Marathi Bible Reading | Thursday 27th April 2023 | 3rd week of Easter

 पुनरुत्थान ३ रा  सप्ताह 

गुरुवार दि. २७ एप्रिल २०२३ 

 "मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही 
✝️

संत झिटा

श्रद्धावान आणि भक्तिमान कुटुंबात जन्माला आलेली झिटा ही मुलगी देवाच्या नजरेतून अत्यंत पवित्र आणि विश्वासू असे जीवन जगत असे. तिचे आईवडील ख्रिस्ती जीवन काटेकोरपणे जगत होते व तिची एक बहीण सिस्टर्शियन संघात धर्मभगिनी होती. तिचे काका एक मठवासी होते आणि जिवंतपणीच त्यांना संत मानले जात होते. वयाच्या १२ व्या वर्षी झिटा इटलीतील लुक्का येथल्या एका कुटुंबात स्वयंपाकीण म्हणून काम करू लागली. मरेपर्यत ती त्याच कुटुंबाची सेवाचाकरी करीत होती.
ती अतिशय कर्तव्यदक्षतेने व निष्ठेने काम करी. रात्री-अपरात्री ती प्रार्थना करण्यासाठी उठे. पवित्र मिस्सामध्ये सहभाग घेणे. वारंवार उपवास करणे, आपला जेवणातील काही भाग गोरगरिबांसाठी राखून ठेवणे अशी दयाकृत्ये तिने पूर्णतः आत्मसात करून घेतली होती.एकदा एक भिकारी थंडीने कुडकुडत होता. तिने आपले अंथरूण पांघरूण त्याला देऊन टाकले आणि ती जमिनीवर झोपू लागली. तिच्या अशा ह्या वागण्यामुळे तिचे सहकारी नोकर तिचा उपहास करीत. सर्वजणी तिला टोचून बोलत आणि उघडउघड तिचा अपमान करीत असत.
नम्रता, सौम्यता, सहनशीलता आणि देवावरील विशुद्ध प्रेम इत्यादी गुणांमुळे ती ह्या पडझडीच्या काळात टिकून राहिली. इतकेच नव्हे तर साधेपणाने व नम्रतेने तिने आपल्या शत्रूंच्या कारवायांवर मात केली व अनेकांची मर्जी संपादन केली. तिच्या घरमालकांना देखील तिचा चांगुलपणा दिसून आला. त्यामुळे झिटा म्हणजे आपल्या घराची शान आहे, आपल्या कुटुंबातील मौल्यवान देणगी आहे ह्याविषयी त्याची खात्री पटली. आपल्या मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी त्यांनी तिच्यावर सोपविली. इतकेच काय तिला संपूर्ण घराच्या व्यवस्थापनाचे कामही दिले.
आता झिटाच्या कामाची व्याप्ती वाढली. परंतु त्यातही वेळात वेळ काढून ती गरीब व आजारी लोकांना भेटी देत असे. गोरगरिबांविषयी तिच्या मनात असलेल्या तळमळीमुळे देवाने देखील गोरगरिबांत तिला दर्शन देणे सुरू ठेवले.
नाताळची संध्याकाळ होती. संपूर्ण कुटुंब रात्रीच्या मिस्साला जाण्यासाठी तयारी करीत होते. थंडीत तर हातपाय गारठत होते. त्यामुळे घरमालकाने स्वत:चा एक कोट झिटा हिच्या खांद्यावर टाकीत तिला म्हटले, "आजची रात्र तू हा कोट वापर.” आनंदाने तिने तो फरचा कोट परिधान केला. देवळाच्या प्रवेशद्वारापाशी जेव्हा ती पोहोचली तेव्हा अंगावर लक्तरे पांघरलेला एक भिकारी तिच्या नजरेस पडला. त्या भिकाऱ्याने झिटाकडे कोट देण्याची विनंती केली. झिटाने इकडे तिकडे पाहिले व कोट त्या भिकाऱ्याला देत म्हटले, “मी देवळात मिस्साला जात आहे. परंतु येईपर्यंत तू हा कोट पांघर. ह्यानंतर परत जाताना मला हा कोट परत दे. हा कोट माझ्या मालकाचा आहे.” त्या भिकाऱ्याने तो कोट घेतला. मिस्सा आटोपल्यानंतर झिटा त्या माणसाला शोधू लागली. परंतु तो माणूस बेपत्ता झाला होता.
झिटा आता चिंताग्रस्त झाली. आपल्या मालकाला तोंड कसे द्यायचे असा विचार करीत उदास मनाने ती घरात शिरली. तिच्या अंगावर कोट नाही हे पाहून तिचा मालक तिच्यावर तुटून पडला. ख्रिस्मसचा आनंद एकमेकांना देण्याऐवजी शिव्याशापांची आग त्या घरात ओकली जाऊ लागली. थोडक्याच वेळात सर्वजण केक कापण्यासाठी मेजाभोवती जमा झाले तेव्हा दारावरची बेल वाजू लागली. दरवाजा उघडून पाहताच एक अपरिचित व्यक्ती हातात तो फरचा कोट घेऊन उभी होती. त्याने तो कोट झिटाच्या हाती दिला. घरमालक त्या माणसाला काही विचारणार इतक्यात तो अदृश्य झाला परंतु घडलेल्या घटनेमुळे कुटुंबातील वातावरण एकदम बदलून गेले. त्या कुटुंबात आता नाचगाणे सुरू झाले. त्या दिवसापासून ज्या चर्चच्या प्रवेशद्वारापाशी झिटाला तो भिकारी भेटला होता त्या दाराला "देवदूताचे दार" असे नाव पडले.
आपली साधीसुधी कामे अगदी टापटीपपणे व व्यवस्थितरित्या पार पाडणे हा झिटाचा गुणविशेष होता. त्यामुळे देवळात व आसपासच्या परिसरात ती लवकरच नावारुपाला आली. २७ एप्रिल १२७८ रोजी ती मरण पावली. ज्या चर्चमध्ये ती नित्य नेमाने मिस्साला जाई त्या संत फर्डियानो चर्चमध्ये तिला पुरण्यात आले. ती घरकामगारांची आश्रयदाती संतीण मानली जाते.

“मोलकरीण जर उद्योगी नसेल तर ती काय कामाची? कामाविना पावित्र्य हे केवळ ढोंग आणि पोकळ डामडौल आहे." - संत झिटा
✝️

पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ८:२६-४०
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन 

  "जर तू तुझ्या संपूर्ण अंत:करणाने विश्वास ठेवलास तर तुला बाप्तिस्मा मिळेल. "
प्रभूच्या दूताने फिलीपला म्हटले, "ऊठ, जी वाट येरुशलेमपासून गज्जाकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा. ती ओसाड आहे." मग तो उठला व निघाला, तेव्हा पाहा, एक कुशी षंढ, कुशी लोकांची राणी कांदके हिचा मोठा अधिकारी होता आणि त्याच्या हाती तिचे सर्व भांडार होते, तो येरुशलेममध्ये उपासनेसाठी आला होता. तो परत जाताना आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचीत होता. तेव्हा आत्म्याने फिलीपला सांगितले, "तू जाऊन त्याचा रथ गाठ." फिलीप धावत गेला आणि त्याने यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले. त्यावर तो म्हणाला, "आपण जे वाचत आहा ते आपल्याला समजते काय ?" त्याने म्हटले, "कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?" मग त्याने फिलीपला आपल्याजवळ येऊन बसावयास वर बोलावले. तो जो शास्त्रलेख वाचीत होता तो असा :
त्याला मेंढरासारखे वधासाठी नेले आणि जसे कोकरू कातरणाऱ्याच्या पुढे गप्प असते, तसा तो आपले तोंड उघडत नाही. त्याच्या लीन अवस्थेत त्याला न्याय मिळाला नाही. त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण त्याचा जीव पृथ्वीवरून घेतला गेला. तेव्हा षंढाने फिलीपला म्हटले, "मी तुम्हाला विनंतीपूर्वक विचारतो, संदेष्टा कोणाविषयी असे म्हणतो, स्वत:विषयी की दुसऱ्या कोणाविषयी ?" तेव्हा फिलीपने बोलायला आरंभ केला आणि ह्या शास्त्रलेखापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली. मग वाटेने जात असता ते पाणवठ्याजवळ आले, तेव्हा पंढ म्हणाला, “पाहा, हे पाणी! मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?" तेव्हा त्याने रथ उभा करायला सांगितले आणि फिलीप आणि षंढ असे ते दोघे पाण्यात उतरले आणि त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. मग ते पाण्यावरुन वर आले तोच प्रभूचा आत्मा फिलीपला घेऊन गेला म्हणून तो पुन्हा षंढाच्या दृष्टीस पडला नाही. नंतर तो आपल्या वाटेने हर्ष करीत चालला. इकडे फिलीप अजोत नगरात आढळला आणि कैसरिया येथे येईपर्यंत त्याला वाटेत जी जी गावे लागली त्यातून जाताना त्याने सुवार्ता सांगितली.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ६६:८-९,१६-१७,२०
प्रतिसाद : पृथ्वीवरील समस्त जनहो, देवाचा जयजयकार करा.

१) लोकहो, आमच्या देवाचे धन्यवाद गा.
 त्याच्या स्तवनाचा गजर ऐकू द्या. 
त्याने आमचे प्राण वाचवले आहेत.
 आमचे पाय ढळू दिले नाहीत.

२) देवाचे भय बाळगणाऱ्यांनो, या व ऐका.
 त्याने माझ्यासाठी काय काय केले ते मी तुम्हांला सांगतो.
 मी माझ्या मुखाने त्याचा धावा केला, 
माझ्या जिभेवर त्याचे स्तवन होते.

३) धन्य तो देव !
माझी प्रार्थना त्याने झिडकारली नाही, 
आपले प्रेम कमी केले नाही.

जयघोष

आलेलुया, आलेलुया !
येशूने थोमाला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून श्रद्धा ठेवली आहे. पाहिल्यावाचून श्रद्धा ठेवणारे ते धन्य.
आलेलुया !

शुभवर्तमान योहान ६:४४-५१
वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

  "स्वर्गातून उतरणारी जिवंत भाकर मीच आहे."

येशूने लोकसमुदायाला म्हटले, “ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्याला शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहिले आहे की, 'ते सर्व देवाने शिकवलेले असे होतील.' जो कोणी पित्याचे ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो. पित्याला कोणी पाहिले आहे असे नाही, जो देवापासून आहे त्याने मात्र पित्याला पाहिले आहे. मी तुम्हांला सत्य सांगतो, जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. मीच जीवनाची भाकर आहे. तुमच्या पूर्वजांनी अरण्यात मात्रा खाल्ला तरी ते मेले. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की, ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे, ह्या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल, जी भाकर मी देईन ती माझा देह असून जगाच्या जीवनासाठी आहे."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:आजच्या शुभवर्तमानात म्हटले आहे, तुमच्या पूर्वजांनी मान्ना खाल्ला तरी ते मेले. परंतु स्वर्गातून खाली उतरलेली भाकर जो खाईल तो कधीही मरणार नाही. ख्रिस्त जगात येण्याआधी जी लोकं मरण पावली, त्यांना स्वर्गाचा अनुभव येणार नाही हेच ह्या वाचनातून स्पष्ट होते. परंतु भाकररूपी ख्रिस्ताचा जे स्वीकार करणार आहेत ते कधीच मरणार नाहीत. ख्रिस्त पुन्हा एकदा आपला आत्मा आणि आपले जीवन ह्याविषयी म्हणत आहे. ख्रिस्त स्वतःची तुलना स्वर्गीय भाकरीबरोबर करीत आहे. आज आपण देखील जागतिक जीवन जगत असताना भाकरीच्याच शोधात आहोत. ज्या भाकरीच्या शोधात आपण आहोत ती ऐहिक आहे. ती भाकर आपल्याला शाश्वत जीवन मिळवून देणार नाही. पूर्वजांनी मान्ना खाल्ला तो शरीराला तृप्त करणारा होता, आत्म्याला नव्हे. आपणही तीच चूक करीत आहोत. आपला संपूर्ण वेळ, आपली सर्व ऊर्जा ह्या जागतिक भाकरीच्या शोधात आहे आणि म्हणून आपल्या पूर्वजांप्रमाणे आपण मरणाच्या दारात येऊन ठेपलो आहोत. ख्रिस्त आज आपल्याला पुन्हा एक संधी देत आहे. मरणाच्या दारातून मागे फिरण्याची. पूर्वजांप्रमाणे शारीरिक भाकरीच्या शोधात आपले जीवन न गमावता ख्रिस्तरूपी भाकरीचा स्वीकार करून शाश्वत जीवन मिळवूया.
    
प्रार्थना :हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या सहवासाचा गोड अनुभव घेण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या