पुनरुत्थान ३ रा सप्ताह
शुक्रवार दि. २८ एप्रिल २०२३
✝️
संत लुईस मॉन्टफोर्ट
- वर्तनसाक्षी (१६७३-१७१६)
फ्रान्समधल्या ब्रिटानी येथे जन्मलेल्या लुईस मॉन्टफोर्ट ह्याने फ्रान्सच्या ईशान्येकडील भागात ख्रिस्ताचे प्रेषितकार्य पसरविण्याची कामगिरी पार पाडली. तो स्वतः खूप दारिद्र्यात जीवन जगत असे. मात्र पवित्र मरिया आणि पवित्र जपमाळ ह्या विषयावरील साध्या सोप्या भाषेतील त्यांची प्रवचने लोकांना खूप खूप आवडत.
संध्याकाळची वेळ झाली की ते आपल्या हातात बायबल आणि पवित्र जपमाळ घेऊन धावत जात. रोझरीच्या पंधरा रहस्यांपैकी एखादे रहस्य लोकांना समजावून सांगत. त्या रहस्यावर आधारित पवित्र शास्त्रवाचन करीत. नंतर “आमच्या יי स्वर्गीय बापा” व “नमो कृपापूर्ण ” ह्या प्रार्थना म्हणत. अशा प्रकारे पंधरा दिवस एकाच गावात जाऊन प्रभूच्या जन्म, दुःखसहन, मरण पुनरुत्थान आणि गौरव इत्यादीवर प्रबोधन करीत. 'चिंतन न करता केवळ ओठाने पुटपुटलेली रोझरीची प्रार्थना ही आत्मा नसलेल्या देहासारखी कशी अचेतन असते' ते त्यांनी आपल्या प्रवचनांमधून लोकांना समजावून सांगितले. त्यांच्या ह्या उपदेशामुळे जॅन्सनिसम ह्या पाखंड- वादापासून बरेच लोक दूर राहिले आणि ते अधिक प्रभावी व श्रद्धावान ख्रिस्ती जीवन जगू लागले.
त्यांनी दिलेले मिशन व तपसाधना समाप्त करताना अनेक पश्चात्तापी पापी देवाला शरण येत. मग लुईस त्यांना पवित्र देवमाता मरियेच्या संरक्षणाखाली सोपवित असे. अनेक वेळा तिथे रोझरी संघ उदयास आले.
उपदेशाव्यतिरिक्त लुईस ह्याने बरेच धार्मिक व आध्यात्मिक लेखनही केले. “धन्य कुमारी मरियेची सार्थ भक्ती” या विषयावर त्यांनी केलेले लिखाण आजही आपल्यामध्ये उपलब्ध आहे व ते मरियाभक्तांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारे आहे. सिस्टर्स ऑफ डिव्हाईन विज्डम आणि कंपनी ऑफ मेरी किंवा मॉन्टफोर्ट फादर्स ह्या संस्था त्यांनीच स्थापन केल्या.
चिंतन : संतांची जडणघडण आणि प्रशिक्षण करण्याचे कार्य परमेश्वराने पवित्र मरियेवर सोपविलेले आहे. • संत लुईस मॉन्टफोर्ट
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ९:१-२०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"परराष्ट्रीयांसमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता शौल माझे निवडलेले पात्र आहे."
शौल प्रभूच्या शिष्यांना धमक्या देणे आणि त्यांचा घात करणे ह्याविषयीचे फुत्कार टाकीत होता. त्याने मुख्य याजकाकडे जाऊन त्याच्यापासून दिमिष्कातल्या सभास्थानांसाठी अशी पत्रे मागितली की, तो मार्ग अनुसरणारे पुरुष किंवा स्त्रिया कोणीही त्याला आढळल्यास त्याने त्यांना बांधून येरुशलेममध्ये आणावे. मग जाता जाता असे झाले की, तो दिमिष्काजवळ येऊन पोहचला त्यावेळी अकस्मात प्रकाश चमकला. तेव्हा तो जमिनीवर पडला आणि त्याने एक वाणी आपणाबरोबर बोलताना ऐकली की, "शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" तेव्हा तो म्हणाला, "प्रभो, तू कोण आहेस?" त्याने म्हटले, तू "ज्या येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तर ऊठ आणि नगरात जा, म्हणजे तू तेथे काय करावयाचे हे तुला सांगण्यात येईल." त्याच्याबरोबर जी माणसे जात होती ती स्तब्ध उभी राहिली. त्यांनी वाणी ऐकली खरी पण त्यांच्या दृष्टीस कोणी पडले नाही. मग शौलला जमिनीवरून उठवले तेव्हा त्याने डोळे उघडले, पण त्याला काही दिसेना. तेव्हा त्यांनी त्याला हाती धरून दिमिष्कात नेले. तेथे तो तीन दिवस आंधळ्यासारखा झाला आणि त्याने काही अन्नपाणी घेतले नाही.
इकडे दिमिष्कात हनन्या नावाचा कोणीएक शिष्य होता. त्याला प्रभू दृष्टान्तात म्हणाला, "हनन्या!" त्याने म्हटले, "काय प्रभू ?" प्रभू त्याला म्हणाला, "उठून नीट नावाच्या रस्त्यावर जा आणि यहुदाच्या घरी तासकर शौल नावाच्या मनुष्याचा शोध कर. कारण पाहा, तो प्रार्थना करीत आहे आणि हनन्या नावाचा एक मनुष्य, आपल्याला पुन्हा दिसावे म्हणून आपणावर हात ठेवत आहे, असे त्याने पाहिले आहे." तेव्हा हनन्याने उत्तर दिले, "प्रभो, येरुशलेममधल्या तुझ्या पवित्र जनांचे हा माणसाने किती वाईट केले आहे हे मो पुष्कळांकडून ऐकले आहे आणि येथेही तुझे नाव घेणाऱ्या सर्वांना बांधावे असा मुख्य याजकांपासून त्याला अधिकार मिळाला आहे. परंतु प्रभूने त्याला म्हटले, "जा, कारण परराष्ट्रीय राजे आणि इस्राएलची संतती ह्यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरिता तो माझे निवडलेले पात्र आहे." आणि त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागले हे मी त्याला दाखवीन. तेव्हा हनन्या निघून त्या घरी गेला आणि त्याच्यावर हात ठेवून म्हणाला, “शौलभाऊ, तू वाटेने येत असता ज्या प्रभूने म्हणजे येशूने तुला दर्शन दिले, त्याने तुला पुन्हा दृष्टी यावी आणि तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे म्हणून मला पाठवले आहे." तत्क्षणी त्याच्या डोळ्यांवरून खपल्यासारखे काही पडले व त्याला दृष्टी आली आणि त्याने उठून बाप्तिस्मा घेतला. मग अन्न घेतल्यावर त्याला शक्ती आली.
ह्यानंतर तो दिमिष्कातल्या शिष्यांबरोबर काही दिवस होता आणि त्याने लागलेच सभास्थानांमध्ये येशूविषयी घोषणा केली की, “तो देवाचा पुत्र आहे."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११७:१-२
प्रतिसाद : सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.
१) आलेलुया !
अहो सर्व राष्ट्रांनो, प्रभूचे स्तवन करा.
साऱ्या मानवांनो, त्याचे गुणगान गा.
२) त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे,
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही. त्याच्यावर ह्यापुढे मरणाची सत्ता चालत नाही..
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ६:५२-५९
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे."
यहुदी आपसामध्ये वितंडवाद करू लागले आणि म्हणाले, "हा आपला देह आम्हांला खावयाला कसा देऊ शकतो ?" ह्यावरून येशू त्यांना म्हणाला, "मी तुम्हांला सत्य ते सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही आणि त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हांमध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि रक्त पितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, मीच त्याला शेवटल्या दिवशी उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि जसा पित्यामुळे मी जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. पण हे तसे नाही, ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल." कफर्णहूम येथे शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:जो माझा देह खातो व माझे रक्त पितो तो माझ्यामध्ये राहतो आणि मी त्याच्यामध्ये राहातो. पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले. ख्रिस्तरूपी भाकर जो खातो तो सार्वकालिक जीवन जगेल. यहुदी लोकांना हे कोडे सुटले नाही. आणि म्हणूनच म्हणतात ख्रिस्त हा आपला देह आम्हांस खावयास कसा देऊ शकतो? ख्रिस्ताचा देह आणि रक्त आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे. ख्रिस्ताच्या शरीराद्वारे आणि रक्ताद्वारे आपल्याला ख्रिस्त शेवटल्या दिवशी उठविणार आहे. सार्वकालिक अनंतकाळचे जीवन मिळविण्यासाठी आपल्याकडे एकच एकमेव मार्ग आहे. आपल्याला स्वर्गीय भाकरीचे सेवन करावे लागेल. स्वर्गीय भाकरीचे सेवन ही केवळ शरीराची नव्हे तर आत्म्याचे संवर्धन करत असते. स्वर्गीय भाकरीचे सेवन करणे म्हणजेच परिवर्तनमय पवित्र प्रार्थनामय सेवामय जीवन जगणे होय. अशाप्रकारचे जीवन जगून स्वर्गरूपी भाकरीचे सेवन करीत आहोत हे स्पष्ट होणार आहे. शारीरिक भाकर आपल्याला अहंकारी, स्वार्थी, संकोचित नि मर्यादीत जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते. स्वर्गीय भाकर आपल्याला प्रेमाचे आणि सेवेचे विशाल जीवन जगण्यास शिकवीत असते आणि तीच स्वर्गीय भाकर आपल्याला सार्वकालिक जीवन देणार आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, भक्ती भावाने भाकरीच्या रूपान स्वीकारण्यास व तुझी कृपा अनुभवून तुझी साक्ष इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या