Marathi Bible Reading | 1st Week of Lent Monday 27th February 2023

उपवासकाळातील पहिला सप्ताह 

 सोमवार दि.२७ फेब्रुवारी  २०२३

✝️ 

कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले. परका होतो तेव्हा मला घरात घेतले.


दुःखी मातेचा संत गाब्रियल

- वर्तनसाक्षी (१८३८-१८६२)

✝️

इटलीतील असिसी ह्या संतमहंतांच्या भूमीत फ्रान्सिस पोसेंती ह्याचा जन्म झाला. त्याचे वडील स्पोलेटो येथे सर्वोच्च कार्यालयात न्यायाधीश होते. परंतु ते अत्यंत धार्मिक व श्रद्धाळू वृत्तीचे होते. दररोज ते मिस्साआधी एक तास प्रार्थना व धार्मिक वाचन यामध्ये घालवित असत. तसेच संध्याकाळी अतिपवित्र साक्रामेंतातील येशूला न चुकता न विसरता भेट देत असत.
ख्रिस्ताचे व संतांचे जीवन ह्याविषयी ते आपल्या मुलांना सदैव गोष्टीरुपाने माहिती सांगत. फ्रान्सिस चांगल्या मार्गाला लागावा म्हणून त्याच्या वडिलांनी एका धर्मगुरूंच्या मार्गदर्शनाखाली त्याला प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली. त्याचा अपेक्षित परिणाम फ्रान्सिसवर झाला व फ्रान्सिस सदाचारी बनला.
नाटके, चित्रपट, संगीत आणि क्लब अशा सामाजिक वातावरणात फ्रान्सिसने आपल्या प्रार्थनामय जीवनाकडे व पवित्र मरियेविषयी असलेल्या त्याच्या उत्कट भक्तीकडे मात्र किंचितही दुर्लक्ष केले नाही. आवश्यक ते संस्कार वेळेवर व नियमितपणे (प्रायश्चित्त, ख्रिस्तशरीर इ.) तो घेत असे.
अशा प्रकारे एकीकडे या जगातील सुखासीनता व दुसरीकडे परमेश्वरावरील भक्ती अशा द्विधा मनस्थितीत सापडलेला असताना फ्रान्सिस दोन वेळा गंभीर आजारांना बळी पडला. मात्र प्रत्येक वेळी त्याने पवित्र मरियेला वचन दिले की 'जर माझ्यात शारीरिक सुधारणा झाली तर मी आयुष्यभर तुझी भक्ती व सेवा करीन.' परंतु आजारातून बरा झाल्यानंतर त्याला त्या वचनांचा विसर पडे.
इ. स. १८५६ साली मात्र स्पोलेटो येथे कॉलराची साथ सुरू झाली. त्या परिस्थितीत लोकांनी पवित्र मरियेचा धावा सुरू केला. इ. स. १११५ साली बार्बारोसा ह्या सम्राटाने स्पोलेटोला दिलेली पवित्र मरियेची इमाज मिरवणुकीने रस्तोरस्ती फिरविली. तसे वचन लोकांनी पवित्र मरियेला दिले. ताबडतोब कॉलराची साथ बंद झाली.
प्रत्यक्ष मिरवणुकीच्या वेळी एक चमत्कार घडला. पवित्र मरियेची इमाज आपणासमोरून जात असताना फ्रान्सिसने धुळीत गुडघे टेकले. त्यावेळी त्याची नजर पवित्र मरियेच्या डोळ्यांवर खिळली गेली. ती प्रेमळ नजर आपल्याला घायाळ करते की काय असा फ्रान्सिसला भास झाला. पवित्र मरियेचे ओठ विलग झाल्याचे व त्यांतून पुढील शब्द बाहेर पडल्याचे त्याने ऐकले. 'फ्रान्सिस, ह्या जगाच्या क्षणिक सुखासीनतेमध्ये का अडकतोस? ऊठ, त्वरा कर आणि धार्मिक जीवन जगायला सुरूवात कर.'
आता मात्र उशीर व्हायला नको अशी फ्रान्सिसची खात्री पटली. तो पॅशनिस्ट संस्थेत दाखल झाला. तेथे त्याने दुःखी मातेचा गाब्रियल हे नाव धारण केले. तिथे असताना संस्थेच्या आचारसंहितेतील बारीक सारीक नियम काटेकोरपणे पाळण्यात तो दक्ष होता. देवाने त्याला तीक्ष्ण अशी स्मरणशक्ती आणि अध्यात्म ह्यांची देणगी दिली होती. प्रभूच्या दुःखसहनाशी तो कित्येकवेळा एकरूप होत असे. अतिपवित्र साक्रामेंतातील येशूशी तो तासन्तास सुसंवाद घालत असे आणि पवित्र मरियेचे दुःख तो आपल्या हृदयाशी कवटाळण्याचा प्रयत्न करीत असे.
अशा रितीने त्याच्या गुरूदीक्षेची तयारी सुरू होती. प्रत्यक्षात जेव्हा गुरूदीक्षेची वेळ येऊन ठेपली तेव्हा राजकीय आणि धर्मगुरूविरोधी कारवायांमुळे गाब्रियल आपल्या महागुरूंपर्यंत पोहोचू शकला नाही. पॅशनिस्ट म्हणून तो जीवन जगत असतानाच वयाच्या २४ व्या वर्षी मृत्यूने त्याला अकस्मात गाठले व २७ फेब्रुवारी १८६२ रोजी तो मरण पावला.
त्यांच्या मृत्यूनंतर चमत्कारांना व परिवर्तनांना ऊत आला. त्यामुळे त्याच्या संतीकरणाची प्रक्रिया नेहमीपेक्षा लवकर सुरू करण्यात आली व त्याच्या वृद्ध भावाच्या उपस्थितीत १९२० साली त्याला संत म्हणून घोषित करण्यात आले.
संत गाब्रियल हा आजच्या युवकांचा मुख्य आश्रयदाता संत आहे आणि व्रतस्थ जीवन सुरू करणाऱ्या नवशिष्यांचा तो आदर्श आहे.
चिंतन : माझ्या हृदयातील एखादा हेतू जरी देवाच्या प्रेमाखातर ठोका देत नसेल तर तो उपटून फेकून देण्यास मी तयार आहे.” --- दुःखी मातेचा संत गाब्रिएल 
✝️

पहिले वाचन लेवीय १९:१-२,११-१८
वाचक : लेवीय या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“आपल्या शेजाऱ्याचा न्याय निःस्पृहपणे कर." 

परमेश्वर मोशेला म्हणाला, “इस्राएलच्या सर्व मंडळींस सांग की, तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्वर तुमचा देव पवित्र आहे. तुम्ही चोरी करू नये, एकमेकांशी कपटाने वागू नये व लबाडी करू नये. माझ्या नावाची शपथ वाहून आपल्या देवाच्या नावाला कलंक लावू नये, मी परमेश्वर आहे.
आपल्या शेजाऱ्यांवर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको, मजुराची मजुरी रात्रीचा दिवस उजाडेपर्यंत आपल्याजवळ ठेवू नको.
बहिऱ्याला शिव्याशाप देऊ नको, ठोकर लागेल अशी वस्तू आंधळ्यापुढे ठेवू नको. तू आपल्या देवाचे भय बाळग. मी परमेश्वर आहे.
न्यायनिवाडा करताना अन्याय करू नको. गरिवाकडे तुच्छतेने पाहू नको आणि सामर्थ्यापुढे नमू नको, आपल्या शेजाऱ्याचा न्याय निःस्पृहपणे कर. आपल्या लोकांमध्ये चहाड्या करीत इकडे तिकडे फिरू नको. आपल्या शेजाऱ्याच्या जिवावर उठू नको, मी परमेश्वर आहे.
आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगू नको. आपल्या शेजाऱ्याची अवश्य कानउघाडणी कर, नाही तर त्याच्यामुळे तुला पाप लागेल. सूड उगवू नको किंवा आपल्या भाऊबंदापैकी कोणाचा दावा धरू नको, तर आपल्या शेजाऱ्यांवर स्वतःसारखी प्रीती कर. मी परमेश्वर आहे.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १९:८-१०,१५
प्रतिसाद :  प्रभो, तुझी वचने आम्हाला आत्मा व जीवन आहेत.
१) प्रभूचे नियम योग्य आहेत. 
ते हृदयाला आनंदित करतात. 
प्रभूची आज्ञा सुस्पष्ट असते. 
तिच्यामुळे ज्ञानचक्षू तेजस्वी होतात.

२) प्रभूप्रणित धर्म विशुद्ध असतो. 
तो कायम टिकणारा असतो. 
प्रभूचे आदेश यथान्याय असतात.
 ते संपूर्णत: सरळ असतात.

३) प्रभूची वाणी परिशुद्ध आहे. 
ती अनंतकाळपर्यंत तयार असते. 
प्रभूचे निर्णय खरे आहेत. 
ते सर्वच्या सर्व न्याय्य आहेत.

४) प्रभो, तू माझा आधार आणि मुक्तिदाता आहेस, 
माझ्या मुखातून जे शब्द निघतात 
आणि माझ्या मनात जे विचार उठतात, 
ते सर्वच्या सर्व तुला आवडोत.


जयघोष 

प्रभू परमेश्वर म्हणतो माझ्या जीविताची शपथ, 
कोणी दुर्जन मरावा यात मला काही संतोष नाही, 
तर त्याने आपल्या मार्गावरून मागे फिरून जगावे, 
यात मला संतोष आहे

शुभवर्तमान  मत्तय  २५:३१-४६

वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“ज्याअर्थी तुम्ही ह्या कनिष्ठ बंधूंपैकी एकासाठी केले त्या अर्थी ते माझ्यासाठी केले आहे." 

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले,"जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादितहो, या, जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हांकरिता सिद्ध केले आहे, ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले. परका होतो तेव्हा मला घरात घेतले. उघडा होतो तेव्हा तुम्ही वस्त्र दिले. आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला. बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील, “प्रभूजी,आम्ही तुम्हांला केव्हा भुकेले पाहून खायला दिले ? केव्हा तान्हेला पाहून प्यायला दिले? तुम्हांला परके पाहून केव्हा घरात घेतले ? उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले? आणि तुम्हांला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो? तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, “मी तुम्हांला सत्य सांगतो ज्याअर्थी तुम्ही कनिष्ठ बंधूपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. मग डावीकडच्यानाही तो म्हणेल, अहो, शापग्रस्तहो माझ्यापुढून निघा. सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यासाठी जो सार्वकालिक अग्नी सिद्ध केला आहे त्यात जा. कारण भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले नाही. तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले नाही परका होतो तेव्हा मला घरात घेतले नाही. उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले नाही आजारी व बंदिशाळेत होतो तेव्हा माझ्या भेटीला आला नाही. त्यावेळेस हेही त्याला उत्तर देतील, प्रभुजी, आम्ही केव्हा तुम्हांला भुकेले, तान्हेले, परके, उघडे, आजारी किंवा बंदिशाळेत पाहिले आणि तुमची सेवा केली नाही? तेव्हा तो त्यांना उत्तर देईल, मी तुम्हांला सत्य सांगतो की, ज्याअर्थी ह्या कनिष्ठांपैकी एकालाही केले नाही, त्याअर्थी ते मला केले नाही. ते तर सार्वकालिक शिक्षा भोगायला जातील आणि नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगायला जातील."

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: प्रायश्चित्त काळात आम्हाला पश्चात्ताप करण्यासाठी आणि वाईट मार्गांपासून दूर जाण्यासाठी आमंत्रित केले आहे. पहिल्या वाचनात देवाने आपल्याला तो पवित्र असल्याप्रमाणे पवित्र होण्यास सांगितले आहे. देव आपल्याला दहा आज्ञा देतो आणि त्यांचे पालन करण्यास सांगतो जेणेकरून आपण पवित्र जीवन जगू शकू. शुभवर्तमानामध्ये आपल्याला समजते की, येशू दहा आज्ञांचे पालन करावयास सांगतो आणि प्रत्येकाला दयाळू होण्यास प्रोत्साहित करतो. येशू गोष्टींद्वारे आपल्याला सांगतो की जेव्हा आपण आपल्या शेजाऱ्यांप्रती आपली जबाबदारी पाळण्यात अपयशी ठरतो तेव्हा आपण खूप गंभीर पाप करतो. येशू आपल्याला सांगतो की, भुकेल्यांना अन्न देणे, नग्नांना कपडे घालणे गरजवंतांना मदत करणे याद्वारे आपण पश्चात्ताप करू शकतो. उपवास काळात आम्हाला प्रार्थना, उपवास आणि दानधर्म देण्यास प्रोत्साहीत केले जाते. अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य यासारख्या मूलभूत गरजांपासून वंचित राहिलेल्या लोकांप्रती अधिक दयाळू होण्यासाठी उपवासकाळ आपल्याला मदत करतो हे महत्त्वाचे आहे. देवाच्या या गरीब मुलांची सेवा करण्यातच आपण येशूची सेवा करतो. “करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी. "

प्रार्थना :  हे प्रभू येशू, सर्व गरजवंतांमध्ये तुला निरखून पाहण्यास व तुझ्या
सेवेचा अनुभव घेण्यास प्रेरणा व कृपा दे, आमेन

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या