Marathi Bible Reading | 25th February 2023 | Saturday After Ash Wednsday

उपवासकाळाला सुरवात 

शनिवार 

 दि.२५ फेब्रुवारी  २०२३

✝️ 

“निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. 


✝️

संत राणी मारिया

✝️

25 फेब्रुवारी 1975 साली इंदोरमध्ये एक घृणास्पद  घटना घडली. अवघ्या चाळीस वर्षांच्या सिस्टर मारिया राणीचा समंदर अली सिंग नावाच्या एका शेतकऱ्यांनी निर्घुण खून केला. जगभरातील प्रसार माध्यमांद्वारे या घटनेचा खुपचं ऊहापोह झाला. प्रेम,दया, क्षमा शांतीचा संदेश देता देता सिस्टर देवाघरी गेल्या. 
 29 जानेवारी 1954 साली सिस्टर मारिया राणीचा जन्म झाला. बालपणापासूनच ख्रिस्त मळ्यात काम करण्यासाठी  त्या  अगदी आतुर होत्या. 1974 झाली राणी मारिया नाव धारण करून त्या धर्म भगिनी झाल्या. प्रभूचा आत्मा माझ्यावर अवतरला आहे त्यांनी मला सुवार्ता घोषविण्यासाठी आशीर्वादित केले आहे. दिनास शुभवार्ता देण्यासाठी  जे पापांच्या  जोखडात    बांधलेले आहेत त्यांना मुक्ती देण्यासाठी प्रभू ने मला पाठविले आहे हे प्रभू वचन मनाशी घेऊनच सिस्टर मारिया धर्मभगीनी झाल्या. फ्रान्सिस्कन  संस्थेमध्ये काम करताना त्यांची बदली इंदूर येथे झाली. करशील जे गरिबासाठी होईल ते माझ्यासाठी या प्रभू वचनांनी प्रेरीत होवून गरिबांना लुटणाऱ्या धनदांडग्यांना  त्यांनी विरोध केला, गरिबांच्या पैशाचे रक्षण केले. सिस्टर आपल्या लोकांचे धर्म परिवर्तन करण्यासाठी आले आहेत त्यांना जगण्याचा हक्क नाही असे काही समाजकंटकांनी समर सिंह यांना हाताशी धरून बसमधून जात असताना सिस्टर त्यांच्या पोटात चाळीस वार करून त्यांना ठार मारले.  त्यांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी समर सिंग या तिच्या मारेकऱ्याला पकडून  तुरुंगात टाकले. 
    आठ वर्षांनी सि. राणी हिची  लहान बहीण  तिच्या आईबरोबर 25 फेब्रुवारी 2003 रोजी तुरुंगात गेल्या. समंदर सिंग थरथर कापत होता. दोन्ही हात जोडून तो बोलत होता मला क्षमा करा त्यांना मारण्याचा माझा हेतू नव्हता मला या लोकांनी सांगितलं. म्हणून मारले. मी पाप केले आहे मला क्षमा करा .  मारेकरणाऱ्याला  क्षमा करणाऱ्या येशूचा आदर्श  आहोत 4 नोव्हेंबर 2017 रोजी  पोप फ्रान्सिस यांनी सि. राणी मारिया यांना  धन्यवादीत घोषित केले. 
धन्यवादित सिस्टर राणी मारिया कडे आपल्याला क्षमेची कृपा मिळावी म्हणून तिच्या कडे मध्यस्ति साठी प्रार्थना करूया. 

✝️

पहिले वाचन  यशया ५८:९-१४
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
 "स्वतःच्या मार्गाने न जाण्याने तू प्रभूचा आदर करशील."

प्रभू म्हणतो, “जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, दुःखग्रस्त जिवाला तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झळकेल, निबिड अंधकार तुला मध्यान्हाचे तेज असा होईल. परमेश्वर तुझा सततचा मार्गदर्शक होईल. तो अवर्षणसमयी तुझ्या जिवास तृप्त करील. तुझ्या हाडांना मजबूत करील. तू भरपूर पाणी दिलेल्या मळ्याप्रमाणे होशील. पाणी कधी न आटणाऱ्या झऱ्याप्रमाणे होशील. बहुत काळ मोडून पडलेली शहरे तुझे लोक पुनः बांधतील. पूर्वीच्या पिढ्यांनी घातलेले पाये तू पुन: उभारशील. मोडतोडीचा जीर्णोद्वार करणारा, वस्ती होण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणारा, असे तुझे नाव पडेल. तू शब्बाथाची पायमल्ली करणार नाहीस. माझ्या पवित्र दिवशी आपला उद्योगधंदा करणार नाहीस. शब्बाथ आनंद दिन आहे. परमेश्वराचा पवित्र व सन्मान दिन आहे असे म्हणून त्याचा आदर करशील व त्या दिवशी आपले कामकाज करणार नाहीस, आपला धंदा चालव नाहीस, वायफळ गोष्टी बोलत बसणार नाहीस, तर तू परमेश्वराच्याठायी हर्ष पावशील. तू देशांच्या उच्च स्थलांचे जयोत्साहाने आक्रमण करशील, असे मी करीन आणि तुझा पिता याकोब याच्या वतनाचा तुला उपभोग घेऊ देईन. परमेश्वराच्या तोंडचे हे शब्द आहेत."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८६:१-६
प्रतिसाद : प्रभो, मला मार्गदर्शन कर.

१) माझ्याकडे लक्ष दे प्रभू, मला उत्तर दे.
 मी गरीब व गरजवंत आहे. 
माझ्या जिवाला जप कारण मी तुझा भक्त आहे. 
तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या आपल्या दासाचे रक्षण कर.

२) तू माझा देव आहेस. म्हणून माझ्यावर दया कर. 
हे स्वामी, सारा दिवसभर मी तुझा धावा करतो. 
या तुझ्या दासाच्या मनाला आनंद वाटू दे. 
कारण हे स्वामी, माझा जीव तुझ्याकडे लागला आहे.

३) स्वामी, तू किती चांगला आहे. 
तू क्षमाशील आहेस. 
तुझा धावा करणाऱ्यांना तू दयासागर आहेस.
 माझी प्रार्थना ऐक. 
हे प्रभू, माझ्या याचनेच्या शब्दांकडे लक्ष दे.


जयघोष 
जे अपराध तू माझ्याविरुद्ध केले आहेत, ते तुझ्यातून निघून जाऊ दे आणि तुझ्यामध्ये नवीन आत्मा आणि नवीन शक्ती येवो.

शुभवर्तमान लूक  ५:२७-३२

वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  “मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही, तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलोआहे."

येशूने लेवी नावाच्या एका जकातदाराला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहिले व त्याला म्हटले, "माझ्यामागे ये." तेव्हा तो सर्व काही तेथून सोडून देऊन उठला व त्याच्यामागे गेला. 
मग लेवीने आपल्या घरी त्याला मोठी मेजवानी दिली. त्यावेळी त्याच्याबरोबर जकातदार व दुसरे लोक यांचा मोठा समुदाय जेवायला बसला होता. तेव्हा परुशी व त्यांच्यातील शास्त्री हे त्याच्या शिष्यांच्या विरुद्ध कुरकुर करीत त्यांना म्हणाले "जकातदार व पापी लोक यांच्याबरोबर तुम्ही का खाता पिता ?" येशूने त्यांना उत्तर दिले, “निरोग्यांना वैद्याची गरज नसते, तर रोग्यांना असते. मी नीतिमानांना बोलावायला आलो नाही तर पापी लोकांना पश्चात्तापासाठी बोलावायला आलो आहे.”

प्रभूचे हे शुभवर्तमान

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन: आजारी लोकांना वैद्याची गरज असते आणि पापी लोकांना पश्चात्तापाची गरज असते. जेव्हा आपण प्रभूच्या मार्गाने चालायला शिकतो तेव्हा आपल्याला खरोखर प्रभूमध्ये आनंद मिळतो. यशया संदेष्टा प्रभूच्या मार्गाचे अनुसरण करण्याबद्दल आणि प्रभूचा आनंद अनुभवण्याबद्दल बोलतो. आनंद हा अंधारातल्या प्रकाशासारखा असतो. जो त्याचा अनुभव घेतो तो पाण्याने भरलेल्या बागेसारखा आणि कधीही न संपणाऱ्या कारंज्यासारखा असेल. त्याचप्रमाणे, आपल्याला येशूच्या शुभवर्तमानात आढळते की लेवीला प्रभूच्या मार्गावर चालण्यासाठी आमंत्रित केले आहे. येशू त्याला “माझ्या मागे ये” असे आमंत्रण देतो. लेवीने लगेच ओळखले की येशूचे अनुसरण केल्याने त्याला त्याच्या जीवनात खरा आनंद मिळेल. म्हणून त्याने ताबडतोब सर्वकाही सोडून येशूचे अनुसरण केले. मोठ्या आनंदाच्या या क्षणामुळे त्यांनी मोठी मेजवानी दिली. तथापि, स्वतःच्या गर्वाने आंधळे झालेल्या इतर अनेकांना येशूचे अनुसरण करण्याचा चांगुलपणा दिसत नव्हता आणि म्हणून त्यांनी येशूवर जकातदार आणि पापी लोकांसोबत भोजन केल्याचा आरोप केला. येशूने उत्तर दिले की तो पापी लोकांना पश्चात्ताप करण्यासाठी बोलावण्यासाठी आला होता. आजारी लोकांनाच वैद्याची गरज असते. जे देवापासून दूर आहेत त्यांनी त्यांच्या चुकीच्या मार्गापासून पश्चात्ताप करावा आणि प्रभूच्या मार्गाने चालावे, जेणेकरून त्यांनाही प्रभू देत असलेल्या आनंदाचा अनुभव घ्यावा अशी येशूची इच्छा होती.

प्रार्थना : हे प्रभू येशू, जीवनात तुला स्वीकारण्यास व तुझा विश्वासु अनुयायी | बनण्यास कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या