उपवासकाळातील पहिला सप्ताह
मंगळवार दि.२८ फेब्रुवारी २०२३
✝️
जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील.
✝️
इ. स. ४४९ साली तुर्कस्थानातील एफसस ह्या ठिकाणी गुप्तपणे भरलेल्या
धर्मपरिषदेत पोपमहाशयांचे प्रतिनिधी म्हणून संत हिलेरियस ह्यांनी पोपमहाशयांवरील दोषारोपांचे खंडण केले व पोप महाशयांचा अधिकार पुनर्प्रस्थापित केला. मात्र आलेक्झांड्रियाचे डायसकुरस ह्यांनी त्या धर्मपरिषदेवर आपलेच वर्चस्व गाजविले व हिलेरियस ह्यांना धमकी दिली. त्यामुळे आपले प्राण वाचविण्यासाठी संत हिलेरियस ह्यांना त्या परिषदेतून पळ काढावा लागला.
संत लिओ महान ह्या पोपमहाशयांच्या कारकिर्दीनंतर इ. स. ४६१ साली संत हिलेरियस ह्यांची पोपपदी निवड झाली. गॉल आणि स्पेन येथील ख्रिस्तसभेमध्ये शिस्तीचे वातावरण निर्माण करण्यात व प्रशासन व्यवस्था सुरळीत करण्यात संत हिलेरियस ह्यांनी मोलाची कामगिरी बजावली. आपल्या कार्डिनलच्या वा आर्चबिशपांच्या परवानगीविना कोणत्याही बिशपांनी आपल्या धर्मप्रांताबाहेर जाऊ नये असा आदेश त्यांनी काढला. तसेच त्यांनी स्वत:हून आपले उत्तराधिकारी नेमू नयेत किंवा आपापसात बिशपांनी धर्मप्रांतात आपापल्या बदल्या करून घेऊ नयेत. इ. स. ४६५ साली रोम येथे झालेल्या परिषदेतील हे निर्णय आजवरही • अंमलात आणले जात आहेत.
ख्रिस्ती माणसाची प्रार्थना कशी असावी ह्याचे ही प्रार्थना सुंदर उदाहरण आहे. ह्या प्रार्थनेत प्रथम आपल्याला संपूर्णपणे देवावर विश्वास ठेवण्यास प्रेरणा मिळते. आपले देवावरचे आणि बंधु-भगिनींबरोबरचे संबंध दृढकरण्याबरोबरच आपण सर्वजण देवाची मुले आहोत ह्याची जाणीव ह्या प्रार्थनेत होते. जीवनात देवाच्या इच्छेला आपण प्राधान्य द्यावे आणि सर्वस्वी देवावरच अवलंबून राहून त्याची सहभागिता अनुभवावी म्हणून चिंतनपूर्वक व मननपूर्वक ही प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन यशया ५५:१०-११
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"माझा शब्द माझ्या इच्छा पूर्ण करील."
प्रभू म्हणतो, “पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्याला बीज, खाणाऱ्याला भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत. त्याचप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल, ते माझी इच्छा पूर्ण केल्यावाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठवले ते केल्यावाचून माझ्याकडे विफल होऊन परत येणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३४:४-७,,१६-१९
प्रतिसाद : सात्त्विकांचा धावा प्रभू ऐकतो.
१) माझ्याबरोबर प्रभूची थोरवी गा.
त्याच्या नामाचा महिमा आपण एकमुखाने गाऊ या.
मी प्रभूला शरण गेलो.
त्याने माझे ऐकले.
त्याने माझी सगळी भीती घालविली.
२) त्याच्याकडे पाहणाऱ्यांची मुद्रा तेजस्वी होते.
त्यांचा चेहरा निराशेने पडणार नाही.
मी पामराने धावा केला, प्रभूने तो ऐकला
आणि माझी संकटे हरण केली.
३) वाईट करणारांची आठवणदेखील
पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून
प्रभू त्यांना विमुख होतो.
प्रभूची दृष्टी सात्त्विकांकडे लागलेली असते.
त्यांची हाक ऐकायला त्याचे कान उघडे असतात.
४) सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो.
तो सर्व संकटांतून त्यांना सोडवतो.
ज्यांची कंबर खचली आहे अशांच्या जवळ प्रभू असतो.
ज्यांचे अवसान गळाले आहे अशांचा तो उद्धार करतो.
जयघोष
प्रभू म्हणतो, "आता तरी मनःपूर्वक माझ्याकडे वळा कारण मी कृपाळू, कनवाळू, मंदक्रोध, दयासागर आहे."
शुभवर्तमान मत्तय ६:७-१५
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“ह्यास्तव तुम्ही ह्याप्रकारे प्रार्थना करा."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका, आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता, तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे.
ह्यास्तव तुम्ही ह्या प्रकारे प्रार्थना करा :
हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हांला दे. आणि जसे आम्ही आमच्या देणेकऱ्यांना देणे सोडले आहे तसे तू आमची देणी आम्हांला सोड. आमची तू परीक्षा पाहू नको आणि आम्हांला वाईटापासून सोडव.
कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील. परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्या शिष्यांना प्रार्थना कशी करावी हे शिकवतो. तो त्यांना प्रार्थना शिकवतो जी “आमचा पिता" म्हणून प्रसिद्ध आहे. येशूने या प्रार्थनेत केलेल्या सात विनंत्यांपैकी काही विनंत्या मानवी श्रद्धेसाठी आवश्यक आहेत असे आपल्याला आढळून येते. आपण आपल्या रोजच्या भाकरीसाठी प्रार्थना करतो त्याचप्रमाणे. आम्ही इतरांना क्षमा करण्यास सक्षम होण्यासाठी क्षमा आणि कृपेसाठी प्रार्थना करतो. आम्ही सर्वप्रकारच्या मोहांपासून आणि वाईटांपासून आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी देवाला प्रार्थना करतो. या अशा विनंत्या आहेत त्या आपल्या आध्यात्मिक जीवनाचे पोषण करतात आणि आपल्याला वाढण्यास सक्षम करतात. पहिल्या वाचनात आपल्याला असे आढळते की, देवाचे वचन हे आपल्याला खरोखर फळ देण्यास सक्षम करते. देवाचे वचन हे स्वर्गातून पडणाऱ्या पावसासारखे आहे जे जमिनीला सुपिक बनवते आणि पृथ्वीला फळ देण्यास सक्षम करते. आपण आपल्या जीवनाचे दार उघडले पाहिजे आणि आपल्या जीवनात देवाचे वचन स्वीकारले पाहिजे जेणेकरून त्याच्या शक्तीने ते आपल्या जीवनात फळ देण्यास सक्षम असेल. देवाच्या वचनात आपल्यामध्ये फळ देण्याचे सामर्थ्य आहे. तथापि, जेव्हा आपण देवाच्या वचनाला आणि आपल्या जीवनात त्याच्या सामर्थ्याचा स्वीकार करतो तेव्हाच आपण आपल्या जीवनात देवाच्या शब्दाची शक्ती खरोखर अनुभवू शकू.
प्रार्थना : हे परमेश्वर बापा, तुझ्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्यास व तुझ्या राज्याचे सहभागीदार बनण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या