उपवासकाळातील पहिला सप्ताह
बुधवार दि.१ मार्च २०२३
✝️
कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."
✝️
ख्रिस्तसभेने दिलेल्या संधीचा आपण येग्य तो उपयोग करुन घेऊ या. प्रायश्चित्त संस्कार घेऊन आपल्या आध्यात्मिक जीवनाचे नुतनीकरण करण्याची हीच चांगली वेळ आहे. सकारत्मकतेने देवाच्या वाणीकडे लक्ष देऊ या आणि आपले जीवन परमेश्वराच्या दयेने, प्रेमाने व कृपेने बहरावे म्हणून सन्मार्गावर चालण्यासाठी प्रेरणा मागू या.
✝️
पहिले वाचन योना ३ :१-१०
वाचक : योना या पुस्तकातून घेतलेले वाचन
“निनवेच्या लोकांनी आपले दुराचरण सोडले"
योनाला दुसऱ्यांदा प्रभूचा आदेश आला. तो म्हणाला, "ऊठ, त्या मोठ्या निनवे शहरात जा आणि मी देतो तो संदेश तू तेथे जाहीर कर." योना उठला आणि प्रभूच्या आज्ञेनुसार निनवेला गेला. निनवे तर फार मोठे शहर होते. ते सगळे फिरून येण्यास तीन दिवस लागत. योनाने शहरातून जाण्यास सुरुवात केली आणि एक दिवसाच्या वाटचालीनंतर दवंडी पिटवून तो म्हणाला, “फक्त चाळीस दिवस, मग निनवे जमीनदोस्त होईल!” तेव्हा निनवेच्या लोकांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी सार्वजनिक उपवास जाहीर केला आणि श्रेष्ठांपासून तर कनिष्ठांपर्यंत सर्वजण पश्चात्तापदर्शक गोणपाट नेसले. निनवेच्या राजाला ही खबर पोहचली तेव्हा तो आपल्या सिंहासनावरून उठला आणि त्याने आपल्या अंगावरील राजवस्त्र काढून टाकले व पश्चात्ताप दाखविण्यासाठी गोणपाट नेसून तो राखेत बसला. मग त्याने फर्मान काढून निनवेभर जाहीर केले ते असे, “हा राजाचा व त्याच्या श्रेष्ठींचा हुकूम आहे. कोणीही मनुष्याने, पशूने, गुराढोराने तसे शेरडामेंढराने काहीही चाखू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. माणसे व पशू ह्यांनी गोणपाटे पांघरावी आणि कळकळीने देवाला आळवावे.. प्रत्येकाने आपले दुराचरण सोडावे व हिंसाचारापासून आपले हात आवरावे. कोण जाणे कदाचित देव अनुताप पावेल व आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. " त्यांनी आपले दुराचरण सोडले. ही त्यांची कृती देवाने पाहिली. तेव्हा त्याने अरिष्ट त्यांच्यावर आणीन असे सांगितले होते त्यापासून तो अनुताप पावला आणि ते त्याने त्यांच्यावर आणले नाही.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५१:१-२,१०-११,१६-१७
प्रतिसाद : हे देवा, नम्र व पश्चात्तापी अंतःकरण तू झिडकारणार नाहीस.
१) हे देवा, तुझ्या प्रेमाखातर माझ्यावर दया कर.
तुझ्या महान दयेला अनुसरून माझ्या
अपराधाचे कलंक पुसून टाक.
मला धुवून माझा दोष पूर्णपणे दूर कर.
माझ्या पापांपासून मला शुद्ध कर.
२ )देवा, माझ्याठायी शुद्ध अंतःकरण
निर्माण कर मला एक नवीन निष्ठावंत आत्मा दे.
तुझ्या समोरून मला टाकून देऊ नकोस.
माझ्यापासून तुझा पवित्र आत्मा काढून घेऊ नकोस.
३) यज्ञ केल्याने तू प्रसन्न होत नाहीस.
'तू' नाहीतर तो मी केला असता.
होमार्पणांचीदेखील तुला आवड नाही.
देवा, तुला शरण आलेला हा आत्मा
हाच माझा यज्ञ होय. नम्र व पश्चात्तापी अंतःकरण
तू झिडकारणार नाहीस.
जयघोष
तुम्ही वाचावे म्हणून चांगल्याच्या मागे लागा,
वाइटाच्या मागे लागू नका;
म्हणजे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे
परमेश्वर, सेनाधीश देव, तुम्हांबरोबर असेल
शुभवर्तमान लूक ११:२९-३२
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“योनाच्या चिन्हाशिवाय ह्या पिढीला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही."
लोकसमुदाय येशूजवळ एकत्र जमत असता तो म्हणू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ही चिन्ह मागते. परंतु योनाच्या चिन्हाशिवाय हिला दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. कारण जसा योना निनवेकरांना चिन्ह झाला तसा मनुष्याचा पुत्र ह्या पिढीला होईल. दक्षिणेकडची राणी न्यायकाळी ह्या पिढीच्या लोकांबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील. कारण शलमोनचे ज्ञान ऐकावयास ती पृथ्वीच्या सीमेपासून आली आणि पाहा, शलमोनपेक्षा थोर असा एक येथे आहे. निनवेचे लोक न्यायकाळी ह्या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील; कारण त्यांनी योनाच्या उपदेशावरून पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षा थोर असा एक येथे आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजची दोन्ही वाचने पश्चात्तापावर केंद्रित आहेत. पश्चात्तापासाठी ग्रीक शब्द "मेटोनोइया" आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ आहे हृदय परिवर्तन, हृदय परिवर्तनाने विचार बदलतात, विचार बदलल्याने कृतीत बदल होतात व शेवटी एखाद्याच्या संपूर्ण आयुष्यात बदल होतो. पश्चात्ताप करा आणि परमेश्वराकडे परत या हा जुन्या करारातील संदेष्ट्यांचा मुख्य संदेश होता, जो आजच्या पहिल्या वाचनात योनाच्या उपदेशात उमटत आहे. येशू देखील पश्चात्तापाच्या संदेशाला त्याच्या प्रवचनाचा महत्वाचा पैलू मानतो. उपवासकाळ हा हृदय परिवर्तनाचा काळ. आपले विचार बदलण्यासाठी व आपले लक्ष संसारिक गोष्टींकडून परमेश्वर आणि इतर गरजू व्यक्तींकडे वळवण्याचा एक कृपापूर्ण काळ आहे. आपण येशूचे हे आमंत्रण स्वीकारून पश्चात्ताप करण्यास व सुवार्तेवर विश्वास ठेवण्यास तयार आहोत का ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, योना आणि शलमोना पेक्षा थोर असा तू परमेश्वर देवपुत्र आहेस. तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास आमचे अतः करण उघड व प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या