उपवासकाळातील पहिला रविवार
दि.२६ फेब्रुवारी २०२३
✝️
“परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.”
✝️
चाळीस दिवस उपास करुन क्षीण झालेल्या येशूला सैतान मोहात पाडण्याचा प्रयत्न करतो. देवपित्याची आज्ञा प्रमाण मानून व संपूर्ण देवपित्यावर भिस्त ठेवून येशू सैतानाचे वार परतवून लावतो.
शुभवर्तमानात तीन प्रकारचे मोह आहेत.
पहिला मोह म्हणजे आध्यात्मिक शक्तिचा वापर करुन शारीरिक भूक भागविण्यासाठी दगडाची भाकर बनविण्यासाठी होतो.
दुसरा मोह आपल्याला प्राप्त देवाच्या कृपाशक्तीद्वारे जगावेगळे साहस करण्यासाठी प्रभूला सांगण्यात येते की मंदिराच्या शिरोभागातून त्याने उडी टाकावी म्हणजे देव त्याला वाचविल, परंतु देवाची परीक्षा पाहणे गैर आहे. जीवनात अद्भूत कृत्ये घडतच असतात. देवाला सर्वकाही शक्य आहे.
तिसरा मोह देवालाच नाकारण्याचा आहे, मात्र प्रभू येशू देवाचेच सार्वभौमत्व स्वीकारुन सैतानाला शह देतो.
आपल्याही जीवनात अशा अनेक मोह येत असतात. सैतान आपली परीक्षा पाहण्यासाठी टपून बसलेला असतो. अशा प्रसंगी आपण संपूर्णपणे परमेश्वरावर विश्वास ठेवावा. परमेश्वरासमोर नतमस्तक बनून येशूच्या नावाने सैतानाला घालवून लावावे. त्यासाठी आपण आज प्रार्थना करु या.
✝️
पहिले वाचन उत्पत्ती २:९,३: -१-७
वाचक : उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आमच्या पहिल्या आईवडिलांची उत्पत्ती आणि पाप. "
परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात प्राणवायू फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि त्यामध्ये आपण घडवलेला मनुष्य ठेवला. परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व स्वादिष्ट फळे देणारी अशी सर्व जातीची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनवृक्ष आणि बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष ही जमिनीतून उगवविली.
परमेश्वर देवाने उत्पन्न केलेल्या सर्व वनचरांमध्ये सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये, असे देवाने तुम्हांला सांगितले हे खरे काय?" स्त्रीने सर्पाला म्हटले, "बागेतल्या झाडांचे फळे खाण्याची आम्हांला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की, ते खाऊ नका. त्याला स्पर्शही करू नका. कराल तर मराल." सर्प स्त्रीला म्हणाला, "तुम्ही खरोखर मरणार नाही, देवाला हे ठाऊक आहे की, तुम्ही त्या झाडाचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्हांला बरेवाईट कळू लागून तुम्ही देवासमान व्हाल." त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यात मनोहर आणि शहाणपणाच्या प्राप्तीस इष्ट आहे असे स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपणाबरोबर आपल्या पतीसह ते दिले. त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यांना कळून आले. तेव्हा त्यांनी अजिरांची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केली.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५१:३-४, ६,१८-१९
प्रतिसाद : प्रभो, आम्हांवर दया कर. कारण आम्ही पाप केले आहे.
१) हे देवा, तू आपल्या वात्सल्याला
अनुसरून माझ्यावर दया कर.
तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून
माझे अपराध पुसून टाक.
मला धुवून माझा दोष अगदी काढून टाक.
माझे पाप दूर करून मला स्वच्छ कर.
२) कारण मी माझे अपराध जाणून आहे.
माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे.
तुझ्याविरुद्ध, तुझ्याविरुद्धच मी पाप केले आहे.
तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे.
३) हे देवा, माझ्याठायी शुद्ध हृदय उत्पन्न कर.
माझ्या ठायी स्थिर असा आत्मा पुन्हा घाल.
तू मला आपणापुढून घालवून देऊ नकोस
आणि आपला पवित्र आत्मा माझ्यामधून घेऊ नकोस.
४)तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा दे
आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर.
हे प्रभो, माझे ओठ उघड म्हणजे माझे मुख तुझी कीर्ती वर्णील.
दुसरे वाचन रोम ५:१२-१९
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
"पापाच्या संख्येपेक्षा कृपा अधिक होती."
(एका माणसाच्याद्वारे पाप जगात शिरले आणि पापाद्वारे मरण शिरले आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले.) नियमशास्त्रापूर्वी पाप जगात होतेच. पण नियमशास्त्र नसले म्हणजे पाप गणण्यात येत नाही, तथापि, आदामपासून मोशेपर्यंत मरणाने राज्य केले. ज्यांनी आदामच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही, त्याच्यावरही त्याने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे प्रतिरूप आहे.
परंतु जशी अपराधाची तशी कृपादानाची गोष्ट नाही. कारण ह्या एका मनुष्याच्या अपराधाने पुष्कळ माणसे मरण पावली तर देवाची कृपा आणि एक मानव येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेचे दान ही पुष्कळजणांकरिता विशेष करून विपुल झाली आणि पाप केलेल्या एकाच मनुष्याद्वारे जसा परिणाम झाला तसा कृपादानाचा होत नाही. कारण ज्याचा परिणाम दंडाज्ञा तो त्या एकाच मनुष्यापासून झाला. पण ज्याचा परिणाम नीतिमान ठरणे ते कृपादान पुष्कळ अपराधांपासून झाले. (जर त्या एकाच इसमाच्याद्वारे त्या एकाच इसमाच्या अपराधाने राज्य चालू झाले तर जे कृपेचे व नीतिमत्त्वाचे दान ह्याची विपुलता स्वीकारतात, ते विशेषकरून त्या एकाच येशू ख्रिस्ताद्वारे जीवनात राज्य करतील. तर मग जसे एकाच अपराधामुळे सर्व माणसांना दंडाज्ञा होते, तसे नीतिमत्वाच्या एकाच निर्णयाने सर्व माणसांना जीवनदायी नीतिमत्व प्राप्त होते. जसे त्या एकाच मनुष्याच्या आज्ञाभंगाने पुष्कळजण पापी ठरले होते तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळजण नीतिमान ठरतील.)
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगत असतो.
शुभवर्तमान मत्तय ४:१-११
वाचक : मत्तय लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशू चाळीस दिवस उपवास करतो आणि मग त्याला मोह होतात. "
सैतानाकडून येशूची परीक्षा व्हावी म्हणून आत्म्याने त्याला अरण्यात नेले. तेथे त्याने चाळीस दिवस व चाळीस रात्र उपवास केला. त्यानंतर त्याला भूक लागली, तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, "तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर." परंतु त्याने उत्तर दिले की, "मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल असा शास्त्रलेख आहे." मग सैतानाने त्याला पवित्र नगरीत नेऊन मंदिराच्या शिरोभागी उभे केले आणि त्याला म्हटले, "तू देवाचा पुत्र असलास तर खाली उडी टाक, कारण तो आपल्या दूतांना तुझ्याविषयी आज्ञा करील आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातांवर झेलून धरतील.” येशूने त्याला म्हटले, " परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. असाही शास्त्रलेख आहे." पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले आणि त्याला म्हटले, “तू पाया पडून मला नमन करशील तर मी हे सगळे काही तुला देईन.” तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, चालता हो, ” कारण असा शास्त्रलेख आहे की, " “परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर.” मग सैतान त्याला सोडून गेला आणि पाहा, देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: राखेच्या बुधवारपासून ख्रिस्तसभा आध्यात्मिक वसंतऋतू मानला गेलेल्या प्रायश्चित्तकाळात प्रवेश करते. पापी जीवनाला तिलांजली द्यायची व पवित्र जीवनाचा मार्ग चोखाळायचा यासाठी ह्या काळात पोषक वातावरण निर्माण करून दिले जाते. त्यासाठी मोह, पाप, पश्चात्ताप, प्रायश्चित्त, परिवर्तन आणि नवजीवन अशा विविध बाबींवर मार्गदर्शन केले जाते. आजची वाचने (उत्पत्ती २:७-९, ३:१-७; रोम ५:१२-१९; मत्तय ४:१-११) मोह हा विषय हाताळीत असल्याचे दिसून येते. इस्राएली लोक चाळीस वर्षे अरण्यातून प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांना जे मोह झाले तसेच मोह चाळीस दिवस अरण्यात उपवास करणाऱ्या येशूलाही झाले. सैतानाने घातलेला मोह आणि परमेश्वराने दिलेले आमंत्रण / पाचारण यातील भेद, आदाम, इस्राएली लोक ह्यांना समजला नाही. येशूने स्पष्टपणे तो ओळखला आणि परमेश्वराच्या शब्दानेच त्याने सैतानाचे मोह परतवून लावले.
अ. येशूच्या पहिल्या मोहात दोन प्रकारची भूक दडलेली आहे : सैतानाने येशूच्या शारीरिक भुकेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. भाकरीपेक्षा प्रभुशब्दाची भूक श्रेष्ठ असते हे येशूने सिद्ध केले. प्रायश्चित्तकाळात शारीरिक भुकेपेक्षा आध्यात्मिक भूक भागविण्यासाठी उपवास व बायबलवाचन हे मार्ग अवलंबिले जातात.
ब. येशूच्या दुसऱ्या मोहात बायबलवाचनाचे दोन अर्थ दडलेले आहेत : सैतान आपला कार्यभाग साधण्यासाठी बायबलचा आधार घेतो. येशू मात्र परमेश्वराची इच्छा प्रकट करण्यासाठी बायबलचा संदर्भ देतो. बायबलवाचन करायचे ते स्वतःच्या सोयीसाठी नव्हे तर परमेश्वराची इच्छा जाणून घेण्यासाठी.
क. येशूच्या तिसऱ्या मोहात दोन प्रकारचे स्वामित्व दडलेले आहे : सैतान ह्या जगातील सर्व गोष्टी येशूला देऊ करतो व असा दावा करतो की, ह्या गोष्टींवर त्याची मालकी आहे. येशू मात्र सैतानाचे स्वामित्व झुगारून देतो आणि परमेश्वर पिता हाच जगाचा खरा मालक आहे हे सिद्ध करतो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनातील विविध प्रकारचे मोह मी कशाप्रकारे हाताळतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनातील सर्व प्रकारच्या मोहप्रसंगी सर्वस्वी तुजवर अवलंबून राहता यावे ह्यासाठी आम्हाला सामर्थ्य व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या