सामान्यकाळातील ८वा सप्ताह
मंगळवार ३० मे २०२३
✝️
देवाच्या व तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमात पडलेल्या शिष्यांनी आपले सर्वस्व समर्पण करुन प्रभूला अनुसरण्याचा निर्णय घेतला होता. प्रभू येशूने आपल्या सर्व शिष्यांना आश्वासन देऊन म्हटले 'सुवार्ते करिता सर्वस्वाचा त्याग करणाऱ्यांस शंभरपटीने मिळेलच व त्याबरोबर सार्वकालिक जीवन मिळेल.' देवाला आपण काय समर्पण करणार आहोत ह्यावर आज चितंन करु या.
सार्वकालिक जीवनासाठी आपल्या प्रत्येकाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळावा म्हणून आपण प्रभू येशू बरोबरचे आपले ऐक्याचे संबंध तपासून पाहू या.
✝️
पहिले वाचन :बेन सिरा ३५:१-१२
वाचक : बेन सिरा या पुस्तकातून घेतलेले वाचन
"आदेशांचे पालन करणे म्हणजे शांतिबली अर्पण करण्यासारखे आहे."
कायद्याचे पालन करणे म्हणजे पुष्कळ दानार्पण करण्यासारखे आहे; आदेशाचे पालन करणे म्हणजे शांतिबली अर्पण करण्यासारखे आहे. उपकाराची परतफेड करणे म्हणजे अन्नबली अर्पण करण्यासारखे आणि शिक्षादान देणे म्हणजे उपकारबली अर्पण करण्यासारखे होय.दुष्कर्मापासून दूर राहिल्याने परमेश्वर संतुष्ट होतो आणि दुराचरणाचा त्याग हे पापाचे प्रायश्चित्त होते. रिकाम्या हातांनी परमेश्वरापुढे जाऊ नका, कारण ह्या सर्व गोष्टी आदेशांना धरून आहेत. सदाचारी माणसाच्या दानार्पणाने वेदीचा अभिषेक होतो आणि त्याचा आल्हाददायक सुवास सर्वोच्च प्रभूपर्यंत पोहोचतो.
सदाचारी माणसाचे बलिदान प्रभूला स्वीकारणीय आहे आणि त्याचे विस्मरण कधी होत नाही. उदार मनाने प्रभूची पूजा करा आणि तुमची प्रथमफळे अर्पण करण्यास कुचराई करू नका.
प्रत्येक दान प्रसन्न चित्ताने अर्पण करा आणि उल्हासित मनाने दशांश द्या. ज्या प्रमाणात सर्वोच्च देवाकडून तुम्हाला मिळाले आहे त्या प्रमाणात यथाशक्ती सर्वोच्च परमेश्वराला दान द्या. कारण प्रभू सदैव परतफेड करणारा आहे, तो सात पटीने परत करील. त्याला लाच दाखवू नका, ती तो स्वीकारत नाही. परमेश्वर असा न्यायाधीश आहे. तो पक्षपाती न्याय करत नाही म्हणून अधार्मिक बलिदानावर विसंबून राहू नका.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ५०: ५-८,१४,२३
प्रतिसाद : जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी तारण प्राप्त करून देईन.
१) "ज्यांनी यज्ञ करून माझ्याशी करार केला आहे,
त्या माझ्या भक्तांना माझ्याजवळ एकत्र करा."
आकाश त्याची न्यायपरायणता प्रकट करते,
देव स्वतः न्याय करणारा आहे.
२)“माझ्या लोकांनो, ऐका, मी बोलत आहे;
हे इस्राएल, मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो:
मी देव, तुझा देव आहे.
तुझ्या यज्ञासंबंधाने मी तुला बोल लावत नाही.
तुझे होमबली माझ्यापुढे नित्य आहेतच.
३)“देवाला आभाररूपी यज्ञ कर,
परात्परापुढे आपले नवस फेड,
जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझा गौरव करतो.
आणि जो सरळ मार्गाने चालतो
त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.
जयघोष
आलेलुया, आलेलुया!
हे परमेश्वरा, तुझा मार्ग मला दाखव; मला सरळ मार्गाने ने.
आलेलुया!
शुभवर्तमान मार्क १०:२८-३१
वाचक : मार्क लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्हांला सांप्रतकाळी आणि येणाऱ्या युगात छळवणुकीबरोबर शंभरपटीने सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही."
पेत्र येशूला म्हणू लागला, “पाहा, आम्ही सर्व काही सोडून आपल्या मागे आलो आहोत.” येशूने उत्तर दिले, "मी तुम्हांला नक्की सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरता आणि सुवार्तेकरिता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे, किंवा शेतीवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळवणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आईवडील, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. तरी पहिले ते शेवटले आणि शेवटले ते पहिले, असे पुष्कळ जणांचे होईल."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:सदाचारी माणसाचे दान देवाला आवडते, त्याचे विस्मरण कधी होत नाही. दान देताना उदार मनाने द्यावे. प्रसन्न चित्ताने द्यावे. गरजेच्या वेळी तत्परतेने द्यावे. परमेश्वर सातपटीने परतफेड करील हे प्रवक्त्यांते शब्द ध्यानी ठेवावे. याप्रसंगी प्रभू येशू मातापित्यासमोर एक महत्त्वपूर्ण आव्हान ठेवीत आहे. शुभवर्तमानाचा प्रसार करण्यासाठी आईबाप व कुटुंबीय यांनी मुलांना धर्मगुरू होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. लहानपणापासून ईश्वरी हाकेचे बीज मुलांच्या मनात पेरले व ते काळजीपूर्वक जोपासले तर त्याचे योग्य फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. परमगुरू पोप संत सहावे पॉल यांनी १९६४ साली भारत देशाला भेट दिली तेव्हा निरोपाचे शब्द सांगताना ते म्हणाले, “तुझीच मुले हे भारतवर्षा, यापुढे तुझा तारणाचे साधन बनतील.” गोरेगाव येथे संत पायस कॉलेज नावाचे विद्यालय भावी धर्मगुरूंना घडविण्यासाठी कार्यरत आहे. आपल्या युवकांची पाऊले या दिशेने वळावीत म्हणून कार्यरत राहू या.
प्रार्थना :हे प्रभू येशू, माझे हे जीवन तुझेच दान आहे. मी सर्वस्वी तुला शरण येतो. माझ्या संपूर्ण जीवनाचा ताबा, तू घे आणि तुझ्या इच्छा प्रमाणे मला वरदान दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या