Ticker

6/recent/ticker-posts

Marathi Bible Reading | Mary Mother of the Church | Monday 29th May 2023

सामान्यकाळातील ८वा सप्ताह 

सोमवार

२९ मे २०२३ 


पवित्र मारिया ख्रिस्तसभेची माता
आजचा सण 'पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता' हा असून २०१८ साली पोप फ्रान्सिस ह्यांनी पवित्र आत्म्याच्या सोहळ्यानंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी तो साजरा करण्यात यावा असे घोषित केले. पॅन्टेकोस्टच्या दिवशी पवित्र मरियेसह प्रेषितांवर पवित्र आत्म्याचा वर्षाव झाला. 

✝️

"पाहा, हा तुझा मुलगा. पाहा, ही तुझी आई."

✝️
             
पहिले वाचन : उत्पत्ती  ३:९-१५.२०
वाचक : उत्पत्ती ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तू आणि स्त्री यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन."

आदामने बऱ्यावाइटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाल्ल्यावर परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, “तू कोठे आहेस ?" तो म्हणाला, “मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून भिऊन लपलो.” देवाने म्हटले, "तू नग्न आहेस हे तुला सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्लेस काय ?’’
आदाम म्हणाला, “जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले," परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, “हे तू काय केलेस ?" स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घातली म्हणून मी ते खाल्ले.” तेव्हा परमेश्वर देव सर्पाला म्हणाला,
"तू हे केलेस म्हणून सर्व ग्रामपशू आणि वनचर यांपेक्षा तू शापग्रस्त आहेस.
तू पोटाने चालशील आणि आयुष्यभर माती खाशील.
तू आणि स्त्री,तुझी संतती आणि तिची संतती यांमध्ये मी परस्पर वैर स्थापीन.ती तुझे डोके ठेचील आणि तू तिची टाच फोडशील."
आदामाने आपल्या पत्नीचे नाव एवा ठेवले, कारण ती सर्व जीवधारी जनांची माता होती.
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र ८७:१-३,५-७
प्रतिसाद : परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.

१) परमेश्वराचे अधिष्ठान पवित्र पर्वतांवर आहे.
याकोबाच्या सर्व वसतीस्थानांहून सीयोनेची द्वारे त्याला अधिक प्रिय आहेत.

२) हे देवाच्या नगरी, तुझ्या वैभवाच्या कथा सांगतात;सीयोनेविषयीं म्हणतील कीं, हा आणि तो तिच्यांतच जन्मले होते, आणि परात्पर स्वतः तिला प्रस्थापित करील.

३) लोकांची नांवनिशी करितांना ह्याचा जन्म तेथलाच, असें परमेश्वर लिहील. गायन व नृत्य करणारे म्हणतील :"माझे सर्व उगम तुझ्याच ठायीं आहेत."


जयघोष                                                 

आलेलुया, आलेलुया! 
कारण 'त्याने' आपल्या 'दासीच्या दैन्यावस्थेचें 
अवलोकन केलें आहे.' पाहा, 
आतांपासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील;. 
आलेलुया!

शुभवर्तमान  योहान  १९:२५-२७

वाचक :  योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
 येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी, क्लोपाची पत्नी मरिया आणि मरिया माग्दालेना ह्या उभ्या होत्या. मग येशूने आपल्या आईला आणि ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, “बाई, पाहा, हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, “पाहा, ही तुझी आई" आणि त्यावेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले.
ह्यानंतर, आतां सर्व पूर्ण झालें आहे हें। जाणून येशूनें शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून, 'मला तहान लागली आहे.' असें म्हटलें. तेथे आंब भरून ठेवलेलें एक भांडें होतें; म्हणून त्यांनी आंब भरलेला स्पंज एजोब झाडाच्या काठीवर बसवून त्याच्या तोंडाला लावला. येशूनें आंब घेतल्यानंतर, 'पूर्ण झालें आहे,' असे म्हटलें आणि मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला. येशूच्या कुशीत भाला तो तयारीचा दिवस होता, म्हणून शब्बाथ दिवशीं शरीरें वधस्तंभावर राहू नयेत, कारण तो शब्बाथ मोठा दिवस होता, म्हणून त्यांचे पाय मोडावे आणि त्यांना घेऊन जावें अशी यहूद्यांनी पिलाताला विनंती केली. मग शिपायांनी येऊन त्याच्याबरोबर वध- स्तंभावर खिळलेल्या पहिल्याचे व दुसऱ्याचे पाय मोडले,  परंतु येशूजवळ आल्यावर तो मरून गेला आहे असें पाहून त्यांनी त्याचे पाय मोडले नाहीत;  तरी शिपायांतील एकानें त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि लागलेंच रक्त व पाणी बाहेर निघालें.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:पवित्र ख्रिस्तसभेतील तिच्या पुत्राकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकावर, पवित्र आत्मा यावा ही पवित्र मरियेची इच्छा ह्या मार्गाने पूर्ण झाली. पवित्र मरियेचे प्रभूयेशूच्या जीवनातील रहस्यावरील चिंतन पेन्टेकॉस्ट या दिवशी पूर्ण झाले. पवित्र आत्म्याच्या आगमनाने ख्रिस्तसभा संपूर्णतः स्थापन झाली त्याद्वारे प्रभूयेशूचे शुभवर्तमान जगाला देण्यासाठी, त्याच्या अनुयायांचा विश्वास वाढवून त्यांना सबळ केले. 'पवित्र मरिया ख्रिस्तसभेची माता' हा सण जरी अलीकडे स्थापित झाला असला तरी हा सण प्राचीन आहे. पोप फ्रान्सिस ह्यांनी या सणाची निर्मिती करताना सांगितले की, पाळकीय, व्रतस्थ आणि प्रापंचिक ह्यांना चर्च ही मातेसमान असल्याची जाणीव व्हावी तसेच पवित्र मारियेच्या भक्तीमध्ये वाढ व्हावी. आपण सर्वांनी ह्या सणाद्वारे आपल्या जीवनात पवित्र मरियेच्या पावित्र्याचा कित्ता गिरवावा व ती देत असलेल्या तिच्या पुत्राची कृपा स्वीकारावी म्हणून संपूर्ण ख्रिस्तसभेसाठी पवित्र मरियेकडे प्रार्थना करा.

प्रार्थना : हे ख्रिस्तसभेचे माते, तुझ्या पुत्राच्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून आम्हासाठी प्रार्थना कर.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️