पुनरुत्थान ३ रा सप्ताह
बुधवार दि. २६ एप्रिल २०२३
"मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही
✝️
आपल्याला देवाच्या भेटीची व सहवासाची आंतरीक आस लागली पाहिजे. जर अंतरात्म्याची भूक लागली तर शारीरिक भूक आपण विसरू शकतो. म्हणून ख्रिस्त म्हणतो, 'जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही'. प्रभूच्या सहवासात आपण जाऊ या आणि आपले सर्वस्व त्याच्याठायी समर्पित करु या.
✝️
पहिले वाचन प्रेषितांचे कृत्ये ८:१-८
वाचक : प्रेषितांचे कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
"ज्यांची पांगापांग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले."
येरुशलेममधल्या मंडळीचा फार छळ झाला, म्हणून प्रेषितांखेरीज त्या सर्वांची यहुदिया आणि शोमरोन ह्या प्रदेशात पांगापांग झाली. भक्तिमान माणसांनी स्टेफनला नेऊन पुरले आणि त्याच्यासाठी फार शोक केला. इकडे शौल मंडळीला हैराण करू लागला. तो घरोघर जाऊन पुरुषांना आणि स्त्रियांनाही घरून आणून तुरुंगात टाकीत असे.
तेव्हा ज्यांची पांगापाग झाली होती ते तर वचनाची सुवार्ता सांगत चहूकडे फिरले आणि फिलीपने शोमरोन शहरी जाऊन तेथील लोकांपुढे ख्रिस्ताची घोषणा केली, तेव्हा फिलीपचे भाषण ऐकून आणि तो करीत असलेली चिन्हे पाहून लोकसमुदायाने त्याने सांगितलेल्या गोष्टीकडे एकमताने लक्ष दिले. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळातून ते अशुद्ध आत्मे मोठ्याने ओरडून निघून गेले, पुष्कळ पक्षपाती आणि पांगळी माणसे बरी झाली. अशा प्रकारे त्या नगरात आनंदीआनंद झाला.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ६६:१-७
प्रतिसाद : पृथ्वीवरील समस्त जनहो, देवाचा जयजयकार करा.
१) पृथ्वीवरील समस्त जनहो,
देवाचा जयजयकार करा.
त्याच्या नावाच्या महिम्याचे गुणगान गा.
त्याचे स्तवन करून माहात्म्य वाढवा.
देवाला म्हणा, “तुझी करणी किती अगाध आहे!"
२) "सारे भूमंडळ तुझ्या चरणी लागेल.
तुझे गुणगान गाईल, तुझ्या नावाचा महिमा वर्णील!”
या आणि देवाचे कार्य बघा.
मानवजातीला त्याच्या करणीचा धाक बसतो.
३) त्याने समुद्राच्या जागी कोरडी जमीन केली,
लोक नदीपार गेले.
तेव्हा त्याची करणी पाहून आम्हांला अत्यानंद झाला;
तो आपल्या पराक्रमाने सदासर्वदा राज्य करतो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात,
मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात
आलेलुया !
शुभवर्तमान योहान ६:३५-४०
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहील त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे."
येशू त्यांना म्हणाला, "मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवला नाही, असे मी तुम्हांला सांगितले. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:आजच्या शुभवर्तमानात ख्रिस्त म्हणत आहे कि मी जीवनाची भाकर आहे, ख्रिस्त का म्हणत नाही कि मी शरीराची भाकर आहे. ह्याचा अर्थ ख्रिस्त जरजीवनाची भाकर असेल तर जीवन म्हणजे काय ते आपल्याला समजले पाहिजे. आपले जीवन म्हणजे आपले शरीर नव्हे. आपले शरीर हे मृत आहे. आपण मेल्यानंतर आपले शरीर हे मातीत पुरण्यात येत. परंतु जीवन किंवा आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला सुरूवात करते. ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. परंतु आपण मात्र शरीराच्या भाकरीसाठी धडपडत आहोत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्याला आपल्या शरीराचे चोचले कसे पुरविता येतील ह्याच्याच विचारात असतो. आपल्या जीवनात आपण शरीराला नव्हे तर आत्म्याला महत्व द्यायचे आहे. ख्रिस्त आत्मीय जीवनाची भाकर म्हणून स्वीकार करायचा आहे. भाकररूपी ख्रिस्त म्हणजेच ख्रिस्ताने दिलेली वचने जी आपल्या जीवनात आणि आपल्या आत्म्याला तृप्त करणारी आहेत. परंतु आपण मात्र शरीर मागे टाकून आपल्या जीवनाचा आपल्या आत्म्याचा नाश करीत असतो. सारे जग कमावले आणि स्वतःचा आत्मा गमावला तर काय लाभ. ख्रिस्त जीवनाची भाकर आहे. त्याचा स्वीकार करून या आणि आपल्या आत्म्याचे म्हणजेच आपल्या जीवनाचा उद्धार करूया. भाकररूपी ख्रिस्ताला जेव्हा आपण स्वीकारणार तेव्हा आपल्या स्वर्गाची वाट आपण मोकळी करणार, कारण ख्रिस्त म्हणतो मीच जीवन आहे.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्यावरील विश्वास दृढकरण्यास आम्हाला धैर्य व कृपादान दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या