उपवासकाळातील पहिला सप्ताह
गुरुवार दि.२ मार्च २०२३
✝️
तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल.
✝️
प्रभूचा सुवर्ण नियम आहे की, 'लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.' आपण हा सुवर्ण नियम अमलात आणणे महत्वाचे आहे. आपण देवासमोर अनेक मागण्या मांडत असताना देवाची आपल्या जीवनातीलइच्छा जाणण्याचा प्रयत्न करायला हवा.
प्रभू आपणास सर्व काही देण्यास तयार आहे, त्यासाठी आपण आपली भौतिक नव्हे तर आध्यात्मिक प्रगती साधण्याचा प्रयत्न करु या. दया, क्षमा, समेट, बंधुप्रेम व सेवा करण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन एस्तेर १४:१,३-५, १२-१४
वाचक : एस्तेर या पुस्तकातून घेतलेले वाचन
"हे प्रभो, तुझ्याविना मला दुसरा कुठलाच आधार नाही."
एस्तेर राणीने मृत्यूच्या भयाने प्रभूचा आसरा घेतला आणि इस्राएलचा देव प्रभू परमेश्वर याच्याकडे प्रार्थना केली; ती म्हणाली, "हे माझ्या प्रभू परमेश्वरा, तूच आमचा राजा आहेस. एकाकी असलेल्या मला मदत कर. तुझ्याविना मला दुसरा कुठलाच आधार नाही. माझे जीवन तळहातावर ठेवून मी जगत आहे. हे प्रभो, मला माझ्या बालपणापासूनच माझ्या जातबांधवांपासून हे शिक्षण मिळाले आहे. सर्व राष्ट्रांमध्ये इस्राएलला त्याच्या सर्व पूर्वजांमधून माझ्या वाडवडिलांना आपल्या सार्वकालिक प्रजेच्या रूपाने आपले वारस केले आहे. त्यांच्याबरोबर जो करार केला होता तो तू पूर्ण करीत आला आहेस."
हे प्रभो, आमची आठवण ठेव. संकटकाळी आमच्यावर दयादृष्टी ठेव. सर्वोच्च आणि सर्वाधिकारसंपन्न ईश्वरा, मला धैर्य प्रदान कर. मी सिंहाच्या सामोरा जात आहे. माझ्या मुखात योग्य शब्द ठेव आणि त्याच्या हृदयात आमच्या शत्रूविषयी द्वेष उत्पन्न कर की, ज्यामुळे आमचा शत्रू आपल्या समर्थकांच्या बरोबर नष्ट होईल.
हे प्रभो, आपल्या हाताने आमचे संरक्षण कर आणि मला सहायता दे. हे प्रभू, तू सर्व काही जाणून आहेस. तुझ्याशिवाय मला दुसरा आधार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३८:१-३,७-८
प्रतिसाद : प्रभो, मी तुझा धावा केला, तो तू ऐकलास.
१ )हे प्रभो, मी अंतःकरणाने तुझे आभार मानीत आहे.
कारण माझा धावा तू ऐकला आहेस.
देवदूतांसमोर मी तुझी स्तुती गाईन.
तुझ्या पवित्र मंदिरात मी तुझा सन्मान करीन.
२) तुझे अपुर्व प्रेम आणि सत्यप्रतिज्ञतेमुळे
मी तुला धन्यवाद देत आहे.
ज्या दिवशी मी तुझा धावा केला,
त्याच दिवशी तू तो ऐकलास व
मला आत्मबळ प्रदान केलेस.
३) आपला हात पुढे करून तू मला वाचवलेस.
तुझा हात माझे रक्षण करीत असतो.
हे प्रभो, तुझे प्रेम अनंतकाळ आहे..
आपल्या सृष्टीचे रक्षण करण्याची कृपा कर.
जयघोष
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे,
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
शुभवर्तमान मत्तय ७:७-१२
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जो कोणी मागतो त्याला मिळते."
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "मागा म्हणजे तुम्हांला दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हांला सापडेल, ठोका म्हणजे तुमच्याठायी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्याला मिळते. जो शोधतो त्याला सापडते व जो ठोकतो त्याच्यासाठी उघडले जाते. आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल आणि मासा मागितला तर त्याला साप देईल, असा तुमच्यात कोण माणूस आहे? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हांला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून चांगल्या देणग्या देईल.
ह्या करिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ हेच होत.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजची वाचने आपल्याला शिकवतात की परमेश्वर कसा प्रेमळ आणि दयाळू पिता आहे आणि तो आपल्या गरजू मुलांची कळकळीची विनंती कशी ऐकतो. पहिल्या वाचनात राणी एस्तेर गंभीर संकटात सापडलेल्या इस्राएली लोकांच्या वतीने उत्कट प्रार्थना करते. आजचे स्तोत्र पहिल्या वाचनाला सकारात्मक प्रतिसाद देते आणि म्हणते, “मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला, तू मला हिम्मत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले” (स्तोत्र १३८:३). शुभवर्तमानात येशू आपल्याला देव पित्याच्या चांगुलपणावर आणि दयेवर विश्वास ठेवून त्याच्याकडे मागण्यास आमंत्रित करतो. परमेश्वर आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपले शुभचं चिंतितो. काहीवेळा आपण त्याच्याकडे जे मागतो ते तो आपल्याला देऊ शकत नाही, परंतु स्तोत्रात सांगितल्याप्रमाणे तो आपल्या आत्म्याचे सामर्थ्य नक्कीच वाढवतो.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, यथाकाली आम्हास तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व योग्य ते वरदान मागल्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या