यंत तू त्याच्यातून सुटणारच नाही."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: स्तोत्र ६, ३२, ३८, ५१, १०२, १३० आणि १४३ ही सात प्रायश्चित्ताची स्तोत्रे मानली जातात. या स्तोत्रांमध्ये, स्तोत्रकर्ता पापांबद्दल दुःख व्यक्त करतो आणि परमेश्वराच्या दयेवर लक्ष केंद्रित करतो, जो मानवी पापांची क्षमा करतो. आजची वाचने क्षमा आणि सलोखा या पैलूंशी संबंधित आहेत. संदेष्टा यहेज्केलचे पहिले वाचन परमेश्वराच्या न्याय आणि दयेच्या निःपक्षपातीपणाबद्दल बोलते. जेव्हा दुष्ट पश्चात्ताप करतात, तेव्हा परमेश्वर त्यांना क्षमा करतो, आणि जेव्हा नीतीमान पाप करतात आणि पश्चात्ताप करत नाहीत तेव्हा त्यांना शिक्षा मिळते (१८:२१- २८). डोंगरावरील प्रवचनातील शुभवर्तमान आपल्या सर्वांना आपल्या बंधू आणि भगिनींशी समेट करण्यास आमंत्रित करते जेणेकरून आपल्याला शिक्षा होऊ नये. परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करण्यास आणि आपल्याला पुन्हा जीवन देण्यास तयार आहे. आपण पश्चात्ताप करण्यास आणि परमेश्वराशी आणि एकमेकांशी समेट करण्यास तयार आहोत का ?

प्रार्थना :हे परमेश्वरा, तू कृपाळू, दयाळू आणि न्यायी आहेस. आमच्याठायी पश्चातापी हृदय निर्माण कर, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या